आयुष्याच्या वळणावरती... (डॉ. यशवंत थोरात)

आयुष्याच्या वळणावरती... (डॉ. यशवंत थोरात)

‘मी फक्त माझ्या शर्तींवरच जगाला स्वीकारीन,’ असं म्हणत मी आयुष्याला सुरवात केली. आज ७० वर्षांनंतर मला हे समजलंय, की आपण जग स्वीकारण्याआधी आपण स्वत:ला स्वीकारलं पाहिजे आणि दुसरे जसे असतील, तसं त्यांना स्वीकारलं पाहिजे. ही गोष्ट जेव्हा मनात मुरते तेव्हा आपण अगदी सहजपणे जग आहे तसं स्वीकारतो. त्या वेळी आपल्याला कळतं, की एखादा माणूस जगात येतो, त्यापूर्वीही जग होतं आणि तो गेल्यानंतरही जग असणारच आहे.

बे  लच्या आवाजानं मी दचकून जागा झालो. पहाटेचे पाच वाजले होते. ‘एवढ्या पहाटे कोण आलंय,’ असं म्हणत मी थोडं कुरकुरतच दार उघडलं. पाहतो तर एका कुरिअर कंपनीचा माणूस हातात भलामोठा पुष्पगुच्छ आणि ओठांवर व्यावसायिक हास्य घेऊन बाहेर उभा होता. चुरचुरत्या डोळ्यांनी मी त्याच्याकडं पाहिलं. त्याच्या हातात एक भेटकार्ड होतं आणि ‘१७ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असं त्यावर लिहिलेलं होतं. तो पत्ता चुकला असावा, असं मला वाटलं. हे आमचं नाही, असं म्हणत मी माघारी वळत होतो, तेवढ्यात माझी पत्नी उषा पुढं आली.

-‘‘मीच ते पाठवलंय,’’ ती म्हणाली ः ‘‘आज तुमचा ७० वा वाढदिवस आहे,’’ तिनं आठवण करून दिली. ‘हल्ली ‘हॅपी १७’ असं म्हणत नाहीत, ‘हॅपी ७०’ असं म्हणतात. केकवर एकच मेणबत्ती ठेवल्यासारखं वाटतं. सतराच का, सात का नाही?’ असं मला विचारायचं होतं; पण मी ते टाळलं.
थोड्या वेळानं आमची मोलकरीण आली.
‘हॅपी बर्थ डे, साहेब,’ म्हणत तिनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेली तीस वर्षं ती आमच्याकडं काम करत आहे. आता कदाचित आमचा ड्रायव्हर आणि लिफ्टमनही येऊन शुभेच्छा देतील, असं मला वाटायला लागलं. काय चाललंय तेच मला कळत नव्हतं. जागा झाल्यानंतर अंथरुणातून बाहेर यायला मला ४५ मिनिटं लागतात. आज मात्र प्रत्येक गोष्ट कमालीच्या वेगानं घडत होती. मी उठतच होतो तेवढ्यात फोन वाजला.

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे’ कुणीतरी म्हणत होतं.
‘यशवंतराव, जिंदगी तो अब शुरू होती है. संध्याकाळी काय बेत आहे? उषाताईंबरोबर खास कुठं जेवायला जाणार आहात की काही पार्टी वगैरे? खरंतर मी तुम्हाला मध्यरात्रीच फोन करणार होतो,’ पलीकडचा माणूस ओसंडत्या उत्साहात सांगत होता. ध्यरात्रीच्या फोनच्या नुसत्या कल्पनेनंच माझ्या अंगावर काटा आला. उपचारापुरतं काहीतरी बोललो आणि चपळाईनं फोन ठेवून दिला.
थोड्या वेळानं उषानं मला एक पुस्तक दिलं.
‘‘हे घ्या, तुम्हाला हवं होतं ते पुस्तक,’’ ती म्हणाली. माझा मूड थोडा बरा झाला. त्या पुस्तकात एक कार्ड होतं. कुतूहलानं मी ते बघितलं. असे किती तरी वाढदिवस आले आणि गेले, किती तरी भेटवस्तू मिळाल्या...पण तिनं मला भेटकार्ड देण्याची गेल्या ४५ वर्षांतली ही फक्त दुसरी वेळ होती. तिनं पहिलं कार्ड आमच्या लग्नानंतर दिलं होतं. ते कार्ड मी आजपर्यंत जपून ठेवलंय. त्यात म्हटलं होतंः ‘येणाऱ्या वर्षात तुमची स्वप्नं प्रत्यक्षात येवोत. स्वप्नं आणि वास्तव यातलं संतुलन तुम्हाला साधता यावं, ही शुभेच्छा.’

या वेळच्या कार्डात लिहिलं होतं ः ‘चला, एकत्र चालू या. आतापर्यंतचा प्रवास कसा झाला, हे सांगण्याची वेळ आता आली आहे, असं वाटतंय. हा प्रवास, त्यातल्या घटना आणि तुम्हाला त्यात भेटलेले लोक, ज्यामुळं तुमचं व्यक्तिमत्त्व काही वेगळंच बनलं. एक वंडरफुल पर्सन.’ त्यातला ‘वंडरफुल पर्सन’ हा शब्द मला आवडला. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आम्ही नदीच्या काठावर फिरायला गेलो. आम्ही दोघंही शांत होतो. आपापल्या आठवणींत गुंतलो होतो. खरंच तो एक प्रदीर्घ प्रवास होता. माझ्या मनात काय चाललंय ते तिनं अचूक ओळखलं.

‘‘या प्रवासाविषयीच सांगा,’’ ती म्हणाली. - मला वाटतं की कुठलंही समर्पक कारण न देता ‘तू हीच गोष्ट कर,’ असं सांगणाऱ्यांविरुद्ध मी आयुष्यात संघर्ष केला.
‘का?’ या प्रश्नाला उत्तर न देता ज्यांनी त्यांचं म्हणणं ऐकण्याची सक्ती माझ्यावर केली ते मी कधी मान्य करू शकलो नाही; मग ती मोठी माणसं असोत, पुस्तकं असोत किंवा पोथ्या-पुराणं असोत. याबाबतीत मी त्या सगळ्या इतरांपेक्षा नक्कीच वेगळा होतो, ज्यांची मिळालेल्या लेखी सूचना निमूटपणे पाळण्याला काहीच हरकत नव्हती. माझा अशा अधिकारशाहीलाच विरोध होता. अशाच पद्धतीनं माझी जडणघडण झालीय. अगदी लहान असतानाही मी असाच वागायचो. सिमल्याच्या डोंगराळ भागातल्या कसौली इथं आमचं एक घर होतं. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथं जात असू. घराच्या मागच्या बाजूचं फाटक नेहमी बंद असायचं. त्या फाटकाच्या मागं एक छोटी दरी होती. मी एकदा सगळ्यांच्या नकळत मागच्या दाराची किल्ली चोरली, दरवाजा उघडला आणि त्या दरीत एक चक्कर मारली. ज्येष्ठ लेखक खुशवंतसिंग हे त्या वेळी आमच्या शेजारी राहत असत. त्यांच्याकडं पाहुणी म्हणून आलेल्या एका वृद्ध महिलेनं मला पाहिलं, घाईघाईनं वर बोलावून घेतलं आणि दरीत जाण्यातल्या धोक्‍याची मला कल्पना दिली. वर ‘अच्छे बच्चे ऐसा नही करते’ असं ती म्हणाली. माझा फ्यूज गेला...मी त्या वेळी अवघ्या दहा वर्षांचा असेन. त्या वृद्ध शीख महिलेकडं पाहत मी म्हणालो ः ‘आप क्‍या महात्मा बुद्ध का अवतार हो, जो मुझे सिखा रही हो?’ त्या वेळी त्या महिलेला आलेला राग आजही माझ्या स्मरणात आहे. कारण, हा प्रकार जेव्हा माझ्या आईला समजला तेव्हा मला चांगलाच मार बसला.

उषानंही माझ्या म्हणण्याला संमतीदर्शक मान डोलावली. ‘‘यशवंत, तू नेहमीच बंडखोर वृत्तीचा होतास, कोणत्याही गोष्टीचं वास्तव समजून घेणं आणि त्याच संदर्भात सगळ्या गोष्टींचा अन्वयार्थ लावणं हे तुझ्या स्वभावातच आहे. एकदा ऑफिसमध्ये एका नियमाबाबत ‘तो असा का आहे?’ असं विचारल्याबद्दल तुला फैलावर घेण्यात आलं होतं, ते आठवतंय का?’’ ती म्हणाली.

मलाही ते आठवलं. खरं तर तो सारा प्रकारच विनोदी होता. माझ्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून माझी नेमणूक विनिमय नियंत्रण विभागात करण्यात आली होती. आपल्याकडं तेव्हा परकीय चलन खूपच कमी प्रमाणात होतं; त्यामुळं त्यावर नियंत्रण असणं गरजेचं होतं. या खात्यातर्फे हे नियंत्रण ठेवलं जाई. यासंदर्भातली नियमावली म्हणजे जणू ब्रह्मवाक्‍यच होतं. हे काम पाहणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:ची बुद्धी न वापरता अंधपणे ती नियमावली अमलात आणावी अशी अपेक्षा असे. सगळेजण निमूटपणे तसं करत. मी एकदा एका नियमाचा अर्थ अर्जदाराला फायदा होईल अशा पद्धतीनं लावला. फाईल वर गेली आणि थोड्या वेळातच मला साहेबांचं बोलावणं आलं. लिहिलेली नोट साहेब वाचत होते आणि अविश्वास, संताप आणि गोंधळ या भावना त्यांच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला उमटत होत्या. ‘हे काय आहे?’ त्यांनी रागानं विचारलं. मला पटलेला नियमांचा अर्थ मी त्यांना सांगितला आणि ‘नियम करताना सामान्य बुद्धीला पटणारा तर्कसंगत विचार का केला गेला नाही?’ असं विचारलं. एखादी वीज कडाडावी किंवा आकाश कोसळावं तसं तेव्हा झालं. मी वापरलेला ‘सामान्य बुद्धी’ हा शब्द त्यांना खूपच झोंबला. काय बोलावं हे त्यांना सुचेना. त्या विभागातला माझा मुक्काम लवकरच हलला, हे वेगळं सांगायला नकोच. त्या आठवणीनं उषालाही हसू फुटलं. काही काळ तो आमच्या ऑफिसमध्ये चर्चेचा एक विषय बनला होता.

‘‘आता तुम्हाला त्याविषयी काय वाटतं?’’ तिनं विचारलं.
‘‘ फारसं वेगळं असं काही नाही’’ मी म्हणालो ः ‘‘ एखाद्यानं ‘हे कर’ किंवा ‘ते करू नको’ असं सांगणारी नियमावली माझ्या हातात दिली की आजही मी अस्वस्थ होतो; पण माझाच मुद्दा बरोबर आहे, असं पटवून देण्याची गरज आज मला वाटत नाही.’’
‘‘माझ्या ते लक्षात आलंय,’’ उषा म्हणाली. ‘‘मी आता अनुभवानं हे शिकलोय की प्रत्येक माणसाला स्वत:चा असा एक विचार करण्याचा अधिकार असतो. वाद-विवादानं फारसं काही निर्माण होत नाही. आपण काय कृती करतो, ते महत्त्वाचं असतं. कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी ‘का?’ असं विचारणं गरजेचं आहे, असं मला आजही वाटतं; पण कुठल्याही सामाजिक किंवा धार्मिक गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्यात कुणाला आनंद वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं मी आता मानायला लागलो आहे. सगळं जग काही मी सुधारू शकत नाही. शेवटी ते त्यांचं आयुष्य आहे. चूक की बरोबर हे कठीण शब्द आहेत आणि काही असलं तरी त्याबाबतचा निकाल देणारा मी कोण किंवा तसं पाहिलं तर अन्य कुणालाही हा अधिकार कसा पोचतो?’’ मी म्हणालो. उषानं त्यावर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘तशी भूमिका घेणं अतिशय धोकादायक असतं, यशवंत,’’ ती म्हणाली ः ‘‘प्रत्येकजण आपल्या नियमांप्रमाणे वागायला लागला आणि चांगलं आणि वाईट यांच्या व्याख्या स्वत:च ठरवायला लागला तर जगणंच अशक्‍य होईल.’’
‘‘मान्य आहे,’’ म्हणालो ः ‘‘पण प्रत्येकजणच असं वागत नाही. चौकशी आणि प्रयोगानंतर एखादा माणूस काही निष्कर्ष काढत असेल तर दीर्घ काळात सिद्ध झालेल्या निष्कर्षांपासून ते फार वेगळं असतं असं नाही. वास्तववादी प्राणी म्हणून आपण स्वत:च सत्य शोधायला नको का? जो समाज कुठलीही शंका न विचारता प्रत्येक गोष्ट मान्य करतो, तो शेवटी केवळ बौद्धिकच नव्हे, तर शारीरिक स्वातंत्र्यही गमावून बसतो.’’

‘‘वास्तवतेच्या संदर्भात थोरात, तुम्ही कालबाह्य आहात!’’ उषा म्हणाली ः
‘‘माणसाच्या तथाकथित वास्तववादावर आता लक्ष ठेवलं जात आहे. नोबेल पुरस्कारविजेते रिचर्ड थालेर यांनी ‘व्यक्तिगत निर्णय कसे घेतले जातात,’ याविषयी संशोधन केलंय. त्यांनी म्हटलंय की सकारात्मक पाठिंबा आणि अप्रत्यक्ष सूचना यांचा हेतूंवर नक्कीच परिणाम होतो, तसाच तो निर्णय घेणाऱ्या गटांवर आणि व्यक्तींवरही होतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर माणूस हा जितका असायला पाहिजे तितका वास्तववादी असत नाही; पण तू जो मुद्दा मांडत आहेस, तोही महत्त्वाचा आहे. माणूस स्वतंत्र विचार करू शकतो, याची त्याला सतत आठवण करून दिली नाही तर एक दिवस तो त्याची ही अमूल्य देणगी विसरून जाईल.’’
आम्ही बराच वेळ चालत होतो. नंतर आम्ही नदीकाठी एके ठिकाणी बसलो.
‘‘उषा, दुसरा एक प्रश्न मला कायम सतवत आलेला आहे व तो म्हणजे एखाद्यानं चांगलं का असलं पाहिजे हा,’’ मी म्हणालो.

‘‘म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?’’ उषानं विचारलं. ती म्हणाली ः ‘‘चांगलं वागायला कारण लागतं का? एखादा माणूस नैतिकतेनं वागतो, कारण तसं वागणं चांगलं असतं.’’
‘‘नक्कीच,’’ मी म्हणालो ः ‘‘पण याबाबत अनुभवातल्या गोष्टी काही वेगळंच सांगतात. दुष्टपणातून मिळणारा आनंद किवा उपभोग हा चांगुलपणातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा जास्त असतो.’’
माझ्या अपेक्षेप्रमाणेच उषा या मुद्द्यावर रागावली व म्हणाली ः ‘‘तुला असं म्हणायचंय का, की चांगल्या, सरळमार्गी जीवनापेक्षा नीतीला सोडून वागणूक अधिक स्वीकारार्ह आहे; कारण त्यातून जास्त फायदा मिळतो...? सर्वसाधारण चित्र बघ. जरी वाईट गोष्टी काही वेळा प्रभावी ठरत असल्या तरी अंतिम विजय सत्याचाच होत नाही का?’’
मी म्हणालो ः ‘‘ती वस्तुस्थिती आहे की चांगुलपणा सोडण्याची हिंमत नसणाऱ्या माणसांचा तर्क आहे? आपल्या शेजारच्यांचंच उदाहरण घे. ते डान्स बार चालवतात. अनेक वाईट गोष्टींत ते नेहमी सामील असतात. त्यांच्याकडं एक सुस्वरूप महिला नेहमी येत असते. त्यांची मुलगी परदेशात शिकत आहे आणि त्यांची पत्नी सुट्ट्यांमध्ये कायम पॅरिसला जात असते. ते नेहमी धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी उदारपणे देणग्या देत असतात. त्यांना कधी कुठला आजार झाला नाही की कधी कुठला अपघात झाला नाही. त्यांच्याबाबत कुठलीही वाईट गोष्ट कधी घडत नाही.’’
‘‘वरवरचं बोलू नकोस, ते तुला शोभत नाही,’’ उषा म्हणाली ः ‘‘तुझा मुद्दा पटवण्यासाठी अपवादात्मक उदाहरणं दिलीस तरी माझ्यासमोर त्यांचा उपयोग होणार नाही.’’

मी हसलो. तिचा हात हातात घेत म्हणालो ः ‘‘तुझा गैरसमज होतोय. मला काय म्हणायचंय ते तुझ्या लक्षात येत नाहीय. तत्त्वं किंवा मूल्यं नसलेल्या जीवनाचं मी समर्थन करत नाही किंवा मी अनैतिक जीवनाचा पुरस्कारही करत नाही. मी हे मान्य करतो की समाजात राहणाऱ्या माणसानं काही नीती-नियम हे पाळलेच पाहिजेत. त्याबाबत संशयच नाही; किंबहुना समाज जसजसा प्रगत होत जातो,
तसतसं हे नैसर्गिकपणेच घडत जातं. जर आपल्याला आपल्या मालमत्तेचा अनिर्बंध उपभोग घ्यायचा असेल तर आपण चोरी मान्य करू का? त्याच न्यायानं, जर आपल्याला आपलं आयुष्य अखेरपर्यंत चांगलं जगायचं असेल तर आपण जखमा मान्य करू का? मुळीच नाही. याचा अर्थ एकत्र जगणाऱ्या लोकांच्या आशा-आकांक्षांनाच पुढं नियमांचं रूप येतं. त्यांचेच पुढं कायदे बनतात. हे कायदे पाळले
जातील, हे कुणाला तरी पाहावं लागतं आणि काहींना त्याविषयीच्या वादात निवाडे करावे लागतात. यातूनच पोलिस आणि न्यायाधीश निर्माण झाले. यातूनच समाज निर्माण झाला आणि त्यातली गुंतागुंत वाढली.’’
‘‘तुला नेमकं काय म्हणायचंय?’’ उषानं विचारलं.
‘‘मला हा प्रश्न सतावतोय की समाजमान्यता हा नैतिकतेचा एकमेव आधार असतो का? चांगुलपणासाठी एवढा एकच मुद्दा पुरेसा आहे का? की त्यासाठी माणसानं निर्माण केलेल्या नीती-नियमांपेक्षा काही वेगळे नीती-नियम आहेत? नैतिक कृत्य म्हणजे काय, ते समजून घेण्यासाठी मी गेली ७० वर्षं झगडत आहे,’’ मी म्हणालो.
‘‘मग त्यात तुला यश मिळालं का?’’ उषानं विचारलं. तिचा राग आता थोडा शांत झाला होता.
मी म्हणालो ः ‘‘यशस्वी झालो की नाही हे सांगता येणार नाही; पण जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कान्ट यानं दिलेलं उत्तर मला समाधानकारक वाटतं. तो काय म्हणाला, त्यापेक्षाही त्यांनं ज्या पद्धतीनं हे समजावून दिलं, ते मला पटतं. त्यानं म्हटलंय ः ‘तीच खरी नैतिक कृती असते, की जिच्यामागचं तत्त्व सगळ्या जगाला लागू पडतं.’ ज्यामुळं आपण आनंदाला पात्र ठरतो, ती खरी नैतिक कृती मानायला पाहिजे. जर आपण सर्व विश्वाला मान्य होतील अशा नीती-नियमांचं पालन केलं तरच हे शक्‍य आहे.’’

‘‘हे मला खूप गूढ वाटतंय. सोप्या शब्दांत याचा काय अर्थ होतो?’’ उषानं विचारलं.
‘‘गौतम बुद्धांनी काय लिहिलंय ते वाच. बौद्ध धर्मात जे सांगितलंय त्यापेक्षाही बुद्धांनी ‘धम्मपदा’त जे म्हटलंय ते वाच. उदाहरणार्थ ः ‘कितीही अपरिहार्य वाटली तरी हिंसा करू नका,’ असा उपदेश त्यांनी केला आहे. माझ्या मते त्या उपदेशाप्रमाणे वागणं म्हणजे नैतिक वागणं होय. ज्यामुळं कुणाला वेदना होतील त्या गोष्टी म्हणजे राग, द्वेष, विश्वासघात, प्रेमातली प्रतारणा या गोष्टी आपोआपच अनैतिक ठरतात. केवळ समाज किवा धर्मग्रंथ म्हणतात म्हणून नव्हे, तर त्यामुळं विश्वाचं संतुलनच बिघडतं
म्हणून.’’
‘‘बाप रे, तुम्ही काय म्हणताय ते ध्यानात येतंय; पण चांगुलपणाला एवढा मोठा
तात्त्विक आधार असण्याची गरज आहे का?’’ उषानं विचारलं.
‘‘होय, असायला पाहिजे, माझ्यासाठी तर नक्की आहे’’- मी म्हणालो.
सावल्या आता लांब व्हायला लागल्या होत्या.

मी उषाला म्हणालो ः ‘‘तुला माहीत आहे का, की जवळपास सगळं आयुष्य मी चुका करत आणि प्रयत्नांनी त्या सुधारत जगलो. जे मिळालं ते स्वीकारून आणि त्यात समाधान मानून ज्यांनी वाटचाल केली, त्यांचा मला खरंच हेवा वाटतो. चांगुलपणाचे आदर्श असलेल्या या लोकांनी कुटुंबाचं प्रेम आणि वरिष्ठांची मर्जी सहजपणे संपादित केली. मी मात्र माझ्या शंका आणि अनिश्‍चितता यांच्याशी झगडत राहिलो. मी अगणित वेळा अडखळलो आणि पडलो. कित्येकदा मी जखमी झालो. त्या पार्श्वभूमीवर ‘गिरना भी जरूरी है सॅंभलने के लिए’ या उक्तीप्रमाणे मी प्रस्थापित श्रद्धांना आणि समजांना आव्हान देत गेलो. त्याची किंमत मला चुकवावी लागली. एक प्रकारे मी बाहेरचा, परका ठरलो. ‘मी फक्त माझ्या शर्तींवरच जगाला स्वीकारीन,’ असं म्हणत मी आयुष्याला सुरवात केली. आज ७० वर्षांनंतर मला हे समजलंय, की आपण जग स्वीकारण्याआधी आपण स्वत:ला स्वीकारलं पाहिजे आणि दुसरे जसे असतील, तसं त्यांना स्वीकारलं पाहिजे. ही गोष्ट जेव्हा मनात मुरते, तेव्हा आपण अगदी सहजपणे जग आहे तसं स्वीकारतो. त्या वेळी आपल्याला कळतं, की एखादा माणूस जगात येतो त्यापूर्वीही जग होतं आणि तो जातो त्यानंतरही जग असणारच आहे. निर्मिती ही नेहमीच संतुलित असते. असंतुलन हे माणसात असतं. माणसाला जेव्हा हे कळतं आणि तो ते दुरुस्त करतो तेव्हाच त्याला शांती मिळते!’’
आम्ही घराकडं परतलो. घर जसं जवळ आलं, तसं उषा म्हणाली ः ‘‘तुला माहीत आहे का
यशवंत, की तू थोडाही बदललेला नाहीस आणि तू बदलावंस अशी माझी इच्छाही नाही. जसा आहे तसाच राहा...’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com