खिळवून टाकणारी रहस्यकथा (गौरी ब्रह्मे)

gauri brahme write article in saptarang
gauri brahme write article in saptarang

"क्वांटिको' ही अमेरिकी दूरचित्रवाणी मालिका आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते. एकामागोमाग एका रहस्यांची उकल होत ही मालिका उलगडत जाते. प्रियांका चोप्राबरोबरच इतर कलाकारांचा उत्तम अभिनय आणि रहस्यांची उत्तम वीण यांमुळं प्रेक्षकांची कमालीची लोकप्रियता मिळवलेल्या या मालिकेवर एक नजर.

जर्मनीमध्ये पश्‍चिमेला मोझेल नावाची एक नदी आहे. या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे वाहतावाहता ती एक झोकदार वळण घेते आणि एखाद्या जमिनीच्या तुकड्याला विळखा घालून एक बेट तयार करेल की काय असं वाटत असतानाच ती परत तिच्या उलट्या बाजूला वळते. उलट्या बाजूलाही ती परत तेच करते. वरून पाहिलं तर ही मोझेल नदी अतिशय सुंदर अशी नागमोडी दिसते आणि डोळ्याचं पारणं फेडते. "क्वांटिको' ही अमेरिकी दूरचित्रवाणी मालिका पाहताना या मोझेलची आठवण आल्याखेरीज राहत नाही. एका रहस्याची उकल होते न होते, असं वाटत असतानाच दुसरं रहस्य पुढं येऊन उभं ठाकतं. एक भाग संपतो न संपतो, तोवर दुसऱ्या भागात ही कथा कोणतं वळण घेणार याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते.

"क्वांटिको' मालिकेच्या 22 भागांचा पहिला सीझन सप्टेंबर 2015मध्ये अमेरिकतल्या एबीसी (अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी) या चॅनेलवर प्रक्षेपित करण्यात आला. पहिलाच सीझन अतिशय लोकप्रिय झाला. मालिकेला दहापैकी सात रेटिंग मिळालं. व्हर्जिनिया इथल्या क्वांटिको इथं एफबीआय ऍकॅडमी ही हेरगिरी शिकवणारी अमेरिकी संघटना, त्यात नव्याने भरती झालेले विद्यार्थी, त्यांचे गुण, त्यांचे दोष, त्यांची परस्परांतली फुलत जाणारी नाती, एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याचे प्रयत्न, त्यांचे शिक्षक, प्रत्येकाचं वर्तमान, त्यांचा भूतकाळ आणि त्यांच्यासमोर सतत उभी ठाकणारी संकटं यांची अतिशय वेगवान रितीनं घातली गेलेली सांगड म्हणजे "क्वांटिको!' एफबीआय एजंट होणं हे सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. नुसतीच शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक पातळीवरदेखील प्रत्येकाची कसोटी लागत असते. ट्रेनिंग घेणारे "क्वांटिको'मधले विद्यार्थी महत्त्वाकांक्षी तर आहेतच; पण त्याचबरोबर प्रचंड मेहनतीही आहेत. त्यांचं प्रशिक्षण अतिशय खडतर आहे. मालिकेच्या प्रत्येक भागात त्यांना एक कामगिरी दिली जाते. कधी ही कामगिरी फत्ते होते, कधी त्यांच्यावरच उलटते, तर कधी साफ निष्फळ ठरते. असं असलं, तरी हे प्रशिक्षणार्थी या सगळ्यातून शिकत राहतात, प्रगती करत राहतात.

क्वांटिको एफबीआय ट्रेनिंगमध्ये भरती होण्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं कारण वेगळं आहे. एकाला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा आहे, एकाला आपल्या घरच्यांसमोर स्वतःला सिद्ध करायचं आहे, एक चक्क स्वतः एफबीआय एजंट असूनदेखील ट्रेनी म्हणून विद्यार्थ्यांमध्ये माहिती काढण्याकरता वावरतो आहे, तर एकाला अमेरिकेला आणि पर्यायानं जगाला दहशतवादापासून वाचवायचं आहे. त्यांच्या शिक्षकांचीही स्वतःची वेगळी अशी कहाणी आहे. प्रत्येक भागात यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला मिळत जाते. चुकीच्या गोष्टींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, दहशतवादाविरुद्ध लढणं हे सोपं काम नाही; पण योग्य ते कौशल्य वापरून, आपली बुद्धी वापरून या गोष्टींचा सामना कसा करायचा हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हे शिक्षक आपलं सर्वस्व पणाला लावतात. याच कौशल्याचा पुढं त्यांच्याच विरोधात वापर कसा होतो, हे पाहणंही मनोरंजक आहे.

"क्वांटिको'मधले मुख्य प्रशिक्षणार्थी आणि मालिकेतली मुख्य पात्रं आहेत रायन बूथ, शेल्बी वायट, निमाह व रेना या जुळ्या बहिणी, केलब, सायमन, डीयाना आणि अलेक्‍स पॅरीश. त्यांचे शिक्षक मिरांडा आणि लियाम हे त्यांच्या प्रशिक्षणात आणि पर्यायानं या मालिकेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक वेळी जबरदस्त स्पर्धा असते, मग ती शारीरिक पातळीवर असो किंवा बौद्धिक. कुठल्याही स्पर्धेत ते एकमेकांना अजिबात भीक घालत नाहीत. ते गरजेचंच असतं; पण एकदा प्रशिक्षणाची वेळं संपली, कि मग मात्र ते एकमेकांचे घट्ट मित्र म्हणून वावरतात. कधी रागानं एकमेकांच्या जीवावर उठतात, तर कधी एकमेकांचा जीव वाचवण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यांच्यात फुलत जाणारे भावबंध, मैत्री, नाराजी, विश्रांतीच्या, प्रेमाच्या चार क्षणांसाठी आसुसलेपण पाहताना सैनिकी प्रशिक्षण घेताना कोणत्या प्रकारची कसोटी लागत असेल, याची प्रचीती येत राहते. यातल्या निमाह आणि रेना या अफगाणी जुळ्या मुलींची पात्रं विशेष लक्षवेधी आहेत. कामगिरीसाठी त्यांची सततची अदलाबदल अत्यंत परिणामकारक पद्धतीनं दाखवली गेली आहे. एफबीआयच्या या अत्यंत कठीण अशा प्रशिक्षणात स्त्रिया आणि पुरुष यांच्यात कुठलाही भेदभाव केला जात नाही, ही यातली अजून एक विशेष बाब. धावायची स्पर्धा असो, अथवा बॉक्‍सिंगची मॅच किंवा नकाशावरून टार्गेट शोधण्याची कामगिरी, सर्व सराव हे सगळे जण एकत्र करतात. कथानकाच्या गरजेसाठीही हे बदल असू शकतात; पण त्यामुळं त्यांचं ट्रेनिंग पाहणं हा एक उत्कंठावर्धक भाग होऊन बसतो.

ऍलेक्‍स पॅरिश या मालिकेतली प्रमुख व्यक्तिरेखा. ऍलेक्‍स एक अत्यंत महत्वाकांक्षी मुलगी आहे. तिच्या वडिलांप्रमाणं एक उत्तम एजंट बनायचं स्वप्न ती दिवसरात्र पाहत असते आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता कुठंही मागंपुढं पाहत नाही. तिची बुद्धिमत्तेची चुणूक, मैत्रीपूर्ण वागणूक (याला तिची भारतीय पार्श्वभूमी कारणीभूत आहेच), कसून मेहनत घेण्याची तयारी या गुणांमुळं वर्गात तिचं स्थान कायम सर्वोत्तम असतं. मात्र, तिची हीच बुद्धिमत्ता पुढं तिची शत्रू बनते. ऍलेक्‍सला ग्रॅंड सेंट्रल टर्मिनलच्या एका स्फोटात मुद्दाम गोवलं जातं आणि मग सुरू होतो सत्याचा पाठलाग आणि त्यामागच्या कटाचा आणि खऱ्या सूत्रधाराचा शोध. हा शोध अतिशय उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणारा आहे.

पहिल्या सीझनमध्ये दिग्दर्शकानं कथेची मांडणी करताना फ्लॅशबॅक तंत्राचा वापर अगदी प्रभावीपणे केला आहे. ऍलेक्‍सच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, संकटाचं मूळ या फ्लॅशबॅकमध्ये प्रेक्षकांना मिळत जातं. नंतर मात्र हळूहळू कथा एका सरळ रेषेत येते आणि रहस्याची उकल एकएक करून व्हायला लागते. आत्तापर्यंत चांगले वाटणारे लोक अचानक खलनायक म्हणून समोर येऊ लागतात. प्रत्येकाची डार्क साइड दिसू लागते. ऍलेक्‍सची या सगळ्यांशी लढताना दमछाक होते. तिचे मित्र, तिचे सहकारी तिचे शत्रू बनतात आणि ती एकटी पडते; पण तरीही सत्याचा शोध घ्यायचं ती सोडत नाही. तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि साहसी बाण्यानं ती कौशल्यानं या सगळ्या अडचणींशी मुकाबला करते. तिला नवनवीन माहिती कळत जाते आणि अनेक रहस्यांची उकल होत जाते.
मलिकेमध्ये 9-11चा सततचा नामोल्लेख अमेरिकेला दहशतवादानं कसं सर्व स्तरांवर पछाडलं आहे, याची जाणीव करून देतो.

आता या मालिकेच्या यूएसपीकडं येऊ. हा यूएसपी आहे तो म्हणजे यातले कलाकार. प्रियांका चोप्राचं नाव घेतल्याशिवाय "क्वांटिको'बद्दल पुढं लिहिताच येणार नाही. मी अनेक दिवस "क्वांटिको'बद्दल ऐकून होते. पूर्वानुभवामुळं एका बॉलिवूड अभिनेत्रीला नक्की कोणत्या प्रकारे या मालिकेमध्ये सादर केलं गेलं असेल, याबद्दल मनात किंचित कुशंका होती; पण प्रियांका तोडीस तोड निघते. तिनं ऍलेक्‍सची व्यक्तिरेखा खूप मेहनतीनं साकारली आहे. तिनं शारीरिक कष्ट घेतले आहेतच; पण त्याचबरोबर बोलण्याची लकब, ऍक्‍सेंट, बॉडी लॅंग्वेज यावरही भरपूर काम केलं आहे. पूर्ण सिरीजमध्ये ती अत्यंत आत्मविश्वासानं वावरते, झोकून देऊन काम करते. तिची भारतीय ओळख ही तिच्यासाठी अडचण न बनता उलट मालिकेचा "सेलिंग पॉइंट' बनते. हॉलिवूडमध्ये फक्त मेहनतीच्या बळावर स्वतःला सिद्ध करणाऱ्या आणि घट्ट पाय रोवणाऱ्या या भारतीय नायिकेबद्दल आपल्याला अभिमान वाटायलाच हवा, मग वैयक्तिकरित्या ती आपली आवडती अभिनेत्री असो वा नसो. तिला मिळालेलं "पीपल्स चॉइस अवॉर्ड'ही यावर शिक्कामोर्तब करतं. जेक मक्‍लोलीन, यास्मिन मसारी, जॉश हॉपकिन्स, जोहाना ब्रॅडी हे बाकीचे सहकलाकार तिला योग्य ती साथ देतात. या मालिकेबद्दल असं म्हटलं जातं, की यातली सगळीच पात्रं सुंदर या निकषावर निवडली गेली आहेत. त्यामुळं अर्थातच ही मालिका डोळ्यांना सुखावह ठरतेच; पण असं असलं तरी अभिनयातही ही मंडळी कुठंच कमी पडत नाहीत.

दहशतवादाविरोधातली लढाई आणि त्यात सरस ठरणारी अमेरिका हे रंजनविश्‍वातलं सध्याचं चलनी नाण असल्यानं या मालिकेला मिळणारं लक्षवेधक यश ही आश्‍चर्याची बाब नाही. तिचा तिसरा सीझनही लवकरच येऊ घातला आहे. वेगवान रहस्यकथा पाहण्याची ज्यांना आवड असेल, त्यांच्यासाठी ही मालिका म्हणजे एक मेजवानी आहे. "क्वांटिको' सध्या "स्टार वर्ल्ड' आणि "नेटफ्लिक्‍स'वरही पाहायला मिळते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com