स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःच विचार करा (डॉ. यशवंत थोरात)

स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःच विचार करा (डॉ. यशवंत थोरात)

तरुणांच्या चमूला मी सांगू लागलो ः ‘‘इतरांनी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा स्वतःच्या अनुभवावरून तुमचं मत बनवा. इतरांचं म्हणणं अमान्य करायला घाबरू नका आणि स्वतःच्या मतावर ठाम राहा. जर घाबरून किंवा संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही गर्दीबरोबर वाहत गेलात तर तुम्ही सगळ्यांचं; विशेषतः स्वतःचं नुकसान करून घ्याल.’’

रविवारी मी नेहमीप्रमाणे फिरून आलो आणि सवयीनं माझी खोली थोडी ठीकठाक करून खुर्च्या मांडायला लागलो; पण क्षणार्धात माझ्या ध्यानात आलं की त्याचा काहीच उपयोग नाहीय. कारण सगळी मुलं तर गावाला गेली होती आणि त्यामुळं आमची गप्पांची मैफलही खंडित झाली होती. त्या मनमोकळ्या, ऐसपैस गप्पा, एकमेकांना मारलेले टोमणे, माहितीची देवाण-घेवाण सगळं थांबलं होतं. त्या मैफलींचं मनातल्या मनात स्मरण करत मी सुस्कारा सोडला आणि तिथलंच एक पुस्तक घेऊन टेबलापाशी बसलो. ‘जीवन हे शेवटी असंच असतं तर...’ असा काहीसा विचार माझ्या मनात आला. कॉफी घेत आणि कुठलंसं संगीत ऐकत मी मनातला विषण्णपणा घालवायचा प्रयत्न करत होतो. एवढ्यात हातात ताजं वर्तमानपत्र घेऊन माझी पत्नी उषा तिथं आली.‘‘तुमच्या कालच्या भाषणाबद्दल यात काय लिहिलंय पाहिलंत का?’’ तिनं विचारलं. ‘‘कसं पाहणार? पेपर तर तुझ्या हातात आहे...’’ विनोद करण्याचा मी प्रयत्न केला. ‘‘उगाच काहीतरी विनोद करू नका’’ तिनं फटकारलं आणि म्हणाली ः ‘‘तुम्ही लोकांना फुकटचा उपदेश करायला गेलातच कशासाठी? नाही ते वाद निर्माण करण्यापेक्षा बागकामात किंवा सिनेमाच्या सीडीज्‌ व्यवस्थित लावून ठेवण्यात तुम्हाला वेळ घालवता आला असता.’’ तिचं म्हणणं बिनबोभाट मान्य केलं नाहीतर ती दुपारपर्यंत मला सुनावत राहील, हे मला माहीत होतं. तिला गप्प करण्यासाठी मी म्हणालो ः ‘‘बरं ठीकंय...मी यापुढं मधमाश्‍यापालन, सिनेमाच्या सीडीज्‌ आवरणं किंवा आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताचा अभ्यास असल्या विषयातच वेळ घालवीन. झालं समाधान?’’

माझ्या बोलण्यानं तिच्या रागाचा पारा आणखीच चढला.
‘‘तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही,’’ ती म्हणाली ः ‘‘तुमच्याभोवती कोंडाळं करून तासन्‌तास गप्पा मारणाऱ्या त्या मुलांना तुम्ही खूप महान वाटत असाल; पण प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेण्याची तुमची ही सवय अगदी उबग आणणारी आहे. काहीही असो...तुमच्याकडं करण्यासारखं काहीच नसेल, तर नुसती टीका करण्यात काय अर्थ आहे?’’ तिनं हातातलं वर्तमानपत्र माझ्यासमोर टाकलं आणि काहीतरी पुटपुटत ती रागारागानं आतल्या खोलीत निघून गेली.
मी ते वर्तमानपत्र हातात घेऊन चाळायला लागलो, एवढ्यात दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर तरुणांचा एक घोळका उभा होता.
‘‘हे थोरातांचं घर आहे का?’’ एकानं विचारलं.
मी ‘‘हो’’ म्हणताच ‘‘आम्ही तुम्हाला देण्यासाठी एक पत्र आणलं आहे’’ असं त्यांच्यातला एकजण म्हणाला. मी तो लिफाफा फोडला. आतल्या चिठ्ठीत लिहिलं होतं ः

आदरणीय सर, हे पत्र घेऊन येणारे आमचे मित्रच आहेत. त्यांच्याशी बोलण्यापूर्वी पुढील गोष्ट वाचावी, अशी आमची तुम्हाला विनंती आहे.
फार फार वर्षांपूर्वी एक माणूस एका जंगलातून प्रवास करत होता. चालत चालत तो एका नदीपाशी आला. ती नदी तो ओलांडणार एवढ्यात एक म्हातारा माणूसही नदी ओलांडू पाहत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या पाठीवर त्याच्याहीपेक्षा एक जख्ख म्हातारा बसला होता. त्या प्रवाशाला त्याची दया आली. त्याला मदत करण्यासाठी म्हणून त्यानं त्या जख्ख म्हाताऱ्याला आपल्या पाठीवर घेतलं.
प्रवाशानं त्याला पाठीवर घेताच तो म्हातारा हसायला लागला. प्रवाशानं हसण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुझ्या पाठीवर बसलेला जख्ख म्हातारा हा खरं म्हणजे एक भूत आहे. दुसऱ्या कुणीतरी ते ओझं आपण होऊन स्वीकारेपर्यंत हा म्हातारा आता तुझ्या पाठीवरून हलणार नाही! गेलं वर्षभर आमचं ओझं पाठीवर वागवल्यानंतर आता तुम्हाला सुटका करून घ्यावीशी वाटत असेल; पण तसं होणार नाही. नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तुमच्या यापुढं होणाऱ्या गप्पांच्या मैफलीसाठी शुभेच्छा! ’’
काकूंना नमस्कार.
तुमचे प्रिय विद्यार्थी.  

मनातल्या मनात मी हसलो. माझे तरुण मित्र माझ्यापेक्षा जास्त हुशार निघाले होते. तरुणांचा हा दुसरा घोळका दारात तसाच उभा होता.‘‘या, बसा. मी एका मिनिटात आलोच’’ असं म्हणत मी त्यांना घरात घेतलं. स्वयंपाकघरात गेलो. ‘‘काय हवंय?’’ पत्नीनं विचारलं.
‘‘काही नाही...थोडा चहा करायचा होता’’- मी म्हणालो.
‘‘करते मी,’’ उषा म्हणाली.
‘‘मग, प्लीज सात कप कर...’’ मी तिची नजर चुकवत म्हणालो.
‘‘माय डिअर फ्रेंड, भूत तुमच्या पाठीवर स्वार झालंय, माझ्या नाही.’’ उषा म्हणाली ः ‘‘तुमचा तुम्हीच करा चहा.’’ एव्हाना सगळेजण खोलीत बसले होते. मी बाहेर येताच त्यांनी आपापली ओळख करून दिली. त्यांच्यातला राहुल हा तरुण कलाशिक्षक होता. शिकवण्याच्या नवनव्या पद्धती शोधून काढण्याची त्याला आवड होती. इंजिनिअरिंगला असलेला पीटर उत्साही ट्रेकर होता. मेडिकलच्या अंतिम वर्षात असलेली देविका निसर्गवादी होती. किरणला त्याचं कृषिविषयक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या गावाचं स्वरूप बदलायचं होतं. आर्किटेक्‍ट असलेली यास्मिन महिलांच्या हक्कांविषयीच्या चळवळीतली कार्यकर्ती होती. कायद्याची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या प्रदीपला गरिबांना आणि मागासलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडायचं होतं. या सगळ्यांच्या परिचयानं मी प्रभावित झालो. ‘‘काय हवंय तुम्हाला?’’ मी विचारलं.
‘‘मार्गदर्शन!’’ ते एका सुरात म्हणाले.
‘‘तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवावा, असं आम्हाला वाटतं.’’
‘‘म्हणजे तुम्हाला असं हवंय, की सगळा विचार मी करायचा आणि तुम्ही फक्त
ऐकायचं...’’ मी विचारलं.
त्यांनी उत्साहानं होकारार्थी मान हलवली.
‘‘जमणार नाही...’’ मी अनपेक्षितपणे म्हणालो. ते एकदम गोंधळले. ‘‘आमच्या आधीच्या मित्रांना तुम्ही असंच तर सांगत होतात...’’ कुणीतरी म्हणालं.
‘‘हो. पण ते चुकीचं होतं. मी त्यांना जर त्यांचा विचार करू दिला असता, तर त्यांची अधिक प्रगती झाली असती. ‘स्वतः अनुभव घेऊन शिका’ असं मी त्यांना सांगायला हवं होतं; पण मला त्यांच्याविषयी फार जिव्हाळा असल्यानं मी त्यांना ‘सुरक्षित’ ठेवू
पाहत होतो...’’ मी म्हणालो.
‘‘पण त्यांना धोक्‍यांपासून वाचवून एक प्रकारे तुम्ही त्यांचं भलंच करत नव्हता का?’’ कुणीतरी म्हणालं.
‘‘हो; पण तात्पुरतं. दीर्घ काळासाठी म्हणाल तर नाही. मी त्यांना कुठल्याही कुबड्या न घेता त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करू द्यायला हवा होता.’’ समोर बसलेल्यांचे चेहरे साफ पडले. ‘‘म्हणजे, तुम्ही आम्हाला मदत करणार नाही का?’’ शांततेचा भंग करत त्यातल्या एका मुलीनं विचारलं.
‘‘हो, करीन...पण पूर्वीप्रमाणे नाही. पूर्वीच्या ‘गुरू-शिष्य पद्धती’ऐवजी आपण आता समान स्तरावर संवाद साधू या,’’ मी म्हणालो. ‘‘एक लक्षात घ्या, की खरा शिक्षक तुमच्या आत असतो. शिक्षण म्हणजे त्याच्यासाठी सगळे दरवाजे उघडे
करून देणं’’ - मी म्हणालो.
‘‘ते ठीक आहे; पण सध्याच्या गतिमान माध्यमांच्या आणि इंटरनेटच्या जमान्यात या ‘आतल्या शिक्षका’शी संवाद साधणं तसं अवघडच आहे,’’ देविकानं चिंता व्यक्त केली.
‘‘मान्य. आपल्यावरचा बाह्य प्रभाव पाहता आपण खरोखरच विचार करत असतो की आपल्याला एका विशिष्ट पद्धतीनं विचार करायला लावलं जातं, हे कळणं कठीण आहे. म्हणून तुम्ही सदैव दक्ष राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतःच स्वतःचा विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जर तुम्ही तुमच्याकडं येणाऱ्या माहितीचा नीट अन्वयार्थ लावू शकलात आणि त्यानंतर तुमची मतं बनवू लागलात आणि त्यानुसार वागायला लागलात, तर तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र होण्याच्या मार्गावर आहात असं समजा. आणि खात्री बाळगा, की यातून होणारा फायदा फार मोठा असेल,’’ मी म्हणालो.
‘‘पण तुम्ही जे म्हणत आहात ते अशक्‍य आहे,’’देविका म्हणाली ः ‘‘रोज मिळणारी माहिती तपासून पाहणं हे सर्वसामान्य माणसासाठी खूपच जिकिरीचं आहे. प्रत्येकच गोष्ट जर तपासून पाहायची असेल तर आयुष्य थबकून राहील... पुढं सरकणारच नाही.’’
‘‘बरोबर आहे,’’ तिला दुजोरा देत पीटर म्हणाला. ‘‘कुठंतरी विश्‍वास हा ठेवावाच लागतो, यात शंकाच नाही. बाहेरून मिळणारी सगळी माहिती ही नेहमी चुकीचीच असते किंवा स्वतःचं मत बनवण्यात बाधा आणणारी असते असं मी म्हणत नाही; पण जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करायची सवय लावून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही कुणाच्यातरी हातचं बाहुलं बनण्याचा धोका खूप जास्त असतो,’’ मी माझा मुद्दा मांडला.

यास्मिननं वेगळाच विचार मांडला.
ती म्हणाली ः ‘‘आपण सगळेच जण अशा समाजात किंवा अशा संस्कृतीत जन्मलेलो असतो, की जिथं सगळे नियम आणि पद्धती आधीच ठरलेल्या असतात. बहुतेक वेळा आधी ठरलेल्या गोष्टी स्वीकारण्याशिवाय आपल्यापुढं पर्यायच नसतो.’’
- मी म्हणालो ः ‘‘तुझं म्हणणं बरोबर आहे आणि ही गोष्ट तेवढी वाईटही नाही. मात्र, आपण कुठल्याही गोष्टीविषयी प्रश्‍न न विचारता आंधळेपणानं स्वीकार करणं हे चुकीचंच आहे. एखाद्या गोष्टीचा जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुमची होऊ शकत नाही आणि एखादी गोष्ट जर खऱ्या अर्थानं तुमची झाली नाही, तर ऐनवेळी ती तुम्हाला उघडं पाडते. एक उदाहरण देतो. स्वतंत्र भारतातली पहिली तरुण पिढी या नात्यानं आम्ही सामाजिक न्यायाच्या संकल्पनेनं भारावलेले होतो. आम्ही जातीपातीचा निषेध करत होतो आणि जातिव्यवस्था काय आहे हे समजून न घेताच आमची ‘उदारमतवादी’ मतं मांडत होतो. जातिव्यवस्थेला असलेला माझा हा विरोध माझ्या ‘आतून’ आलेला नसावा. माझ्या कपाळावर बाहेरून कुणीतरी पोस्टाचं तिकीट चिकटवावं, तसा तो होता. कालांतरानं मी मोठा झालो, मोठ्या पदावर गेलो. एकदा मला ब्रिटनमधल्या एका विद्यापीठात व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ‘सकारात्मक कृती आणि तिचा भारतातल्या जातिव्यवस्थेवर परिणाम’ असा भाषणाचा विषय होता. जायच्या आदल्या दिवशी मी माझ्या नोट्‌सची उजळणी करत होतो, तेव्हा केंब्रिजमधून आपला अभ्यासक्रम संपवून नुकतीच परतलेली माझी थोरली मुलगी आभा तिथं आली.
‘‘कशी चाललीय भाषणाची तयारी?’’ तिनं विचारलं.

‘‘प्रत्येक समुदायामध्ये काही ना काही भेदभाव हा असतोच आणि तो शतकानुशतकांपासून असतो. सामाजिक दर्जा देण्यासाठी जोपर्यंत त्याचा वापर होत नाही, तोपर्यंत तो तसा निरुपद्रवी असतो; पण संपत्ती, उत्पन्न, सत्ता आणि प्रतिष्ठा यासाठी तो आधार मानला जायला लागला, तर त्यातून सहन न करण्याजोगी असमानता निर्माण होईल, असं मत मी मांडणार आहे,’’ असं मी तिला सांगितलं.
‘‘यालाच तर जातिव्यवस्था म्हणतात!’’ आभा म्हणाली. ‘‘होय’’ मी म्हणालो.
ती म्हणाली ः ‘‘एखादी व्यक्ती ज्या जातीत जन्म घेते, त्या जातीवरून तिचा दर्जा ठरवला गेल्यानं त्या व्यक्तीच्या क्षमतांवर मर्यादा येतात, तिच्या हक्कांवर गदा येते, संपत्तीपासून ती वंचित राहते आणि समाजात ती वेगळी पडते. अशी जन्मजात वर्गवारी त्या व्यक्तीचा व्यवसाय ठरवतेच; पण संपत्ती, सत्ता आणि हक्क मिळवण्याच्या त्याच्या अधिकारांवरही मर्यादा आणते, हे भयानक आहे. हा आपल्या समाजावरचा कलंक आहे, तो आपण धुऊन टाकलाच पाहिजे.’’
मी गप्पांचा विषय बदलला. तिचं करिअर, भविष्यातल्या योजना, तिचं लग्न अशा विषयांवर आम्ही बोलू लागलो. काही वेळ ती दूर शून्यात नजर लावून एकदम शांत बसली. कुठल्यातरी विचारात ती गढली असावी. ती अचानक म्हणाली ः ‘‘मी एखाद्या दलिताशी लग्न केलं, तर तुम्हाला वाईट नाही ना वाटणार?’’
मला तिला सांगावंसं वाटत होतं ः ‘‘मुली, तू मला ओळखतेस. तू असं केलंस तर मला आनंदच आहे. जात ही महत्त्वाची नाही. तुला हवं ते मोकळेपणानं कर...’’ पण माझे शब्द माझ्या गळ्यात अडकले. त्या एका निर्णायक क्षणी माझं मोठं मन, माझा उदारमतवाद उघडा पडला.

मनाचा मोठेपणा, उदारमतवाद या गोष्टी माझ्या नसानसात भिनल्या आहेत, असं मला वाटायचं; पण तो केवळ मुखवटा किंवा वरवरची रंगरंगोटी असल्याचं मला जाणवलं. तो दिखावाच होता, त्यात काहीच अर्थ नव्हता.
माझं ब्रिटनमध्ये केलं जाणारं भाषण म्हणजे पोकळ शब्दांचा फुगा आहे, हे मी काही न बोलताही तिच्या लक्षात आलं होतं. तिचा बाबा दलितांच्या हक्कांसाठी लढणारा एक झुंजार सैनिक होता; पण कुठपर्यंत? तर त्याच्या घराला झळ लागणार नाही तोपर्यंत! दलित जावई मान्य करण्याची त्याची तयारी नव्हती. ती निघून गेली. ती काळोखी रात्र सरता सरत नव्हती. मीच उभ्या केलेल्या माझ्या मूल्यांचं छप्पर माझ्यावर कोसळत आहे, असं मला वाटत होतं. यातून सुटका होण्यासाठी सत्यापर्यंत पोचणं एवढा एकच मार्ग होता.
दरम्यान, आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय; पण त्या दिवसानं मला कायमसाठी शिकवलं, की एखादी गोष्ट केवळ स्वीकारली म्हणून ती खरी मानण्याचं ढोंग पुन्हा कधी करू नकोस! त्या घटनेनं मला हेही शिकवलं, की अनेक गोष्टी
बुद्धीशी निगडित असल्या, तरी मनात खोलवर दडलेल्या काही गोष्टींसाठी मनाच्या पलीकडं, अगदी आत्म्यापर्यंत जाऊन शोध घ्यावा लागतो.
‘‘ते खूप क्‍लेशदायक होतं का?’’ देविकानं हळुवारपणे विचारलं. ‘‘होय’’ मी म्हणालो.
दलितांविषयी बोलणं, त्यांच्याविषयी कळवळा दाखवणं किंवा त्यांच्यावरच्या अन्यायाच्या विरोधात लढणं ही एक गोष्ट आहे अन्‌ स्वतः दलित असणं आणि तो अन्याय सहन करणं ही वेगळी गोष्ट आहे. अन्याय झाल्याचं किंवा नाकारलं गेल्याचं दुःख समाजाची फेररचना मागत असतं, तर सर्व हक्क मिळालेले समाजाची वीण तशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
‘‘आता तुमचं मत काय आहे?’’ प्रदीपनं विचारलं ः ‘‘आजही तुम्ही तुम्हाला वरच्या जातीमुळं मिळालेला दर्जा जपत आहात का, की त्यापलीकडं गेला आहात?’’ ‘‘तो एक वेगळाच विषय आहे. सांगेन पुन्हा कधीतरी...’’ मी म्हणालो.
‘‘पण सर, जर आम्ही स्वतःच विचार केला, तर आमचा प्रत्येक विचार हा नवा असू शकेल काय?’’ राहुलनं विचारलं.

मी म्हणालो ः ‘‘नाही, मुळीच नाही. आपण कुणीतरी वेगळे आहोत, असं दाखवण्यासाठी काहीतरी वेगळं बोललं पाहिजे, असं नाही. दुसऱ्याला चूक न ठरवता आपण बरोबर कसे आहोत, ते सांगणं याला परिपक्वता म्हणतात. तुम्ही तुमचा विचार करणं म्हणजे
तुमची मतं तुम्ही विचारपूर्वक बनवणं आणि ती अभ्यास आणि चिंतन यातून तयार होणं. म्हणजे, एखाद्या समूहाशी जुळवून घेण्यासाठी आपल्या विचारांशी तडजोड न करणं. याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे अत्याधुनिक राहण्याचा आपला अट्टहास. आपण जे कपडे घालतो किंवा जे संगीत ऐकतो किवा माध्यमं जशी सांगतात तसं वागतो ते याच अट्टहासातून. व्यापारी कंपन्या त्यांच्या जाहिरातीतून आपल्याला संमोहित करतात आणि मग आपण कळपातल्या मेंढराप्रमाणे त्यांना बळी पडतो. मग आपण फॅशनच्या मागं लागतो, कर्जाच्या विळख्यात अडकतो, न झेपणारा खर्च करत राहतो, आपला हव्यास वाढतो, आपण चंगळवादी बनतो आणि एका जबरदस्त तणावात स्वतःला गुरफटून घेतो. हे सगळं लक्षात यायच्या आत आपण इतरांनी बेतलेलं आपलं आयुष्य जगायला सुरवात केलेली असते.
आपल्या स्वेच्छेचा त्यात काहीही वाटा नसतो...’’

आमच्या गप्पा अशाच सुरू राहिल्या असत्या; पण स्वयंपाकघरातून आलेल्या
टोमण्यामुळं त्या थांबल्या. टोमणा असा होता ः ‘‘अजूनही उपदेशाचे डोस सुरूच आहेत का डॉक्‍टर? की काही वास्तववादी सांगत आहात?’’
‘‘काय?’’ कुणीतरी विचारलं. ‘‘काही नाही...आपल्याला आता थोड्या वेळानं बाहेर जावं लागेल,’’ मी म्हणालो ः ‘‘पण जाण्यापूर्वी तुमच्यासाठी काही सूचना. पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सगळ्या गोष्टींची माहिती ठेवा. तुमचं मत बनवण्यापूर्वी त्याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवा. वाचा, निरीक्षण करा, मत व्यक्त करा आणि तुमचं मत तपासून पाहा. हे करताना आपल्यावर संस्कृतीचा किंवा सभोवतालच्या वातावरणाचा अनावश्‍यक परिणाम तर झाला नाही ना, हेही तपासून पाहा. तुमचं मन खुलं आणि मोकळं आहे ना, हे वारंवार तपासून पाहा. इतरांनी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा स्वतःच्या अनुभवावरून तुमचं मत बनवा. इतरांचं म्हणणं अमान्य करायला घाबरू नका आणि स्वतःच्या मतावर ठाम राहा. जर घाबरून किंवा संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही गर्दीबरोबर वाहत गेलात तर तुम्ही सगळ्यांचं; विशेषतः स्वतःचं नुकसान करून घ्याल. लोकांच्या श्रद्धांना तुम्ही आव्हान दिलंत, तर ते तुमच्यावर रागावतील, कदाचित तुमच्यावर हल्लाही करतील; पण त्यामुळं विचलित होऊ नका. तुम्ही त्यांना व्यक्तिगत आव्हान देत आहात असं वाटल्यामुळं ते रागावलेले असतात. तुमची चूक असेल तर ती मोकळेपणानं मान्य करा. कुठलाही निर्णय चांगला किंवा वाईट नसतो. त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट असतात. तुम्ही जर या गोष्टी लक्षात घेतल्या, तर कुठलीही सुधारणा करताना येणारं दडपण बरंचसं कमी होईल. थोडक्‍यात, इतरांच्या विचारानं वागण्यापेक्षा स्वतःच्या विचारानं वागा.’’ ते सगळेजण निघून गेले, तेव्हा बाहेर येत उषा म्हणाली, ‘‘नेहमीपेक्षा तुमचा आजचा उपदेश जरा बरा होता. असंच सुरू ठेवा...एक दिवस तुम्ही नक्की काहीतरी चांगलं सांगू शकाल!’’
काही उत्तर देण्यापूर्वी ती तितक्‍याच वेगानं आत निघून गेली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com