शेतकरी मुलाच्या तोंडी बॉम्बची भाषा शोभते ?

शेतकरी मुलाच्या तोंडी बॉम्बची भाषा शोभते ?

"आमच्या मायबापात आमचं रक्त आहे. भगतसिंह यांनी ब्रिटीशांवर जसा बॉम्ब टाकला. तसा बॉम्ब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर टाकू असे खळबळजनक विधान शेतकऱ्यांचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांची ही भाषा कायद्याला कदापी मान्य होणार नाही. त्यांच्यावर सरकार याबाबत कारवाई करूही शकते. मात्र, अशी हिंसक भाषा वापरून मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रही पेटला पाहिजे असे जर कोणाला वाटत असेल तर जनतेनेही त्यांना शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगण्याची गरज आहे. शिवरायांचा, ज्ञानोबा-तुकोबाचा, शाहु,फुले,आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असल्या अतितेकी विचाराला कदापी थारा देणारा हे कडू यांनी लक्षात घ्यायला हवे. 

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. गेल्या आठ दिवसापासून कधी नव्हे इतकी अशांतता आहे. अजुनही मार्ग निघत नाही. शेतकऱ्यांचा संप मिटून रात्रही उलटत नाही. तोवर शेतकरी संघटनांच्या कृती समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्र बंदची हाक देण्याबरोबरच रेल रोको करण्याचा इशारा दिला. मध्यप्रदेशात तेथील सरकारच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाले. शांतताप्रिय म्हणून ज्या राज्याकडे पाहिले जात होते त्याला गालबोट लागले. मध्यप्रदेशची पुनरावृत्ती महाराष्ट्रात व्हायची नसेल तर आपल्याकडील नेत्यांनीही थोड डोक ठिकाण्यावर ठेवले पाहिजे. प्रक्षोक भाषा आणि भाषणे करून किंवा जाळपोळ, पेटवापेटवी करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. हे अगदी टोकाची भूमिका घेणाऱ्या मंडळींनी लक्षात घ्यावे. 

महाराष्ट्राने यापूर्वी अनेक लढे पाहिले आणि अनुभवले आहेत. अगदी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाले होते. शेतकरी मृत्यूमूखी पडले होते. निदर्शने, मोर्चे, बंद, बेमुदत उपोषण असे एक ना अनेक लढे उभारले गेले. या लढ्याचे अनेक नेते साक्षिदार आहेत. मात्र अगदी टोकाची भूमिका घेऊन काहीच साध्य झालेले नाही. 

शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जेवढी म्हणून राजकीय वाटचाल झाली आहे. या वाटचालीतील त्यांचा सध्याचा काळ खूपच खडतर आहे असे म्हणावे लागेल. त्यांच्या वाट्याला गेल्या काही दिवसात जे काही आले तितके यापूर्वी शरद पवार सोडले तर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या वाटेला आले असेल असे वाटत नाही. 

लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्याचे पुतळे जाळण्यात आले, त्यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या नावाने शंख करण्यात आला. त्यांना ब्राह्मण म्हणून जातीयवादी ठरविण्यात आले. आता तर त्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचाही इशारा देण्यात आला. हे मानअपमान, हार-प्रहार ते गेल्या काही दिवसापासून सहन करीत आहेत. एकीकडे दररोज वाटेला अवहेलना येत असतानाही ते शेतकरी प्रश्‍नावर मार्ग काढण्याचा मार्ग शोधता आहेत. शेतकऱ्याचे जे म्हणून काही प्रश्‍न आहेत ते एका दिवसात संपणारे नाहीत. ते संपणार नाहीत. मग कोणतेही सरकार सत्तेवर येऊ द्या. 

आज शेतकऱ्यांविषयी बेंबीच्या देटापासून बोंब ठोकणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले पंधरा वर्षे काय झोपले होते का ? शेतकरी आज ज्या मागण्या करता आहेत त्या काय गेल्या एक दोन महिन्यातील आहेत का ? याचाही विचार व्हायला हवा. उद्या भाजपचे सरकार जरी सत्तेवरून पायउतार झाले. समजा शिवसेना आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले तरी हे पश्‍न सुटणारे नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आणि भाजप सरकारला विरोध करण्याचा प्रत्येक पक्ष, संघटना आणि प्रत्येक नागरीकाला अधिकार आहे. तो असलाच पाहिजे. पण, कोणाची हत्या करून, कोणाच्या घरावर बॉम्ब फेकून प्रश्‍न मिटत असते तर आज शेतकरी जे आंदोलन करीत आहेत ते करण्याची गरज भासली असती का ? 

बच्चू कडूंच्या शेतकऱ्याविषयी असलेल्या भावनांचा आदरच करायला हवा. ते जरी बॉम्ब फेकण्याची भाषा करीत असले तरी वास्तवात ते कदापी शक्‍य होणार नाही. महात्मा गांधींची हत्या करून त्यांचे विचार संपविता आले नाहीत. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकरांची हत्या करूनही ते संपलेले नाहीत. याचा शांत डोक्‍याने विचार व्हावा. शेतकऱ्यांची माथी भडकवून, जनतेला वेठीस धरून काय साध्य होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी निश्‍चितपणे मतभेद असू शकतात. पण, त्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याची भाषा एका शेतकऱ्याच्या मुलाच्या तोंडी शोभत नाही. जे शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांचे प्रतिनिधीत्व करातात त्यांच्या डोक्‍यात रक्तसांडण्याचे विचार कसे काय येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांना ठार मारून प्रश्‍न मार्गी लागतील का ? आपण तालिबानींचा आदर्श घ्यायचा की काय ? 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रक्षोभक विधान करीत. हिटलरचे गुणगाण गात. हिटलरमध्ये धमक होती असे ते म्हणायचे. पण, त्यांना हिटलर होता आले नाही. बच्चू कडू भगतसिंगाचे उदारहरण देतात. त्यांच्या क्रांतीची भाषा करतात. पण, त्यांनाही कदापी भगतसिंग होता येणार नाही हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्र ही संताची आणि शूरांची भूमी आहे येथे अविवेकी विचारांना कदापी थारा मिळणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com