...अभी इश्‍क के इम्तिहाँ और भी है!

...अभी इश्‍क के इम्तिहाँ और भी है!
...अभी इश्‍क के इम्तिहाँ और भी है!

मी बोलायचा थांबलो. कुणीच काही बोलत नव्हतं. सगळ्याजणी निःशब्द झाल्या होत्या. उमाच्या प्रेमविवाहाच्या प्रश्‍नापासून ते पालकांची मनःस्थिती आणि समाजाची बंधनं असं आम्ही कुठल्या कुठं पोचलो होतो. मुली विचारात पडल्याचं स्पष्ट दिसत होतं. कदाचित, आपलं पुढचं आयुष्य कसं असेल, याचा विचार त्या करत असाव्यात. आपल्याला खरंखुरं प्रेम मिळेल की ठरवून केलेल्या लग्नातलं तोलून-मापून केलेलं प्रेम आपल्या वाट्याला येईल, असा प्रश्‍न त्यांना पडला असावा.

त्या  मुली एकदम घोळक्‍यानं आल्या. या वेळी त्यांच्याबरोबर मुलं नव्हती.
‘‘मुलं कुठंयत?’’ मी विचारलं.
त्यावर ‘‘ती येणार नाहीत’’ असं त्रोटक उत्तर त्यांनी दिलं.
‘‘का?’’ मी कुतूहलानं विचारलं.
‘‘आम्हीच त्यांना ‘येऊ नका’ म्हणून सांगितलं. कारण, आम्हाला स्वतंत्रपणे तुमच्याशी बोलायचंय. काही गोष्टी अशा आहेत, की त्या गोष्टी आम्हाला त्या मुलांसमोर बोलता येणार नाहीत,’’ त्यांनी खुलासा केला.
‘‘फेअर पॉइंट, शूट!’’ मी सहजपणे म्हणालो.
त्या गोंधळल्या. माझ्या वाक्‍याचा अर्थ त्यांना समजला नसल्याचं मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
‘‘तो एक लष्करात बोलला जाणारा वाक्‍प्रचार आहे. म्हणजे ‘चाल करा, बोला!’ ’’ मी हसत म्हणालो.
त्यांनी क्षणभर दीर्घ श्‍वास घेत एकमेकींकडं पाहिलं.
‘‘उमा प्रेमात पडलीय,’’ आभा एकेक शब्द शांतपणे उच्चारत म्हणाली.
‘‘मग इंडियन पीनल कोडनुसार तो गुन्हा आहे की काय?’’ मी थोडं थट्टेच्या सुरात म्हणालो.
‘‘नाही; पण प्रकरण गंभीर आहे,’’ आभा गांभीर्यानंच म्हणाली.
‘‘अच्छा! म्हणजे उमा खरोखरच प्रेमात पडलीय तर...!’’ माझा सूर कायम होता.
‘‘सर, आमची थट्टा करू नका. तुम्हाला आमचं ऐकायचं नसेल तर तसं स्पष्ट सांगा. आम्ही जातो...’’ त्या निर्वाणीच्या सुरात म्हणाल्या. प्रकरण गंभीर असल्याचं मला जाणवलं.
‘‘थांबा... नेमकं काय घडलंय?’’ मी विचारलं.
‘‘तसं काहीच घडलं नाही; पण जर तुम्ही हस्तक्षेप केला नाहीत, तर मात्र नक्की काहीतरी घडेल,’’ आभा फणकाऱ्यानं म्हणाली.
कदाचित ‘विपरीत’ असा शब्द तिला वापरायचा असावा.
‘‘मला नीट समजावून सांगा...’’ मी थोडंसं नमतं घेत म्हणालो.
त्यांच्यातल्या ‘कार्यकर्ती’ असलेल्या हेमानं खुलासा केला ः ‘‘त्यात समजावून सांगण्यासारखं काही नाहीय. उमा ही तिच्या तुलनेत लायक नसलेल्या एका मुलाच्या प्रेमात पडलीय.’’
‘‘अच्छा; पण तो लायक आहे की नाही, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’’ मी विचारलं.
‘‘आम्हाला तसं वाटतं. तो वेगळ्या धर्माचा आहे. तिच्याइतकं शिकलेला नाही. एक सामान्य विक्रेता म्हणून तो काम करतो आणि त्याला फारसं भवितव्य नाही; तर दुसरीकडं उमा अतिशय हुशार आहे; तिला अतिशय चांगली नोकरी आहे आणि चांगलं करिअर करण्याची तिला संधी आहे,’’ आभानं एका दमात सांगितलं.
‘‘तारुण्यातला उथळपणा...’’ मागून कुणीतरी दबक्‍या आवाजात म्हणालं ः ‘‘त्यानं तिला भुरळ घातली आणि तिला अक्कल नाही. मी तर असं ऐकलंय, की ते दोघं पळून जाऊन लग्न करणार आहेत. तिच्या आई-वडिलांच्या मनावर या गोष्टीचा केवढा आघात होईल. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं तर मग संपलंच सगळं.’’
‘‘सर, तुम्ही तिच्याशी बोलाल का?’’ सगळ्यांनीच एका सुरात विचारलं.
‘‘एक मिनिट... थांबा, मला आधी सगळं समजून घेऊ द्या. उमाचं एका मुलावर प्रेम आहे, तिच्या दृष्टीनं तो तिच्यासाठी सुयोग्य आहे. आई-वडिलांची नाराजी किंवा राग टाळण्यासाठी ती पळून जाऊन लग्न करण्याच्या विचारात आहे. बरोबर?’’ मी विचारलं.
‘‘एकदम चूक,’’ त्या मुली गरजल्या आणि एकमतानं म्हणाल्या ः ‘‘तो मुलगा तिच्यासाठी सुयोग्य नाही.’’
‘‘हे पाहा, मला ‘आयपीएस’ माहीत आहे; पण तुम्ही ‘एमपीएस’ कधी केलंत?’’ मी विचारलं.
‘‘एमपीएस?’’ त्यांनी गोंधळून विचारलं. ‘एमपीएस’ म्हणजे काय हे त्यांच्या लक्षात येईना.
‘‘मॉरल पोलिस सर्व्हिस’’ मी खुलासा करत म्हणालो.
‘‘तुमचा आरोप बरोबर नाही. आम्ही उमाच्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. तिच्या या ‘आंधळ्या’ प्रेमामुळं आम्हाला काळजी वाटत आहे. तिची काळजी करण्याचा किंवा तिच्या बऱ्या-वाइटाचा विचार करण्याचा अधिकार आम्हाला नाही का?’’ त्यांनी प्रतिप्रश्‍न केला.
‘‘नक्कीच! तुम्हाला तो अधिकार आहेच,’’ मी म्हणालो.

‘‘प्रथमदर्शनी प्रेम (लव्ह ॲट फर्स्ट साइट) हे बऱ्याचदा धोक्‍याचं ठरतं, ते पडताळून पाहायलाच हवं. उमानं ते पडताळून पाहिलं असेल आणि पूर्ण विचारान्ती ती या निर्णयाला आली असेल, तर मग तुमचं काय म्हणणं आहे? तिला हेच हवं असेल तर मग? प्रेम काही नफा-तोट्याचा विचार करून केलं जात नाही, ते अचानक होतं. ‘मुहब्बत हो जाती है दोस्त, की नही जाती,’ ’’ मी म्हणालो.
‘‘ठीक आहे. तुमचं म्हणणं कदाचित बरोबर असेलही; पण मग आमचं म्हणणं काय चूक आहे? तिच्या भवितव्याची आम्हाला काळजी वाटते. तिच्या भविष्याची चिंता हा मुद्दा तर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. मग आता आम्ही नेमकं काय करू?’’ त्यांनी थोडं काकुळतीच्या सुरात विचारलं.

‘‘आयुष्यात कुठल्याही प्रश्‍नाचं उत्तर सोपं नसतं. कोणत्याही गोष्टीकडं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता येतं. प्रत्येक बाजू किंवा प्रत्येक दृष्टिकोन एक वेगळंच सत्य समोर आणतो. जर तुम्हाला सर्वंकष उत्तर हवं असेल तर सगळ्या प्रश्‍नांचा तुम्ही एकत्रित विचार केला पाहिजे,’’ मी म्हणालो.
‘‘सर, आम्हाला नीट समजावून सांगा,’’ त्यांचा आवाज आता बराच खालच्या पट्टीत आला होता.
मी म्हणालो ः ‘‘हे पाहा. आता याच प्रश्‍नाकडं पाहा. आपण या प्रश्‍नाचा किमान सात बाजूंनी विचार करू शकतो.’’
‘‘सात?’’ त्यांनी आश्‍चर्यानं विचारलं.
‘‘होय. तुम्ही मोजा... या प्रश्‍नाला किमान सात बाजू आहेत,’’ मी म्हणालो.
‘‘उमा आणि तो मुलगा - काय नाव त्याचं?’’ मी विचारलं.
‘‘रमाकांत...’’ कुणीतरी सांगितलं.
‘‘ते दोघंजण; मग त्या दोघांची कुटुंबं. मग त्या दोघांच्या मित्र-मैत्रिणी आणि मग समाज... आपण समजा मुलाच्या बाजूच्यांना वगळलं, तरी मुलीच्या बाजूचे चार दृष्टिकोन आहेतच,’’ मी म्हणालो.
आता त्या सगळ्याजणी एकचित्तानं माझं म्हणणं ऐकू लागल्या.
‘‘तुम्हा मैत्रिणींपासूनच सुरवात करू,’’ मी म्हणालो ः ‘‘तुम्हाला तिची काळजी वाटते; पण मला जर हे माहीत नसतं, तर मी म्हणालो असतो, की तुम्ही तिच्यावर टीका करता आहात, तिच्यावर तुमचं मत लादत आहात, तिच्या निर्णयात हस्तक्षेप करता आहात. तुमचे शब्द आठवा. तुम्ही म्हणाला होता, की ‘उमा मूर्खपणा करतेय. हा तारुण्यातला वेडेपणा आहे.’ म्हणजे तुमची भूमिका तिला मदत करणारी होती, की विरोध करणारी? आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेवढं तुम्ही तुमचं मत आग्रहानं मांडाल, तेवढी ती तिच्या मताला जास्त चिकटून राहील.’’
‘‘तुम्ही आमचे शब्द फिरवू नका. आमचं खरोखरच तिच्यावर प्रेम आहे. आम्हाला तिची काळजी वाटते...’’ त्या म्हणाल्या.

‘‘अगदी योग्य आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. सर्वसाधारण स्थितीत ही तुमची काळजी अगदी योग्यच आहे, तुमचा युक्तिवादही बरोबर आहे; पण जेव्हा वातावरण तापलेलं असतं, तेव्हा अगदी सख्खे मित्रही संवेदनशील बनलेले असतात. त्या वेळी शब्द हे फक्त शब्द उरतात, त्यामागच्या भावना विचारात घेतल्या जात नाहीत. गालिब यांनी ही स्थिती अतिशय सुरेख शब्दांत मांडली आहे. ते म्हणतात ः
ये कहाँ की दोस्ती है, जो बने है दोस्त नासेह
कोई चारासाज होता, कोई गमगुसार होता...
ही कसली मैत्री? जिथं मित्र माझ्या जखमांवर उपचार करण्याऐवजी किंवा माझं दुःख वाटून घेण्याऐवजी मलाच शहाणपण शिकवत आहेत?
‘‘मुलींनो, वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, मैत्री म्हणजे दुसऱ्याची भूमिका समजून घेणं, त्याच्या मताची योग्यायोग्यता ठरवणं म्हणजे मैत्री नव्हे,’’ मी म्हणालो.
चळवळीत काम करणारी हेमा वादात मागं कशी हटेल? ती म्हणाली ः ‘‘ठीकंय. आम्हाला टोमणे मारण्यातला आनंद घेऊन झाला असेल, तर मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे ते तरी सांगा.’’

तीच एक गोष्ट मला टाळायची होती; पण हेमानं मला बरोबर कोंडीत पकडलं. मी शब्दांची काळजीपूर्वक निवड करत सावधपणे म्हणालो ः ‘‘उमाचं वय आणि समज लक्षात घेता, तिच्या मनात आता खळबळ माजलेली असणार, हे उघड आहे. रमाकांत हा एक साधा विक्रेता आहे हे तिला कळत नाहीय, असं तुमचं म्हणणं आहे; पण तिला ते कळतंय. तिच्या आई-वडिलांचा लग्नाला विरोध आहे हे तिला माहीत नसेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तेही चूक आहे; पण हे सगळं अगदी अचानक घडलंय. ती एका अनोळखी प्रदेशात सापडलीय आणि तिला रस्ता दाखवणारं कुणीही नाहीयं. तिचं प्रेम आणि कुटुंबाविषयीचं तिचं कर्तव्य यात तिची भयानक ओढाताण होत आहे. तिला तिच्या आई-वडिलांना दुःख द्यायचं नाहीय; पण सामाजिक दडपणामुळं आई-वडील आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत, असं तिला वाटतंय. सध्या तिला मानसिक शांततेची गरज आहे, ज्यामुळं ती सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करू शकेल. तेव्हा तिला तुम्ही सल्ला देताना, तुमचं तिच्यावर प्रेम असल्याची आणि तुम्ही तिच्या पाठीशी असल्याची जाणीव तिला करून द्या. तिला हे सांगा, की तुझ्याइतकीच तुझ्या आई-वडिलांच्या मनातही खळबळ माजली आहे. तुम्हाला जर माझ्याविषयी काही सांगायचं असेल, तर तिला माझी कहाणी सांगा. रिझर्व्ह बॅंकेचा एक तरुण अधिकारी असताना मी एका अशा मुलीच्या प्रेमात पडलो, की जी खानदानी मराठा घरात सून म्हणून चालणं अतिशय कठीण होतं. ती ब्राह्मण होती. विद्वान, वेदोक्त घराण्यातली होती. तिचे वडील सरकारी नोकर होते आणि आमच्या गावापासून त्यांचं गाव खूप दूर अंतरावर होतं. केवळ भौगोलिक अंतरच दूर नव्हतं, तर संस्कृती आणि परंपरा यातलं अंतरही खूपच होतं. त्या काळातले रीती-रिवाज लक्षात घेता, आमचं लग्न होणं अशक्‍य होतं. विरोधाचं वारं खूप जोरात होतं; पण आम्ही पक्कं ठरवलं होतं, की कितीही वेळ लागला तरी चालेल; पण आम्ही आमच्या कुटुंबीयांचा आशीर्वाद घेऊनच लग्न करू. मग काय घडलं? एके दिवशी माझ्या वडिलांनी आम्हाला बोलावून घेतलं. ‘तुम्ही खरंच एकमेकांवर मनापासून प्रेम करता का?’ असं आम्हाला विचारलं. आम्ही ‘हो’ म्हणालो. तेव्हा ‘तुम्ही दोन वर्षं एकमेकांना न भेटता राहू शकाल का?’ असं त्यांनी विचारलं. ‘तुम्ही तसं राहून दाखवलंत तर दोन वर्षांनंतर तुम्हाला माझी परवानगी मिळेल,’ असं ते म्हणाले.’’

‘‘मग तुम्ही वाट पाहिलीत का?’’ कुणीतरी विचारलं.
- मी म्हणालो ः ‘‘हो. आम्ही वाट पाहिली. त्या वेळी तिचं पोस्टिंग मुंबईला होतं आणि मी नागपूरला होतो. दरम्यानच्या काळात आम्ही आई-वडिलांना दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळत होतो, हे त्यांच्या लक्षात येत होतं. शेवटी त्यांनी आमचं म्हणणं मान्य करून लग्नाला संमती दिली. एवढंच नव्हे, तर आशीर्वादही दिले. आम्ही जर काही घाई केली असती किंवा मूर्खपणा केला असता तर आम्ही आमच्या कुटुंबीयांपासून दुरावलो तर असतोच; पण दोघांच्या कुटुंबीयांनाही आम्ही कायमसाठी दुःखात लोटलं असतं. तुम्ही उमाला सांगा ः ‘एखाद्याला पळून जाऊन लग्न करता येईलही; पण आपल्याला परस्परांशी बांधून ठेवणाऱ्या या नात्यांपासून कसं पळून जाणार?’ तिला सांगा ः ‘अखेरीस आपले आई-वडील हेच आपले सगळ्यांत जवळचे मित्र असतात. ते एखाद्या वेळी रागावतात; पण कायमचेच रागावलेले राहू शकत नाहीत, कारण शेवटी आपण त्यांचाच अंश असतो.’ ’’

यावर कुणीतरी मला चिमटा काढण्यासाठी म्हणालं ः ‘‘तुमचं वय लक्षात घेता, तुम्ही उमाच्या आई-वडिलांनाच पाठिंबा देणार, हे उघड आहे. शेवटी सगळी वयस्कर माणसं एकमेकांना धरून असतात!’’ ‘‘तुमची गोष्ट वेगळी आहे; पण माझे आई-वडील कायम मला ऑर्डर देत असतात. ‘हे कर,’ ‘ते करू नकोस,’ ‘हे बरोबर,’ ‘ते चूक...’ - मी आता २३ वर्षांची आहे; पण मला कसलंही स्वातंत्र्य नाही.’’ एकजण कुरकुरत म्हणाली.
मी म्हणालो ः ‘‘तुझ्या बोलण्यात तथ्य आहे; पण तू तुझ्या आई-वडिलांच्या भूमिकेतून विचार केलास तर गोष्टी खूपच सोप्या होतील. आई-वडील आणि मुलं यांच्या नात्याचा विचार केला, तर त्यांना दोन परस्परविरोधी गोष्टींत संतुलन साधायचं असतं. एक म्हणजे, त्यांना तुमचं संरक्षण करत तुम्हाला मार्ग दाखवायचा असतो; तर दुसरीकडं त्यांना तुम्हाला स्वातंत्र्यही द्यायचं असतं. एका बाजूला त्यांना तुम्हाला सांभाळायचं असतं, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही एक ना एक दिवस उडून जाणार, हे त्यांना माहीत असतं.’’
‘‘म्हणजे तुम्हाला नेमकं काय सांगायचंय?’’ मुलींनी विचारलं.

‘‘मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही पतंग उडत असताना बघितलाय का? हा पतंग एकदम हवेत झेपावत नाही, तो थोडा उडतो; पण वारा नसेल तर तो खाली पडतो. तो पुन्हा उडवावा लागतो आणि हे अनेकदा करावं लागतं; पण केव्हातरी एका क्षणी त्याला हवा मिळते आणि तो आकाशात झेप घेतो. तो पतंग आणि तो उडवणारा माणूस यांच्यासाठी तोच एक क्षण खरा असतो. पतंगाला मुलाची उपमा दिली, तर त्या पतंगाला उडायचं असतं; पण त्याला ते स्वातंत्र्य पेलवेल की नाही, याची काळजी त्या उडवणाऱ्याला असते. आई-वडिलांना मुलांना स्वातंत्र्य द्यायचं असतं अन्‌ त्यांची त्यांना काळजीही वाटत असते. मुलाला मोठं व्हायचं असतं; पण त्याच वेळी त्याला मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं आई-वडिलांना वाटत असतं. आपला मुलगा किंवा मुलगी खुल्या आकाशात स्वच्छंदपणे विहार करील, अशी खात्री वाटताच त्याला बांधलेला दोरा सोडून देण्याची आई-वडिलांची तयारी असते, त्यासाठीच त्यांनी आपलं ‘पालकपण’ पणाला लावलेलं असतं. आपल्या हातांनी तो ‘धागा’ सोडायचा आणि मुलाला उंच आकाशात झेपावताना पाहायचं, हेच तर खरं पालकपण असतं. मैत्रीचंसुद्धा असंच असतं. ती काळजी, चिंता, प्रेम करणारी असते; पण ती दुसऱ्याच्या भावनांचा आदर करणारीही असावी लागते. ती जशी पकडून ठेवणारी हवी, तशीच ती योग्य वेळी हातातला धागा सोडून देणारीही हवी!’’ मी सोदाहरण समजावलं.
‘‘पण मग ही योग्य वेळ कोणती?’’ मीनानं विचारलं.

मी म्हणालो ः ‘‘त्याचे काही नियम नाहीत, त्याबाबत निश्‍चित असं काही ठरवता येत नाही. प्रेमाप्रमाणंच त्याचा हृदयाशी संबंध आहे; पण ही अतिशय कठीण गोष्ट आहे, असं मला वाटतं. कारण एखाद्याला उपदेश करणं, त्याची काळजी घेणं, त्याचं संरक्षण करणं ही भावना इतकी तीव्र आणि शक्तिशाली असते, की मुलं मोठी, कर्ती-सवरती झाली तरी आपण ती भावना सोडू शकत नाही. मुलं असोत की मित्र, ते मोठे झाले आहेत किंवा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली आहे, असं आपल्याला कधी वाटतच नाही. मित्रांकडून किंवा आई-वडिलांकडून मिळालेला योग्य सल्ला हा फक्त मार्ग दाखवतो. आपण मात्र खूप चुका केल्यानंतर त्या मार्गावरून चालायला लागतो. त्यालाच सोप्या भाषेत ‘अनुभव’ असं म्हणतात. चुका करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार असतोच. एकदा का आपल्या मुलानं विचारपूर्वक निर्णय घेतला, की आपण त्यातून माघारी यायला हवं. मग त्याचं भलं होण्यासाठी फक्त प्रार्थना करायची. जर यश मिळालं तर उत्तमच; पण जर पतंग खाली पडला, आपल्या मुलाला किंवा मुलीला शारीरिक अथवा मानसिक पातळीवर इजा झाली, तर मग आपण आहोतच त्याला सावरायला. तेव्हा तर आपली जबाबदारी अधिक वाढलेली असेल. पूर्वीपेक्षा अधिक प्रेमानं, जिव्हाळ्यानं आणि दुःख न करता किंवा कुणालाही दोष न देता आपण ते फुटलेले तुकडे पुन्हा जुळवायचे. ‘बघ, मी तुला तेव्हाच सांगितलं होतं, की ते काही प्रेम नाही,’ असं काही सांगणं म्हणजे उमाला सावरणं नव्हे. तो तर आपला अहंकार झाला; पण ‘काळजी करू नकोस, आयुष्य खडतर असतं; पण ते तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवतं,’ असं सांगणं हे खरं प्रेम झालं.

शेवटी समाज नावाची एक चीज आहे. आपल्यापैकी बहुतेकजण त्याला घाबरून जगतात; पण माझा अनुभव वेगळा आहे. खूप वर्षांपूर्वी माझ्या धाकट्या मुलीनं एका ब्रिटिश युवकाशी माझी ओळख करून दिली आणि त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं मला सांगितलं. मी एकदम उडालोच. मी स्वतः राज्याबाहेरच्या किंवा जातीबाहेरच्या मुलीशी लग्न केलं होतं; पण आमचा धर्म एक होता. काय करावं हे मला सुचत नव्हतं. माझ्या मनातली खळबळ त्या तरुणांच्या लक्षात आली असावी. त्यांनी मला थोडा वेळ द्यायचं ठरवलं. दरम्यानच्या काळात मी त्या मुलाची वागणूक बघितली. त्याचं माझ्या मुलीवर खरोखरच प्रेम होतं आणि तो तिची काळजीही घेत होता, हे मला जाणवलं. त्यांच्यातलं प्रेम निर्विवाद, निखळ होतं. त्यांचं खरंखुरं प्रेम आणि माझी समाजातली तथाकथित प्रतिमा यातून एकाची निवड करावी लागणार, हे माझ्या लक्षात आलं. ते सोपं नव्हतं; पण अखेरीस मी त्यांच्या प्रेमाच्या बाजूनं उभा राहिलो. माझ्या दृष्टीनं ते अवघड होतं; पण माझं सुख मला त्यांच्या दुःखावर उभं करायचं नव्हतं. विशेष म्हणजे, मी हे सगळं जेव्हा माझ्या जावयाच्या घरच्यांना सांगितलं, तेव्हा त्यांच्यापैकी कुणीही रागावलं नाही. मला आश्‍चर्यच वाटलं. खूप आदळआपट होईल, असं मला वाटलं होतं; पण तसं काहीच घडलं नाही. तात्पर्य हे, की अनेक वेळा भीती ही फक्त आपल्या मनात असते, प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. खरं आणि काल्पनिक भय यांतला फरक आपण ओळखला पाहिजे. खऱ्या भीतीशी आपण लढलं पाहिजे आणि काल्पनिक भीतीकडं दुर्लक्ष केलं पाहिजे.’’

मी बोलायचा थांबलो. कुणीच काही बोलत नव्हतं. सगळ्याजणी निःशब्द झाल्या होत्या. उमाच्या प्रश्‍नापासून ते पालकांची मनःस्थिती आणि समाजाची बंधनं असं आम्ही कुठल्या कुठं पोचलो होतो. मुली विचारात पडल्याचं स्पष्ट दिसत होतं. कदाचित, आपलं पुढचं आयुष्य कसं असेल, याचा विचार त्या करत असाव्यात. आपल्याला खरंखुरं प्रेम मिळेल, की ठरवून केलेल्या लग्नातलं तोलून-मापून केलेलं प्रेम आपल्या वाट्याला येईल, असा प्रश्‍न त्यांना पडला असावा. आपल्या आयुष्यात आनंद आणि तणावाचे चढ-उतार असतील, की दोन रूम कीचन, बाल्कनीचा फ्लॅट, दुचाकी गाडी आणि नवरा-बायको-मुलं अशा चौकोनी कुटुंबातलं जीवन आपल्याला जगायला मिळेल याचाच त्या विचार करत असाव्यात. काय ते कुणास ठाऊक! त्या सगळ्याजणी काहीही न बोलता अगदी शांतपणे तिथून निघून गेल्या.
‘आयुष्य एवढं कठीण का असतं?’ असा प्रश्‍न मी निःश्‍वास सोडत स्वतःलाच केला. उमाचाच विचार माझ्या मनात होता. त्या सूर्याकडं बघत मी माझ्या मनाशीच पुटपुटलो ः
आता है तूफान तो आने दे, कश्‍ती का खुदा खुद हाफीज है
मुश्‍किल तो नही इन मौजों मे, बहता हुआ साहिल आ जाए।
जर वादळ यायचंच असेल तर खुशाल येऊ दे. नौकेची काहीच काळजी करू नकोस... सोडून दे ती आणि नीघ सफरीवर; त्याची इच्छा असेल तर दूरचे किनारेसुद्धा भेटायला जवळ येतील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com