ऍक्‍सीलेटर आहे, तसा ब्रेकही आहे ना! 

fast lifestyle there is not have any break!
fast lifestyle there is not have any break!

वेडा वेग आहे हा... जीवघेणा... घातक... हा जगण्याचा नव्हे, मरणाचा वेग आहे. सध्याचं युग स्पर्धेचं आणि त्यामुळे वेगाचं. ही स्पर्धा आणि वेग साऱ्याच क्षेत्रांत. जो-तो वेड्यासारखा धावत सुटलाय. प्रत्येकाच्या बॉडीला जणू ऍक्‍सीलेटर लागलंय. ब्रेक लावायचे राहून गेले असावेत. त्यावर दाब देऊन सारेच सुर्रऽऽऽ निघाले आहेत. कुठं जाताहेत, कशासाठी जाताहेत..? कुणालाच विचार करायला वेळ नाही. परवा एका मानसोपचारतज्ज्ञ मित्राशी न राहवून बोललो. कशाचा रे हा वेग?... त्याचं उत्तर असं- ""निरर्थक पॉवरच्या भासाचा वेग आहे हा... मशीनची किंवा यंत्रणेची किंवा पदाची पॉवर ही आपली पॉवर आहे, असे समजून धावताहेत लोक वेड्यासारखे... नव्या जीवनशैलीनं निर्माण केलेल्या तात्पुरत्या समाधानाच्या पोटी धावताहेत बेटे!''... किती खरं बोलला तो!... पंधरा-वीस वर्षांची तरुण पोरं झुम्म जोरात बाईक्‍स पळवितात. त्यांनाही याच पॉवरचा भास होत असावा. 500 सीसीची मोटारसायकल जागेवरूनच पीक अप घेते... मग काय? निघायचं, धावायचं आणि पडायचं-पाडायचं... जखमी व्हायचं. या वयात भान असत नाही हे खरं किंवा ते लवकर सुटतं हेही खरं. पण, प्रौढत्वाकडे झुकलेल्या लोकांनी तरी वेगाचं वेड झुगारायचं ना!... तेही तसेच. फक्त पोरंसोरं स्पर्धेत पळताहेत हे खरं नाही. आपण सारेच पळत सुटलो आहोत, जगायचं मागं सोडून. बरं, कशासाठी?... माहिती नाही!... काय मिळवायचंय?... कल्पना नाही! साधारणतः तीसेक वर्षांपूर्वी युरोपात "स्लो डाउन' नावाची चळवळ सुरू झाली. त्यानं तिथल्या जगण्यात फार मोठा फरक घडविला असं नव्हे; पण किमान साऱ्याच बाबतीतला अनावश्‍यक वेग कमी करण्यावर चर्चा तरी सुरू झाली. फास्ट बस, फास्ट ट्रेन, फास्ट लाइफ, फास्ट्रॅकचं घड्याळ आणि फास्ट फूड... सारंच कसं फास्ट!... पोचायचं कुठं याचा अजिबात विचार नाही, अशा युगाची सुरुवात होत असताना व तेच चांगलं आहे, असा साऱ्यांचा समज होत असताना ही चळवळ पुढं आली. या वेगात जगणं सुटतंय मागं, याचा विचार बहुतेकांच्या मनालाही शिवला नव्हता तेव्हा तिचा जन्म झाला. यातूनच पुढं "वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ स्लोनेस'चा जन्म झाला. या संस्थेनं 1999 मध्ये जीवनाची गती कमी करण्याची आवश्‍यकता असल्याचं प्रतिपादन करीत हा विचार प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर "इन प्रेज ऑफ स्लोनेस' नावाचं एक पुस्तकही आलं. साम्यवादाच्या संदर्भात "दास कॅपिटल'ला जे मोल आहे, तेच "स्लो डाउन मूव्हमेंट'च्या संदर्भात या पुस्तकाला आहे, असे अभिप्राय दिले गेले. परंतु, हा विषय जगात सर्वत्र फारसा पुढं गेला नाही. विशेषतः जिथं गरिबी, बेकारी, निरक्षरता आहे, अशा भारतासारख्या देशांमध्ये हा विषय पचनी पडणं शक्‍यही नव्हतं. गतिमान माणूस किंवा देश-प्रदेश हे सर्व बाबतीत उत्कृष्ट असतात, हा समज खोडायला या संकल्पनेची बऱ्यापैकी मदत झाली हे मात्र खरं. एका अर्थानं हे गतिमानतेच्या प्रेमात पडलेल्या युगात अवतरलेलं मन्वंतर होतं. "स्लो डाउन'चा अर्थ प्रत्येक काम संथ गतीनं करा, असा होत नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेग आवश्‍यक आहे, तेवढाच वेग द्या आणि त्या कामाचा आनंद घ्या, जगण्याचाही आनंद घ्या, असा संदेश या चळवळीनं दिला. शिवाय, अतिवेगानं केलेलं काम बऱ्याच प्रमाणात दर्जाहीन असतं, हेही त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. काळ कुणासाठीही थांबत नाही. त्यामुळे साऱ्यांना काळाच्या बरोबरीनं चालणं भाग आहे. जे काळासोबतची गती राखू शकत नाहीत, ते मागं पडतात. मात्र, आपल्या मूलभूत गरजा या बदलांच्या आवर्तनांतही बदललेल्या नाहीत, याची नोंद प्रत्येकानं घ्यावी आणि गरजेएवढं गतिमान राहावं, हे त्यातलं मूलभूत सूत्र. मानवानं मोठ्या कष्टानं प्रतिसृष्टी निर्मिली. तिचा आस्वाद घ्यायला मानवालाच वेळ नाही, ही आधुनिक जगातली खरी शोकांतिका. गावाकडच्या पानाच्या ठेल्यावरच्या रेडिओवर कधी तरी "ये नयन डरे-डरे' ऐकायला येतं तेव्हा- ""अरेच्चा!... किती वर्षं झालीत हेमंतकुमारला ऐकून...'', असं मनातल्या मनात वाटून जातं. पण, ते सारं आवरून माणसं पुढच्या कामाकडे वेगानं निघतात. साऱ्या दुनियेच्या शिरस्त्याला ही पोटार्थी माणसं कशी अपवाद असतील?... ही चळवळ किमान आज तरी सुसंघटित नाही. त्यामुळे तिचा आवाज फारसा ऐकू येत नाही. ती आपल्याकडे कधी येईल आणि फोफावेल, हेही सांगता येत नाही. आपल्या हाती आहे ते ऍक्‍सीलरेटरवरचा दाब थोडासा कमी करणं आणि ब्रेक लावून गरजेएवढ्या वेगानंच पुढं जाणं. त्यातून जगण्यातला ताण काही अंशी तरी कमी होईल आणि आनंद वाढेल हे निश्‍चित!... सो... जरा आहिस्ता... आहिस्ता...  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com