खुदी की मौत हो जिस में... (डॉ. यशवंत थोरात)

खुदी की मौत हो जिस में... (डॉ. यशवंत थोरात)

काही प्रकारचं यश हे त्या त्या काळापुरतंच असतं. उदाहरणार्थ ः पदाच्या अनुषंगानं येणारं यश. तो काळ गेला की ती पदंही जातात. प्रसिद्धी, नशीब यांच्याबाबतही असंच म्हणता येईल. याउलट मूल्यं टिकवण्यासाठी, स्वत्व राखण्यासाठी केलेल्या संघर्षातून मिळालेल्या गोष्टी या कायम टिकणाऱ्या असतात. मग तो आपल्यातल्या दुबळेपणाविरुद्धचा संघर्ष असो, स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी केलेला संघर्ष असो किंवा लोभावर मात करण्यासाठी केलेला संघर्ष असो....

किसे नही है तमन्ना-ए-सरवरी, लेकिन
खुदी की मौत हो जिस में, वो सरवरी क्‍या है?

वर्ष संपत आलं होतं आणि आता निरोपाची वेळ होती. सगळ्यांनी अभ्यासही खूप जोमानं केला होता. आता घरट्यातून जीवनाच्या उंच आकाशात झेप घ्यायला ते सगळे आसुसले होते. अशा वेळी नुसत्या चहा-बिस्किटांवर त्यांची बोळवण करण्याऐवजी माझ्या पत्नीनं त्या सगळ्यांना घरी जेवायलाच बोलावलं होतं. ‘‘तुम्हाला आता शेवटचं असं काही विचारायचंय का?’’ जेवायला बसता बसता मी म्हणालो.

‘‘आता तुम्ही म्हणतच आहात तर मला एक प्रश्न विचारायचाय,’’ मीना म्हणाली ः ‘‘काल रात्री मी सामान आवरत असताना आई-बाबांनी मला बराच उपदेश केला.’’
‘‘-माझ्या आई-बाबांनीही अगदी असंच केलं,’’ रफीक म्हणाला ः ‘‘एकसारखं ‘तू हे कर’ किंवा ‘तू हे करू नको’ अशा सूचना ते देत होते. ‘काय कर आणि काय करू नकोस’ याचा पाढाच जणू ते वाचत होते.’’
‘‘अरे, आई-वडिलांची ती सवयच असते. त्यात काय एवढं?’’ मी म्हणालो.
‘‘नाही, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही; पण यशाबद्दलच्या त्यांच्या कल्पनांमुळं माझा गोंधळ वाढतो,’’ उमा म्हणाली.
‘‘तुम्ही एकदा आमच्या आजोबांचं बोलणं ऐकायला पाहिजे’ त्यांच्यातला पहिलवान मुलगा म्हणाला ः ‘‘वाट्टेल ते करून यश मिळवलं पाहिजे असं ते म्हणतात. ते एकदा बोलायला लागले की त्यांची गाडी थांबतच नाही.’’ त्या चमूतल्या बहुतेकांनी असेच विचार व्यक्त केले. सगळ्यांच्या बोलण्याचं सार सांगत मीना म्हणाली ः ‘‘आम्ही आमच्या जीवनात पदार्पण करत असताना यशाला किती महत्त्व द्यायचं, हा आमच्या पुढचा मुख्य प्रश्न आहे. थोडक्‍यात यश म्हणजेच सगळं आयुष्य का?’’
‘‘का नाही?’’ मी म्हणालो.

‘‘यश मिळवण्यात चूक काय आहे? आपण यशस्वी व्हावं, लोकप्रिय व्हावं, आपलं सगळीकडं कौतुक व्हावं, असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं ना?’’ -मी प्रतिप्रश्न केला.
‘‘होय, वाटतं; पण १० बाय १०च्या खोलीत राहून कोण कोट्यधीश होऊ शकेल? चहा-व्यावसायिकाचा पंतप्रधान कसा होऊ शकेल? रफीक म्हणाला. ‘‘१३० कोटी लोकसंख्येच्या देशात ते केवळ अशक्‍य आहे. थोडक्‍यात, आमच्यासारख्या सामान्य माणसांनी केवळ बड्या बड्या प्रेरणादायी गोष्टी ऐकाव्यात. मात्र, ते तसं प्रत्यक्षात घडण्याची फारशी शक्‍यता नाही. कायम काठावर राहण्याचंच नशिबी असलेल्यांनी घटनेचा केंद्रबिंदू बनण्याचं स्वप्न पाहूच नये हेच खरंय, हो ना, सर?’’ जाड भिंगाच्या चष्मेवाल्यानं आपलं तत्त्वज्ञान पाजळलं. शब्दांची काळजीपूर्वक निवड करत मी म्हणालो ः ‘‘आपल्यापैकी प्रत्येकात आपापल्या पद्धतीनं वागून प्रेरणादायी बनण्याची क्षमता नक्कीच आहे. फक्त यशाची व्याख्या आपण कशी करतो, त्यावर ते अवलंबून आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबरोबर दोन वर्षं काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्या वेळी ते रिझर्व्ह बॅंकेच्या दिल्लीतल्या स्थानिक संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. एकदा त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सहज गप्पा मारताना मी त्यांना विचारलं होतं ः ‘तुमचं सगळ्यात
मोठं यश कोणतं?’ क्षेपणास्त्र वगैरे असं काही ते सांगतील असं मला वाटलं होतं; पण माझा अंदाज साफ चुकला. ते म्हणाले होते, ‘हृदयावरच्या शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे स्टेन्ट्‌स आपण परदेशातून मागवत असल्यानं ते फारच महाग असतात, हे माझ्या लक्षात आलं. ते माझ्या मनाला फारच लागलं. शेवटी मी दीर्घ रजा घेतली. बराच अभ्यास केला आणि देशात तयार होऊ शकतील, असे स्वस्त
किमतीचे स्टेन्ट्‌स बनवले. त्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो.’  नंतर एकदा एक महिला मला एका विमानतळावर भेटली. ती म्हणाली, ‘कलामजी, आप मेरे दिल में हमेशा रहेंगे. -मी उडालोच! पण ‘तुम्ही बनवलेले कमी किमतीचे स्टेन्ट्‌स माझ्या
हृदयात बसवलेत,’ असा खुलासा तिनं जेव्हा केला, तेव्हा माझ्या डोक्‍यात प्रकाश पडला.’ कलाम मला पुढं म्हणाले होते ः ‘थोरात, मी आयुष्यात केलेल्या सगळ्या कामांमधलं हेच काम मला सगळ्यात मोठं वाटतं. कारण ते लोकांचे प्राण वाचवणारं काम आहे; लोकांना मारणारं नव्हे. तुम्ही यश कशाला मानता हे महत्त्वाचं आहे. कलाम यांनी समाजोपयोगी कामात यश मानलं. काहींना ते संपत्ती जमवण्यात आहे, असं वाटेल.’ ’’ पण एक गोष्ट स्पष्ट आहे, की यशस्वी ठरण्यासाठी आपल्याला देशाचा आदर्श वगैरे बनलं पाहिजे, असं काही नाही. आपण आपल्या कुटुंबाचे किंवा आपल्या गल्लीचे किंवा आपण राहतो त्या वस्तीचे आदर्श बनलो, तरी ते यश एखादा दरिद्री माणूस लक्षाधीश बनण्याच्या किंवा एखादा चहावाला पंतप्रधान बनण्याच्या तोडीचं मानायला हवं.’’

‘‘मान्य! तुमच्या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे,’’ जाड भिंगवाला म्हणाला ः ‘‘आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या कल्पनेतलं यश मिळवू शकतो किंवा त्यानं तसा प्रयत्न करावा हे बरोबरच आहे; पण यशाचं स्वरूप आणि प्रमाण कोणत्याही परिस्थितीत सारखंच असतं का? सार्वजनिक क्षेत्रात किंवा उद्योगक्षेत्रात ते यश मिळवण्याचा मार्ग सारखाच असतो का?’’
‘‘हो आणि नाहीही’’- मी म्हणालो ः ‘‘मार्ग जरी सारखा असला तरी आव्हानं भिन्न असतात. खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांत यशासाठी महत्त्वाकांक्षा, दृष्टी आणि अविरत कष्टाची तयारी या गोष्टी लागतातच; पण यातलं साम्य इथंच संपतं. उद्योग किंवा व्यवसायात एखाद्याला आपली ठरवलेली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी बरंच स्वातंत्र्य असतं; पण संस्थात्मक यश हे मात्र अगदी वेगळं असतं. सार्वजनिक क्षेत्रातलं स्वातंत्र्य मर्यादित असतं. कारण विविध पद्धती आणि यंत्रणा यांनी त्याच्या सीमा ठरवलेल्या असतात. अशा संस्थांमधल्या आपल्या कामाचा ठसा उमटवायचा असेल तर केवळ लोककल्याणाचं उद्दिष्ट, त्यावरची निष्ठा आणि ते पूर्ण करण्यासाठीची कष्टाची तयारी एवढ्याच गोष्टी पुरेशा नसतात, तर विविध क्षमतेच्या, मनोवृत्तीच्या आणि अहंकारांनी भरलेल्या माणसांना सांभाळणं हेही तिथं महत्त्वाचं ठरतं. त्यात आणखी एक अडचण असते. एखाद्याकडं तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ हाताळण्याबाबतची गुणवत्ता असली तरी योग्य वेळी, योग्य माणसाच्या हाताखाली योग्य काम करण्याची संधी मिळणं आवश्‍यक असतं. एखाद्याला मिळणारी संधी ही नेहमीच सर्वोच्च असते असं नाही. अनेकदा ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीची असते. चांगल्या संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा आहे ती संधी साधून निष्ठेनं काम करत तिला सर्वोत्तम संधी बनवणं हे खरं आव्हान असतं.’’

‘‘सर, एखादं उदाहरण सांगा ना,’’ अपर्णा म्हणाली.
मी सांगू लागलो ः ‘‘१९७०च्या दशकात रिझर्व्ह बॅंकेनं संगणकीकरणाचा निर्णय घेतला आणि ही कामगिरी मुंबई शाखेकडं सोपवली. त्यासाठीची यंत्रसामग्री फ्रान्सकडून आयात केली जाणार होती. त्या वेळी श्रीवास्तव मुंबई शाखेचे प्रमुख होते. मी त्यांच्या हाताखाली मनुष्यबळ विभागाचा प्रमुख म्हणून काम करत होतो. त्या काळात कामगार संघटना खूप प्रबळ होत्या. संगणकीकरणामुळं कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, असा त्यांचा दावा होता. याच कारणासाठी त्यांचा संगणकीकरणाला विरोध होता. संगणकीकरणाचा यापूर्वीचा प्रयत्न या संघटनांनी हाणून पाडला होता. त्यामुळं याही वेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरण्याची शक्‍यता होती. फ्रान्सहून येणारे संगणक मध्यरात्री मुंबई विमानतळावर पोचणार होते. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्तही पुरवण्यात आला होता. संगणक येणार होते, त्या दिवशी रात्री मी माझे विश्वासू सहकारी श्रीधर परब, अजित आजगावकर आणि जेरॉम डिसूझा यांच्यासह आमच्या व्यवस्थापकांच्या निवासस्थानी गेलो. त्या वेळी त्यांनी ‘हे काम व्यवस्थित हाताळणार ना?’ असं मला विचारलं. थोडं दडपण आलं होतं; पण तरीही आत्मविश्वासाचा आव आणत ‘तुम्ही निश्‍चिंत राहा,’ असं मी त्यांना म्हणालो. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला की नाही, हे माहीत नाही; पण मी कामगिरी पार पाडायला आणि स्वतःला सिद्ध करायला उत्सुक असल्याचं त्यांना जाणवलं असावं. माझ्यासारख्या अननुभवी अधिकाऱ्यावर एवढी कठीण कामगिरी सोपवणं, ही एका अर्थानं त्यांची कसोटीच होती. आम्ही विमानतळावरून संगणक घेतले, दोन ट्रकमध्ये ते भरले आणि रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयाकडं निघालो. कार्यालयापाशी येऊन पाहतो तर काय, प्रचंड संख्येनं जमलेल्या कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमचा रस्ता रोखला होता. त्या लोकांनी
आमच्या गाड्या अडवल्या. स्थिती हातघाईला आली.

‘तुमचा काय विचार आहे?’ असं पोलिस उपायुक्तांनी मला विचारलं. सगळं धैर्य एकवटून मी संघटनेच्या नेत्याकडं गेलो. ‘तुम्ही १५ मिनिटं घोषणा द्या, नंतर मी संगणक आत नेतो’ असं मी त्याला म्हणालो. डोळे मिचकावत तो हसला. माझ्या सांगण्याचा फारसा उपयोग होणार नाही, हे मला माहीत होतं. मी ट्रककडं परत फिरलो.
‘आता काय करायचं?’ उपायुक्तांनी पुन्हा विचारलं. ‘१५ मिनिटं त्यांना घोषणा देऊ द्या आणि मग त्यांच्या नेत्यांना उचलून गाडीत घाला; पण त्याना अटक करू नका. त्यांना फ्लोरा फाउंटनवर नेऊन चहा द्या आणि सोडून द्या,’ मी एका दमात सांगितलं. पोलिस उपायुक्त क्षणभर विचारात पडले. संघटनेच्या अखिल भारतीय पातळीवरच्या नेत्यांना उचलून नेणं ही सोपी गोष्ट नव्हती; पण एक तरुण अधिकारी त्यांना नेमकं तेच करायला सांगत होता. ‘तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्यायचाय का,’ असं त्यानं विचारलं. मी अर्थातच नकार दिला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मी सांगितल्यानुसार १५ मिनिटांनी संघटनेच्या नेत्यांना उचलून गाडीत घातलं गेलं. या अनपेक्षित कृतीनं कार्यकर्ते भांबावून गेले. काय करावं हे त्यांना सुचेना. त्या गोंधळाचा फायदा घेत मी गाड्या बॅंकेच्या आवारात घेतल्या. गेट बंद करून घेतलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
दुसऱ्या दिवशी एकच खळबळ माजली. रात्रीच्या प्रकारामुळं संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. ‘तुमची नोकरी जाणार आणि तिथंच तुमच्या करिअरचा अंत होणार,’ असंही अनेकांनी मला सांगितलं. ११ वाजता गव्हर्नरांनी मला बोलावून घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते; पण त्यांचे डोळे काही वेगळंच सांगत होते. ‘‘तुझ्या कृतीनं काही पेच निर्माण होईल आणि आपल्याला सरकार आणि संघटनेच्या पातळीवर कटकटींना तोंड द्यावं लागेल, हे मी नाकारत नाही; पण संगणकीकरण हाच भविष्याचा मार्ग आहे आणि तू जी कामगिरी बजावली आहेस ती नक्कीच कौतुकास्पद आहे. अशी कृती करायला निर्णयक्षमता, योग्य नियोजन आणि धाडस लागतं. तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांना माझ्याकडून अभिनंदन कळव.’’ ती माझ्या भावी आयुष्यातल्या यशाची मुहूर्तमेढ होती!

‘‘तुम्ही धाडस दाखवलंत आणि तुम्हाला यश मिळालं; पण तुम्ही अयशस्वी ठरला असतात तर?’’ त्या मुलांमधल्या पहिलवानानं प्रश्न केला आणि तो म्हणाला ः ‘‘असे अनेक प्रसंग आहेत, की प्रामाणिक प्रयत्न करूनही जिथं अपयश आलं आहे.’’
‘‘होय...अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं; पण अपयश मिळाल्यावर काही जण निराश होतात, काही जण प्रयत्न सोडून देतात; पण काही जण बाह्या सरसावतात आणि पुन्हा प्रयत्न करतात. माझ्या मते यशस्वी होण्याचा सगळ्यात खात्रीशीर मार्ग म्हणजे यश किंवा अपयश हे अंतिम आहे, असं केव्हाही न मानणं. आपला उत्साह आणि निष्ठा कायम ठेवून परिस्थितीला सामोरं जाणं हेच अंतिम असतं.’’ -अनेक वर्षांपूर्वी मला प्रमोशन देण्याबाबत विचार सुरू होता. माझ्या वरिष्ठांनी माझ्या कार्यालयाला भेट दिली, तपासणी केली, माझ्या कामाचं कौतुकही केलं. प्रमोशन मिळणार असं मला खात्रीनं वाटत होतं. काही महिन्यांनी मला शिस्तभंगाची एक कारवाई करण्यास सांगण्यात आलं; पण माझ्या मते ती कारवाई अनावश्‍यक होती. मी माझं तसं मत मांडलं. मात्र, तो माझ्या मनाचा कमकुवतपणा मानला गेला आणि धाडसी निर्णय घेण्यास मला अपात्र ठरवण्यात आलं व माझी बदली मुख्यालयात करण्यात आली व माझ्याकडं अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची नियमावली बनवण्याचं काम देण्यात आलं. हा माझ्या कारकीर्दीला फार मोठा धक्का होता. काही काळ मी अस्वस्थ होतो. थोडा निराशही झालो; पण मी स्वतःला सावरून म्हटलं, एवढं वाईट घडूनही मी अद्याप तिथं कायम आहे. आता जे आहे ते मला स्वीकारलं पाहिजे. नियमावली लिहायचं काम का असेना; पण मी ते इतकं चांगलं करीन, की सगळे त्याचंच नाव घेतील. मी निष्ठेनं ते काम केलं आणि आजही ती नियमावली म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ते माझं चांगलं काम आहे.
‘‘ते ठीक आहे; पण तुम्हाला प्रमोशन मिळालं का?’’ अपर्णानं विचारलं.
मी म्हणालो ः ‘‘सगळ्या गोष्टींसारखी या कथेलाही अनेक वळणं असली तरी तिचा शेवट गोडच
झाला. प्रमोशन मिळालं अन्‌ तेही माझ्या आवडीच्या कृषिक्षेत्रात!’’
‘‘...म्हणजे तुम्हाला हेच सांगायचंय, की अनुकूल काळातच नव्हे, तर प्रतिकूल काळातही आपल्याला यशाचं शिखर गाठता येतं, होय ना?’’ जाड भिंगवाल्यानं विचारलं.

‘‘अगदी बरोबर; पण अशा प्रकारचं यश हे दोन घडीचंच असतं, असा माझा दृष्टिकोन आहे. त्यामुळं संचालक, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक ही माझी सगळी पदं त्या त्या काळापुरतीच होती. तो काळ गेला की ती पदंही गेली. प्रसिद्धी, नशीब यांच्याबाबतही असंच म्हणता येईल. याउलट मूल्यं टिकवण्यासाठी केलेल्या संघर्षातून मिळालेल्या गोष्टी या कायम टिकणाऱ्या असतात. मग तो आपल्यातील दुबळेपणाविरुद्धचा संघर्ष असो किंवा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी
केलेला संघर्ष असो किंवा लोभावर मात करण्यासाठी केलेला संघर्ष असो. यशाच्या पिरॅमिडच्या तळाशी प्रसिद्धी आणि नशीब असतं. सर्वसाधारणपणे तारुण्यात आपल्याला ते हवं असतं. त्याच्या वरच्या पातळीवर स्वतःविरुद्धच्या संघर्षातून मिळालेलं यश असतं. सगळ्यात वरच्या पातळीवर इतरांच्या भल्यासाठी केलेल्या संघर्षातून मिळालेलं यश असतं. हे यश पैसा किंवा प्रतिष्ठा यांच्या मोजमापानं कधीच मोजलं जात नाही, तर ते आंतरिक समाधानाच्या स्वरूपात अनुभवलं जातं,’’ मी म्हणालो.

गप्पांमध्ये किती उशीर झाला ते कळलंच नाही; पण तरीही त्या संपू नयेत, असं प्रत्येकालाच वाटत होतं. कायम व्यावहारिक विचार करणाऱ्या मीनानं सगळ्यांना तंद्रीतून जागं केलं. ‘‘चला, उशीर झालाय.’’ तिनं वेळेची आठवण करून दिली आणि पुढच्याच क्षणी
माझ्याकडं बघून म्हणाली ः ‘‘सर, एखादा निरोपाचा शेर सांगा ना...’’
- मी म्हणालो ः ‘‘मित्रांनो, आयुष्याच्या वाटेवर चालताना इक्‍बालचा सल्ला नेहमी लक्षात ठेवा.
किसे नही है तमन्ना-ए-सरवरी, लेकिन
खुदी की मौत हो जिस में, वो सरवरी क्‍या है?
(आपल्याला यश मिळावं, असं प्रत्येक माणसाला वाटत असतंच... परंतु यश मिळवताना मूल्यांचा, स्वत्वाचाच बळी द्यावा लागत असेल, तर मग त्या यशाला अर्थ तो काय?)
‘‘गुड बाय, सर...’’ कुणीतरी म्हणालं.
‘‘गुड बाय नाही, खुदा हाफिज!’’ मी म्हणालो, ‘‘आपण पुन्हा भेटूच, तोपर्यंत परमेश्वराचं कृपाछत्र तुमच्यावर कायम राहो...’’...आणि जड पावलांनी त्यांनी निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com