दायरे इश्‍क में अपना मकाम पैदा कर... (डॉ. यशवंत थोरात)

दायरे इश्‍क में अपना मकाम पैदा कर... (डॉ. यशवंत थोरात)

एक लक्षात घ्या... संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना? मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया! फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक म्हणजे, बाह्यजगतातल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रातल्या अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि दुसरा म्हणाल तर मनातल्या अंधकाराविरुद्धचा संघर्ष!

‘या रविवारी काही आम्ही येत नाही,’ असा त्यांनी निरोप पाठवला. खरं म्हणजे त्यांच्या या निरोपानं मला ‘हुश्‍शऽऽऽ’ वाटायला हवं होतं; पण मी थोडासा निराश आणि काहीसा उद्विग्न झालो.

त्यांना माझ्या मनात असं घर मी का निर्माण करू दिलं असा मलाच प्रश्‍न पडला. तो एक मूर्खपणाच होता. मी काही त्यांचा स्थानिक पालक नव्हतो किंवा तसा त्यांच्याशी बांधलेलाही नव्हतो. आम्ही केवळ एकमेकांसोबत जाणारे काही घटकांचे प्रवासी होतो. इच्छित स्थळ आलं की नकळत दूर होणारे. त्यामुळं त्यांचा एवढा विचार करणं हा खरोखर मूर्खपणाच होता; पण त्यांच्या निरोपामुळं मी वैतागलो होतो, हेही तितकंच खरं होतं. चेहऱ्यावर मात्र मी तसं भासू देत नव्हतो. त्यांच्या या साप्ताहिक भेटीची मी मनापासून वाट बघत असे. त्यांचा गोंधळ, आरडाओरडा, त्यांचं सातमजली हास्य, एकमेकांना टाळ्या देणं, ते माझ्यावर सहजपणे दाखवत असलेला हक्क आणि माझं घर जणू आपलंच आहे, असं मानून ते घालत असलेला धुमाकूळ या सगळ्या गोष्टी मला आतल्या आत कुठंतरी खूप आवडत होत्या. आमच्या गप्पा, त्यांच्या प्रश्‍नांच्या फैरी आणि त्यावर झडणारे वादविवाद यांची मजा काही औरच होती होता. त्या सगळ्यात मी कसा गुंतलो, हे माझं मलाच कळलं नव्हतं. सत्य हे होतं, की म्हातारपण नेहमी एकाकीपणा सोबत घेऊन येतं. आपली मुलं त्या वेळी आपल्याजवळ नसतात... त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं; त्यांचं आकाश त्यांना खुणावत असतं. त्यांच्या आकांक्षा, त्यांचे मित्र आणि त्यांची नवी क्षितिजं... मुलांनी पुनःपुन्हा, सारखं सारखं यावं असं आपल्याला त्या वेळी वाटत असतं खरं; पण आपल्या तारुण्याच्या काळात आपण आपल्या आई-वडिलांना कितीदा भेटत होतो, असाही विचार मनात आला. ‘ठीक आहे’ असं म्हणत मी स्वतःचीच समजूत घातली. थोड्या उदास मनानं कॉफी बनवली आणि पाय ओढत वरच्या मजल्यावरच्या अभ्यासिकेत गेलो.
कॉफीचे घुटके घेत मी खुर्चीवर बसलो आणि दिवाळी अगदी जवळ आल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या तरुण मित्रांच्या न येण्यामुळं आलेलं औदासीन्य घालवण्यासाठी त्या मुलांबरोबर काल्पनिक गप्पा मारायचं मी ठरवलं.
‘‘दिवाळी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीतंय?’’ जणू त्यांच्या कोंडाळ्यातच मी बसलोय अशा थाटात मी विचारलं.
‘‘हा काय प्रश्‍न झाला?’’ अशा आविर्भावात माझ्याकडं बघत त्यातल्या जाड भिंगाचा चष्मा घातलेल्यानं मला क्षणार्धात सांगितलं ः ‘‘दिवाळी म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांच्या विवाहाचा उत्सव!’’
बंगालमधून आलेली अनुराधा म्हणाली ः ‘‘आमच्या राज्यात कोणत्याही उत्सवात कालीमातेची पूजा होते.’’

‘‘ते तुमच्या राज्यात असेल,’’ उत्तर प्रदेशातला राकेश ‘भय्या’ म्हणाला ः ‘‘रावणाला ठार मारून प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येला परत आल्याची आठवण म्हणून आमच्याकडं दिवाळी साजरी करतात. श्रीरामांच्या आगमनाचा आणि दुष्टांवर मिळवलेल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही उत्तरेतले लोक घरांवर रोषणाई करून व फटाके वाजवून आनंद साजरा करतो. अभ्यासू असलेल्या जाड भिंगवाल्यानं माहिती दिली. नेहमी शांत राहणारा हा मुलगा आज थांबतच नव्हता. ‘‘दिवाळीचा सण चार दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाची एक वेगळी कहाणी आहे. पहिल्या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केल्याचं मानलं जातं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावास्येला लक्ष्मीपूजन केलं जातं. तिसरा दिवस बलिप्रतिपदेचा असतो. वामनावतारात भगवान विष्णूनं अन्यायी बळीला नरकात पाठवलं होतं; पण त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची अनुमती होती. या दिवशी बळी पृथ्वीवर येऊन अंधकार दूर करण्यासाठी लाखो दिवे लावतो असं मानलं जातं. चौथ्या म्हणजे यमद्वितीयेच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला घरी बोलावून ओवाळतात,’’ जाड भिंगवाल्यानं एका दमात माहिती दिली.
‘‘शाब्बास... तू खरा हुशार आहेस’’ मी त्याला कौतुकानं म्हणालो. ‘‘मला वाटतं दिवाळी साजरी करण्यात तुम्ही सगळेच सहभागी होत असाल किंवा काही वेळा नुसतं बघत असाल; पण आता तुम्ही या सगळ्या रिवाजांच्या, रोषणाईच्या, फटाके वाजवण्याच्या पलीकडं जाऊन दिवाळीचा अर्थ शोधला पाहिजे,’’ मी म्हणालो.

माझ्या वाक्‍यासरशी सगळेजण एकदम चपापले. ‘‘म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय?’’ एकानं विचारलं. त्यावर सगळ्यांनीच कान टवकारले.
‘‘तुम्ही क्षणभर विचार केलात तर तुम्हाला कळेल, की दिवाळीच्या दिवसांचं तुम्ही सांगितलेलं वैशिष्ट्य किंवा कहाणी ‘चांगल्याचा वाइटावर किंवा प्रकाशाचा अंधकारावर किंवा आशेचा नैराश्‍यावर विजय’ या तीनपैकी कोणत्यातरी एका गोष्टीशी निगडित आहे.

माझ्या वाक्‍यावर ते एकदम माझ्यावर तुटून पडले. ‘‘आम्हाला तुमच्याविषयी आदर वाटतो; पण तुमची ही गोष्ट काही आम्ही मान्य करणार नाही,’’ असं ते एका सुरात म्हणाले. अंधार हटवणं किंवा वाइटावर विजय मिळवणं या केवळ पोकळ गप्पा आहेत. कल्पना म्हणून त्या सुंदर आहेत; पण वास्तवात त्यांना काही अर्थ नाही, असा त्यांचा सूर होता.

‘‘आम्ही अशा काळात जगत आहोत, की जिथं योग्य कृती आणि चांगले परिणाम यांचं काही नातं असण्याची शक्‍यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. जे वाईट वागतात, वाममार्गानं संपत्ती जमवतात, आपल्या फायद्यासाठी कायदा किंवा यंत्रणा वाकवतात त्यांना शिक्षा झालेली आम्हाला नक्कीच आवडेल; पण आजूबाजूला तसं होतंय का? बहुतेक वेळा दुष्टप्रवृत्ती चांगल्यावर मात करतात. कष्टाचं आणि निष्ठेचं कधीच कौतुक होत नाही. ‘चांगल्याचा वाइटावर विजय’ ही निव्वळ कविकल्पना आहे, असंच आम्हाला आता वाटायला लागलंय’’ ते तावातावानं आपलं म्हणणं मांडत होते.
त्यांचा उसळता आवेश बघून क्षणभर मी अवाक्‌ झालो; पण लगेच स्वतःला सावरत म्हणालो ः ‘तुम्ही बरोबर असाल किंवा कदाचित चूकही असाल; पण सगळ्या इतिहासात आपण हेच पाहिलंय, की ज्यांनी काहीतरी करणं आवश्‍यक असतं, ते निष्क्रिय बनलेले असतात. ज्यांनी आजूबाजूच्या घडामोडीत हस्तक्षेप करायला पाहिजे, ते उदासीन बनतात. न्यायाचा, सत्याचा आवाज जेव्हा उमटायला पाहिजे, तेव्हा उमटत नाही. त्यामुळं दुष्ट शक्तींना विजय मिळवणं सहज शक्‍य होतं. सगळीकडं नैराश्‍याची छाया पसरते; पण तुम्ही एक गोष्ट विसरू नका व ती म्हणजे, आपल्या देशाची फाळणी झाली त्या वेळच्या अंधकारमय युगात सगळा देश हिंसाचार आणि जातीय दंगलींच्या आगीत होरपळत असताना महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं ः ‘इतिहासात अनेक जुलमी राजे होऊन गेले; पण ते सगळे पराभूत झाले.’ हे वाक्‍य नेहमी लक्षात ठेवा. त्या महात्म्याचे शब्द खरे होते आणि म्हणून मी त्यांच्या बाजूनं ठामपणे उभा आहे.

मला आणखी असं वाटतं, की आपण अतिविद्वान मंडळी बडबडच जास्त करतो. आपल्या सभोवताली काय चुकीचं आहे, हेच आपण सांगत असतो. आपण सामाजिक विषयांवर सातत्यानं चर्चा करतो, युक्तिवाद करतो, वाद घालतो... एवढं केलं म्हणजे आपलं काम झालं, असं आपण मानत असतो; पण ते खरं नाही. प्रत्यक्षात आपण कृती करणं टाळत असतो. या चर्चांमुळं आपल्या स्वतःच्या स्वभावातसुद्धा काही बदल होत नाही. मी आता म्हातारा झालोय. या फुका गप्पांचा मला आता कंटाळा आलाय. काही अंशी या चर्चांचा उपयोग आहे; पण अशा चर्चांनी जगात काहाही बदल होत नाही. जे फक्त विचार करतात त्यांच्यामुळं जगात काहीही बदल होत नाही आणि जे फक्त कृती करतात, त्यांच्याहीमुळं काही बदल होत नाही; तर जे विचार करून कृती करतात त्यांच्यामुळंच जगात बदल होत असतो.’’

‘‘तुम्ही आज खूपच आक्रमक वाटत आहात,’’ मृदुला हसत हसत म्हणाली.
‘‘होय, झालोच आहे’’ मी म्हणालो, ‘‘मला याचा राग आलाय की आमच्यासारखे तुम्हीपण आता या चर्चेच्या जंजाळात अडकत चालला आहात. नुसतीच चर्चा... जबाबदारी कसलीच नाही! नुसतं बघून टीका करण्याचा तुम्हाला काय हक्क आहे? जर तुम्हाला प्रत्यक्ष कृतीत करायचीच नसेल, तर कृपा करून गप्प बसा; निदान तो प्रामाणिकपणा तरी ठरेल.’’

त्या तरुणांवर हा खूपच तीव्र हल्ला होता. ते एकदम चवताळलेच. त्यांनी त्वेषानं विचारलं ः ‘‘तुम्ही आमच्यावर आरोप करताय; पण तुम्ही तरी तुमच्या आयुष्यात काय केलंत?’’  
‘‘योग्य प्रश्‍न विचारलात!’’ मी त्यांच्या डोळ्यात बघत विचारलं ः ‘‘दर महिन्यात एक आठवडा मी कुठं गायब होतो तुम्हाला माहीतंय?’’
‘‘आम्हाला त्याबाबत कुतूहल आहेच,’’ कुणीतरी म्हणालं.

‘‘तुम्हाला हे माहीतच आहे, की मी ग्रामीण भागातून आलोय. चांगले शिक्षक आणि चांगलं शिक्षण यामुळं मी आयुष्यात यशस्वी झालो, असं मी मानतो; पण जसजसा मी मोठा होत गेलो, तसतसं ग्रामीण आणि शहरी शिक्षणात खूप फरक असल्याचं माझ्या लक्षात आलं. शैक्षणिक संस्थांमध्ये कमालीची गुणात्मक तफावत होती. सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांमधल्या सोई अगदीच तुटपुंज्या होत्या. शाळांना जागा नव्हती, इमारत नव्हती, शिक्षकांची संख्याही अगदीच कमी असायची. त्यांची क्षमताही कमी होती. आणि आपल्या व्यवसायावर त्यांची निष्ठाही फारशी नव्हती. खासगी शाळांची स्थिती तर आणखी दयनीय होती. या स्थितीत सुधारणा झाली पाहिजे, असं मी अनेक व्याख्यानांत सांगायचो; त्यावर मी लेखही लिहिले; पण प्रत्यक्ष शाळेत जाऊन मी कधी काही काम केलं नव्हतं. मला ते काम खूप कष्टप्रद वाटत होतं. पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक महाविद्यालयं असलेल्या एका संस्थेच्या अध्यक्षांनी मला एकदा त्यांच्या एका बैठकीसाठी निमंत्रित केलं. त्यांनी मला संस्थेचं अध्यक्षपद देऊ केलं. मी ते मान्य केलं; पण आठवड्यातच आपण राजीनामा द्यावा किंवा मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करावं, असं मला प्रकर्षानं वाटायला लागलं. मी तुम्हाला खरं सांगतो, की ते आव्हान स्वीकारायला मी घाबरत होतो. आपल्याला त्याची गरज नाही, असं मी मानत होतो. मी संस्थेतून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असतानाच आर्थिक स्थितीमुळं जिला शिक्षण सुरू ठेवणं शक्‍य नव्हतं, अशा एका मुलीचा आर्थिक मदतीसाठीचा अर्ज माझ्यापुढं आला. तिची अडचण खरी होती आणि तिला आर्थिक मदत केली पाहिजे, असंच मला वाटत होतं; पण त्या महाविद्यालयाचं यासंदर्भात स्पष्ट असं काहीच धोरण नव्हतं. त्या वेळी मी तिची फी भरली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी थोडा अस्वस्थ झालो; तिच्या डोळ्यांत त्या वेळी जे भाव होते, त्यांचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. ते भाव जणू काही मला सांगत होते ः ‘‘जगात जर तुमच्यासारखे लोक जास्त असले असते तर माझ्यासारख्या मुलींची संख्या नक्कीच कमी झाली असती.’’

मी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला. जेवढा काळ मी तिथं असतो, तेवढा काळ मी त्यांच्यात मिसळतो. प्राध्यापकांना दिलासा देतो. विद्यार्थ्यांना शिकवतो. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक ‘टीम’ म्हणून काम करू या असं मी त्यांना पटवून देतो. त्या काळात मला जे समाधान मिळतं, ते माझ्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीपेक्षा कितीतरी जास्त आहे.

तर मुद्दा हा की आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या सभोवतालची स्थिती सुधारण्यासाठी काही ना काही करू शकतो. त्यासाठी वयाचं बंधन नसतं. मी सत्तरीचा आहे; तुम्ही सतरा वर्षांचे आहात. आपण सगळे सक्षम आहोत, मग तेवढं पुरेसं नाही का? एक लक्षात घ्या, की संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना? मग त्या संघर्षाचं स्वागत करू या; त्याचाच उत्सव करू या! आणि संघर्ष म्हणाल तर फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक म्हणजे, बाह्य जगतातल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रातल्या अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि दुसरा म्हणाल, तर मनातल्या अंधकाराविरुद्धचा संघर्ष!
‘‘मनातला संघर्ष?’’ जाड भिंगवाल्यानं काहीशा अविश्‍वासानं विचारलं. म्हणालो ः ‘‘होय! खऱ्या लढाया बाह्य जगात नव्हे, तर आपल्या मनाच्या खोल कप्प्यात लढल्या जातात. खरे रावण हे बाह्य जगात नसतात तर आपल्याच मनात दडी मारून बसलेले असतात. असूया, मोह, क्रोध हे खरे राक्षस आहेत. आपल्या निष्ठा, आणि मूल्यं यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहणं हीच खरी लढाई आहे. दुसऱ्यांना इजा करण्याच्या किंवा इतरांना वा निसर्गाला उपद्रव देण्याच्या इच्छेवर विजय मिळवणं हा खरा विजय आहे. गौतम बुद्धांनी हे अतिशय सुरेख शब्दांत सांगितलंय. त्यांनी म्हटलंय ः ‘‘जो मनातल्या अंधकारावर मात करतो, तो हजार युद्धं जिंकणाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ होय.’’
विचारांच्या तंद्रीत मी हरपलो होतो. एवढ्यात पत्नीनं खालून मारलेली हाक मला ऐकू आली. मी भानावर आलो. माझ्याभोवती जमलेलं तरुणांचं कोंडाळं आता लुप्त झालं होतं. ते सगळेजण माझे खूप जवळचे मित्र आहेत. मी दिवाळीत त्यांना भेटणार होतोच; पण आताच, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटलं. कोणत्या शब्दात शुभेच्छा द्याव्यात, असा मी विचार करत होतो. नकळत कवी इक्‍बालचे शब्द माझ्या ओठांवर आले. आपल्या मुलाला आशीर्वाद देताना त्यानं म्हटलं होतं,

दायरे इश्‍क में अपना मकाम पैदा कर
नया जमाना, नयी सुबह-ओ-शाम पैदा कर

 
प्रेमाच्या बळावर स्वतःचं स्थान निर्माण कर. तुझी स्वतंत्र ओळख निर्माण कर. तुझा काळ तू घडव.
उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या प्रत्येक दिवसावर तुझा ठसा असू दे...’’

टेबलाचा आधार घेत उठता उठता या ओळी माझ्या ओठांवर आल्या. मी मनातल्या मनात माझ्या मित्रांना म्हणालो ः ‘‘आज तुमचाच विचार माझ्या मनात घोळत आहे. मी परमेश्‍वराकडं मागणं मागतो, की या दिवाळीच्या प्रकाशपर्वावर तुम्हाला तुमचे स्वतःचे स्वामी बनण्याची शक्ती आणि बुद्धी परमेश्‍वरानं तुम्हाला द्यावी.’’

हीच माझी तुम्हाला दीपावलीची शुभकामना...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com