शाबूत राहिली पत (डॉ. यशवंत थोरात)

शाबूत राहिली पत (डॉ. यशवंत थोरात)

‘‘दहा-बारा भारतीय जवान तुरुंगात संतप्त कैद्यांच्या घोळक्‍यात सापडले होते. लाठ्या आणि दगड हातात घेतलेले चिडलेले कैदी त्यांच्या दिशेनं पुढं सरकत होते. एकास पन्नास असं जवान आणि कैदी असं प्रमाण होतं; पण तरीही भारतीय जवानांनी कैद्यांवर प्रतिहल्ला करण्याची तयारी केली. त्या स्थितीत शांत राहणं महत्त्वाचं आहे, हे ओळखून कमांडर पुढं झाले आणि कैदी आणि जवानांच्या मध्ये उभं राहून त्यानी शांतपणे सिगरेट पेटवली. त्यांच्या या कृतीनं कैद्यांचा जमाव गोंधळला. दरम्यानच्या काळात त्यांच्या सहायक अधिकाऱ्यांनी जादा सैनिक मागवून घेऊन बाहेरून कंपाऊंडला वेढा घातला. दोन्ही बाजूंच्या संतप्त जमावात उभ्या असलेल्या कमांडरनी आपल्या आदेशाशिवाय एकही गोळी झाडण्यात येऊ नये, असं बाहेरच्या जवानांना ओरडून सांगितलं.’’

परदेशातला थोडा लांबलेला मुक्काम आटोपून मी परतलो. पाहतो तर टेबलावर कागदांचा. पत्रं, बिलं, मासिकं. बरेच तास खपून मी त्या ढिगाचा जवळपास निपटारा केला; पण आता मला थोडी विश्रांती हवी होती. एवढ्यात पत्नी उषानं पुकारा केला ः ‘‘चहा तयार आहे, यशवंत, राघव चला...’’ मी उठलो; पण टेबलावरच्या ‘इकॉनॉमिस्ट’च्या एका जुन्या अंकानं माझं लक्ष वेधून घेतलं. त्या अंकाच्या मुखपृष्ठावर अमेरिकेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा सत्ताधीश किम जोंग यांचं, अणुचाचणीनंतर निर्माण झालेल्या ढगाच्या पर्श्वभूमीवरचं छायाचित्र होतं. छायाचित्राच्या खाली लिहिलं होतं ः ‘असं घडू शकतं!’ चहा घेताघेता वाचता येईल म्हणून मी तो अंक घेऊन आत गेलो.
राघव थोडा उशिराच आला. ‘‘कुठं होतास,’’ त्याच्या आजीनं विचारलं. ‘‘पणजोबांच्या खोलीत,’’ राघवनं समोरच्या डिशमधला केक उचलत सांगितलं. त्याच्या उत्तरावर थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. शांततेचा भंग करत राघवनं विचारलं ः ‘‘आजी चक्रपट्टी म्हणजे काय?’’
‘‘चक्र म्हणजे चाक,’’ उषानं उत्तर दिलं.
‘‘पण पणजोबांना अशोकाचं चाक कुणी कां दिलं,’’ राघवनं पुन्हा विचारलं. ‘‘अच्छा, म्हणजे तुला अशोकचक्र म्हणायचंय का,’’ उषानं विचारलं. ‘‘ते चाक नाही, गौरवपदक आहे,’’ ती म्हणाली. कोरियात बजावलेल्या कामगिरीबद्दल तुझ्या पणजोबांना (द्वितीय श्रेणी) अशोकचक्र प्रदान करण्यात आलं होतं. आता त्याला ‘कीर्तीचक्र’ म्हणतात.
‘‘पणजोबा कोरियात कशासाठी गेले होते,’’ राघवची प्रश्‍नांची साखळी संपत नव्हती.
भूतकाळ आणि वर्तमानकाळ एकाचवेळी समोरासमोर उभे राहिल्यासारखं मला वाटलं. मी पाच वर्षाचा असतानाचा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्या दिवशी मला घरात बोलवून घेण्यात आलं. वातावरण गंभीर होतं. माझ्या दोन्ही बहिणी अगोदरच तिथं पोचल्या होत्या. त्यांचे चेहरे रडल्यासारखे दिसत होते. ‘‘बाबा कोरियाला चाललेत,’’ आईनं सांगितलं.

‘‘तुम्ही का चाललात,’’ मी बालसुलभ भावनेनं विचारलं. ‘‘तिथं शांतता निर्माण करण्यास मदत करण्यासाठी,’’ त्यांनी शांतपणे सांगितलं. कोरिया नेमका कुठं होता आणि तिथं शांतता निर्माण करण्यासाठी बाबांची काय गरज होती हे मला समजत नव्हतं. एवढ्यात त्यांनी त्यांच्या बळकट हातांनी मला सहजपणे उचलून घेतलं. माझा चेहरा थेट त्यांच्या चेहऱ्यासमोर आणून म्हणाले ः ‘‘गुड बाय, सन. मी परत येईपर्यंत आईची आणि तुझ्या बहिणींची काळजी घे.’’
राघवनं पुन्हा विचारलं ः ‘‘पणजोबा कोरियाला कशासाठी गेले होते?’’ ‘‘सांगतो,’’ मी म्हणालो. अभ्यासिकेत गेलो आणि ॲटलास घेऊन आलो.
‘‘रशिया, चीन आणि जपान यांच्या मधोमध असलेलं कोरिया हे एक द्वीपकल्प आहे. हे तिन्ही बलाढ्य देश आहेत. १९१०मध्ये जपाननं कोरिया ताब्यात घेतलं. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करेपर्यंत म्हणजे १९४५ पर्यंत कोरिया जपानच्याच ताब्यात होता. युद्ध संपल्यानंतर जेते ‘जीत’ राष्ट्रांच्या विभाजनास बसले, तेव्हा रशियाचं सैन्य आधीच उत्तर कोरियात दाखल झालं होतं. अमेरिकी सैन्य मात्र त्यावेळी बरंच लांब होतं. कोरियात कम्युनिझम वाढण्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेनं घाईघाईनं उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या विभाजनास मान्यता दिली आणि ३८ अक्षांशावर कोरियाची विभागणी करण्यात आली. चीन, ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेकडं या देशांचं संयुक्त प्रशासन ठेवण्यात आलं.

‘‘त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघात तीन वर्षं चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन स्वतंत्र देशांना जागतिक समुदायानं मान्यता दिली. उत्तरेत लोकशाही प्रजासत्ताक कोरिया आणि दक्षिणेत कोरियन प्रजासत्ताक स्थापन करण्यात आलं. त्यानंतर रशिया आणि अमेरिकेनं कोरियातून आपापलं सैन्य मागं घेतलं. दोन्ही कोरियांतली सीमारेषा धगधगतच राहिली आणि चकमकी झडतच राहिल्या.
‘‘२५ जून १९५० रोजी उत्तर कोरियाच्या रणगाड्यांनी ३८ वं अक्षांश ओलांडत दक्षिण कोरियात प्रवेश केला. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन त्यांच्या घरी भोजन घेत होते. त्यावेळी त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी परिस्थितीची माहिती देण्यासाठी फोन केला. ही केवळ सीमेवरची चकमक नसून खरीखुरी लढाई आहे, हे त्यांना सांगण्यात आलं, तेंव्हा ट्रुमन तातडीनं वॉशिंग्टनला परतले. उत्तर कोरियाच्या हल्ल्यामागं रशिया आणि चीनचा अदृश्‍य हात आहे, हे त्याना माहीत होतं. दक्षिण कोरियाला तातडीनं मदत देण्याची त्यांची तयारी होती; पण अमेरिकी मदत पोचेपर्यंत ते तग धरतील किंवा नाही याची त्यांना खात्री नव्हती.

‘‘बरोबर ४८ तासांनी त्यांचा सचिव बाहेर आला आणि व्हाइट हाऊसच्या लॉबीत ताटकळत वाट पाहणाऱ्या सुमारे शंभर पत्रकारांना त्यांनी अध्यक्षांचं निवेदन वाचून दाखवलं. एकदम शांतता पसरली. उत्तर कोरियाच्या आक्रमणाला दिलेलं हे आतापर्यंतचं सर्वांत सडेतोड उत्तर होतं. ‘कम्यनिस्टांना सर्व स्वतंत्र देश लष्करी आक्रमण आणि युद्धाच्या मार्गानं जिंकून घ्यायचे आहेत, हेच दक्षिण कोरियावरच्या आक्रमणावरून सिद्ध होतं आहे,’ असं अध्यक्षांनी त्या निवेदनात म्हटलं होतं. वेळोवेळी आवाहन करून आणि चकमकी थांबवून सैन्य मागं घेण्याचा इशारा देऊनही, उत्तर कोरियानं त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यासाठी सुरक्षा परिषदेनं सदस्य देशांना मदतीचं आवाहन केलं. ‘‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या रक्षणासाठी मी अमेरिकेच्या  नौदल आणि हवाई दलाला दक्षिण कोरियाच्या सैन्यदलांना मदत करण्याचा आदेश दिला आहे.’’  पत्रकार बातमी देण्यासाठी पांगले. हे निवेदन अमेरिकी काँग्रेसमध्ये वाचण्यात आलं, त्यावेळी ‘अध्यक्षांना युद्धच पुकारायचंय का,’ असा सदस्यांपुढं प्रश्न पडला. मात्र, अध्यक्षांच्या अहवालाला मान्यता देण्यात आली
लष्करी कारवाई पुढं तीन वर्षं चालू राहिली. त्यात ३३ हजार अमेरिकी सौनिक मारले गेले. निष्णात सेनानी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याचे पहिले कमांडर, जनरल डग्लस मॅकऑर्थर यांची हकालपट्टी केली गेली. सीआयएसारख्या अमेरिकी गुप्तहेर संघटनेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला, कोरियन जनता दोन परस्परविरोधी विचारसरणींत दुभागली गेली. त्यातून असं वातावरण निर्माण झालं, की सात दशकानंतरही अमेरिकेचे अध्यक्ष आणि उत्तर कोरियाचे नेते यांचा अणुचाचणीच्या पार्श्वभूमीवरचा फोटो ‘इकॉनॉमिस्ट’च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाला.
‘‘युद्ध संपलं आणि जुलै १९५३ मध्ये शांतता करार झाला. मात्र, तोपर्यंत उत्तर कोरियाचे १३ लाख आणि दक्षिण कोरियाचे ३२ लाख सैनिक आणि नागरिक मरण पावले. आपल्या सहकारी कम्युनिस्टांच्या बचावासाठी युद्धात उतरलेले साठ हजार चिनी सैनिक ठार वा बेपत्ता झाले.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धबंदी करारात दोन संस्थांची स्थापना करण्यात आली. तटस्थ राष्ट्रांची एक समिती (एनएनआरसी). यात भारत, स्वीडन, स्वित्झर्लंड, पोलंड आणि चेकोस्लाव्हाकिया या देशांचा समावेश होता. एक शांतिसेना, कस्टोडियन फोर्स ऑफ इंडिया (सीएफआय) स्थापन करण्यात आली. या दलाचं नियंत्रण पूर्णपणे भारताकडं ठेवण्यात आले. लेफ्टनंट जनरल के. एस. थिमय्या यांच्याकडं एनएनआरसीचं नेतृत्व, तर तुझ्या पणजोबांकडं सीएफआयचं नेतृत्व देण्यात आलं.’’
‘‘वॉव!’’ राघव उद्‌गारला. ‘‘पण हे सांगण्यासाठी तुम्ही एवढा वेळ का लावला?’’आजूबाजूला पाहत तो म्हणाला ः ‘‘आजीनं केकची डिश आत का नेली?’’
‘‘ते तू तिलाच विचार,’’ मी म्हणालो.
‘‘ठीक आहे,’’ म्हणत तो आत गेला आणि हातात केकचा एक स्लाईस घेऊन पुन्हा बाहेर आला. ‘‘तुम्हाला पाहिजे का?’’ मी नको म्हटलं. ‘‘बरं, पुढं सांगा,’’ त्यानं जणू आज्ञाच केली. माझ्यात लष्करी अधिकाऱ्याची छाप का नाही, ते त्यावेळी मला कळलं. मी निमूटपणे सांगायला सुरवात केली ः
‘‘युद्धबंदीनंतर हजारो सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आलं. ते सर्वजण शांतपणे घरी परततील, याची जबाबदारी एनएनआरसी आणि सीएफआयकडं सोपवण्यात आली.’’
‘‘त्यात काय विशेष आहे,’’ राघवनं  शंका उपस्थित केली. ‘‘ प्रत्येकाला घरी परतण्याची ओढ असेलच.’’

‘‘सर्वसाधारण अपेक्षा तीच असते आणि त्यामुळंच आंतरराष्ट्रीय कायद्यात प्रत्येक युद्धकैदी त्याच्या घरी परतला पाहिजे, असा नियम करण्यात आला आहे. मात्र, इथं जगाच्या इतिहासात प्रथमच असं घडत होतं, की हे युद्धकैदी घरी परतायला तयार नव्हते. कारण परत आलात तर तुमचा अपमान होईल, एवढंच नव्हे, तर अनन्वित छळ करून तुम्हाला ठार केलं जाईल, असं त्याच्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांना परत पाठवण्याची कामगिरी अतिशय कठीण बनली होती.’’
आमचं बोलणं सुरू असतानाच उषा बाहेर आली. ‘‘जरा तुम्ही पुन्हा सांगाल का,’’ ती म्हणाली.
‘‘या सैनिकांवर एवढं प्रचंड मानसिक दडपण होतं, की दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या घरी परत जाण्यास तयार नव्हते. एका बाजूला जीनिव्हा करारानुसार प्रत्येक सैनिकाला त्याच्या घरी परत पाठवणं अनिवार्य होतं आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणं सैनिकांना त्यांच्या इच्छेनुसारच पाठवणं गरजेचं होतं. त्यामुळंच खरा पेच निर्माण झाला होता.’’
‘‘बापरे, केवढी गोंधळाची स्थिती होती,’’ उषा म्हणाली.
‘‘पुढं तर स्थिती अधिकच गंभीर बनली,’’ मी म्हणालो. ‘‘एखाद्या युद्धकैद्याला परत जाण्याची इच्छा आहे, अशी बातमी पसरली, तर त्याची स्थिती अगदी मेल्यासारखी होत असे. अशा कैद्याच्या शरीराचे तुकडे करून ते कंपाऊंडमध्ये फेकून दिले जात. मृत्यूच्या या तांडवाच्या मागं तथाकथित बडी राष्ट्रं असत- ज्यांना एखाद्या कैद्यानं स्वखुषीनं परत जाणं हा वैचारिक पराभव वाटत असे. कम्युनिस्ट आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भांडवलशाही देश या दोघांचीही धारणा तीच होती. कोरियाच्या संदर्भात कैद्यांच्या हस्तांतराचा प्रश्‍न सगळ्यात स्फोटक होता, याबाबत तज्ज्ञांचं एकमत आहे. पूर्ण निःपक्षपातीपणानं तो हाताळला नसता, तर पुन्हा युद्ध होण्याची शक्‍यता होती.

‘‘याचा अंदाज असल्यामुळंच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सीएफआयच्या जवान आणि अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, की ‘तुम्ही शांतता निर्माण करण्याच्या महत्त्वाच्या कामगिरीवर जात आहात. त्यामुळं तुमच्या मनात सगळ्यांविषयी प्रेम असलं पाहिजे. कुणाविषयीच द्वेष भावना असता कामा नये. ही कठीण कामगिरी भारताकडं सोपवली जाणं हा एकप्रकारे भारताचा गौरव आहे. तुम्ही तो गौरव कायम राखाल आणि भारताचं नाव उज्ज्वल कराल असा मला विश्वास वाटतो.’ माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, की ‘सीएफआयचं बोधवाक्‍य फॉर द ऑनर ऑफ इंडिया (For The Honour of India) याच भावनेतून तयार केलं गेलं होतं.’ तुझ्या पणजोबांना अशोकचक्र मिळालं राघव, कारण ते या बोधवाक्‍यासाठी जगले म्हणून.’’
‘‘आजोबा नेमकं काय झालं ते सांगा,’’ राघवनं उत्सुकतेनं विचारलं.

‘‘तो दिवस होता- २४ सप्टेंबर १९५३. वाँग चू या चिनी सैनिकानं आपली परत जाण्याची तयारी असल्याचं सीएफआयला सांगितलं. या निर्णयाच्या विरोधात मोठी निदर्शनं होण्याची भीतीही त्यानं व्यक्त केली. त्याची ही भीती खरी ठरली. दुसऱ्या दिवशी युद्धकैद्यांच्या सर्व छावण्यांमध्ये जोरदार निदर्शनं झाली. सर्व कैद्यांनी वाँग चूला परत बोलावण्याची मागणी केली. त्याला घरी पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, तेव्हा सगळ्या युद्धकैद्यांनी उपोषण आंदोलन सुरू केलं आणि छावणीच्या परिसरात हिंसाचार सुरू झाला. ही माहिती मिळताच दलाचे कमांडर कैद्यांच्या कंपाऊंडकडं धावले. तिथलं वातावरण अतिशय तणावपूर्ण होतं; पण तरीही त्यांनी त्या तुरुंगाची दारं उघडायला लावून काही सैनिकांसह आत प्रवेश केला. सार्जंट वाँग चू याला आधीच पाठवण्यात आलं असल्यामुळं आता निदर्शनं करणं निरर्थक आहे, असं कैद्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेले कैदी काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळं ते तुरुंगाच्या बाहेर जाण्यासाठी निघाले. गेटमधून बाहेर पडणार एवढ्यात त्यांना त्यांच्यामागं मारामारी झाल्याचा आवाज आला. त्यांनी पाहिलं, तर सुमारे वीस कैदी एका अधिकाऱ्याला ओढत मागं नेत असल्याचं दिसलं. त्याच्या जीवाला धोका असल्याचं लक्षात येताच ते मागं फिरले आणि दोन अधिकारी आणि काही जवानांसह त्या घोळक्‍याच्या मागं गेले. मात्र, कैद्यांचा एक मोठा जमाव आडवा आला आणि त्यानं त्यांची वाट आडवली. एवढ्यात कैद्यांनी आणखी जवान आत येऊ नयेत, म्हणून कंपाऊंडचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला. आत असलेले दहा-बारा भारतीय जवान संतप्त कैद्यांच्या घोळक्‍यात सापडले होते. लाठ्या आणि दगड हातात घेतलेले चिडलेले कैदी त्यांच्या दिशेनं पुढं सरकत होते. एकास पन्नास असं जवान आणि कैदी असं प्रमाण होतं; पण तरीही भारतीय जवानांनी कैद्यांवर प्रतिहल्ला करण्याची तयारी केली. त्या स्थितीत शांत राहणं महत्त्वाचं आहे, हे ओळखून कमांडर पुढं झाले आणि कैदी आणि जवानांच्या मध्ये उभं राहून त्यानी शांतपणे सिगरेट पेटवली. त्यांच्या या कृतीनं कैद्यांचा जमाव गोंधळला. तो थांबला; पण त्यांच्याकडून शिव्यांचा भडिमार सुरूच होता. दरम्यानच्या काळात कमांडर आणि त्यांच्याबरोबरच्या जवानांना धोका असल्याचं लक्षात घेऊन त्यांच्या सहायक अधिकाऱ्यांनी जादा सैनिक मागवून घेऊन कंपाऊंडला वेढा घातला. हा अगदी अखेरचा उपाय होता, हे कमांडरना माहीत होतं. वातावरण तलवारीच्या धारेवर चालल्यासारखं कमालीचं तणावपूर्ण होतं. बाहेरच्या जवानांकडून चुकून एकही गोळी झाडली गेली असती, तर आत हिंसाचार भडकून अनर्थ ओढवला असता आणि जगात भारताची बदनामी झाली असती. दोन्ही बाजूंच्या संतप्त जमावात उभ्या असलेल्या कमांडरनी आपल्या आदेशाशिवाय एकही गोळी झाडण्यात येऊ नये, असं बाहेरच्या जवानांना ओरडून सांगितलं.

‘‘एवढ्यात जवळचा एक कैदी त्यांच्याशी इंग्रजीत काहीतरी बोलला. कैद्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीनं ही सुदैवाचीच गोष्ट होती. त्याच्यामार्फत त्यांनी इतर कैद्यांशी संवाद साधत, पकडलेल्या भारतीय अधिकाऱ्याला सोडण्याचं आवाहन केलं. त्यांनी नकार दिला. कमांडर यांनी पुन्हा समजावून सांगितलं. यात बराच वेळ गेला. तणावामुळं कमांडर थकले होते आणि त्यांना सिगरेट ओढण्याची  गरज भासली. त्यानी पाहिलं तर त्यांची सिगरेट केस रिकामी होती. ती रिकामी केस त्या इंग्रजी जाणणाऱ्या चिनी कैद्याला दाखवत ते म्हणाले ः ‘तू असा कसा चिनी आहेस? आम्ही गेल्या तासाभरापासून तुमचे पाहुणे आहोत आणि आम्हाला साधा कपभर चहा किंवा एखादी सिगरेट द्यावी वाटलं नाही? तुमची परंपरागत आतिथ्यशीलता आणि ज्यासाठी तुम्ही चिनी लोक जगभर ओळखले जाता तो चांगुलपणा गेला कुठं?’
‘‘या वाक्‍यामुळं तो चिनी कैदी क्षणभर गोंधळला. त्यानं एकदा कमांडरांकडं पाहिलं आणि मागं वळून चिनी भाषेत काहीतरी ओरडला. सगळ्या घोळक्‍यात एकदम चलबिचल झाली. काही कैदी वेगवेगळ्या दिशांना धावले आणि थोड्याच वेळात हातात चहाचे मग आणि सिगारेटची पाकिटं घेऊन परत आले. त्यांनी कमांडर आणि अन्य जवानांची क्षमा मागत त्यांना चहा आणि सिगरेट दिली.

‘‘पणजोबांनी त्यांच्या आठवणीत लिहिलंय ः ‘त्या एका वाक्‍यानं जादूची कांडी फिरावी, तशी स्थिती क्षणार्धात बदलली आणि संघर्षाऐवजी एकदम मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झालं. त्या एका वाक्‍यानं त्यांच्या परंपरेविषयीच्या अभिमानाला स्पर्श केला आणि आपली चूक सुधारण्याची त्यांच्यात जणू स्पर्धाच लागली. त्यांनी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याला सोडलं आणि तणाव निवळला. पुन्हा बोलणी सुरू झाली. मात्र, आता वातावरण भारताच्या बाजूनं झुकलं होतं. वाँग चूला परत बोलावणं शक्‍य नसलं, तरी कैदी तशी मागणी करणारं निवेदन देऊ शकतात, ते निवेदन आपण एनएनआरसीपुढं मांडू, असं आश्वासन मी दिलं. कैद्यांनी ते मान्य केलं आणि कुठलीही अनुचित गोष्ट न घडता प्रश्‍न मिटला.’
‘‘तुझ्या पणजोबांना मिळालेल्या मानपत्रात त्यावेळी नेमकं काय घडलं, याचा असा उल्लेख करण्यात आला आहे : ‘या कृतीनं त्यांनी केवळ कैद्यांच्या ताब्यात असलेल्या मेजर ग्रेवाल या अधिकाऱ्याचे प्राण वाचवले नाहीत, तर ज्यात अनेकांचा जीव गेला असता असा हिंसाचार टाळला.’ मेजर जनरल थोरात यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जी कामगिरी बजावली, त्याचं सर्व थरांतून कौतुक झालं. ते तिथून निघाले, तेव्हा कैद्यांनीही त्यांना मानवंदना दिली. भारतीय लष्कराच्या उच्च परंपरेला साजेशी अशीच ही कामगिरी होती.

‘‘नंतरच्या आयुष्यात ‘तुम्ही आपला जीव धोक्‍यात घालून मेजर ग्रेवाल यांना वाचवायला का गेलात,’ असा प्रश्न अनेकांनी त्यांना विचारला.’’
‘‘मी तेच विचारणार होतो,’’ राघव म्हणाला.
‘‘ते नेहमी म्हणायचे, की ही फार मोठी गोष्ट होती असं मला वाटत नाही. उलट माझ्या जागी कोणताही कमांडर असता तर त्यानं हेच केलं असतं. कोणत्याही कमांडरनं त्याच्या उपस्थितीत त्याच्या सहकाऱ्याला कुणी पळवून नेणं सहन केलं नसतं. शिवाय मला असलेल्या धोक्‍याबद्दल विचार करायला वेळच नव्हता. आयुष्यात अनेक गोष्टी अशा असतात, की आपण त्या मुद्दाम करत नाही, तर त्या सहजपणे होऊन जातात.
‘‘तर हे असं घडलं. ही मोठीच गोष्ट आहे. त्यांचं कोरियात फार कौतुक झालं असेल,’’ राघव म्हणाला.
‘‘नाही, उलट त्यांना आधी त्याबद्दल बोलणी खावी लागली. त्यांनी मला एकदा सांगितलं, की या घटनेनंतर मेजर जनरल जे. एन. चौधरी यांनी त्यांना फोन करून या कृत्याबद्दल, स्वत:चा जीव धोक्‍यात घातल्याबद्दल तत्कालीन लष्करप्रमुख आणि पंतप्रधानांची नाराजी त्यांच्यापर्यंत पोचवली. ते सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना वैयक्तिक शौर्याबद्दल अशोकचक्र आणि राष्ट्रीय सेवेबद्दल पद्मश्री प्रदान करण्याच्या राष्ट्रपतींच्या  निर्णयाची माहिती दिली.’’  
‘‘व्वा, ग्रेटच,’’ राघव म्हणाला. ‘‘आजोबा आता तुम्ही शांतपणे तुमचं मासिक वाचू शकता.’’

मी हातातल्या ‘इकॉनॉमिस्ट’च्या अंकाकडं आणि त्यावरच्या ट्रम्प आणि किम यांच्या चित्राकडं पुन्हा बघितलं. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वसुरींनी युद्ध छेडलं होतं. या दोघांना तरी आता शहाणपण सुचेल का असा प्रश्न मला पडला. याबद्दल तज्ज्ञांचं एकमत नाही. इतिहासात असे अनेक दाखले आहेत, की श्रीमंत आणि शक्तिशाली देश युद्धाच्या पटावर नेहमीच आपलं सैन्य आणि नौदल घुसवतात. युद्ध होतात. सैनिक मरतात. त्यांच्या बायकांना वैधव्य येतं. मुलं निराधार होतात; पण इतिहास असंही सांगतो, की ही युद्धं आणि संहार होत असतानाही माणसं आणि देशांमधल्या चांगुलपणाचा आणि शांतताप्रियतेचा प्रत्यय अनेकदा येतो. एका बाजूला संघर्ष ही माणसाची ओळख असेल, तर दुसऱ्या बाजूला समजूतदारपणा हीही माणसाची ओळख आहे. जशी कोरियामध्ये खूप पूर्वी अत्यंत तणावपूर्ण स्थितीतही, नव्यानं स्वतंत्र झालेल्या एका देशाचे जवान आणि अधिकारी यांनी शांततेवरची निष्ठा ढळू दिली नाही. कारण: देशाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी त्यांना तिथं पाठवण्यात आलं होतं....फॉर द ऑनर ऑफ इंडिया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com