‘ख्रिस्तपुराणा’चा कोकणी-मराठी अवतार (फ्रान्सिस दिब्रिटो)

francis dibrito
francis dibrito

‘जैसी पुस्पामाजि पुस्प मोगरी। कि परिमळा माजि कस्तुरी। तैसी भासांमाजि साजिरी मराठिया’ अशा शब्दांत मराठी भाषेचं गुणगान करणारे फादर थॉमस स्टीफन्स (१५४९-१६१९) यांनी रचलेल्या ‘ख्रिस्तपुराण’ या ग्रंथाचा कोंकणी-मराठी अनुवाद गोमंतकपुत्र सुरेशबाब गुंडू आमोणकार यांनी नुकताच केला. अतिशय आव्हानात्मक असलेलं हे काम आमोणकर यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी मोठ्या परिश्रमांनी पार पाडलं. ‘ख्रिस्तपुराण’च्या या अनुवादाचा प्रवास आजच्या ईस्टर संडेनिमित्त...

धर्म हे संघर्षाचं नव्हे, तर संवादाचं क्षेत्र आहे. विविध धर्मांचे धर्मग्रंथ हे संस्कृतीचं संचित आहे. धर्मग्रंथांचे चुकीचे अन्वयार्थ लावल्यामुळं जगात काही उत्पात झाले आहेत हे खरं आहे; परंतु ती विकृती होती. त्यामुळं धर्मग्रंथाचं अंगभूत सामर्थ्य कमी होत नाही. धर्मग्रंथांनी मानवतेच्या मंदिरांची उभारणी केली आहे.

भारतीय माणूस स्वभावानं उदार आणि सहिष्णू आहे. त्याची बीजं आपल्याला ऋग्वेदात सापडतात. आपल्या ऋषींनी आपल्याला व्यापकतेची दीक्षा दिलेली आहे. ऋग्वेदात म्हटलं आहे ः "सर्व दिशांतून सुंदर विचार माझ्या भूमीत येऊ द्यात.' (आ नो भद्राः ऋत्वो यन्तु विश्वतः). या महावाक्‍यापासून प्रेरणा घेऊन, विविध धर्मग्रंथांचं कोंकणी भाषेत अनुवाद करण्याचं युगप्रवर्तक कार्य गोमंतकपुत्र सुरेशबाब गुंडू आमोणकार यांनी केलं आहे. गोवा हे छोटेसं राज्य आहे. तिथं कोंकणीभाषकांची संख्या मर्यादित आहे. तशात देवनागरी, रोमन, कन्नड, मल्याळम्‌ आणि परसो-अरेबिक अशा पाच विभिन्न लिप्यांमध्ये लिहिली गेलेली कोंकणी ही जगातली एकमेव भाषा असावी. लिपीभिन्नता हे कोंकणीचे सौंदर्य जसं आहे, तसंच ते तिचं दुर्बल स्थानही आहे. या सगळ्यावर मात करून आमोणकार यांनी हे अनुवादाचं कार्य केलं असून, अनुवादासाठी त्यांनी देवनागरी लिपीचा अंगीकार केला. सर्व संस्कृतोद्भव भाषांनी देवनागरी लिपीचाच अवलंब केला आहे.

पेशाने शिक्षक असलेले आमोणकार हे भाषाप्रेमी, संशोधक आणि विशेष म्हणजे सकल धर्मांचे आस्वादक आहेत. आपल्या उत्तरायुष्यात आमोणकारांनी अनुवादयज्ञाला प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी मानवी मूल्यांची बीजं असलेल्या अभिजात जागतिक ग्रंथांची निवड केली. आज 82 व्या वर्षात असलेले आमोणकार यांनी 1997 मध्ये "धम्मपदा'चा कोंकणी अनुवाद केला. त्यानंतर त्यांनी श्रीमद्भगद्गीता (श्रीभगवंतानं गायलेले गीत), श्रीतिरुवल्लुरकृत तामिळ वेद "तिरुक्कुरळ', झेनच्या दृष्टान्तकथा, ज्ञानेश्वरी, गुरू नानकविरचित "जपूजीसाहेब', संत योहानाचं शुभवर्तमान (जुआंवांप्रमाणे जेजू ख्रिस्ताचे शुभवर्तमान) या कृतींचे कोंकणी अनुवाद केले. या सगळ्यावर कळस म्हणजे, त्यांनी केलेला फादर थॉमस स्टीफन्स यांच्या "ख्रिस्तपुराणा'चा कोंकणी अनुवाद (पृष्ठं 1070) आणि "ख्रिस्तपुराणा'चा अनुवाद करता करता संशोधन करून लिहिलेला "गोंयचे संवसारिकीकरण ः गोव्याचे जागतिकीकरण' (पृष्ठं 182) हे दोन ग्रंथ होत. दोन्ही ग्रंथ मासिकाच्या आकाराचे आहेत. आमोणकार यांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्या त्या धर्माच्या ग्रंथाचा अनुवाद करताना ते प्रथम त्या ग्रंथाचं तत्त्वज्ञान सहृदयतेनं आत्मसात करतात. त्या त्या धर्मातल्या धर्मपंडितांकडून त्यांचे अर्थ आणि पाठभेद समजून घेतात. ग्रंथातल्या विचारांशी तादात्म्य पावतात. "धम्मपदा'चा अनुवाद करताना ते बुद्धाचे अनुयायी होतात, तर संत जॉनचं "शुभवर्तमान' कोंकणीमध्ये आणताना ते ख्रिस्ताला आपला गुरू मानतात. "जपूजीसाहेब'चा अनुवाद करताना गुरुनानक त्यांच्या आत्म्यात अवतरतात.
***

"ख्रिस्तपुराणा'चा कोंकणी भाषेत अनुवाद करणं हे आमोणकर यांच्यासाठी मोठं आव्हान होते. ब्रिटिश मिशनरी फादर थॉमस स्टीफन्स यांच्या (1549-1619) "ख्रिस्तपुराणा'च्या तीन छापील आवृत्ती (1616, 1649, 1654) गोव्यात काढण्यात आल्या. नवख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती धर्माचं ज्ञान देऊन त्यांचं प्रबोधन करणे हा स्टीफन्स यांचा हेतू होता. हे महाकार्य हाती घेताना फादर स्टीफन्स यांनी संस्कृत, मराठी आणि कोकणी या भाषांवर प्रभुत्व मिळवलं, त्याचबरोबर भगवद्गीता आणि भागवतसंतांच्या साहित्याची पारायणं केली. त्यांनी ओवीवृत्तात ख्रिस्तपुराण हा महाग्रंथ साकारला. बायबलचे जुना आणि नवा असे दोन करार आहेत. स्टीफन्स यांच्या "ख्रिस्तपुराणा'त "जुना करारा'वर 36 अध्याय (अवस्वरू) व "नवा करारा'वर 59 अध्याय आहेत.

काव्यरचना करताना स्टीफन्स यांनी भारतीय संतसाहित्यातल्या संकल्पनांचा व शब्दकळेचा मुक्तहस्ते वापर केला आहे. उदाहरणार्थ ः वैकुंठ, निजगोपाल, जगद्गुरू, षड्रिपू, नवखंड, पृथ्वी, यज्ञ, होम अशा संज्ञा त्यांनी वापरल्या आहेत. स्टीफन्स हे हिंदू-ख्रिस्ती समन्वयाचे आद्य शिल्पकार होते.("म्हणोनि आमीं तुमी सर्व जनी। बंदूवर्ग ऐसे मानावे मनी। फ्रिन्गी हिंदू आदि करूनि। एकमेकांचे बंदू।। 1ः3ः64). धर्मसंवाद ही त्यांची भूमिका होती; त्यामुळं ख्रिस्ती तसंच हिंदू धर्मातल्या धार्मिक लोकांना "ख्रिस्तपुराण' एकसारखंच प्रिय होतं. 27 जून 1684 ला गोव्याचे तत्कालीन व्हॉईसरॉय फ्रान्सिस द ताव्होर यांनी "ख्रिस्तपुराणा'वर बंदी घातली. त्यामुळं गोव्यात मराठी ग्रंथव्यवहारच कुंठित झाला. चर्चेसमध्ये "ख्रिस्तपुराणा'चं वाचन व निरूपण करण्यात येत असे, तेही थांबवण्यात आलं. "ख्रिस्तपुराणा'च्या छापील प्रती चर्चमध्ये होत्या, त्या जप्त करण्यात आल्या. त्यांचं काय झालं, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. पाश्‍चात्य लोकांना इतिहासाचं भान असतं. त्यांनी स्टीफन्स यांच्या छापील ख्रिस्तपुराणाची एकतरी प्रत युरोपला नेली असेल किंवा स्टीफन्स यांनीही एखादी प्रत मायदेशी पाठवली असेल. तिचा शोध घेणं हे संशोधकांपुढचं मोठं आव्हान आहे. अशी प्रत मिळाली तर "ख्रिस्तपुराणा'च्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल आणि अंतिम पाठशुद्ध आवृत्ती (Critical Edition) तयार करता येईल.

पोर्तुगीजांच्या छळामुळे गोव्यातल्या अनेक ख्रिस्ती मंडळींनी निरनिराळ्या ठिकाणी पलायन केलं. काही कुटुंबं मंगळूरला स्थायिक झाली. "ख्रिस्तपुराण' हा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. काही जणांनी मूळ "ख्रिस्तपुराणा'च्या हस्तलिखित नकला तयार केल्या होत्या. त्याही ते मंगळूरला घेऊन गेले होते. त्याच्या श्रवणावर त्यांचं आध्यात्मिक पोषण होत होते. मंगळूल इथल्या जोसेफ सलढाणा यांनी "ख्रिस्तपुराणा'च्या उपलब्ध हस्तलिखितांची जमवाजमव केली. ती रोमन लिपीत होती. त्यावरून त्यांनी "ख्रिस्तपुराणा'ची पाठचिकित्सक आवृत्ती 1907 मध्ये प्रसिद्ध केली. "ख्रिस्तपुराणा'ची ही चौथी आवृत्ती होय.

नगर कॉलेजचे प्राध्यापक शांताराम बंडेलू यांनी सालढाणा प्रतीचं देवनागरीत लिप्यंतर केलं. मराठीचे ऑस्ट्रियन अभ्यासक व पुण्याच्या डी नोबिली कॉलेजममधले प्राध्यापक फादर स्टाफनर (एस. जे.) व नगर जिल्ह्यात कार्य करणारे रेव्हरंड पी. गायजल (एस. जे.) यांच्या प्रयत्नांमुळं पुण्याच्या "प्रसाद प्रकाशना'नं 1956 मध्ये 1075 पृष्ठांचा "ख्रिस्तपुराण' हा ग्रंथ प्रकाशित केला. राजवाडे, पांगारकर, प्रियोळकर, प्रभुदेसाई, भेंब्रे आदींनी त्यावर समीक्षात्मक लेखन केलं. फादर स्टाफनर यांनी सलढाणाकृत आवृत्तीच्या दोन मायक्रोफिल्म काढून त्यातली एक प्रत पुणे विद्यापीठाच्या "मुकुंद रामराव जयकर ग्रंथालया'ला दिली आणि दुसरी प्रत पुण्यातल्या "स्नेहसदन' या संस्थेचे फादर कारीदाद द्रागो यांच्या हवाली केली. (अशीच एक फिल्म मुंबईच्या मराठी संशोधन मंडळात आहे). द्रागो यांनी त्यावरून तयार केलेली श्रेयस आवृत्ती मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनानं 1996 मध्ये प्रकाशित केली. (पुनर्मुद्रण 2009). त्यासाठी त्यांनी मर्सडेन प्रत व बंडेलू प्रत यांचा आधार घेतला होता.

स्टीफन्स यांच्या "खिस्तपुराणा'ची देवनागरी लिपीतली हस्तलिखितं लंडनमधल्या स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज्‌मधल्या "मर्सडेन कलेक्‍शन'मध्ये आढळली असल्याचं जस्टिन ऍबट यांना 1925 मध्ये कळलं. सन 1907 मध्ये मंगळूर इथं रोमन लिपीत प्रसिद्ध झालेल्या सलढाणा यांच्या ख्रिस्तपुराणाची "मर्सडेन' ही देवनागरी प्रत असावी, असं डॉ. नेल्सन फलकाव यांनी म्हटलं आहे. डॉ. फलकाव यांनी लंडनमध्ये जाऊन मर्सडेन प्रतीचा शोध गेतला. त्या हस्तलिखितांचा आधार घेऊन, त्यांनी 2009 मध्ये, "फादर स्टीफन्सकृत ख्रिस्तपुराण' ही मराठी आवृत्ती सिद्ध केली.***
बंडेलू आणि आमोणकार यांच्या मते, मर्सडेन प्रत ही स्टीफन्सकृत मूळ "ख्रिस्तपुराणा'ची नक्कल नाही. बंडेलू यांच्या मतानुसार "कोकणातील मध्यम आणि कनिष्ठ वर्गात विशेषत्वाने आणि सर्वसाधारणपणे गोमंतकाळातील सर्वच क्रिस्तीजनांत बऱ्याच काळापर्यंत पुराणाची लोकप्रियता कायम होती. अशा परिस्थितीत फादर स्टीफन्स यांच्या रोमन लिपीतील ख्रिस्तपुराणाची शुद्ध ग्रांथिक मराठीत संस्कृत पर्याय देऊन देवनागरी लिप्यंतर कोणा नवीन धर्मांतर केलेल्या विद्वान ब्राह्मणाने केले नसेलच असे म्हणवत नाही.'' (बंडेलूकृत क्रिस्तपुराण, प्रस्तावना, पृ. 16).

आमोणकरांनी सलढाणा आवृत्ती प्रमाण मानून "ख्रिस्तपुराणा'चा कोंकणी अनुवाद सिद्ध केला आहे. त्यांच्या मते, मर्सडेन आवृत्ती पाठशुद्ध असू शकत नाही. सन 1766 मध्ये, म्हणजे मूळ "ख्रिस्तपुराणा'च्या प्रकाशनानंतर 150 वर्षांनी फादर शिमोन गोमेझ या पोर्तुगीज धर्मप्रसारकानं सिद्ध केलेली ती आवृत्ती आहे. तिची प्रत मर्सडेन या ब्रिटिश संशोधकाला मिळाली व त्यानं ती लंडनच्या ओरिएंटल संस्थेला दिली. फादर गोमेझ हे उत्तर गोव्यात मराठी विभागात धर्मप्रचार करत असत. त्यांच्या श्रोत्यांना कोंकणीमिश्रित "ख्रिस्तपुराणा'चं आकलन होत नव्हतं म्हणून त्यांनी संस्कृतप्रचुर आवृत्ती तयार केली.

मर्सडेन आवृत्तीत "नवा करारा'तला बाविसावा अध्याय वगळलेला आहे. प्रभू येशूनं पाण्याचा द्राक्षारस कसा केला यासंबंधीचा तो अध्याय आहे. मद्याचा संदर्भ मराठी वाचकांना खटकणारा होता व फादर गोमेझ यांचा श्रोतृवर्ग महाराष्ट्रीय असल्यामुळं त्यांनी तो अध्याय मुद्दाम वगळला असावा, असं बंडेलू व आमोणकार यांचं मत आहे. त्यामुळं दोघांनी सलढाणा प्रत प्रमाण मानून, मराठी व कोंकणी अनुवाद साकार केले आहेत. आमोणकारांच्या मते, रोमन लिपीतून देवनागरीत लिप्यंतर करताना, जुन्या कोंकणी भाषेच्या पूर्ण ज्ञानाच्या अभावी अन्य मराठी आवृत्तींमध्ये खूप चुका झाल्या आहेत. प्रत्येक पानावर 30 ते 40 चुका आढळतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी त्या दुरुस्त करून, "ख्रिस्तपुराणा'ची सुधारित मराठी आवृत्ती तयार केली आणि त्याचा कोंकणीत अनुवाद केला. बंडेलू यांनी "ख्रिस्तपुराणा'चं देवनागरीत लिप्यंतर केलं. ते करताना मूळ "ख्रिस्तपुराणा'तल्या कोंकणी शब्दांचं वास्तव भाषांतर झालेलं नाही, असं कोंकणी भाषेचे अभ्यासक प्राध्यापक सेबेस्त्याव बोर्झेस यांनाही आढळलं. त्यांनी प्रत संपादित करून मूळ कोंकणी शब्दांचं यथार्थ भाषांतर सादर केलं. अध्याय 2 ओवी 61 मध्ये शब्द आहे "खैची'. बंडेलू यांनी अर्थ दिला आहे "कैची.' या कोंकणी शब्दाचा अर्थ आहे "कुठली.' अध्याय 8 ओवी 114 मध्ये शब्द आहे "गिरबुजी.' बंडेलू यांनी अर्थ दिला आहे "पोफळीच्या झाडाच्या गाभ्यातून निघणारं शिंपूट,' तर कोंकणी अर्थ आहे "चिमणी.' आजही चिमणीला कोंकणीत "गिरबुजी' म्हणतात. अध्याय 24 ओवी 45 मध्ये "आटू' या शब्दाचा बंडेलू यांनी अर्थ दिला आहे "ताठा,' परंतु या कोकणी शब्दाचा अर्थ आहे "नाश,' पुराण 2 ओवी 34 मध्ये शब्द आहे "तिखी.' बंडेलकृत अर्थ "मिरची' असा आहे, तर कोंकणी अर्थ आहे "दालचिनी.' पुराण 2 अध्याय 31, ओवी 19 मध्ये शब्द आहे "सुंवळी.' बंडेलू यांनी अर्थ दिला आहे "मृदुभाषी', तर खरा अर्थ आहे "धाकटी भावजय.' गोवा विद्यापीठातल्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. सु. म. तडकोडकर यांच्या मते, आमोणकार यांनी सिद्ध केलेलं "ख्रिस्तपुराण' हे एका बाजूला संशोधन आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुवाद आहे. म्हणजे हा "संशोधनपर अनुवाद' आहे.

"ख्रिस्तपुराणा'चा कोंकणी अनुवाद ही आमोणकार यांची फार मोठी साहित्यसेवा आहे. अधिक शुद्ध स्वरूपातली निर्णायक अशी मराठी संहिताही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. ग्रंथाच्या डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला कोंकणी असं या ग्रंथाचं स्वरूप आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बायबलमधल्या संकल्पनांविषयी टीपा आहेत. प्रत्येक ओवीनुसार सापडणाऱ्या प्राचीन व अर्वाचीन कोंकणी शब्दांची यादी देण्यात आली आहे. आमोणकार यांनी भावी संशोधकांना उपयुक्त ठरतील अशी सात परिशिष्टं कोंकणी-मराठी आवृत्तीला जोडलेली आहेत. पहिल्या परिशिष्टामध्ये बायबलच्या पुस्तकांची लॅटिन व इंग्लिश भाषेतली नावं व त्यांचे कोंकणी व मराठी भाषेतले अनुवाद दिले आहेत.

दुसऱ्या परिशिष्टात "ख्रिस्तपुराणा'तल्या महत्त्वाच्या ख्रिस्तीधर्मीय संकल्पनांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ ः ट्रिनिटी, मूळपाप, देवदूत, कन्फेशन इत्यादी. तिसऱ्या परिशिष्टामध्ये ज्यू लोकांनी इसवीसनपूर्व 1050 च्या दरम्यान इजिप्तमधून पॅलेस्टाइनमध्ये केलेल्या स्थलांतराचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे व चौथ्या परिशिष्टामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळातला राजकीय नकाशा दिलेला आहे. पाचव्या परिशिष्टामध्ये "ख्रिस्तपुराणा'ची सलढाणा प्रत, मर्सडेन प्रत आणि आमोणकार प्रत यांनी आपला अनुवाद व सलढाणा प्रत यांच्यातल्या पाठभेदांची अध्यायवार सविस्तर यादी दिलेली आहे. सहाव्या परिशिष्टामध्ये ख्रिस्तपुराणामध्ये आलेल्या व्यक्तींच्या इंग्लिश, मराठी आणि ग्रीक बायबलांमधल्या नावांचे उच्चार दिलेले आहेत. सातव्या परिशिष्टामध्ये "ख्रिस्तपुराणा'ची संपूर्ण विषयसूची आहे. बंडेलू यांच्या आवृत्तीतही आठ अभ्यासपूर्वक परिशिष्टं आहेत. भावी अभ्यासकांच्या दृष्टीनं ही सर्व परिशिष्टं अतिशय मोलाची आहेत.

आमोणकारांनी वयाच्या 78 व्या वर्षी "ख्रिस्तपुराणा'च्या कोंकणी आवृत्तीचं काम हाती घेतलं. तशात, गेली दहा वर्षं ते कर्करोग या दुर्धर आजाराशी झगडत आहेत. दोन शस्त्रक्रिया, पत्नीनिधनाचं दुःख अशा प्रसंगांनाही मधल्या काळात त्यांना सामोरं जावं लागलं. असं असूनही नंदकुमार कामत यांनी म्हटल्याप्रमाणं ः "दुर्दम्य इच्छाशक्ती, सविस्तर संशोधन, भाषेवरचं प्रभुत्व, ध्येयाचा ध्यास, प्रचंड सहनशीलता आणि सकल धर्मांकडं पाहण्याची समदृष्टी' या बळावर "मराठी-कोंकणी ख्रिस्तपुराण' हा महाग्रंथ त्यांनी साकार केलेला आहे.' ""हे सगळं तुम्ही कसं काय करू शकलात?'' असं मी आमोणकर यांना विचारलं असता त्यांनी आकाशाकडं बोट दाखवत विनम्रतेनं म्हटलं ः ""हे प्रभूनं घडवून आणलं!' "साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी परी वेगळाची' या संत तुकाराममहाराजांच्या अभंगाची आठवण अशा वेळी होते.
कोंकणी आणि मराठी या दोन भाषांना भारतीय राज्यघटनेनं मान्यता दिलेली आहे. दुर्दैवानं राजकारणाच्या गदारोळात या दोन्ही भाषांची गोव्यात प्रचंड परवड झाली आहे व होत आहे. (त्यामुळं गोव्यातले अनेक पालक इंग्लिश माध्यमाकडं वळत आहेत. "कोकणी-मराठीचं भांडण व इंग्लिशचा लाभ' असा हा प्रकार आहे). गोव्यातले ख्रिस्ती आणि हिंदू हे दोन्ही समाज कोंकणी भाषेत व्यवहार करतात; परंतु हिंदूंची देवनागरी आणि ख्रिश्‍चनांची रोमन लिपी यावरून फूट पडलेली दिसते. एका निष्ठावंत हिंदू विद्वानानं "ख्रिस्तपुराणा'चा देवनागरीत केलेला अनुवाद दोन्ही समाजांना जवळ आणील, अशी अपेक्षा करू या. तसे झालं तर आमोणकार यांच्यासारख्या ऋषितुल्य संशोधकानं सिद्ध केलेल्या "ख्रिस्तपुराणा'चं सार्थक होईल. "ख्रिस्तपुराणा'च्या प्रथम आवृत्तीला गेल्या वर्षीच चार शतकं झाली. त्याच मुहूर्तावर "ख्रिस्तपुराणा'चा कोकणी अवतारही प्रसिद्ध व्हावा, ही विशेष आनंदाची बाब होय. या आवृत्तीमधला मराठी अनुवाद अधिक शास्त्रशुद्ध आहे. "कला आणि संस्कृती संचालनालय' या गोवा सरकारच्या स्वायत्त संस्थेनं हे दोन्ही ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

"जैसी पुस्पामाजि पुस्प मोगरी। कि परिमळा माजि कस्तुरी। तैसी भासांमाजि साजिरी मराठिया' (ख्रिस्तपुराण 1.1.123) अशा शब्दांत मराठीचे कौतुक करणारे फादर स्टीफन्स यांच्या नावे एखादा पुरस्कार महाराष्ट्र शासन सुरू करील काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com