हाय वे होऊ शकतात 'सेफ वे'

हाय वे होऊ शकतात 'सेफ वे'

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्यानं अपघात होत आहेत. या मार्गावर नुकत्याच झालेल्या अपघातात १७ जण ठार झाले. द्रुतगती महामार्ग असो की अन्य राष्ट्रीय महामार्ग, अपघातांची संख्या वाढतच आहे. ‘इंडियन रोड काँग्रेस’नं महामार्गांवर होणाऱ्या अपघातांबद्दल आपल्या अहवालात चिंता व्यक्त केली आहे. रस्त्यांवरच्या अपघातांची संख्या रोखली जावी आणि बहुमूल्य आयुष्य अचानक संपू नये यासाठी काय करता येईल, याचा वेध घेतला आहे रस्तेसुरक्षाविषयक अभ्यासक तन्मय पेंडसे व विवेक वेलणकर यांनी.

आपल्याला बदल नकोच आहे का?
देशात सगळीकडं बदलाचं वारं वाहत असताना मलाच नेमका हा प्रश्‍न का पडला आहे; असं अनेकांना वाटेल. मात्र, आज मागं वळून पाहिल्यानंतर हाच प्रश्‍न मला सातत्यानं भेडसावत आहे. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी एका दुर्घटनेनं माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं. पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेवर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) झालेला अपघात याला कारणीभूत ठरला. भाऊ अभिनेता अक्षय पेंडसे, त्याचा दोन वर्षांचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या प्रत्युष आणि ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांना या मार्गावरच्या अपघातात प्राण गमवावे लागले. हे दुःख सोसण्यापलीकडचं होतं. ‘लाइफ इज ऑलवेज्‌ ब्युटीफुल’ असं दादा (अक्षय) नेहमी म्हणायचा आणि त्याच्या याच वाक्‍यानं मला उभारी दिली आणि यंत्रणेविरुद्ध लढाई उभारत रस्तेवाहतुकीबाबत आणि रस्तासुरक्षेबाबत जनजागृतीचा उपक्रम हाती घ्यायचा, असं मी ठरवलं. ही लढाई राजकीय व्यवस्थेविरुद्ध, यंत्रणांविरुद्ध आणि अशा अपघातांना कारणीभूत असलेल्या बेदरकार चालकांविरुद्धची होती. मग माझ्या आयुष्याचा एक वेगळाच अंक सुरू झाला. माझा मित्र कौस्तुभ वर्तक आणि अभिनेते शरद पोंक्षे हे या लढाईत माझ्यासोबत सुरवातीपासूनच उभे राहिले. दोघांचं ऋण शब्दांपलीकडचं आहे.

मानवाच्या मेंदूची जसजशी प्रगती होत गेली तो जग जवळ आणत गेला. निरनिराळ्या माध्यमांतून शहरं एकमेकांना जोडली गेली. रेल्वे, विमानवाहतूक, जलवाहूतक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्तेवाहतूक. रस्त्याच्या माध्यमातून शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्यातली दरी संपली आणि सुलभ जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. अशाच रस्त्यांपैकी एक रस्ता म्हणजे पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वे. हा मार्ग सुरवातीच्या काळात सगळ्यांच्या ‘गळ्यातला ताईत’ ठरला आणि नंतर जसजसं या मार्गावर अपघातांचं आणि त्यांत मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण वाढत गेलं, तसतसा हाच मार्ग ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनही ओळखला जाऊ लागला. तो अनेकांच्या मृत्यूचा मूक साक्षीदार ठरू लागला!

दादाच्या अपघातानंतर मी ठरवलं, की आपण असा ‘मूक साक्षीदार’ व्हायचं नाही. केवळ सरकारला, यंत्रणांना दोष देत न बसता या मार्गावरचे अपघात कसे रोखले जातील आणि सकारात्मक बदल कसे घडवून आणता येतील, त्यासाठी प्रयत्न करायचे, असा निर्धार मी केला आणि माझ्या आयुष्यातलं एक नवं पर्व सुरू झालं. खरंतर रस्तेसुरक्षा या विषयाची मला काहीही पार्श्‍वभूमी नव्हती. मग सुरू झाला या क्षेत्राच्या शिक्षणाचा ध्यास. कारण तिथं प्रत्यक्षात कोणत्या त्रुटी आहेत, मानवनिर्मित किती चुका आहेत, हे जाणून घेतल्याशिवाय पुढं जाणं अशक्‍य होतं. मग विविध स्तरांवर आमचा अभ्यास सुरू झाला. वर उल्लेखिल्याप्रमाणे या उपक्रमात माझा मित्र आणि या उपक्रमातला सहकारी कौस्तुभ व शरद पोंक्षे यांची अगदी पहिल्यापासून सोबत आहे. मात्र, अनेक कलाकारांनी मला काहीही मदत केली नाही, हेही इथं खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरची सुरक्षा या विषयाचा आम्ही सर्व बाजूंनी अभ्यास केला. यासंदर्भात संबंधित सगळ्या लोकांना भेटलो. अभ्यास करत असताना यातल्या त्रुटी मोठ्या प्रमाणावर लक्षात यायला लागल्या. ज्या मुद्द्यांसंदर्भात त्रुटी जाणवल्या ते मुद्दे पुढीलप्रमाणे
* दिशादर्शक, * साउंड अँड सोल सिस्टिम (SOS) * ओव्हरस्पीडिंग अँड अंडरस्पीडिंग, * लाइट ब्लॉकर्स, * ट्रॉमा केअर ॲब्युलन्स, * ट्रॉमा केअर युनिट, * ब्रायफेनबाबत रोजचा अभाव, * इंटेलिजंट हाय वे मॉनिटरिंग सिस्टिम, * मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मानवी चुका, * नियमांबाबतचं लोकांचं अज्ञान, * लोकांना जरब बसवण्यासाठीच्या यंत्रणेचा अभाव, *अपुरं पोलिसबळ, * रिफ्लेक्‍टर्सचा अभाव, *रम्बलर स्ट्रिप्सचा अभाव, * अनधिकृत दुचाकी वाहनांची वर्दळ, * मार्गावर गुरांचा संचार, * मद्यपान करून गाडी चालवणं,* सरकारी यंत्रणांची अनास्था, * दरडी कोसळणं.
आता या वरील मुद्द्यांचा आम्ही जो अभ्यास केला आणि ज्या उपाययोजना सुचवल्या त्या अशा ः
 दिशादर्शक ः भारतातले सर्व रस्ते हे ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केले जातात. या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासंदर्भात आम्हाला जाणवलं, की इथं साइनेज (Signage, वाहतूकविषयक चिन्हं) लावलेली असली तरी ती पुरेशा प्रमाणात नाहीत आणि काही चिन्हं समजायला अत्यंत क्‍लिष्ट आहेत. उदाहरणार्थ ः सुरवातीलाच तीन बाण आणि वाहन दाखवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ की इथं तीन लेन आहेत आणि उजवीकडून मोठ्या वाहनानं जाऊ नये. मात्र, ही चिन्हं कुणालाही नीटशी कळत नाहीत. यात सुधारणा होणं अत्यावश्‍यक आहे आणि यासंदर्भात मी सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना माझा अहवाल सादर केला असून, त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या मार्गाविषयीचं आमचं संशोधन प्रत्यक्ष भेटीत समजून घेतलं.

 साउंड ऑफ सोल (एसओएस) ः आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी इथं एसओएस ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे; पण आता त्यात आयपीच्या (इंटरनेट प्रोटोकॉल्स) माध्यमांतून सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. या मार्गावरचे एसओएस बूथ नीटसे दिसत नाहीत आणि या बूथचा कोणता उपयोग आहे, हेही लोकांना माहीत नाही. यासंदर्भात यंत्रणांनी जनजागृती करणं गरजेचं आहे.
 ओव्हरस्पीडिंग आणि अंडरस्पीडिंग ः भरधाव गाडी चालवण्याची नशा हेसुद्धा या मार्गावरच्या अपघातांचं प्रमुख कारण आहे. पुणे आणि मुंबई ही प्रचंड गर्दीची शहरं झाल्यामुळे तिथं वेग अनुभवता येत नाही. मग या द्रुतगती मार्गावर आल्यावर ‘आपणच राजे’ असा गैरसमज चालक करून घेतात आणि मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. ८० किलोमीटर हा वेग बंधनकारक असतानाही तो कुणीच पाळत नाही. हे झालं ओव्हरस्पीडिंगबाबत. या मार्गावर अंडरस्पीडिंगही मोठ्या प्रमाणावर होतं.

 ग्रीन बेल्टचा अभाव/ लाइट ब्लॉकर्स ः या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगल्या उंचीची झाडं लावणं गरजेचं आहे; जेणेकरून समोरच्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर येणार नाही आणि अपघात टाळता येतील. याला ‘लाइट ब्लॉकर्स’ असंही म्हणता येईल.
 ट्रॉमा केअर ॲब्युलन्स ः द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्या लक्षात घेता इथे ट्रॉमा केअर ॲम्ब्युलन्स जास्त संख्येत असणं आवश्‍यक आहे; जेणेकरून ‘गोल्डन आवर्स’मध्ये रुग्णाला तत्काळ उपचार मिळून त्याचे प्राण वाचू शकतील. आमच्या या सूचनेचा सरकारनं विचार करून त्यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचललं आणि आता एमएसआरडीसीच्या चार क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (क्‍यूआरव्हीसी) आणि चार खासगी रुग्णवाहिका, तसेच आयआरबीची यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, यातही सुधारणा होणं गरजेचं आहे. एअर ॲब्युलन्सची सुविधाही लवकरच प्रत्यक्षात उतरेल, अशीही आशा वाटत आहे.

 ट्रॉमा केअर युनिट ः ‘गोल्डन आवर्स’मध्ये प्राण वाचावेत, यासाठी किमान दोन ट्रॉमा केअर युनिट असणं आवश्‍यक आहे. ओझर्डे इथलं युनिट गेल्या अडीच वर्षांपासून बांधून तयार आहे; पण ते अद्याप कार्यान्वित नाही; पण ते लवकरच कार्यान्वित होईल, अशी चिन्हं दिसत आहेत. मुंबईच्या हद्दीत आणखी एक ट्रॉमा केअर युनिट असणं आवश्‍यक आहे.

 ब्रायफेन रोपचा अभाव ः दादाचा अपघात झाल्यानंतर मी सातत्यानं ब्रायफेन रोपची मागणी केली होती. हे तंत्रज्ञान प्रथम १९६० मध्ये कॅलिफोर्नियामध्ये वापरलं गेलं. आज ते ४० देशांमध्ये वापरलं जातं. एका लेनमधून दुभाजक ओलांडून दुसऱ्या वाहनावर गाडी जाण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अशा अपघातातून नुकतेच बचावले आहेत. अलीकडंच सात तारखेला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मी हा मुद्दा मांडला होता. त्याला मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा होती आणि ती खरी ठरेल, अशी चिन्हं दिसत आहेत.

 इंटेलिजंट सिस्टिमचा अभाव ः दादाचा अपघात झाल्यानंतर आम्ही लेन कटिंगचा - जी इथली सगळ्यात मोठी समस्या आहे - अभ्यास करण्यासाठी पाच कॅमेरे बसविले. तीन कॅमेरे अमृतांजन पुलाजवळची दस्तुरी चौकी इथं आणि दोन कॅमेरे मळवली इथल्या उड्डाण पुलावर बसवले आणि पाठपुरावा सुरू केला. एक इंटेलिजंट हाय वे मॉनिटरिंग सिस्टिम खास या रस्त्यासाठी तयार केली व तिचं सादरीकरण केलं आणि आता लवकरच या मार्गावर ती दिसेल. या गोष्टीमुळं अनेक प्रश्‍न मार्गी लागू शकतील. उदाहरणार्थ ः
    १)ओव्हरस्पीडिंग,
    २) लेन-कटिंग,
    ३) इन्सिडंट मॅनेजमेंट,
    ४) ई-चलन आदी. यासाठी कमांड सेंटर उभारणं आवश्‍यक आहे.
 मानवी चुकांचं मोठं प्रमाण ः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मानवी चुकांमुळं अपघात होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. बेदरकारपणे गाडी चालवणं, गाडी चालवताना झोप येणं, मद्यपान करून वाहन चालवणं, सीट बेल्ट न लावणं, गाडीच्या देखभालीची खातरजमा करून न घेता वाहन तसेच रस्त्यावर आणणं, गाडी चालवत असतानाच मोबाईलवर बोलणं, अतिवेगात गाडी चालवणं अशा काही मानवनिर्मित कारणांमुळं असंख्य अपघात झालेले आहेत. आपली जबाबदारी आपण विसरून केवळ यंत्रणांना दोष देणंसुद्धा योग्य नाही, असं मला वाटतं.

 लोकांचं अज्ञान ः अनेक वाहनचालकांना गाडी कुठल्या लेनमधून चालवावी, याविषयी प्रचंड अज्ञान आहे. वास्तविक, द्रुतगती मार्गावर डाव्या बाजूची लेन अवजड वाहनांसाठी, मधली लेन लहान वाहनांसाठी आणि सर्वांत उजवीकडची लेन ही ओव्हरटेकिंगसाठी असते, हेच मुळात ८० टक्के वाहनचालकांना माहीत नाही. ट्रक, बस, कंटेनर ही वाहनं सगळ्या लेन अडवून धावत असतात, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अपघात होतात.

 जरब बसवणाऱ्या यंत्रणेचा अभाव ः गाडी नियम सांभाळूनच चालवली जावी, अशी जरब बसवणारी यंत्रणा इथं मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित नाही; त्यामुळं लोक अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत असतात. यासंदर्भात कडक कारवाईचे आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले आहेत. वाहन ताब्यात घेण्यापासून ते वाहनपरवाना रद्द करणं, परमिट रद्द करणं, दंडात्मक कारवाई करणं असं या कारवाईचं स्वरूप आहे.
 अपुरं पोलिसबळ ः वाहतूक ही नेहमी चार E वर अवलंबून असते. Education, Emergency, Engineering आणि Enforcement. द्रुतगती मार्गावर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं, की पोलिसांचं मनुष्यबळ हे खूप कमी असल्यामुळं कारवाई करण्यात मर्यादा येत आहेत. पोलिसांच्या सुविधा आणि मनोबल वाढवणं आवश्‍यक आहे. इथं काम करताना कोणकोणत्या अडचणी येतात, त्या मांडण्याची संधी पोलिसवर्गाला द्यायला हवी, असं या अभ्यासादरम्यान जाणवलं. मंत्रालयातल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांना मी यासंदर्भात विनंती केली असून, तिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

रिफ्लेक्‍टर्सचा अभाव ः या मार्गावर अनेक छोकादायक वळणं असून, अनेक ठिकाणी रिफ्लेक्‍टर्सचा अभाव जाणवतो. अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी इथं लाल, पिवळे असे रिफ्लेक्‍टर्स ठिकठिकाणी तातडीनं बसवण्याची गरज आहे.
 अनधिकृत दुचाकी वाहनं ः अनेक ठिकाणी या मार्गावर दुचाकी वाहनांचा मुक्त वावर दिसतो. तो थांबवायला हवा. त्यासाठी सर्व्हिस शेड असणं आवश्‍यक आहे; जेणेकरून अपघात कमी होतील. जे वाहनचालक जाळ्या तोडून रस्ते ओलांडू पाहतात त्यांच्यावर कारवाई करून आणि प्रबोधनाद्वारे या प्रश्‍नावर उपाययोजना होऊ शकेल.
 मद्यपान करून गाडी चालवणं ः अनेक वाहनचालक मद्यपान करून गाडी चालवतात, असं मला अभ्यासाअंती लक्षात आलं आहे. द्रुतगती मार्गावर आता लवकरच अल्कोमीटर कायमस्वरूपी येत असल्यामुळं या गोष्टीला आळा बसेल. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई अत्यावश्‍यक आहे.
 सरकारी यंत्रणांची अनास्था ः गेल्या १४ वर्षांत या मार्गावर १४ हजारांहून अधिक अपघात झालेले आहेत आणि चौदाशे लोकांना त्यांत प्राण गमवावे लागले आहेत. हे केवळ चौदाशे मृत्यू नसून, त्यामुळं चौदाशे घरं उद्‌ध्वस्त झालेली आहेत. या मुद्द्यावर सरकारी यंत्रणांनी तातडीनं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

 दरडी कोसळणं ः गेल्या वर्षी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून तीन-चार लोक मृत्युमुखी पडले.
असे अपघात रोखण्याविषयीची आधीची उपाययोजना तितकीशी चांगली नव्हती; पण आता दरडी कोसळू शकणाऱ्या संभाव्य क्षेत्रात अपघात रोखण्यासाठी केलेलं नेटिंग हे चांगल्या दर्जाचं आहे, असं जाणवलं. नेटिंगचं हे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झालेलं आहे. या पावसाळ्यात नेटिंगची चाचणी होऊन या उपाययोजनेच्या सक्षमतेविषयी कळेल. या सर्व गोष्टींची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी एक एफएम चॅनेल खास द्रुतगती मार्गासाठी सुरू करावं, अशी मागणी मी परवाच्या बैठकीत केली आहे; जेणेकरून यंत्रणांवरचा भार कमी होईल आणि अफवांनाही आळा बसेल.
    आणखी काही मुद्द्यांबाबत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. ते मुद्दे असे आहेत.
    १) रम्बल स्ट्रिपची संख्या वाढवायला हवी.
    २) टेल लॅम्प नसणाऱ्या गाड्यांना अटकाव करायला हवा.
    ३) ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी माहितीफलक हवेत.
    ४) Emergency Exit जवळ लाइटची व्यवस्था.
    द्रुतगती मार्ग हा जास्तीत जास्त सेफ, सुरक्षित व्हावा, यासाठीची माझी लढाई शेवटपर्यंत सुरूच राहील आणि ‘मृत्यूचा सापळा’ असा जो कलंक या महामार्गाला लागलेला आहे, तो संबंधित सगळ्या घटकांच्या मदतीनं दूर होईल, असा मला विश्वास आहे. वाहनचालकांनी अत्यंत जबाबदारीनं वाहन चालवणं गरजेचं आहे.
 पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरच्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात सात जून रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत पुढील निर्देश देण्यात आले आहेत.
१) इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिमची उभारणी

२) ब्रायफेन रोपची संपूर्ण मार्गावर उभारणी
३) विशेष कृती दलाची उभारणी
४) चार E वर भर देणं
५) ३६५ दिवस पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून देणं
६) ट्रॉमा केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करणं
७) सेंट्रल कंट्रोल सेंटरची उभारणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com