तोच खरा जय जो संपवतो आतलं भय ! (डॉ. यशवंत थोरात)

dr yashwant thorat's saptarang article
dr yashwant thorat's saptarang article

भीती म्हणजे काय, हे जाणून घेणं आणि मग त्या भीतीवर मात करणं हे महत्त्वाचं असतं. कदाचित साहस म्हणजे, आपल्या मनातल्या कल्पनांशी झगडणं. कारण भीती शेवटी मनातच वसत असते. जंगलातला अंधार हा आपल्या मनातल्या अंधारापेक्षा मोठा नसतो. शेवटी शिकार असो, की जीवन, आपल्याला अंधाराशी आणि ‘वाघा’शी झगडावंच लागतं. दोघांशीही समोरासमोर दोन हात करावेच लागतात. आपल्याला आधी आपली भीती किंवा आपला दुबळेपणा स्वीकारावा लागतो आणि मग त्याच्याशी संघर्ष करून त्यावर मात करण्यासाठीचं धाडस आपल्याला गोळा करावं लागतं.

नेहमीसारखंच गप्पांचं कोंडाळं जमलं होतं.
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे काय काय परिणाम होतील, याची चर्चा आम्ही करत होतो.
जाड काचांचा चष्मा घातलेल्या मुलानं मला अनपेक्षितपणे विचारलं ः ‘‘सर, जनरल थोरात म्हणजे तुमचे वडील ना?’’
‘‘हो’’, मी म्हणालो. त्याच्या या अनपेक्षित प्रश्‍न विचारण्यामागं नेमका काय हेतू होता ते मला कळत नव्हतं; पण नक्कीच काही वेगळा हेतू असावा, अशी माझी खात्री होती.
‘‘माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांचं आत्मचरित्र वाचलंय,’’ तो म्हणाला. त्याच्या हेतूबद्दल अद्यापही मी चाचपडतच होतो. त्याचा अंदाज घेण्यासाठी मी म्हणालो ः ‘वा !’ तुझ्या वडिलांना ते पुस्तक नक्कीच आवडलं असेल...’

मात्र, माझ्या वाक्‍याकडं दुर्लक्ष करत त्यानं माझ्यावर जणू बाँबच टाकला. तो म्हणाला ः ‘‘तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षी एक चित्ता मारला होता, असं त्यात म्हटलंय. ते खरं आहे का? कारण ती घटना खरी असली तरी सत्य असू शकत नाही.’’
‘‘तर्कदृष्ट्या ते वाक्‍य बरोबर नाही; पण ती घटना असत्य असू शकत नाही,’ मी म्हणालो. त्याच्या प्रश्‍नानं मी अस्वस्थ झालो होतो; थोडा रागावलोही होतो. मी थोडं कडवटपणेच त्याला म्हणालो ः ‘‘हे बघ. तुझ्याकडं पाहिल्यावर तू अगदीच सुमार बुद्धीचा आहेस, असं कुणालाही वाटेल; पण प्रत्यक्षात तसं नाहीय. या गोष्टीचा मथितार्थ एवढाच आहे, की वरवरच्या पाहणीवरून कुठल्याही गोष्टीचा निष्कर्ष काढू नये. वरवर जे दिसतं ते अनेक वेळा फसवं असू शकतं.’’ ‘‘आपण आपल्या मूळ विषयाकडं वळू,’’ मी म्हणालो. तर, नोटाबंदी आणि बॅंका व एटीएमच्या बाहेर लागलेल्या रांगा यात आता त्या सगळ्या मुलांना फारसा रस उरलेला नव्हता. त्या जाड भिंगाच्या चष्मेवाल्याच्या प्रश्‍नामुळं त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. ‘‘सर, हे खरं आहे?’’ त्यांनी एका सुरात विचारलं.
‘‘दुर्दैवानं हो’’ मी उत्तरलो.

माझं उत्तर ऐकून ते क्षणभर स्तब्ध झाले. ‘टक्कल पडलेला, चष्मा घातलेला हा म्हातारा माणूस असा कसा असू शकेल,’ असा प्रश्‍न त्यांना पडला असावा. ‘निसर्गप्रेमी’ अशी प्रतिमा असलेल्या माणसाला एकदम ‘शिकाऱ्या’च्या रूपात पाहणं त्यांना पेलवत नसावं. नेहमीच विरोधी पक्षनेत्यासारखं वावरणाऱ्या मंदानं शांततेचा भंग केला. तिनं मला थेटच विचारलं ः ‘‘एक मुक्‍या प्राण्याचा बळी घेतल्याबद्दल, आपण दोषी आहोत, असं तुम्हाला वाटत नाही का?’’ -मी ठामपणे म्हणालो ः ‘‘नाही... पण मला या घटनेबद्दल वाईट नक्कीच वाटतंय.’’

‘‘मी अशा काळात जन्मलो, की ज्या वेळी शिकार कायदेशीर होती आणि तिला समाजमान्यताही होती. शिकार करणं हा एक ‘क्रीडाप्रकार’ मानला जात असे आणि त्याबाबतचे काही नीति-नियम ठरवण्यात आलेले होते,’’ मी सांगितलं.
‘‘ही शिकार शांततेत व्हायची की गाजावाजा करून?’’ केतकीनं विचारलं. -मी म्हणालो ः ‘‘दोन्ही पद्धतींनी. हे बघ, ७० वर्षांपूर्वी सगळीकडं जंगलांचं प्रमाण जास्त होतं. जंगलं घनदाट होती आणि प्राण्यांची संख्याही खूप असायची. शिकार हा काही बड्या व्यक्तींचा; विशेषतः राजेरजवाड्यांचा विशेष क्रीडाप्रकार असायचा.’’ ‘‘पण शिकार करणं हे शेवटी वाईटच,’’ मंदा ठामपणे म्हणाली.

‘‘असेल; पण शिकार करणारा प्रत्येक जणच रक्ताला चटावलेला असतो असं नाही. राजेरजवाड्यांपैकी काही जणांनी फार मोठ्या प्रमाणावर शिकारी केल्या, हे खरं आहे. सरगुजा इथल्या राजानं एकट्यानं तब्बल दोन हजारांहून अधिक वाघांची शिकार केली; पण बहुतेक शिकाऱ्यांनी अगदी माफक प्रमाणात शिकार केली. शिकार हा केवळ वेळ घालवण्याचा एक प्रकार असायचा त्या वेळी. तो जंगलात खेळला जाणारा एक साहसी प्रकार होता. त्यात वाघ किंवा चित्ता यांची बाजू अधिक बळकट असायची. जंगल त्यांच्या पायाखालचं असे; त्यामुळे त्यांना तिथल्या भौगोलिक स्थितीची पूर्ण माहिती असे. शिवाय, निसर्गानंच या प्राण्यांना माणसापेक्षा कितीतरी पटींनी अधिक तीक्ष्ण अशी दृष्टी आणि श्रवणशक्ती दिली होती. त्यांची घ्राणेंद्रियंही अतिशय तीक्ष्ण असतात. समोरच्याला गर्भगळित करण्याची मोठी ताकद त्यांच्याकडं असते ते निराळंच,’’ मी माहिती पुरवली.

‘‘मग नेमका फरक काय?’’ सुशांतनं विचारलं.
‘‘चारचाकी वाहन, बॅटरी, रायफली, दुर्बिणी, टेलिफोन आणि औषधं’’ मी एका दमात सांगितलं.
‘‘यामुळं स्थिती एकदम बदलते. या गोष्टींमुळं शिकारी वरचढ होतो. मग शिकार हा एक खेळ राहत नाही. ‘शिकार ही काही एखाद्या प्राण्याला मारण्यासाठी नव्हे, तर साहस किंवा कौशल्य दाखवण्यासाठी आहे,’ हा दावाही मग पोकळ ठरतो. ‘शिकारी हा जंगलाचा मित्र आहे,’ वगैरे गोष्टीही खोट्या ठरतात.’’ जाड भिंगाचा चष्मा असलेल्यानं स्वतःकडं नेतृत्व घेत सगळ्यांसमोर जणू भाषण ठोकलं.
‘‘प्रत्येक नाण्याला दुसरी बाजूही असते; त्यामुळं शिकार आणि शिकारी यांच्यावर टीका करण्यापूर्वी सरांना त्यांचं म्हणणं मांडण्याची एक संधी दिली पाहिजे,’’ असं कुणीतरी म्हणालं. सगळ्यांनीच कान टवकारले.

-मी सांगू लागलो ः ‘‘माणूस जसजसा वयानं वाढत जातो, तसतसं त्याचं मन भूतकाळात अधिकाधिक रमायला लागतं. माझे वडील लष्करी अधिकारी होते. त्यामुळं माझं बालपण मोठमोठ्या लष्करी बंगल्यांमध्ये आणि त्याभोवतीच्या विस्तीर्ण आवारात बागडण्यात गेलं. पाच-सहा वर्षांचा असताना त्यांच्या मागं मागं फिरत मी शिकारीचा पहिला अनुभव घेतला. मी आठ वर्षांचा झालो, तेव्हा मला कुणीतरी एक एअरगन भेट  दिली. मी हाताळलेलं ते पहिलंच शस्त्र. सुरवातीला मला ती एअरगन अजिबात वापरू दिली जात नसे. माझे वडील रोज संध्याकाळी ऑफिसमधून घरी आले की घराच्या मागच्या आवारात ‘टार्गेट रेंज’ उभी करत आणि मला नेमबाजीचं शिक्षण देत. नेमबाजीचं नैसर्गिक कौशल्य माझ्यात आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी मला ‘शिकार करायचीय का?’ असं विचारलं. मी उत्साहात ‘हो’ म्हणालो; पण त्यांनी मला फेरविचार करायला सांगितलं. ते म्हणाले होते ः ‘बेटा, थोडं कौशल्य आणि सराव यामुळं कुणालाही नेमबाजी सहजपणे जमू शकते; पण शिकारी व्हायचं असेल, तर तुला जंगलावर प्रेम करावं लागेल; जंगल जाणून घ्यावं लागेल. हे जंगल ज्यांचं आहे, त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा आदर करावा लागेल आणि शिकाऱ्याचे नैतिक नियम तुला कधीही मोडता येणार नाहीत. तुला हे मान्य आहे का?’ त्यांचं बोलणं मला फारसं समजलं नव्हतं; पण मी मान डोलावली.’’ ‘हे नियम सोपे आहेत; पण पाळायला कठीण आहेत,’ ते सांगत होते ः ‘पहिला नियम म्हणजे बेछूटपणे, गंमत म्हणून शिकार करायची नाही. दुसरा नियम म्हणजे ज्याची शिकार करायची, त्याला योग्य संधी द्यायची आणि जर तुम्ही खाण्यासाठी शिकार करणार असाल तर तुमची भूक आहे, त्यापेक्षा जास्त मोठी शिकार करायची नाही. समजलं?’ त्यांनी विचारलं... मला समजलं नव्हतं; पण तरीही मी मान डोलावली. ‘आज एवढंच पुरे... याच्यावर विचार कर’ असं त्यांनी मला सांगितलं. मी विचार केला; पण त्यांचं म्हणणं चुकीचं असल्याचं मला वाटायला लागलं. कारण माझ्या एअरगननं पक्षी टिपून मारण्यात वेगळीच ‘मजा’ येत होती. मी त्यांचं म्हणणं फारसं मनावर घेतलं नाही. त्यामुळं मी पक्षी टिपणं सुरूच ठेवलं. माझ्या वडिलांच्या ते लक्षात आलं. त्यांनी मला सांगितलं, ‘शिकारी विनाकारण गोळी झाडत नाही.’ -मात्र, मी त्यांच्याकडं फारसं लक्ष दिलं नाही. एके दिवशी ते त्यांच्या कारमधून उतरत असताना, दूर अंतरावरून मी मारलेला एक कावळा नेमका त्यांच्या पायापाशी पडला. त्यांनी वर पाहिलं. हातात बंदूक घेऊन मी छपरावर उभा होतो. त्यांनी मला खाली बोलावलं. मी खाली आल्यावर ‘कावळा कुठं बसला होता आणि मी कुठं उभा होतो,’ हे त्यांनी मला विचारलं. ते म्हणाले, ‘ठीक आहे. तू चांगला नेम मारलास.’ माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. त्यांनी मला घरात जाऊन जेम्स नावाच्या खानसाम्याला बोलावून आणायला सांगितलं. मी धावत जाऊन त्याला बोलावून आणलं. त्याला ते म्हणाले, ‘‘देखो, भैयासाहबने शिकार किया है । इस को कूक करो और रात को साहब को खाने को दो।’ बघतच राहिलो. क्षणभर मी घाबरलो; पण हे केवळ सांगण्यापुरतंच असेल; प्रत्यक्षात तसं घडणार नाही, असं मला वाटलं. माझ्या आईनं मध्ये पडायचा प्रयत्न केला; पण एकूण वातावरण पाहून तिनं माघार घेतली. सगळ्या घरात कमालीचं तणावपूर्ण वातावरण होतं...’’ हे सगळं सांगत असताना सगळी मुलं श्‍वास रोखून ऐकत होती.‘‘मग काय झालं?’’ एकानं विचारलं.
‘‘आवाराच्या एका कोपऱ्यात एका मातीच्या भांड्यात तो कावळा शिजवला गेला,’’ मी सांगितलं.
‘‘शी ऽऽऽ’’ कुणीतरी किंचाळलं.

‘‘एवढंच नव्हे तर, रात्रीच्या जेवणाच्या वेळी तो कावळा टेबलावर आणण्यात आला. माझे वडील स्वतः वाढायला उभे राहिले. मी एकदम रडायला लागलो आणि समोरचं ताट मी भिरकावून दिलं,’’ मी म्हणालो आणि पुढं सांगू लागलो ः ‘‘नंतर ती जागा स्वच्छ करण्यात आली. वडील माझ्या शेजारी बसले व मला म्हणाले, ‘बघ, मी तुला सांगितलं होतं, की या शिकारीचे नियम पाळणं अतिशय कठीण आहे. कारण, ते कठीण निमय पाळताना तुम्हाला तुमच्या मनाशी आणि इच्छांशी सामना करावा लागतो. तू स्वतःवर तसा ताबा मिळवला आहेस, असं तुला वाटतं का? तू जेव्हा तसा ताबा मिळवशील, तेव्हाच तू चांगला शिकारी आणि चांगला माणूस बनू शकतील...’ अशा पद्धतीनं माझी शिकारीशी ओळख झाली, ’’ मी म्हणालो.

पुढं सांगू लागलो ः ‘‘आठ वर्षांनंतर मध्य प्रदेशातल्या जंगलात मला शिकारीचे दोन-तीन नवे नियम समजले. १९६० च्या दरम्यानची ही घटना आहे. त्या वेळी भारतात शिकारीला- मोठ्या प्रमाणावरच्या शिकारीला- कायद्यानं परवानगी होती. एखाद्यानं अर्ज केला तर त्याला शिकारीचा परवाना दिला जात असे. फक्त ती संबंधित व्यक्ती जंगलात किती दिवस राहणार, याची विचारणा केली जाई आणि कुणाची शिकार करायची आणि कुणाची नाही, याविषयीची माहिती त्या व्यक्तीला दिली जाई. दर उन्हाळ्यात माझे वडील महिनाभराची रजा घेत असत आणि आम्ही मध्य प्रदेशातल्या किंवा दक्षिण भारतातल्या जंगलात वातानुकूलन नसलेल्या फियाट गाडीतून फिरत असू. जंगलाच्या जवळ असलेल्या शेवटच्या गावात काही खानसामे आम्हाला येऊन मिळत. काही जीप आमच्याबरोबर येत. हा काफिला मग जंगलातल्या विश्रामगृहावर जात असे. दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी लवकर उठवून जंगलात फिरायला नेलं जात असे. त्या दिवशीच्या जेवणापुरतं काही तरी मारून आणणं हे त्या वेळचं काम असे. त्या वेळी जंगल कसं वाचायचं, हे माझे वडील मला सांगत असत. एखादं झाड का व कसं वाकलं, कोणता प्राणी जंगलातून गेला, हे पावलाच्या ठशावरून कसं ओळखावं वगैरे गोष्टी ते सांगत. या ठशांवरून तो प्राणी नर आहे की मादी आणि त्याचं वय काय आहे, याचा अंदाज बांधता येत असे; पण त्यांच्या सांगण्याचा एकच मथितार्थ असे व तो म्हणजे, शिकारीच्या वेळी शिकारीचे नीतिनियम पाळले पाहिजेत. हे नियम म्हणजे, बसलेल्या पक्ष्याला मारायचं नाही किंवा गाभण असलेल्या प्राण्याला मारायचं नाही किंवा दुर्मिळ प्राण्यांना मारायचं नाही.

सन १९६३ मध्ये - मी १६ वर्षांचा व्हायला काही थोडे दिवस शिल्लक असताना - माझे वडील एकदा मला म्हणाले, ‘यशवंत, या वर्षी तू शिकार करून बघ. त्याच दिवशी रात्री परतताना एक वाघ आमच्या जवळून सुमारे १०० यार्ड अंतरावरून गेला. माझ्या वडिलांनी मला बंदूक चालवण्याचा आग्रह केला. मी गोळी झाडली. गोळी त्याच्यापासून दूर अंतरावरून गेली; पण त्यामुळं तो सावध झाला आणि तिथून निघून गेला. माझ्या प्रतिमेला मात्र त्यामुळं धक्का बसला. पुढं जेव्हा जेव्हा हा विषय निघत असे, तेव्हा तेव्हा मी माझ्या बंदुकीलाच दोष देत असे किंवा अंधूक प्रकाशाचं निमित्त सांगत असे. मात्र, ‘माझा नेम चुकला होता’, हे स्वीकारायची माझी तयारी नव्हती. वडिलांनी दोन-तीन दिवस हे ऐकून घेतलं आणि मग एके दिवशी दुपारी अचानक मला गाशा गुंडाळायला सांगितला. त्यांनी मला घरी परत पाठवलं. ‘जीप तुला स्टेशनपर्यंत सोडील,’ असं ते म्हणाले. निघताना ते मला एवढंच म्हणाले, ‘हे बघ बाळ, आपण सगळेच जण सामान्य माणसं आहोत. त्यामुळं आपण कधी जिंकतो, तर कधी हरतो. आमचा कधी नेम चुकला तर आम्ही ‘नेम चुकला’ असंच म्हणतो. आम्ही त्यासाठी आमच्या बंदुकीला किंवा अन्य कुणाला दोष देत नाही. तू अजून लहान आहेस; पण जसजसा मोठा होशील, तसतशा तुझ्याकडून अनेक चुका होतील. चुका करण्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही; पण चुकांची जबाबदारी न घेणं किंवा त्यासाठी इतरांना दोष देणं हे मात्र लाजिरवाणं आहे. त्यामुळं स्वतःला जिम कॉर्बेट समजणं सोडून देऊन अहंगंडातून बाहेर ये किंवा सरळ माघारी जा... ’’
‘‘मी तिथं थांबलो; पण माझी समज अधिक वाढली होती, मी सांगितलं. ‘‘...पण मग तुम्ही चित्ता मारला की नाही?’’ मिलिंदनं विचारलं. म्हणालो ः ‘‘होय, मी मारला; पण ती काही फार मोठी गोष्ट नाही.’
मात्र, माझं हे म्हणणं ऐकून घ्यायला कुणी तयारच नव्हतं. त्यांनी एकच आग्रह धरला.
मग मला त्यांच्यापुढं मान तुकवावीच लागली.

- मी सांगायला सुरवात केली ः  ‘‘एका चित्त्यानं शेळी मारल्याची बातमी त्या वेळी आम्हाला समजली होती. त्या शेळीचा मालक घाबरला होता. त्यानं आम्हाला हस्तक्षेप करायला सांगितलं. त्या दिवशी ‘रात्री मचाणावर माझ्याबरोबर बसशील का?’ असं वडिलांनी मला विचारलं. मी नकार दिला. कारण, त्यांच्याबरोबर बसणं म्हणजे एक दिव्य होतं. डास किंवा मुंग्या यांची पर्वा न करता ते तासन्‌नतास एखाद्या दगडासारखे स्थिर बसू शकत असत. मला तेवढी सहनशक्ती नव्हती. मी सारखी हालचाल करत असे. त्यामुळं ते चिडत असत. ते एकटेच गेले; पण त्या रात्री चित्ता त्या भक्ष्याजवळ आलाच नाही. दुसऱ्याही दिवशी तसंच घडलं. मग तिसऱ्या रात्री मी एकट्यानंच मचाणावर बसायचं ठरवलं. त्या दिवशी सायंकाळी वडील मला घेऊन जंगलात गेले.
एके ठिकाणी एक मेलेली शेळी ठेवण्यात आली होती. तिच्या गळ्यात छोटी घंटा बांधण्यात आली होती. वडील म्हणाले, ‘अंधारात तुला चित्ता आलेला दिसणार नाही; पण त्यानं शेळी खायला सुरवात केली, तर तिच्या गळ्यातली घंटी वाजेल, तो इशारा समजून तू कृती कर.’ ’’

‘‘पण मी कुठं बसू?’’ मी अभावितपणे विचारलं. त्यांनी उंचवट्याकडं निर्देश केला. आपल्याला एखाद्या सुरक्षित मचाणावर बसायला मिळेल, असं मला वाटलं होतं; पण वडील तर मला उघड्यावरच्या एका उंचवट्यावर बसायला सांगत होते. ‘तू मचाणावर बसून गोळी झाडणं हा चित्त्यावर अन्याय होईल,’ असं ते म्हणाले आणि मला शुभेच्छा देऊन ते निघाले. जाताना मला म्हणाले, ‘आम्ही सकाळी येऊ. तू त्याला मारलंस तर उत्तमच; पण तसं न घडलं तर आम्ही त्याला त्याच्या पावलांच्या ठशांवरून शोधून काढू. मग तो नुसताच शेळी मारणारा आहे की माणसांनाही मारणारा आहे, हे आम्हाला समजेल...’ एवढं बोलून जनरल एस. एस.पी. थोरात त्यांच्या मुलाला जंगलात एकटं सोडून निघून गेले!

थोड्याच वेळात अंधार दाटून आला. जंगलातला अंधार शहरातल्यासारखा नसतो. शहरात रात्रीही थोडी दृश्‍यमानता असते; पण जंगलात असतो मिट्ट काळोख. त्या अंधारात तिथं मी एकटा होतो. कमालीचा घाबरलेला. मी तिथं मनसोक्त ओरडलो, गाणी म्हटली. मला थोडी गुंगी येत होती. तेवढ्यात घंटी वाजली. मी एकदम जागा झालो. ‘तो आला असावा. त्याला ती शेळी खाऊ द्यावी,’ असं मी मनात म्हटलं. ‘मला खाण्यापेक्षा त्यानं शेळी खाल्ली तर बरंच,’ असा विचारही माझ्या मनात आला; पण तेवढ्यात अचानकपणे एक घटना घडली. कदाचित ती माझ्या आनुवंशिक गुणांमुळं घडली असेल किंवा उद्या वडिलांसमोर ‘एक भित्रा मुलगा’ म्हणून उभं राहण्याची लाज वाटणार असल्यामुळं घडली असेल. मी माझी रायफल वाघाच्या दिशेनं रोखली. रायफलवर लावलेल्या बॅटरीचं बटन मी दाबलं. बॅटरीच्या प्रकाशाचा झोत जसा पडला, तसा एक पूर्ण वाढलेला चित्ता प्रकाशाच्या दिशेनं माझ्याकडं पाहत असल्याचं मला दिसलं. मी बंदुकीचा ट्रिगर केव्हा दाबला, ते मला कळलंच नाही; पण माझ्याकडून ट्रिगर दाबला गेला आणि पुढच्याच क्षणी तो चित्ता रक्ताच्या थारोळ्यात त्याच शेळीवर गतप्राण होऊन पडल्याचं मला दिसलं. क्षणार्धात माझी भीती पळून गेली. मी पुरेसा धीट व निर्भय असल्याचं मला जाणवलं.’’
‘‘तुम्ही खरोखरच घाबरला नव्हता का?’ मंदानं मला विचारलं.
-मी म्हणालो ः ‘‘नाही; मी घाबरलो नव्हतो.’ ‘‘मग हिंमत किंवा धाडस म्हणजे काय?’’ जाड काचेच्या चष्मेवाल्यानं मला विचारलं.

‘‘मला माहीत नाही; पण आधी भीती म्हणजे काय, हे जाणून घेणं आणि मग त्या भीतीवर मात करणं हे महत्त्वाचं आहे. कदाचित साहस म्हणजे आपल्या मनातल्या कल्पनांशी झगडणं. कारण भीती शेवटी मनातच वसत असते. मध्य प्रदेशातल्या जंगलातला तो चित्ता हा काही गव्हर्न्मेंट फॉरेस्टमधल्या किंवा कॉर्पोरेट फॉरेस्टमधल्या वाघांपेक्षा वेगळा नव्हता. जंगलातला अंधार हा आपल्या मनातल्या अंधारापेक्षा मोठा नसतो. शेवटी शिकार असो की जीवन, आपल्याला अंधाराशी आणि वाघाशी झगडावंच लागतं. दोघांशीही समोरासमोर दोन हात करावेच लागतात. आपल्याला आधी आपली भीती किंवा आपला दुबळेपणा स्वीकारावा लागेल आणि मग त्याच्याशी संघर्ष करून त्यावर मात करण्यासाठीचं धाडस आपल्याला गोळा करावं लागेल. ‘‘शेवटी मित्रांनो, मी काही एखादा हीरो नव्हतो!’’ मी म्हणालो.
‘‘ते आम्हाला ठरवू द्या...’’ ते मिस्कीलपणे हसत म्हणाले आणि मग एकेक करत हळूहळू बाहेर पडले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com