अब तू जाग...अब तू भाग...

Anjali Prabhudesai
Anjali Prabhudesai

आपलं शरीर हे एखाद्या यंत्रासारखं असतं. ते सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आपल्याला त्याचं 'सर्व्हिसिंग' करणं गरजेचं असतं. योग्य आहार आणि दैनंदिन व्यायाम त्यासाठी आवश्‍यक असतो. निरोगी शरीरासाठी व्यायामाचं महत्त्व प्रत्येकालाच ठाऊक आहे. दैनंदिन जीवनात स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यापासून शारीरिक हालचाली कमी होताहेत, ही बाब सर्वमान्य आहेच. माहिती व तंत्रज्ञानाच्या उदयानंतर कार्यालयांमध्ये बैठ्या कामाचं प्रमाण वाढत चाललंय आणि या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात तणावाची कारणं तर मोजावी तेवढी कमीच! म्हणूनच दररोज सकाळी उठून व्यायाम करणारे फार मोजके लोक राहिलेत... ही झाली एक बाजू. 

दुसऱ्या बाजूला, आजकाल अनेक जण आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी किंवा भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी भरपूर लोक दैनंदिन व्यायाम करण्यावर भर देताना दिसतात. अगदी फार काही नाही जमलं तरी किमान थोडंसं चालून यायचं, असा नेम काही जण धरतात; पण बऱ्याचदा तेवढं पुरेसं नसतं. म्हणून धावणं (रनिंग), जिम, एरोबिक्‍ससारखे व्यायाम प्रकार केले जातात. 

आजकाल विशेषतः व्यायामासाठी धावणाऱ्या लोकांच्या लहान लहान कम्युनिटीज तयार होत आहेत. यात महिलांचा वाढणारा सहभाग कौतुकास्पद आहे. खरंतर धावणं हा सगळ्यात सोपा व्यायाम प्रकार आहे. कारण यासाठी तुम्हाला खास असं प्रशिक्षण घ्यावं लागत नाही. एकेकाळी फक्त 'प्रोफेशनल ऍथलिट्‌स'पुरता मर्यादित असलेला हा व्यायामप्रकार सर्वसामान्यांमध्ये रुजू होत आहे. धावण्याविषयी सर्वत्रच जनजागृती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांबरोबरच विविध शहरांमध्ये छोट्या प्रमाणावरदेखील सर्वसामान्य लोकांसाठी मॅरेथॉन शर्यती आयोजित केल्या जातात. यामध्ये धावणाऱ्या सेलिब्रिटीजना पाहून या शर्यतींना थोडेसं ग्लॅमरही प्राप्त होत आहे. सुप्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण आणि रीमा संघवी यांनी काही वर्षांपूर्वी खास महिलांसाठी 'पिंकेथॉन' मॅरेथॉन शर्यतीची सुरवात केली होती. महिलांमध्ये बळावणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या या शर्यतींना आता संस्थात्मक रूप येत आहे. विशेष आहे, महिलांचा त्यातला वाढता सहभाग. 

आपल्याकडे 'कर्ता पुरुष' ही संज्ञा बऱ्याच अंशी घरातील महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांपुरतीच मर्यादित असते. बाकी सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेणाऱ्या स्त्रियाच असतात. गृहिणी असो वा नोकरदार 'येस वी कॅन डू इट' हा विचार मनात ठेवून हा सगळा प्रपंच त्या विनातक्रार आणि अतिशय यशस्वीपणे पार पाडत असतात; मात्र हे सगळं करताना त्या स्वतःला शेवटची प्रायोरिटी देतात. त्यांचं स्वतःचं रुटिन घरातल्या इतर लोकांच्या रुटिनवर अवलंबून असतं. म्हणून बऱ्याच जणींचं स्वतःच्या आरोग्याकडं पुरेसं लक्ष नसतं. वजन वाढणं, ब्लडप्रेशर, डोकेदुखी यासारख्या शारीरिक बदलांना अजिबातच गांभीर्यानं घेतलं जात नाही; मात्र या गोष्टींचा त्रास उतारवयात अधिक जाणवतो. सुरवातीपासूनच आरोग्याकडं लक्ष देणं चांगलं; पण ते जमलंच नसेल तर किमान नंतरच्या काळात तरी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ द्यायला हवा! 

ज्यांच्या मनात हा विचार आला अशांमधल्याच या काही जणी. त्यांनी धावायला सुरवात केली (धावपळीला नव्हे!) विविध शर्यतींमध्ये सहभागी होऊ लागल्या. प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी धावत होतं; मात्र प्रत्येकीचा उद्देश जगण्याची एनर्जी मिळवण्याचा होता. त्यामुळंच वजन कमी करण्यासाठी धावायला सुरवात करणाऱ्या अनेकींचं मानसिक आरोग्य सुदृढ होऊ लागलं. धावण्याविषयी प्रेम असणाऱ्या समविचारी लोकांशी संपर्क आल्यानं त्यांचं खऱ्या अर्थानं 'सोशल नेटवर्किंग' वाढलं. यांच्यापैकी कित्येक जणी घर आणि नोकरी अशा दोन्ही आघाड्या सांभाळत दररोज धावायला जातात; परंतु फिटनेससाठी केवळ धावणं पुरेसं नसल्याचंही त्या सांगतात. धावपटूचं शरीर तयार होण्यासाठी आपल्याला सोबत आणखी व्यायाम करावे लागतात. त्यामुळं धावण्यासोबतच जिम, सूर्यनमस्कार, योगासनं, झुंबा यासारख्या अनेक गोष्टी त्या करतात. 

ध्येय वजन कमी करण्याचं... 
अगदी व्यायाम म्हणून असलं तरी बायकांना रस्त्यावर येऊन धावताना थोडा 'कॉम्प्लेक्‍स' येतो; पण आपल्याला खरोखर मनापासून स्वतःच्या आरोग्यासाठी काहीतरी करायचं असेल, तर तो दूर सारण्याशिवाय पर्याय नाही. 

अशीच एक पॅशनेट धावपटू आणि पिंकेथॉन संस्थेच्या ऍम्बेसिडर तृप्ती कुलकर्णी-दलाल. आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःचं वजन तब्बल 35 किलोने कमी केलं. वजन कमी करणं हा बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी अलीकडं प्रयत्नांची पराकाष्टाच सुरू असते. प्रत्येकाला याची गरज असते का माहीत नसतानाही बारीक दिसण्याचा अट्टाहास सुरू असतो. अर्थात तृप्तींना वजन कमी करण्याची गरजच होती. इतकं वजन कसं कमी होऊ शकलं याबद्दल त्या म्हणाल्या, 'मी लहानपणापासून जाड होते; पण वेगवेगळ्या खेळांमध्येही भाग घ्यायचे. त्यामुळे माझा फिटनेस कायम होता. नोकरी सुरू झाल्यानंतर खेळणं आणि अर्थातच शारीरिक हालचाल कमी झाली. लग्न झाल्यानंतर तर बऱ्याच सवयी बदलल्या. परिणामी वजन वाढतच राहिलं. फक्त नोकरी आणि घर या रुटिनचाही कंटाळा आला होता. त्यामुळं आता पुन्हा कसंही करून स्पोर्ट्‌सच्या संपर्कात यावं, असं मला वाटत होतं. मग धावायला सुरवात केली. जाड असताना पळणं म्हणजे थोडं आव्हानच होतं. एक म्हणजे आपलं अतिरिक्त वजन असताना पळताना होणारा त्रास आणि एखाद्या जाड मुलीला रस्त्यावर धावताना पाहणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन; पण माझ्या स्पोर्ट्‌समन ऍटिट्यूडमुळे मला ते निभावून नेणं शक्‍य झालं. यादरम्यान मला माझे प्रशिक्षक आणि सगळ्या मित्र-मैत्रिणींनी खूप चांगला आधार दिला. 

आता गेल्या वर्षभरापासून मी टोनिंग आणि माझा फिटनेस वाढवण्यावर मी भर देतीयं. धावण्याची सुरवात वजन कमी करण्यासाठी केली होती; पण आता स्पर्धेचा टप्पा सुरू झाला आहे. आता मी कमीत कमी वेळेत शर्यत पूर्ण करण्याचा किंवा क्रमांक पटकावण्याचा प्रयत्न करते. धावण्याबरोबरच बाकीचे व्यायाम करावे लागतात आणि खाण्यावरही लक्ष द्यावंच लागतं. शरीराला ऊर्जा मिळेल असा आहार घ्यावा लागतो. अर्थात मला वाटतं एकदा आपण त्या कम्युनिटीत गेलो की ते आपल्याला आपोआप सगळं जमतं. एक मात्र या वेळी लक्षात ठेवायला हवं ते म्हणजे आपण कोणाशीही तुलना करायची नाही. प्रत्येकीची शारीरिक क्षमता, परिस्थिती वेगवेगळी असते. आपण आपल्या परीने मेहनत घेतली की आपोआप पारितोषिकं आणि बक्षिसं मिळत जातात.'' 

धावण्यासाठी घरकामातून फुरसत 
घर आणि कामाच्या ठिकाणची जबाबदारी सांभाळताना बायकांची दमछाक होताना दिसते. घरकामातून वेळ काढायचा म्हणजे बाईसाठी मोठं दिव्यच; पण शेवटी जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करायची असते, तर आपल्याला मार्ग सापडतोच, असं मत आहे डॉ. नीलम (वैद) यांचं. दक्षिण अफ्रिकेतील सर्वांत अवघड अशा 'कॉमरेड्‌स' मॅरेथॉन शर्यतीची त्या तयारी करत आहेत. त्या म्हणाल्या, 'या शर्यतीचं प्रशिक्षण अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला भरपूर वेळही द्यावा लागतो. आठवड्याला ठराविक अंतर धावावंच लागतं. घर, व्यवसाय किंवा काम आणि प्रशिक्षण अशा तिन्ही आघाड्या सांभाळताना थोडी कसरत होतेच. आता आम्ही आठ ते दहा लोक या शर्यतीची तयारी करत आहोत. त्यामुळं तुम्हाला ग्रुपमध्ये धावल्यानंतर तो एकटेपणा जाणवत नाही आणि धावण्याची प्रेरणा मिळते. 

खेळाच्या आवडीतूनच मला धावण्याची प्रेरणा मिळाली. लहानपणापासून मी शाळेत खेळांमध्ये भाग घ्यायचे. त्यानंतरही दररोज व्यायाम, एरोबिक्‍स वगैरे सुरू होतं. माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाआधी हाफ-मॅरेथॉन पूर्ण करण्याची इच्छा मनात निर्माण झाली आणि तीन वर्षांपूर्वी धावणं मी अधिक गांभीर्यानं घेतलं. माझ्या काही मैत्रिणींना या वयात धावताना मेनोपॉझमुळे काही त्रास होतो; परंतु वैयक्तिक पातळीवर सांगायचं तर मला वयाचं बंधन कधीच जाणवलं नाही.'' 

आईपणातून स्वतःसाठीचा वेळ 
सर्वसामान्यपणे स्त्रियांच्या आयुष्याचा मोठा भाग त्यांच्या मुलांभोवतीच फिरतो; परंतु एकदा मुलं मोठी झाली की त्यांच्यावरचा भार अचानक कमी होतो आणि त्यांना स्वतःसाठी थोडा वेळ हातात मिळतो. सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी आपण तो सत्कारणी लावायचा हे पटायला लागतं. मुलं मोठी होत जातात तसंतसं आपल्याला कुठल्यातरी दुसऱ्या ऍक्‍टिव्हिटीजमध्ये गुंतण्याचा सल्ला दिला मिळतो. असंच मुलं मोठी झाल्यानंतर छंद म्हणून धावायला सुरवात करणाऱ्या कविता रेड्डी यांनी आता बोस्टन मॅरेथॉनचा पल्ला गाठायचा ठरवलं आहे. त्या म्हणाल्या, 'मी सुरवातीला फिटनेस मेंटेन करायच्या हेतूने धावायला सुरवात केली होती. नंतर मला ते आवडायला लागलं आणि मी ते जास्त गांभीर्यानं घ्यायला सुरवात केली. धावण्याआधी मी योगासनं आणि जिम करायचे; पण एका मैत्रिणीसोबत मी शर्यतीत सहभागी व्हायचं ठरवलं आणि पहिल्याच प्रयत्नात मी 10 किलोमीटरचं अंतर सहज पार करू शकले. त्यामुळं मी यापेक्षा आणखी काही तरी चांगलं करू शकते, असा विश्‍वास माझ्या मनात निर्माण झाला.' 

आरोग्य जपण्यासाठी महिलांनी स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची गरज व्यक्त आहे, असं त्यांना वाटतं. त्या म्हणाल्या, 'स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी पहिलं पाऊल सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर आपल्याला खूप पॉझिटीव्हिटी मिळते. घरातली काळजी थोडावेळ बाजूला ठेवून त्यांनी स्वतःसाठी बाहेर पडायला हवं. ही गोष्ट अवघड असली तरी अशक्‍य नाही. एकदा तुमचा निश्‍चय पक्का झाला की तुमच्या घरातलेही तुम्हाला छानप्रकारे समजून घेतात.' 

फिटनेस मंत्रा 
घर आणि नोकरीसोबतच स्वतःचा फिटनेस सांभाळणाऱ्या पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर तारू मतेती म्हणतात, आपण बायका बऱ्याचदा 'टाइम मॅनेजमेंटमध्ये' अडकतो. काही वर्षांपूर्वी माझंही तेच झालं होतं. मुलगी बारावीत होती. तिचा अभ्यास आणि घरात बाकी गोष्टींकडे लक्ष देत असताना माझं वजन वाढलं होते. शिवाय, माझा आधी जिम आणि एरोबिक्‍समुळे होणारा व्यायाम बंद झाला होता. त्यामुळं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घराबाहेर पडून काहीतरी व्यायामाचा मार्ग निवडायचं मी ठरवलं. म्हणून मी धावून पाहिलं आणि मला खूप प्रसन्न वाटलं. याआधी मी आउटडोअर व्यायाम केला नव्हता. धावायला वेळेचं काही बंधन नाही हे माझ्या लक्षात आलं. पहिल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला तेव्हा मला 'एज कॅटेगरी'मध्ये क्रमांक (पोडियम) मिळाला आणि यातून मला आणखी उत्तेजन मिळालं. तो प्रवास सुरू झाला. आतापर्यंत 37 ते 38 शर्यतींमध्ये पोडियम्स मिळाले आहेत. तीन अल्ट्रा मॅरेथॉन्स कम्प्लीट शर्यती पूर्ण झाल्या आहेत आणि हाफ मॅरेथॉन शर्यती मोजणं तर मी केव्हाच बंद केलंय!' 


एकटेपणाला पर्याय 
विविध मॅरेथॉन इव्हेंट्‌समध्ये वेगवेगळ्या लोकांशी भेटी हेही धावण्याचं एक निमित्त ठरतं, असंही तारू मतेती यांना वाटतं. एकट्यानं बाहेर पडायला कंटाळा येणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांनी काही टिप्स सुचवल्या आहेत. त्या म्हणाल्या, 'जर तुम्हाला स्वतःहून जाणं शक्‍य होत नसेल, तर तुम्ही सोबत एखादी मैत्रीण घेऊन जाऊ शकता. ती तुमच्यासोबत येईल आणि तुम्हाला तिच्यापासून प्रेरणा मिळेल. विशेषतः धावण्याचा एक फायदा असा आहे, की आता धावणाऱ्यांचे बरेच ग्रुप्स आहेत. तुम्ही तुमच्या भागात राहणाऱ्या एखाद्या ग्रुपला जॉइन होऊ शकता. एकमेकांच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्याला कळतं की कुठे काय इव्हेंट आहेत?... आणि ती स्पर्धा कदाचित तुमच्या यशाची सुरवात ठरू शकते. स्वतःसाठीच तुम्ही एखादा रिवॉर्डही सेट करू शकता. म्हणजे, ठराविक अंतर पार केलं किंवा शर्यत पूर्ण केली तर मी स्वतःसाठी काही तरी खरेदी करीन, असं तुम्ही मनाशी ठरवा. एकदा तुम्ही यामध्ये तुमच्या कुटुंबाला सामील करून घेतलंत की तेही तुम्हाला सपोर्ट करतीलच.' 

फिटनेस नेहमीसाठीच 
कमी होणारी शारीरिक हालचाल आणि विशेषतः बाळंतपणानंतर स्त्रियांचं वजन वाढत जातं. बऱ्याच जणी ते पुन्हा आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न करत नाहीत. आता आपलं लग्न झालं, मुलं झाली आता कसंही दिसलं तरी काही फरक पडत नाही, असा त्यांचा दृष्टिकोन तयार होत जातो; पण नेमका हाच विचार चुकीचा आहे, असं सांगतात पुण्यातील रनर आणि 'पोस्ट-नेटल फिटनेस ट्रेनर' झरीन सिद्दीकी. त्या म्हणतात, 'स्त्रियांनी आपल्या आरोग्याबाबत नेहमीच सतर्क राहिलं पाहिजे. आपलं आपल्याकडे खाण्याकडे लक्ष असेल, तर जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खातो असं वाटेल ते आपण सहज कंट्रोल करू शकतो. लग्न झालं, मुलं झाली म्हणून स्त्रियांनी स्वतःला मोकळं सोडता कामा नये. आपलं वजन कमी असणं हे केवळ छान दिसण्यापुरतं मर्यादित नाही. तुम्हाला स्वतःविषयी छान वाटायला हवं. 'पॉझिटिव्ह बॉडी इमेज'मुळे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्‍वास मिळतो'. 

महिला सबलीकरण, महिलांचे हक्क यासारख्या अनेक विषयांभोवती वेगवेगळ्या चर्चा आपण ऐकत असतो. महिलांना स्वतःसाठी काही तरी करण्याची ऊर्जा मिळणं फार आवश्‍यक असतं. आजही अनेक घरातील मुली, स्त्रियांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विविध बंधनांचा सामना करावा लागतो; परंतु ही अवाजवी बंधनं झुगारत यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणं म्हणजेच खरं महिला सबलीकरण आहे; पण प्रत्येक वेळेला दुसरं कोणी तरी येऊन आपल्यासाठी आवाज उठवण्याआधी आपणच आपल्यासाठी काही तरी करणं गरजेचं आहे, असा विश्‍वास धावणाऱ्या प्रत्येकीच्या मनात आहे. म्हणूनच स्वतःसाठी काही तरी करायचं ठरवल्यानंतर दररोज येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणींचा सहज सामना करीत त्या आपलं ध्येय साध्य करत असतात. 

काही दिवसांपूर्वी मिलिंद सोमण यांची आई उषा सोमण यांचा धावतानाचा व्हिडिओ सर्वांनीच पाहिला असेल. साडी नेसून त्यांना धावताना पाहिलं, की स्त्रियांचा कपड्यांविषयी असलेला कॉन्शियसनेस नाहीसा होईल. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अंतर त्यांनी शूजशिवाय पूर्ण केलं. आजही कित्येक मॅरेथॉनमध्ये महिला पंजाबी ड्रेस आणि साड्या नेसून धावताना दिसतात. 

घरातला व्याप सांभाळून आवड म्हणून पिंकेथॉनला सामील झालेल्या मुंबईच्या अंजली प्रभूदेसाई आपला अनुभव सांगतात, मैत्रिणीनं विचारलं म्हणून सहज मी तिच्यासोबत एका पिंकेथॉनच्या शर्यतीला गेले होते. ते आवडलं म्हणून या संस्थेत सामील झाले आणि आयुष्यात खूप फरक पडला. आता मला धावण्याची एवढी आवड लागली आहे, की मी सहसा शर्यत चुकवत नाही. घरच्यांची सकाळी फजिती होऊ नये, म्हणून मी आता स्वयंपाकाला बाई ठेवली आहे. एकदा माझ्या घरी दुपारी जेवायला पाहुणे येणार होते आणि नेमकी त्याच दिवशी शर्यत होती. मग मी आदल्यादिवशीच स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली. जायचं हे पक्कं ठरवलंच होतं. अर्थात शर्यत संपवून मी लगेच घरी आले. बऱ्याचदा शर्यत संपल्यानंतर आम्ही काहीवेळ एकत्र थांबतो; पण मी त्या दिवशी लगेच घरी येऊन पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनीही मला समजून घेतलं, याचं मला जास्त बरं वाटलं.' 

धावण्यामुळं आयुष्यात झालेल्या बदलांविषयी अंजली म्हणाल्या, धावताना तसे आपण एकटेच असतो. त्या वेळी आपण आपल्याशीच संवाद साधत असतो. त्यामुळं आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचत जातात. खरं सांगायचं तर फिनिशिंग लाइन जवळ आली की धावायला आपोआप आणखी बळ मिळतं. त्यामुळं आपणच स्वतःला प्रेरणा देत राहावी, असं मला वाटतं. 

धावण्यामुळे मिळालं कर्करोगाशी सामना करण्याचं बळ! 
पुण्यातील डॉक्‍टर मनीषा वैद्य यांना दोन वर्षांपूर्वी स्तनांमध्ये गाठ झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी लगेचच डॉक्‍टरांकडे धाव घेतली; पण तोपर्यंत उशीर झाला होता. प्राथमिक तपासणीत ती गाठ फक्त दीड सें.मी. होती; पण दुर्दैवाने कॅन्सर पसरण्यास सुरवात झाली होती. खरंतर कर्करोगामुळे माणसाला शरीराबरोबरच भावनिक पातळीवरदेखील जास्त धक्का बसतो. तरीही त्या स्वतःला सावरत होत्या. एक दिवस त्यांनी सहज व्यायाम म्हणून दोन किलोमीटर अंतर धावून पार केलं. यानंतर त्यांना खूप जास्त फ्रेश वाटलं. कर्करोगावर उपचार सुरू असतानादेखील त्यांनी धावणं सुरू ठेवलं आणि याचा कर्करोगांवरील उपचारादरम्यान खूप फायदा झाला. 

सगळा प्रसंग आत्ताही त्यांच्या नजरेसमोर उभा राहतो. 'तसं मी कर्करोग होण्याआधीदेखील धावत होतेच. ऑगस्ट 2015 मध्ये कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर मला किमोथेरपी, रेडिएशन्स असं सगळंच घ्यावं लागत होतं. सुरवातीला मी पुन्हा धावू शकेन, असं मला वाटलं नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर असं कर्करोग असून धावणाऱ्यांचं उदाहरण नव्हतं; पण धावण्याची सवय होती म्हणून एकदा प्रयोग करून पाहायचं मी ठरवलं. पहिल्या आणि दुसऱ्या किमोथेरपी सेशनदरम्यान मी एकदा सहजच दोन किलोमीटर धावून आले आणि मला खूप छान वाटलं. कर्करोगामुळे थोडा मानसिक त्रासदेखील होतोच; पण तेव्हा धावल्यानंतर माझ्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला. नंतर मी जसं जमेल तसं धावणं आणि व्यायाम सुरू ठेवला. त्यामुळं मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत होती. कदाचित त्यामुळंच मला किमोथेरपीचा त्रास थोडा कमी झाला. मला ते सहन करता आलं. त्यामुळं आणखी थोडा उत्साह आला आणि मी धावण्याचं अंतर वाढवायला सुरवात केली. तेव्हा मी 'पुणे रनिंग' संस्थेच्या दर महिन्यातील शेवटच्या रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन शर्यतींमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. त्यानंतर मी एकदा 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटरची शर्यत पूर्ण केली. या सगळ्यांमुळं सतत प्रेरणा मिळत राहिली; परंतु शस्त्रक्रियेनंतर खांद्याला त्रास जाणवतो; पण त्याचा कधी अडथळा झाला नाही.' 

मधुमेहींसाठी... 
मधुमेहाच्या भीतीतून आपला धावण्याचा प्रवास सुरू झाल्याचं मनीषा सांगतात. त्या म्हणाल्या, भरत नाट्यम आणि स्पोर्ट्‌समधला सहभाग हे शालेय वयापासूनच होतं. मी डॉक्‍टर असल्यानं माझं दिवसभराच्या व्यस्त शेड्युलमधून व्यायामाला वेळ देणं अवघड जायचं. बाळंतपणामध्ये माझ्या शरीरातील साखर वाढली. वजनही वाढलं होतं. माझ्या घरात सगळ्यांना डायबिटीस आहे. माझं वजन कमी झालं नाही, तर मलाही डायबिटीस होईल, असं मला डॉक्‍टरांनी सांगितलं. त्या भीतीपोटी मी काही तरी ऍक्‍टिव्हीटी सुरू करायचं ठरवलं मी झुंबा करायचे आणि त्याला क्रॉस ट्रेनिंग म्हणून धावायला सुरवात केली. शिवाय, माझा नवरा रनर आहे. धावण्याच्या निमित्तानं आम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवायला मिळेल म्हणून मी पण धावायला सुरवात केली. त्यानंतर मी पुणे रनिंग या संस्थेला जॉइन झाले आणि हा प्रवास आणखी व्यवस्थित झाला.' 

या युगातल्या बाईला सारखं धावावं लागतं. सकाळी मुलांमागं धावायचं. त्यांची शाळेची वेळ गाठायची. तिथून स्वतःचं ऑफिस, नवरा, घरची जबाबदारी, करिअरमधील आव्हानं...सगळं गाठण्यासाठी फक्त धावायचं आणि धावायचं. या सगळ्यातून 'गरजेच्या धावण्याला' वेळच उरत नाही. चांगल्या फिटनेससाठी व्यायाम म्हणून धावायला हवं. रोजच्या धावण्यासाठीची एनर्जी तिथंच तर मिळते! 

धाव एव्हरेस्टपर्यंत! 
मनाचा निश्‍चय पक्का असेल, तर मार्गात येणाऱ्या अडचणी तुम्हाला कधीच थांबवू शकत नाहीत. खेळाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना धावपटू आणि गिर्यारोहक म्हणून यश मिळविणाऱ्या अपर्णा प्रभुदेसाई आता एप्रिल महिन्यात माऊंट एव्हरेस्ट सर करणार आहेत. कदाचित हा लेख वाचताना अपर्णाताईंचा एव्हरेस्टकडे प्रवास सुरू झालेला असेल. आणखी एक वैशिष्ट म्हणजे, तिबेट मार्गे (उत्तरेकडून) एव्हरेस्टला जाणारी ही पहिली महाराष्ट्रीयन महिला आहे. आयुष्यात पहिल्यांदा धावण्याची सुरूवात झाली चार वर्षांपुर्वी, तीन किलोमीटरच्या शर्यतीपासून आणि आता गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी 11 तासांत तब्बल 75 किलोमीटर अंतर पार केलं! 
75 किलोमीटरचं अपर्णा यांचं रेकॉर्ड बघितलं किंवा आज त्यांना प्रत्यक्षात पाहिलं तर कदाचित विश्वास बसणार नाही, की काही वर्षांपुर्वी त्यांना कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय चालणंही शक्‍य नव्हतं. त्यांना नेमकं काय झालंय हे डॉक्‍टरांना तितकं नीट शोधता येत नव्हतं. आजारपणात काही दिवस त्यांनी व्हीलचेअरवर बसून काढली. मात्र, या आयुष्याला नवा अर्थ देण्यासाठी त्यांनी धावायचं ठरवलं. आजारपणाचा तो अनुभव अपर्णा सांगत होत्या, 'खरंतर स्नायू मजबूत करण्यासाठी धावण्याची सुरुवात केली होती. हाडं कमकुवत झाली होती. पण स्नायू बळकट केले तर फायदा होऊ शकतो असं डॉक्‍टरांनी सांगितलं. व्हीलचेअरवर बसून आयुष्य जगण्यापेक्षा मी धावायचं ठरवलं.' 

धावण्यापासून थेट एव्हरेस्टचा प्रवास कसा साध्य केला याविषयी त्या म्हणाल्या,'सुरुवातीला ब्रेसेस लावून, सपोर्ट घेत ,स्ट्रेच बॅंड घालून मी धावायला सुरुवात केली. फक्त पुन्हा चालायचं किंवा धावायचं नाही तर त्यातला सर्वोच्च बिंदू गाठून ते साध्य करायचं, हे मनाशी पक्क ठरवलं होतं.' 

माऊंट एव्हरेस्टसारखं शिखर सर करणं तसं सहज नाही. अपर्णा यांच्या ठाम निर्धारानं त्याची तयारी सुरू झाली होती. सर्वात आधी त्यांनी मनालीला जाऊन गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर इतर काही अवघड डोंगर चढून पार केले. विशेष म्हणजे, कोणत्याही खास प्रशिक्षकाची मदत न घेता स्वतःच ट्रेनिंगचं वेळापत्रक तयार केलं. माऊंट एव्हरेस्टच्या तयारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, 'एक महिना आधी हेवी वर्कआऊट्‌स सुरु केली. रोज सकाळी मी धावायला जाते. त्यानंतर दोन्ही पायांना दीड-दीड किलो वजन बांधून रोज 2200 पायऱ्या चढ-उतार करते. नंतर, एक तास योगासनं आणि पुन्हा संध्याकाळी आठवड्यातून तीन दिवस शहरांमधील टेकड्या चढायला जाते. तो रोज एक तासाचा व्यायाम असतो. दर शनिवारी घाटातून सिंहगड चढायला जायचं. तिथेही पायांना वजन आणि सोबत 30 किलो वजनाचं बॅकपॅक घेऊन दोन चकरा मारायच्या. दर रविवारी धावणं तर सुरुच आहे.' 

प्रशिक्षकाची मदत का नाही घेतली? या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, दरवेळी प्रत्येक वेळ गाठत ध्येयपूर्ती करणं शक्‍य नसतं. म्हणून मी स्वतःच माझं वेळापत्रक ठरवलं. याशिवाय, ज्या मित्र-मैत्रिणींनी एव्हरेस्ट सर केला आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेते. या सगळ्यांत एनर्जी राखून ठेवण्यासाठी पौष्टिक आहार आवश्‍यक आहेच. दिवसभरात थोड्या थोड्या वेळानं खावं लागतं. त्याप्रमाणं, रात्रींचं जेवण लवकर असतं. संध्याकाळी पाचनंतर फळं खात नाहीत. दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी नारळ पाणी, कोकम सरबत वगैरेचा समावेश असतो. त्याचप्रमाणे, जेवणात दूध दही जास्त, डाळी, वगैरे असतं. 

या सगळ्या मिशनमध्ये घरच्यांनीही त्यांना वेळोवेळी मदत केल्याचं त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'पतीच्या निधनानंतर माझे आई-बाबा खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत. मुलीही आता मोठ्या झाल्यात आणि त्यांचाही खुप आधार असतो.' 
एव्हरेस्ट चढून परत आल्यानंतर, एकावेळी शंभर किलोमीटर धावायचं त्यांचं ध्येय आहे. आपली शक्ती वाढविण्यासाठी त्या सायकलिंगही करतात. दोन वर्षांपुर्वी त्यांनी पुणे ते गोवा दरम्यान सायकल शर्यतदेखील पुर्ण केली. 

प्रत्येकानं आपल्याला हवं ते मिळविण्यासाठी काय करायला हवं हे विचारलं तर त्या म्हणाल्या, 'स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाच्या आयुष्यात एव्हरेस्ट वेगळा आहे. माझ्यासाठी तो डोंगर आहे. इतर कोणासाठी ते सिगरेट सोडवणं असू शकतं तर कोणासाठी घरातून बाहेर पडणं. मला वाटतं यासाठी प्रत्येकानं आधी सगळी नाती बाजूला ठेऊन स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. स्वतःसाठी अगदी थोडावेळ काढायला सुरुवात केली तर खूप फरक पडू शकतो.'

पूर्वप्रसिद्धी : तनिष्का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com