ये इन्साँ है जो देता जा रहा है इम्तिहाँ अपना (डॉ. यशवंत थोरात)

ये इन्साँ है जो देता जा रहा है इम्तिहाँ अपना (डॉ. यशवंत थोरात)

कोणत्याही गोष्टीची जाणीव आणि आपला प्रतिसाद यात थोडं अंतर असतं. खरी नैतिक कृती तेव्हाच घडते, जेव्हा सततच्या संस्कारांमुळं आपण त्या मधल्या शांततेत, थोडं थांबून त्या गोष्टीकडं निरपेक्षपणे पुन्हा पाहतो. सुरवातीला एखादी जाणीव झाल्याबरोबर कृती करण्यासाठी तुमचं मन तुम्हाला भाग पाडतं. कारण तो मधला अवकाश अधिक ताणण्याची तुमची शक्ती मर्यादित असते; पण सवयीनं हा अवकाश आपल्याला वाढवता येतो आणि मग एका क्षणी तुम्ही स्वतःकडं आणि तुमच्या भावनांकडं तटस्थपणे पाहू शकता. हे होत नाही तोपर्यंत आपण आपल्या मनाचे गुलाम असतो. ते घडतं त्या वेळी आपण मुक्त होतो. खरं स्वातंत्र्य म्हणजे, या मधल्या अवकाशावर प्रभुत्व मिळवणं आणि मगच आपल्या प्रतिसादाची निवड करणं...

समाजवादी पक्षाचे संस्थापक-सदस्य, १९४२ च्या स्वातंत्र्यचळवळीचे नेते, ब्रह्मविद्येचे अभ्यासक (थिऑसॉफिस्ट) आणि माझे गुरू व मार्गदर्शक अच्युतराव पटवर्धन एकदा मला म्हणाले होते ः ‘अनामिक राहणं ही फार कठीण गोष्ट आहे.’
- माझी गोष्ट मात्र अगदी वेगळी आहे. माझा ‘नाबार्ड’मधला कार्यकाळ संपला आणि ही अनामिकता नकळत, अगदी चोरपावलांनी माझ्याकडं आली; पण त्यानं मी फारसा अस्वस्थ झालो नाही. सगळं सोडून देऊन नाना-नानी पार्कला आपला अड्डा बनवणाऱ्यातला मी नव्हतो. ‘ग्रामीण भागातलं शिक्षण’ या माझ्या आवडीच्या विषयात मी माझं मन गुंतवलं आणि नवी वाटचाल सुरू केली. दिवस जात होते आणि अचानक एक दिवस माझे मित्र श्रीराम पवार माझ्याकडं आले आणि ‘सप्तरंग’साठी सदरलेखन करण्याची गळ मला त्यांनी घातली. मी आत्ता इथं जे लिहिणार आहे, ते काही अच्युतराव किंवा श्रीराम पवार यांच्याविषयी नाहीय; पण पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या या माझ्या सदरामुळं (हृदयसंवाद युवकांशी) माझी जी एक ओळख निर्माण झालीय, त्यातून घडलेली ही कहाणी आहे. मी कुणी फार मोठा माणूस नाही आणि माझ्या लेखनात अक्षय्य गुणवत्ता आहे, असंही मी मानत नाही. त्यामुळं माझ्या लेखनाबाबत येणाऱ्या प्रतिक्रिया आणि कौतुकाचे मेल वाचकांच्या चांगुलपणामुळं आलेले आहेत किंवा त्यांनी ते चुकून पाठवले आहेत, असंच मी मानतो. एकदा अचानक असाच एक मेल मला आला. त्यात म्हटलं होतं ः

आदरणीय सर,
गेल्या काही दिवसांपासून मी तुमचा चाहता बनलोय. मी २००२ मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. आज मी बंगळूर इथल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आणि एका प्रोजेक्‍टचा प्रमुख आहे. व्यक्तिगत आयुष्यातल्या काही घटनांमुळं मी पुरता गोंधळलो आहे. काय करावं हे मला सुचत नाहीय. मला तुमचा सल्ला हवाय. त्यासाठी मला तुम्हाला भेटायचंय. तुम्हाला वेळ असेल त्या वेळी मी येईन. कृपया वेळ द्यावा.
भेटीअंती सविस्तर बोलू.
- अस्लम शेख , बंगळूर

हा काही सर्वसाधारण मेल नव्हता. अनेक वाचक मला खुलासे मागत असतात किंवा सल्ले देत असतात; पण ते फक्त मेलवरून. खासगी प्रश्नाबाबत सल्ला घेण्यासाठी माझी भेट घेऊ इच्छिणारा हा पहिला मेल होता. मी तो मेल अनेकदा वाचला आणि खूप विचारान्ती उत्तर  लिहिलं ः

प्रिय अस्लम,
तुझ्या मेलबद्दल आणि त्यात व्यक्त केलेल्या भावनांबद्दल आभार. मी कोल्हापुरात राहतो आणि इतक्‍या दुरून मला भेटण्यासाठी खास वेळ काढून येणं तुला खूप गैरसोईचं होईल. त्यामुळं तू बंगळूरमधल्याच एखाद्या निष्णात समुपदेशकाला भेटावं, असा माझा तुला सल्ला आहे. तिथं तुला योग्य सल्ला मिळेल, अशी मला खात्री वाटते.
- डॉ. यशवंत थोरात

माझ्या मेलच्या उत्तरात अस्लमनं मला कळवलं, की यासंदर्भात त्यानं बराच विचार केला असून व्यावसायिक समुपदेशकाकडं जायचं नाही, असं जाणीपूर्वक ठरवलं आहे. ‘त्याची कारणं प्रत्यक्ष भेटीत सांगीन’ असं म्हणत त्यानं भेटण्याची विनंती पुन्हा एकदा केली. आता मी नकार देणं असभ्यपणाचं ठरलं असतं. त्यामुळं मी भेटण्याचं मान्य केलं. पुढच्या रविवारी तो आला. खास मर्सिडिज कारमधून. ‘काय सुंदर घर आहे तुमचं,’ असं म्हणत घरात प्रवेश करतानाच त्यानं वातावरणात अनौपचारिकपणा आणला. आम्ही घराच्या मागच्या आवारात चहा घेत बसलो.
‘‘इथं कुणी नाही, मोकळेपणानं बोल...’’ -मी म्हणालो.
तो थोडा वेळ तसाच शांत बसला. मग एकदम म्हणाला ः
‘‘सर, मी एका विचित्र परिस्थितीत सापडलोय. मला मदत कराल?’’
‘‘काय झालंय ते मला नेमकं सांगशील का?’’

तो सांगू लागला ः ‘‘ती एक खूप मोठी कहाणी आहे. खूप वर्षांपूर्वी, कॉलेजमध्ये असताना मी अंजली नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. तिचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. कॉलेज आणि विद्यापीठात आम्ही बरोबरच शिकलो. आमच्यात अनेक गोष्टी समान होत्या आणि भविष्यात एकत्र राहण्याची स्वप्नं आम्ही पाहिली होती. मानसशास्त्रातली पदवी घेऊन ती प्राध्यापिका झाली. मी इंजिनिअरिंगमध्ये माझ्या वर्गात पहिला आलो. मला चांगली नोकरी मिळाली. आम्ही दोघंही आता पुढचं आयुष्य एकत्र घालवण्याची स्वप्नं पाहू लागलो. तिच्या आई-वडिलांशी माझी चांगली ओळख होती. रीतीप्रमाणे लग्नाचा प्रस्ताव घेऊन मी त्यांना भेटलो. त्यांची प्रतिक्रिया मात्र अगदी अनपेक्षित होती. माझा प्रस्ताव ऐकून ते एकदम भडकलेच. त्यांना संताप अनावर झाला. आम्ही वेगवेगळ्या धर्मांचे होतो. ‘तुम्ही दोघांनी लग्नाचा विचार केलाच कसा?’ असा त्यांचा सवाल होता. त्यांची समजूत पटणं अशक्‍य होतं. त्यांनी मला चांगलंच सुनावलं. ‘तू आमचा विश्वासघात केला आहेस’, असा आरोप त्यांनी माझ्यावर केला आणि ‘अंजलीला पुन्हा कधीही भेटू नकोस’ अशी तंबीही त्यांनी मला दिली. मी अगदी उद्‌ध्वस्त झालो. ‘आई-वडिलांचा विरोध झुगारून देऊन लग्न करू,’ असं अंजली मला म्हणाली. मीही जवळपास तयार झालो; पण तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतलं दुःख माझ्या मनातून जाईना.

अखेरीस मी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुण्यात आलो. तिथं मला मोटारींच्या एका जागतिक पातळीवरच्या कंपनीत नोकरी मिळाली.

मनातल्या उद्‌ध्वस्त स्वप्नांचे तुकडे मागं सोडून नव्यानं सुरवात करणं तसं कठीण होतं; पण मी स्वतःला कामात झोकून दिलं. हळूहळू दुःख कमी झालं. माझ्या कामावरच्या निष्ठेमुळं मला चांगली पदं आणि बढत्या मिळत गेल्या. माझी वेगानं प्रगती झाली. मी कामात एवढा बुडालो होतो, की लग्नाचा विचारच माझ्या मनात आला नाही. उलट, उत्तरोत्तर ती भावना कमी कमीच होत गेली. मी एकटा होतो; पण एकाकी नव्हतो. मी खूप वाचन करायचो. व्यायाम करून मी स्वतःला तंदुरुस्त ठेवलं होतं. चित्रकलेची मला आवड होती. पेंटिंगची कला मी जोपासली होती. तसा मी सर्वसाधारणपणे सुखी होतो. दोन वर्षांपूर्वी बंगळूरला कोट्यवधी रुपयांचा एक मोठा प्रकल्प उभारण्याची आणि त्याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. अगदी शून्यातून एवढा मोठा प्रकल्प उभा करण्याची कल्पनाच मला सुखावून टाकणारी होती. मी ते आव्हान स्वीकारलं. मी पुन्हा बंगळूरला आलो आणि कामात स्वतःला झोकून दिलं. थोड्याच दिवसांत आम्हाला एचआर विभागाच्या प्रमुखांची आवश्‍यकता निर्माण झाली. ‘आयआयएम’मधून पदवी घेतलेल्या भास्करशी आमचा शोध थांबला. भास्करही माझ्यासारखाच चाळिशीतला होता. भास्कर कामावर रुजू झाला. त्याच्या रूपानं आम्हाला अतिशय शांत आणि कार्यक्षम अधिकारी  मिळाला होता. ते अतिशय धावपळीचे दिवस होते. आमची सगळी टीम उत्साहात होती. सगळ्या आघाड्यांवर आम्ही बाजी मारत होतो. ठरवून दिलेलं लक्ष्य आम्ही सहजपणे पूर्ण करत होतो. उद्योगजगतात आमचं खूपच कौतुक होत होतं. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्‍टर्समध्ये मला घेणार असल्याची बातमी सगळ्यांना समजली. एक छानशी पार्टी करून हा आनंद साजरा करायचं सगळ्यांनी ठरवलं. भास्करनं त्यात पुढाकार घेतला. त्या दिवशीचं जेवण त्यानं त्याच्या घरीच ठेवलं होतं. कामामुळं मला जायला थोडा उशीर झाला. मी तिथं पोचलो आणि दाराची बेल वाजवली. दरवाजा उघडला तो अंजलीनं! मी तिला क्षणार्धात ओळखलं. मी सुन्न झालो. काय घडतंय ते मला कळेना. माझ्या हृदयाचे ठोके जणू बंद झाले. कदाचित काळही काही क्षण थांबला असावा. त्याच वेळी वेदनेची एक कळ माझ्या काळजात उमटली. कसाबसा मी तो प्रसंग निभावून नेला. पार्टी संपली. तिथं काय काय बोलणं झालं, जेवायला काय होतं, हे आता मला काहीही आठवत नाही. पार्टी संपवून कसाबसा मी घरी पोचलो आणि अक्षरशः कोसळलो. मी त्या दिवशी रात्री एक क्षणभरही झोपू शकलो नाही. त्यानंतर अनेक रात्री मी जागून काढल्या आहेत. कारण स्पष्ट होतं. भूतकाळात काहीही घडलं असलं, तरी सध्या एक गोष्ट खरी होती, की तिनं लग्न केलं होतं आणि ती सुखानं संसार करत होती. भास्कर माझा जवळचा मित्र आणि सहकारी होता. मी कंपनीचा प्रमुख होतो. तिथं माझा अनादर होण्याचा प्रश्नच नव्हता; पण काय करावं ते मला सुचत नव्हतं. काय करावं याचा विचार करण्यासाठी मी रजा घेतली; पण काही उपयोग झाला नाही. शेवटी आपलं नशीबच वाईट असेल तर त्याला कोण काय करणार, असा विचार करून मी शांत राहिलो. ‘सप्तरंग’मधलं तुमचं सदर मी नियमितपणे वाचतो. सूक्ष्म मानवी व्यवहाराबाबतचं तुमचं भाष्य मला आवडतं. तुम्ही मला मदत कराल, असं खात्रीनं वाटलं आणि मी तुमच्याकडं आलो. आज मी हा तुमच्यापुढं आहे... सर, मला सांगा की मी काय केलं म्हणजे ते बरोबर ठरेल? नेमकं मी काय करू?’’ निरोप घेण्याच्या क्षणापर्यंत अस्लम हा प्रश्न मला पुनःपुन्हा विचारत होता.
आठ दिवसांनी मला अंजलीचा मेल आला. तिनं लिहिलं होतं ः

प्रिय डॉ. थोरात,
गेल्या आठवड्यात तुम्हाला अस्लम येऊन भेटला असल्याचं त्यानंच मला सांगितलं आणि ‘मीही तुम्हाला भेटावं,’ असा सल्ला त्यानं मला दिला आहे. बऱ्याच दिवसांपासून मला महालक्ष्मीच्या दर्शनाला यायचंच होतं. तुम्ही मला थोडा वेळ दिलात तर मला दोन्ही गोष्टी एकाच फेरीत करता येतील.
- डॉ. अंजली. एस.
प्रोफेसर आणि मानसशास्त्र विभागप्रमुख.

- मेल अतिशय सुस्पष्ट होता. त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली व ती म्हणजे, माझ्याशी चर्चा करायला येणं हाच अंजलीचा मुख्यतः हेतू होता; महालक्ष्मीचं दर्शन हे केवळ एक निमित्त होतं. माझं एक मन मला यापासून दूर राहायला सांगत होतं; पण उत्सुकता गप्पही बसू देत नव्हती. मी भेटीची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणं ती आली. मला सर्वप्रथम जाणवला तो तिच्या व्यक्तिमत्त्वातला रुबाब. विचारांच्या वादळावर तिनं खंबीरपणानं ताबा मिळवला होता. मी तिचं स्वागत केलं. थोड्या वेळानं ती म्हणाली ः ‘‘सर, माझी कहाणी म्हणजे ‘पत्नीला प्रियकर भेटतो आणि मग ती नवऱ्याला फसवून पळून जाते,’ अशा स्वरूपाची धक्कादायक प्रेमकहाणी तर वाटत नाही ना तुम्हाला?’’
- ‘‘मी तर तसं काहीच म्हणालेलो नाही,’ मी स्पष्ट केलं.
‘‘हो, खरंय. तुम्ही तसं म्हणाला नाहीत; पण तुमच्या डोळ्यांत मला तसं दिसलं,’’ अंजली म्हणाली.
- माझ्या मनातलं तिनं ओळखल्याचं पाहून मी थोडा वरमलो. थोड्या कोरड्या स्वरात मी विचारलं ः ‘‘तसं असेल तर मॅडम नेमकं सत्य काय आहे?’’
ती थोडी गोंधळल्यासारखी वाटली. ‘‘सत्य?’’ ती कडवटपणे म्हणाली ः ‘‘डॉ. थोरात, तुम्हाला असं वाटतं का, की जगात सत्य नावाची काही चीज आहे? आपण आपल्या सोईसाठी किंवा स्वार्थासाठी गोष्टी हव्या तशा रचून त्यालाच ‘सत्य’ असं म्हणत नाही का? तुम्ही मला सत्य विचारलंत; पण तुम्हाला कुणाचं सत्य हवंय? माझं, भास्करचं की अस्लमचं? प्रत्येकाचं सत्य हे एकाच वेळी सत्य आणि असत्य असतं! तुम्ही अस्लमचं सत्य ऐकलंय. आता माझंही ऐका. होय, मी आणि अस्लम कॉलेजात आणि विद्यापीठात बरोबर होतो. आमचं एकमेकांवर प्रेम होतं, हेही खरं आहे. मी पार्टीच्या दिवशी दार उघडलं, त्या क्षणापर्यंतही यात काहीच बदल झालेला नव्हता. माझी कुंडली जर एवढी वाईट नसती, तर १८ वर्षांपूर्वीच आम्ही एक झालो असतो; पण तो निघून गेला आणि माझं सगळं आयुष्य रिकामं रिकामं झालं. सगळं काही हरवलं होतं आणि ते पुन्हा मिळणार नाही, हे मला माहीत होतं. काळ जातच होता. साधारणतः वर्षभरानं माझ्या आई-वडिलांनी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. मी लग्न करून संसाराला लागावं, असं त्यांचं म्हणणं होतं. मी नकार दिला; पण माझ्यावरचं दडपण वाढतच गेलं आणि शेवटी मी तयार झाले. भास्करचं स्थळ आलं, बघण्याचा कार्यक्रम झाला आणि भास्करनं लगेचच होकार कळवला. मात्र, मी लगेच तयार नव्हते. मी वर्षभराचा वेळ मागून घेतला आणि दरम्यानच्या काळात भास्करला अस्लमबद्दल सगळं सांगितलं. ‘मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते,’ हे मी त्याच्याशी बोलताना स्पष्ट केलं. भास्करनं ते शांतपणे ऐकून घेतलं. हे सगळं कळूनही भास्करनं मला नकार दिला नाही. शेवटी त्याचा निर्धार, प्रेम आणि समजूतदारपणा यांनी माझ्यावर मात केली आणि माझा विरोध मावळला. गेली १५ वर्षं आम्ही पती-पत्नी मित्र, सहकारी आणि जोडीदार या नात्यानं आनंदात राहत आहोत. तो अतिशय प्रेमळ आणि सुसंस्कृत माणूस आहे; त्यामुळंच त्या दिवशीच्या पार्टीनंतर अस्लम निघून गेल्यावर मी भास्करला त्याचा बॉस कोण आहे, ते सांगून टाकलं. सर, मी भास्करपासून काहीही लपवलेलं नाही. तुमची भीती व्यर्थ आहे. तुम्हाला वाटतंय तसं झालेलं नाही; पण त्यातून माझ्यासमोरचा प्रश्न सुटलेला नाही. तोच प्रश्न मला सतावतोय. सर, मी आता काय करणं बरोबर ठरेल?’’

एखादं प्रमेय सुटत जावं आणि त्याचं अपेक्षित उत्तर समोर यावं, तसंच घडलं. १५ दिवसांत भास्करचाही मला मेल आला. खरं सांगायचं तर मी त्याची वाटच पाहत होतो. तो अगदी कमी शब्दांतला आणि नेमक्‍या मुद्द्यावर बोट ठेवणारा होता.
‘मी नऊ तारखेला पुण्याला जाणार आहे. जाताना वाटेत कोल्हापूरला थांबून मी तुमच्याशी थोडा वेळ चर्चा करू शकतो का?’ असं त्यानं मेलमधून विचारलं होतं.
मी होकार कळवला. ठरल्याप्रमाणं भास्कर मला भेटायला आला. मला वाटलं होतं, त्यापेक्षा तो अगदी वेगळा होता. उंच, सडपातळ, नितळ चेहऱ्याचा, मोकळ्या स्वभावाचा; पण थोडं अंतर राखून बोलणारा.

‘‘तुम्ही काय घेणार?’’ मी विचारलं.‘‘कॉफी... शक्‍य असेल तर. मात्र, मी तुमचा वेळ मात्र फार घेणार नाही,’’ भास्कर म्हणाला ः ‘‘तुम्हाला सगळं माहीतच आहे. अंजली आणि अस्लम या दोघांनीही मला तुमच्याबरोबर बोलणं झाल्याचं सांगितलंय.’’
‘‘अंजली काय म्हणतेय?’’ मी विचारलं.भास्करचे डोळे पाणावले. तो सांगू लागला ः ‘‘अंजली अतिशय प्रेमळ आणि अत्यंत प्रामाणिक आहे.१६ वर्षांपूर्वी बघण्याच्या कार्यक्रमात ते कानडी पद्धतीचे पोहे घेऊन येताना मी तिला पहिल्यांदा पाहिलं...त्याच क्षणी मी तिच्यावर लुब्ध झालो होतो. मी तिथल्या तिथं पसंती सांगितली होती. तिनं वर्षभराची मुदत मागितल्यामुळं मला आश्‍चर्यही वाटलं होतं. पुढच्या एक-दोन भेटींनंतर तिनं मला अस्लमबद्दल सगळं काही सांगितलं; मात्र, ‘तो विषय आता संपला आहे आणि मला त्यात काहीही रस नाही,’ असं मी तिला त्या वेळी म्हणालो होतो.
‘सगळं विसरून आपण पुढं जाऊ या,’ असा सल्लाही मी तिला दिला होता. त्यावर ‘माझं अस्लमवर खरं प्रेम आहे आणि तू ते सहजपणे घेऊ नकोस. वाटल्यास तू लग्नाचा फेरविचार करू शकतोस,’ असं तिनं मला त्या वेळी स्पष्टपणे सांगितलं होतं. - मात्र, फेरविचार करण्यास मी ठामपणे नकार दिला. आमच्या भेटी जसजशा वाढत गेल्या, तसतशी ती विरघळत गेली आणि साधारणतः वर्षअखेरीस आम्ही विवाहबद्ध झालो. सर, आम्ही एकमेकांच्या सहवासात जे दिवस घालवले आहेत, ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस आहेत. मला आयुष्यात दुसरं काहीही नको होतं. त्यामुळं त्या पार्टीच्या रात्री तिनं जेव्हा मला सांगितलं, की माझा जो बॉस आहे, तोच तिचा कॉलेजमधला मित्र अस्लम होय, तेव्हा मला धक्काच बसला. काय करावं ते मला सुचेना. आपले सुखाचे दिवस संपले आणि आता दुःखाचे दिवस सुरू झाले, असं मला वाटायला लागलं. मात्र, तुमचा काही गैरसमज झाला असेल तर मी स्पष्ट करू इच्छितो, की त्या दिवसापासून अस्लमचं आणि अंजलीचं वागणंही नेहमीसारखंच आहे. त्यात काहीही फरक पडलेला नाही. तुमच्या बरोबर झालेलं सगळं बोलणं तिनं मला सांगितलं आणि तुम्हाला भेटण्याचा सल्ला दिला. माझाही प्रश्न तिच्यासारखाच आहे. मी नेमकं काय करू?’’
तिघांनाही मी लिहिलं ः

प्रिय मित्रांनो,
तुमच्या कहाण्यांमध्ये मला समाविष्ट करून घेण्याइतका विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवल्याबद्दल धन्यवाद. मात्र, मी या प्रसंगाला ‘कहाणी’ म्हणू का? कदाचित मी स्वतःहोऊनच या कहाणीत गुंतलो असेन. तुम्हाला न भेटण्याचा पर्याय माझ्यापुढं होता; पण मी तुम्हाला भेटलो आणि आता आज मी एका डॉक्‍टरच्या किंवा सल्लागाराच्या भूमिकेत तुमच्या पुढं उभा आहे; पण मी काही अधिकृत समुपदेशक नाही, ही गोष्ट त्यामुळं लपत नाही. तुम्हाला प्रत्येकाला काय हवंय, याची मला कल्पना नाही. तुमच्या मनात काय आहे, हे तुमच्यापैकी एकानंही मला सांगितलेलं नाही. तुम्ही आपापलं केवळ म्हणणं सांगितलंत आणि तुम्ही निघून गेलात. तुम्ही तसं काही बोलला नाहीत; पण माझा अंदाज आहे, की तुमच्यापैकी कुणालाच तुमच्या मनाविरुद्धचं उत्तर नकोय. मात्र, एक लक्षात ठेवा, की माझ्याकडं काही जादूचा तोडगा नाही किंवा मी म्हणेन तेच घडवून आणणारा जादूचा दिवाही माझ्याकडं नाही. एक गोष्ट मात्र मला कबूल केलीच पाहिजे, की तुमच्या या कथेमुळं मीदेखील काही काळ बुचकळ्यात पडलो. मी एक अपरिपूर्ण असा साधा माणूस आहे. तुमची वागणूक बरोबर आहे किंवा नाही, ते ठरवण्याचा अधिकार मला नाही. कदाचित गुणांचं भांडवल करायला मी संकोचतही असेन. मी तुम्हाला यासाठी असा इशारा देतोय, की कदाचित पुढं माझं म्हणणं तुम्हाला कटू वाटलं, तरी मी कुठला आहे, याची तुम्हाला कल्पना आहेच. तुमच्या कहाण्यांवर मी काय बोलू? इतर सगळ्यांप्रमाणे तुम्हालाही तुमच्या भूतकाळानं एका नात्यात बांधलं आहे. या नात्यांचं तुमच्या वागण्यावर नियंत्रण आहे आणि आज तुम्ही जे कुणी आहात, ते या नात्यांमुळंच बनला आहात. तुमचं पूर्वायुष्य हे ऊन्ह आणि सावलीच्या खेळासारखं आहे. तुम्ही पडलात, स्वतःलाच इजा करून घेतलीत; पण पुन्हा उभे राहिलात. आता मात्र तुम्ही एका अनिश्‍चित भविष्याच्या उंबरठ्यावर उभे आहात. एका बाजूला, आपले रस्ते आता पुन्हा एकत्र येऊ नयेत असं तुम्हाला वाटतंय. कारण, तुमची तुमच्या मूल्यांवर श्रद्धा आहे. एवढ्या वर्षांत जे कमावलं किंवा जे जपलं, ते तुम्हाला सांभाळायचं आहे. त्यामुळं योग्य काय नि अयोग्य काय हे ठरवायला तुम्ही असमर्थ आहात, असं मी मानत नाही. मला ते कारण सांगू नका. काय केलं पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे; पण ते करण्याची तुमची इच्छा नाही. कारण, दरम्यानच्या काळात पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलेलं असलं, तरी तुमचं दुसरं मन तुम्हाला अजूनही या कहाणीत गुंतवत आहे. तुम्ही मनानं खूप खंबीर आहात, याची मला खात्री आहे; त्यामुळंच तर तुम्ही आतापर्यंत एवढ्या निष्ठेनं राहिलात. समजा, माझ्याकडं अशी जादू असेल, की जिच्यामुळं तुम्हाला कुठलीही इजा न होता या आगीशी खेळता येईल...मग अशा वेळी तुमची प्रतिक्रिया अशीच असेल? तुम्ही मनातल्या मनात शांतपणे विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही कितीही उच्च नैतिक पातळीवर असलात, तरी तुम्ही समोरच्या माणसाइतकेच माणूस आहात, त्याच्या सर्व गुण-दोषांसह. मानवजात ही काही देव आणि राक्षस यांच्यात विभागता येत नाही. कोणताही माणूस पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो. आपल्या सगळ्यांकडूनच चुका होत असतात. या अपुरेपणाच्या किंवा दुबळेपणाच्या चौकटीत राहूनच योग्य गोष्टी करत राहणं म्हणजेच आयुष्य. माझ्या या ‘प्रवचना’चा तुम्हाला कंटाळा येणं स्वाभाविक आहे. कुणाचीही उच्च नैतिक भूमिका ही रोज जागा बदलणाऱ्या वाळवंटातल्या वाळूच्या ढिगासारखी असते. कुणाला त्याबाबत सांगितलं तर त्याला ते आवडत नाही. संथ पाण्यात एखादा दगड फेकला तर निर्माण होणारे तरंग शेवटी किनाऱ्यापर्यंत पोचतात. तद्वतच आपली कोणतीही कृतीसुद्धा परिणामांपर्यंत पोचतेच; मग आपली इच्छा किंवा आकांक्षा काहीही असो. आपल्याला बसणारे धक्के किंवा आयुष्याला मिळणारी वळणं हा, आपण कोणते पर्याय निवडतो, याचाच परिणाम असतात.
भास्कर, कुठलीही गोष्ट ‘आधी ठरलेली’ किंवा ‘प्राक्तनातली’ नसते.
अंजली, ‘वाईट कुंडली’ असा काही प्रकार नसतो .

आणि अस्लम, तुझ्या ‘नशिबा’त काही वाईट आहे, असं बिलकूल नाही.
प्राक्तन-कुंडली-नशीब या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. कुणालाही त्याच्या कृत्याच्या परिणामांची जबाबदारी टाळता यावी म्हणून त्या पद्धतशीरपणे रचल्या गेलेल्या आहेत. विवेकानंदांनी असं म्हटलं होतं ः ‘ज्या गोष्टींना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारणीभूत आहे,  त्या गोष्टींव्यतिरिक्त अन्य कशानंही मला काहीही होत नाही, पूर्वी झालेलं नाही आणि भविष्यातही होणार नाही.’ तेव्हा मित्रांनो, त्या सगळ्या भ्रामक समजुती मनातून काढून टाका आणि वास्तव जगाचं स्वागत करा. सगळ्या प्रश्नांचं मूळ हेच आहे. आपल्या कुठल्याही कृतीला आपणच जबाबदार आहोत, हे एकदा मान्य केलं, की मग आपल्यापुढं अन्य कुठला पर्याय उरतो का? होय, उरतो. आजचं विज्ञानही तेच म्हणतं, जे गौतम बुद्धांनी अनेक शतकांपूर्वी म्हटलं होतं. ते म्हणजे, कोणत्याही गोष्टीची जाणीव आणि आपला प्रतिसाद यात थोडं अंतर असतं. खरी नैतिक कृती तेव्हाच घडते, जेव्हा सततच्या संस्कारांमुळं आपण त्या मधल्या शांततेत, थोडं थांबून त्या गोष्टीकडं निरपेक्षपणे पुन्हा पाहतो; अगदी शस्त्रक्रियेची सुरुवात करताना एखादा सर्जन पाहतो त्या निरपेक्षपणे. सुरवातीला एखादी जाणीव झाल्याबरोबर कृती करण्यासाठी तुमचं मन तुम्हाला भाग पाडतं. कारण, तो मधला अवकाश अधिक ताणण्याची तुमची शक्ती मर्यादित असते; पण सवयीनं हा अवकाश आपल्याला वाढवता येतो आणि मग एका क्षणी तुम्ही स्वतःकडं आणि तुमच्या भावनांकडं तटस्थपणे पाहू शकता. कारण त्या भावना बदलत्या आणि अस्थिर असतात. हे होत नाही तोपर्यंत आपण आपल्या मनाचे गुलाम असतो. ते घडतं त्या वेळी आपण मुक्त होतो. खरं स्वातंत्र्य म्हणजे, या मधल्या अवकाशावर प्रभुत्व मिळवणं आणि मगच आपल्या प्रतिसादाची निवड करणं.

काय बरोबर आहे, ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. खरं म्हणजे तसं कुणीच कुणाला सांगू शकणार नाही. माझ्यासारखा माणूस, ज्यानं काही नद्या ओलांडल्या आहेत, ज्यानं काही डोंगर पार केले आहेत आणि ज्यानं काही वादळं पाहिली आहेत, तो तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकतो, ज्याच्यावरून कधीकाळी मी स्वतः चाललो आहे. तेव्हा हिमतीनं वाटचाल करा. आपणच आपले खरे वाटाडे, मार्गदर्शक, गुरू असतो, हे लक्षात असू द्या.
आणि हेही लक्षात ठेवा ः

खुदी मे गुम है खुदाई, तलाश कर गाफील
यही है तेरे लिये अब सलाह-ए-कार की राह।
हदीस-ए-दिल किसी दरवेश-ए-बेगिलीम से पूछ
खुदा करे तुझे तेरे मकाम से आगाह।

(कदाचित तुला जाणीवही नसेल, परंतु शहाणीव आणि योग्यायोग्य समजण्याची कुवत या दोन बाबी तुझ्यात आहेतच आहेत. तो तुझ्या व्यक्तित्वाचाच गाभा आहे. या गाभ्याचा शोध तू जर अतिशय परिश्रमपूर्वक घेतलास, तर तुझं खरं ध्येयस्थान शोधून काढण्यापासून तुला कुणीही रोखू शकणार नाही, याची खात्री बाळग.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com