विराटची सत्त्वपरीक्षा (सुनंदन लेले)

विराटची सत्त्वपरीक्षा (सुनंदन लेले)

इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या पाच कसोटी सामन्यांचं महत्त्व चांगलं माहीत आहे. मायदेशात समोर आलेल्या प्रत्येक संघाला पराभवाची धूळ चारणाऱ्या भारतीय संघाची इंग्लंडमधल्या पाच कसोटी सामन्यांत कठोर परीक्षा असणार आहे.

बरोबर दोन दिवसात भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड दौऱ्यातली सत्त्वपरीक्षा चालू होणार आहे. टी-२० सामने आणि एकदिवसीय सामने मजेदार असतात, हे मान्य आहे; पण खरी कसोटी ‘कसोटी’ सामन्यांतच लागते. ज्याचं नाव मुख्यतः आक्रमक फलंदाज म्हणून घेतलं गेलं आणि जो मुख्यत्वेकरून मर्यादित षटकांचा खेळाडू असल्याची गैरसमजूत आहे, त्या वीरेंद्र सेहवागनं विराट कोहलीला सांगितलं होतं ः ‘‘विराट, वन डे और टी-२० में जरूर रन्स बनाना... लेकीन ध्यानमें रखना, की बॅटस्‌मनकी असली पहचान उसने किये टेस्ट रन्ससेही होती है... आखिरकार टेस्ट के रन्सही ध्यान में रहते है...’’ चांगलं यश संपादन करून विराट २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराटला लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत फलंदाज म्हणून कोहलीला मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंडला आला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या पाच कसोटी सामन्यांना काय महत्त्व आहे, हे चांगलं माहीत आहे. मायदेशात समोर आलेल्या प्रत्येक संघाला पराभवाची धूळ चारणाऱ्या भारतीय संघाची कठोर परीक्षा पाच कसोटी सामन्यांत बघितली जाणार आहे.

सध्याचं क्रिकेट असं झालं आहे, की कोणत्याही संघाला मायदेशात हरवणं पाहुण्या संघाला जमत नाहीये. मायदेशात चांगली कामगिरी करणारे संघ दौऱ्यावर गेल्यावर खूप खराब खेळ करत आहेत. अगदी ताजं उदाहरण दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं घेता येईल. भारतीय संघाला मायदेशात २-१ फरकानं पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला श्रीलंकेच्या संघानं दोन कसोटींत प्रचंड मोठ्या फरकानं हरवलं आहे. फलंदाजांना तर कोणतीच लय सापडलेली नाही. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची धूळधाण उडवली. 

दोन वर्षांपूर्वी इंग्लंडचा तगडा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना कोहलीच्या संघानं त्यांचे नाक सर्व पाच कसोटी सामन्यांत पाण्याच्या आत ठेवलं होतं. इंग्लंड दौऱ्यात मालिकेत एकूण दीडशे धावाही करायला न जमणाऱ्या विराट कोहलीनं ६९०पेक्षा जास्त धावा मायदेशातल्या मालिकांत केल्या होत्या. सांगायची गोष्ट इतकीच, की फक्त आपलाच नाही, तर सगळेच संघ ‘घर में शेर’ झाले आहेत. विराट कोहलीला तो शिक्का पुसायचा आहे. मनातली इच्छा पूर्ण करायला चाळीस दिवस सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळायचं आव्हान पेलावं लागणार आहे, याची विराटला कल्पना आहे. 

कळीचा मुद्दा
कोणताही प्रकल्प असो, सुरवात चांगली होण्याचं महत्त्व जुनेजाणते लोक नेहमी सांगत असतात. मोठ्या मालिकेत भयानक खराब सुरवात होताना मी  २०११ च्या दौऱ्यात बघितलं होतं. लॉर्डसवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ दोनच वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला होता. प्रथम गोलंदाजी करताना पहिल्या अर्ध्या तासातच झहीर खानच्या मांडीचा स्नायू दुखावला. पहिल्याच दिवशी उपाहारानंतर विकेटकीपिंग राहुल द्रविडनं केलं, तर धोनीनं गोलंदाजी केली. अर्थातच मालिकेत भारताचा फज्जा उडाला. 

इंग्लंड दौऱ्यात यश मिळवायची दोरी जास्त करून वेगवान गोलंदाजांकडं आहे, असं मला वाटतं. इथंच थोडी गडबड होताना दिसली आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला दुखापतीनं ग्रासलं आहे. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहंमद शमी चांगल्या लयीत आणि एकदम ताजेतवाने आहेत, ही एक बरी गोष्ट. इंग्लंडचा संघ कोणत्याही परिस्थितीत फिरकीला पोषक खेळपट्टी देणार नाही, हे उघड असल्यानं संघात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करावाच लागेल. तीन गोलंदाज सातत्यानं वेगानं मारा करू शकणारे असले, तर समोरच्या संघाला एकदम हिरवी खेळपट्टी ठेवताना दहा वेळा विचार करावा लागेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शेवटच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्याला यजमान संघानं ठेवलेली तिखट खेळपट्टी त्यांनाच झटका देऊन गेली होती- ज्याची नोंद इंग्लंड संघ व्यवस्थापनानं घेतली असणार. शास्त्रीसह सपोर्ट स्टाफला वेगवान गोलंदाजांना तंदुरुस्त ठेवण्याकरता वेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. 

कोहली काय करणार?
२०१४ च्या दौऱ्यात भारतीय संघाला अपयश यायचं एक मुख्य कारण विराट कोहलीला धावा काढता आल्या नाहीत हे होतं. टप्पा पडल्यावर बाहेर जाणाऱ्या चेंडूनं कोहलीचा घात केला होता. जिमी अँडरसननं विराटला चार वेळा बाद केलं होतं. इंग्लंड संघाला टक्कर द्यायची असेल, तर प्रत्येक कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एकातरी भारतीय फलंदाजाला मोठं शतक करावं लागेल. एक मोठे शतक आणि दोन चांगल्या भागिदाऱ्या हेच भक्कम धावसंख्या उभारण्याचं गमक आहे. त्याकरता विराट कोहली चमकणं फार गरजेचं आहे. एक नक्की सांगतो, की विराट मोठ्या धावा करण्यासाठी पेटला आहे. त्यानं आपल्या तंत्रातले दोष दूर करायला बरेच कष्ट घेतले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यानं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्याबरोबर चर्चाही केली आहे, असंही कानावर आलं आहे. दोघांनी त्याला मोलाचे सल्ले दिले आहेत.

२०१४ च्या पहिल्या सामन्यात अजिंक्‍य रहाणेनं बहारदार शतक झळकावून लॉर्डस सामना जिंकून दिला होता. नंतर इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना स्विंगच्या तालावर नाचवलं होतं. भारतीय संघात पाच प्रमुख फलंदाज घेतले जाणार, याचा अर्थ त्याच पाच फलंदाजांवर मोठ्या धावा उभारायची जबाबदारी असेल. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणेकरता हा इंग्लंड दौरा ‘करो या मरो’चा आहे. दोघंही कसोटी क्रिकेटचे खंदे फलंदाज आहेत. मोठी खेळी उभारण्याचं तंत्र आणि संयम दोघांकडं आहे. लोकेश राहुलसारख्या गुणवान फलंदाजाला जास्त काळ संघ बाहेर बसवणं विराट कोहलीला पसंत नसणार.

ब्रॉड- अँडरसन यांची जोडी
स्टुअर्ट ब्रॉड आणि जिमी अँडरसन हे समोरच्या संघाकरता अगदी संताजी-धनाजी आहेत. स्विंगवर हुकूमत असणारे हे दोन वेगवान गोलंदाज गेली दहापेक्षा जास्त वर्षं इंग्लंड संघाला मायदेशात यशाचा मार्ग दाखवत आले आहेत. गेल्या काही मालिकांमध्ये याच दोघांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही आणि संघ पराभवाच्या छायेत गेला. अँडरसनपेक्षा स्टुअर्ट ब्रॉडवर जोरदार टीका झाली. त्याच्या गोलंदाजीतला डंख नाहीसा झाल्याचं माजी कर्णधार मायकेल वॉननं लिहिलं, त्याचा ब्रॉडला राग आला. मला वाटतं, इंग्लंड संघाला पराभूत करायचं झाल्यास ब्रॉड- अँडरसनशी चांगल्या प्रकारे खेळण्याला खूप महत्त्व आहे. 

जिमी बोलून किंवा फलंदाजांना टोमणे मारून आगीत तेल ओतायला वाकबगार आहे. २०११ मध्ये नॉटिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात जिमी रवींद्र जडेजाला उद्देशून बरंच काही बोलला होता. उपाहाराकरता खेळ थांबल्यावर त्यानं आत जाताना जडेजाला जोरदार धक्काही मारला होता. भारतीय संघानं त्या कृतीचा निषेध करत बंड पुकारलं असताना बीसीसीआयनं ती आग पाणी टाकून विझवली होती. आत्तासुद्धा मालिका सुरू होण्याअगोदर जिमी अँडरसननं विराट मोठी कामगिरी करण्याच्या दडपणाखाली असल्याची वाच्यता केली आहे. कोहलीचा भारतीय संघ पूर्वीच्या तुलनेत बराच खमक्‍या आहे. कोणी काही बोललं, तर आजची भारतीय खेळाडूंची पिढी ऐकून घेत नाही. ‘अरेला का रे’ करायची हिंमत भारतीय क्रिकेटपटू ठेवतात. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे अशा बोलाचालीनं आजच्या जमान्यातले भारतीय क्रिकेटपटू मनाचा समतोल ढासळू देत नाहीत. पहिल्या सामन्यातल्या पहिल्या डावात ठिणग्या नक्की पडणार आहेत.

कॅचेस विन मॅचेस!       
बऱ्याच वेळेला दिसायला सोपा दिसणारा झेल प्रत्यक्षात घ्यायला किती अवघड असतो, हे खेळाडूच जाणतात. प्रत्येक देशात झेल उडाला, की तो नवा गुगली टाकत असतो. उदाहणार्थ, दक्षिण आफ्रिकेतलं जोहान्सबर्ग गाव समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असल्यानं उंच झेल उडाला, की खेळाडूचा अंदाज असतो त्यापेक्षा तो काही सेकंद लवकर खाली येतो- कारण हवेत त्याला विरोध होत नाही आणि मग सोपा दिसणारा झेल खेळाडूच्या हातून सुटतो. इंग्लंडमध्ये उंच उडालेला झेल पकडणं सोपं जातं; पण स्लिपमधला झेल पकडणं कठीण जातं. याबाबत मी राहुल द्रविडला विचारलं असता तो म्हणाला ः ‘‘इंग्लंडमधे जर उडालेल्या झेलाच्या वेळी चेंडूची शिवण गोलंदाज स्विंग करायला टाकतो तशी सरळ असेल, तर तो झेल उडाल्यावरही स्विंग होत राहतो. त्याचा परिणाम असा होतो, की बॅटची कड घेतल्यापासून ते स्लिपमध्ये येईपर्यंत तो कधी आपली दिशा किंचित बदलेल, हे सांगता येत नाही. मग होतं काय, की झेल हाताच्या पंज्यात येण्याऐवजी थोडा बाजूला म्हणजे बोटांकडं जातो आणि मग झेल सुटायची शक्‍यता वाढते. इंग्लंडमध्ये म्हणूनच स्लिपमध्ये उभे राहिल्यावर झेल कितीही सोपा वाटला, तरी तो खूप लक्षपूर्वक बघून पकडायला लागतो.’’ झेलांचा विक्रम ज्याच्या नावावर आहे, त्या राहुल द्रविडनं सांगितलेला हा मुद्दा कायम लक्षात राहील, असा आहे. 

गेल्या दोन परदेश दौऱ्यांत भारतीय संघातल्या खेळाडूंकडून काही मोक्‍याच्या क्षणी झेल सुटले होते. कसोटी सामन्यात झेल उडवायला भाग पाडणं हे गोलंदाजाचं काम असतं, तसा तो पकडण्याची जबाबदारी फिल्डरची असते. जणू काही ही दोन चाकांची गाडी असते. खेळाच्या प्रगतीचा किंवा अधोगतीचा वेग याच दोन चाकांच्या एकत्रित कामगिरीवर अवलंबून असतो. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाज फलंदाजांना अडचणीत आणून झेल उडवायला भाग कसे पाडतात आणि उडालेल्या झेलांचा स्वीकार आपले फिल्डर्स कसा करतात, हे बघणं मजेचं ठरणार आहे. 

प्रत्येक खेळाडूच्या जीवनात निर्णायक क्षण येत असतात. तसा निर्णायक क्षण विराट कोहलीच्या क्रिकेट जीवनात या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या रूपानं येतो आहे. एका अर्थानं ही क्रिकेटची लढाई आहे. प्रत्येक मावळ्याला आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. इंग्लंड संघाला त्यांच्या अंगणात टक्कर देण्याची संधी भारतीय संघासमोर उभी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com