अंधारातचि घडले सारे... (प्रवीण टोकेकर)

अंधारातचि घडले सारे... (प्रवीण टोकेकर)

डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच होता. त्याला एक सभ्य आयुष्य जगायचं होतं. त्यासाठीच तर तो शिकला-सवरला होता. अमेरिकी लष्करात भरती झाला होता. के ॲडम्ससारखी सुशिक्षित, सुस्वरूप जोडीदार त्यानं पसंत केली होती; पण घडलं उलटंच. त्याला डॉनच्या खुर्चीत बसावंच लागलं. शांत, शालीन स्वभावाचा मायकेल अवघ्या काही महिन्यांत न्यूयॉर्कमधला भयंकर उलट्या काळजाचा डॉन म्हणून बदलौकिकाला आला. 

टोमॅटोच्या वाफ्यात मरून पडलेल्या वृद्ध डॉन व्हितो कोर्लिओनं मरणाआधी त्याला सावध केलं होतं ः ‘तुझ्या मुळावर उठलेला इसम घरातलाच आहे.’ तसंच घडलं. प्रतिस्पर्धी डॉन बार्झिनीकडून मीटिंगचा निरोप खुद्द टेशिओ घेऊन आला. टेशिओ खरं तर व्हितो कोर्लिओनेचा उजवा हात. डॉनच्या सांगण्यावरून वेळ आली तर कटून पडेल असा निष्ठावान; पण आता घराचे वासे फिरले होते. 

...त्यानंतर काही दिवसांनीच मायकेलची बहीण कोनी हिच्या नवजात बाळाचा बाप्तिस्मा होता, त्याच मुहूर्तावर मायकेल कोर्लिओनेनं आपला पहिला सर्वंकष हल्ला केला. तो इतका प्रखर होता की डॉन मायकेल कोर्लिओने याचा दबदबा पुढं आयुष्यभर टिकला. चर्चमधले पाद्री बाप्तिस्म्याचे मंत्र म्हणत असताना काय घडलं?

क्‍लेमेंझानं एका हॉटेलच्या फिरत्या दारात डॉन स्ट्राच्चीची चाळण केली. मस्त मसाज करून घेण्यासाठी पहुडलेला लास वेगासचा राजा मो ग्रीन याच्या डोळ्यातून पिस्तुलाची गोळी आरपार मेंदूचा भुगा करत गेली. सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलच्या फिरत्या प्रवेशद्वारात डॉन क्‍युनिओ अडकला. पाठोपाठ पिस्तुलाच्या गोळ्यांनी त्याचा खात्मा केला. आपल्या रखेलीबरोबर शांत झोपलेल्या डॉन टाटाग्लियाला धड जागदेखील आली नाही. पन्नासेक गोळ्या खाऊन तो तिथल्या तिथं मेला. डॉन बार्झिनी त्याच्या ऑफिसच्या दारातच बॉडीगार्डसकट यमसदनाला गेला. मायकेलचा उजवा हात अल्‌ नेरीनं पोलिसाच्या गणवेशातच तिथं जाऊन त्याला उडवलं. टेशिओला मायकेलच्या पोरांनी घेरलं. गाडीत बसवलं. पुन्हा तो कुणालाच दिसला नाही.

* * *

व्हितो कोर्लिओने मूळचा सिसिलीचा. मूळ नाव व्हितो आंदोलिनी. तिथल्या बाघेरियाच्या मुलखात त्याचा बाप अंतोनिओ सटरफटर कामं करत असे. तिथला बाश्‍शा डॉन चिचिओचा अपमान केल्याबद्दल त्याला बेधडक गोळ्या घातल्या गेल्या. ‘बापाच्या खुनाचा सूड घेईन,’ असं म्हटलं म्हणून डॉन चिचिओनं खवळून त्याचा थोरला मुलगा पावलो यालाही मारून टाकलं. ते पोर तर अवघं पंधरा वर्षांचं होतं. ‘माझ्या धाकट्या पोराला तरी जिवंत सोड’ असं सांगायला गेलेल्या त्याच्या आईलाही डॉन चिचिओनं झटकलं. ‘मोठा होऊन त्यानं माझा सूड घेतला तर?’ असा त्याचा रास्त सवाल होता. त्वेषानं सुरा उपसून धावलेली ती आई तिथंच गोळ्या खाऊन मेली. नऊ वर्षांचा अनाथ व्हितो काही दिवस लपत-छपत जगला. मग एका मोठ्या बोटीत शिरकाव साधून त्यानं अमेरिका कशी गाठली, हे त्याचं त्यालाच माहीत. इथंच त्याचं नाव व्हितो आंदोलिनीचं व्हितो कोर्लिओने झालं. बंदरावरच्या कारकुनानं हे त्याचं बारसं सरकारी कागदपत्रात केलं, त्याला कोण काय करणार? हे घडलं सन १९०१ मध्ये. त्याच वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष विल्यम मॅकिन्ली यांची लिआँ त्सोवगॉस नावाच्या एका पोलिश कामगारानं गोळ्या घालून हत्या केली होती आणि जगभरातले निर्वासित अमेरिकेच्या एलिस बेटावर येऊन धडकू लागले होते...

साधारणतः सन १९१७ च्या सुमारापर्यंत व्हितोनं रुटूखुटू कामं करत जीव तगवला. न्यूयॉर्कच्या पूर्वेकडच्या खालच्या पाखाडीत इटालियन अमेरिकनांची भलीमोठी वस्ती होती. तिथं तो जगला. जेनको अबांडानो नावाच्या इटालियनांचा तिथं ऑलिव्ह तेलाचा घाणा होता. त्या घाण्यावर काम करता करता तीन वर्षांत व्हितो त्या घाण्याचा मालकच झाला. पुढं तोच व्यापार त्यानं बहराला आणला. हे सगळं जमवून आणत असताना त्यानं तिथला लोकल दादा डॉन फानुची याला खंडणी न देता उलट ढगात पाठवलं. अल्पावधीत तो डॉन व्हितो झाला. आसपासच्या इटालियन रहिवाशांची भलीबुरी कामं करत राहिला. क्‍लेमेंझा आणि साल टेशिओसारखे साथीदार त्याला लाभले होते. 

तब्बल वीसेक वर्षांनी त्यानं पुन्हा एकदा इटलीचा किनारा गाठला. सिसिलीत गेल्यावर त्यानं डॉन चिचिओची भेट घेतली. ९० वर्षांच्या चिचिओला उभा चिरून आई-बापाच्या हत्येचा सूड घेतला. तसं त्यानं केलं नसतं, तर त्याच्या सिसिलियन रक्‍ताची आण वाया गेली असती. 

* * *

वयाच्या तिशीत डॉन व्हितो कोर्लिओनेनं जे केलं, त्याला शंभरानं गुणलं तरच मायकेलच्या तिशीतल्या ‘पराक्रमा’चा अंदाज करता येईल. मुलगा बापाच्या सवाई होता. बापानं नांगरून ठेवलेल्या जमिनीत पीक घ्यायचं आणि ते डोळ्यात तेल घालून जपायचं, हे तसं अवघडच. 

थोरला भाऊ सांतिनो ऊर्फ सनी आधीच गोळ्या खाऊन मेलेला. बाप टोमॅटोच्या वाफ्यात संपलेला. मधला फ्रेडो डोक्‍यानं कमी आणि बाईलबाजीचा दिवाणा. धाकटा असूनही मायकेलला मोठं व्हावं लागलं होतं. (खुलासा : पूर्वार्धात मायकेल मधला आणि फ्रेडो धाकटा असा उल्लेख चुकून झाला होता. क्षमस्व!). सिसिलीत नवीनवेली बायको बॉम्बस्फोटात उडालेली त्याला पाहावी लागली होती. लष्करातलं उत्तम करिअर सोडून गुंडागर्दी आणि काळ्या धंद्यात उतरावं लागलं होतं. पूर्वाश्रमीची प्रेयसी के ॲडम्सशी पुन्हा धागा जुळून दोन गोड मुलं झाली इतकीच काय ती आयुष्याला सोनेरी किनार होती. के ॲडम्सनं त्याच्याशी लग्न केलं; पण ‘पाच वर्षांत फॅमिलीचे सगळे उद्योगधंदे कायदेशीर करीन’ असा मायकेलकडून शब्द घेतल्यावरच. त्यालाही सातेक वर्ष होऊन गेली होती. मोठा छोकरा अँथनी. त्याच्याशी खेळतानाच आजोबा झालेला डॉन व्हितो गेला होता. धाकटी मेरी. खरीखुरी शेंडेफळ. या मुलांना माफियाचं वारं लागू नये म्हणून केनं खूप आटापिटा केला.

ंआपल्या फॅमिलीचं मुख्यालय नेवाडात हलवलं होतं. तिथल्या लेक टाहोच्या किनारी कडेकोट बंदोबस्तात तो राहत असे. एके रात्री त्याच्या शय्यागृहाच्या खिडकीतून बेफाम गोळीबार झाला. हा हल्ला कुण्या बाहेरच्यानं नव्हे, तर घरभेद्यानंच घडवून आणला, हे सगळ्यांनीच ओळखलं होतं. कोण असेल तो घरभेदी? मायकेलला बऱ्याच नंतर ते कळलं...

* * *

हायमन रॉथ ही एक बडी असामी होती. सगळ्या माफिया टोळींमध्ये तो एक दुवा म्हणून काम करायचा. मधल्यामध्ये प्रचंड पैसा कमवायचा. डॉन व्हितो कोर्लिओनेसोबतही त्यानं काम केलं होतं. मायकेल त्याच्या दृष्टीनं ‘पोरगा’च होता. वडीलकीच्या नात्यानंच तो बोलायचा. तुझ्यावरचा हल्ला पेंटांजेलीनं केलाय अशी टिप त्यानं दिली. पेंटांजेली हासुद्धा डॉन व्हितोच्या काळातला माणूस; पण तुलनेनं ‘छोटा बटाटा’ होता. फॅमिलीचा कारभार चालवताना मायकेलनं कधीतरी त्याच्या शेपटावर पाय दिला होता. मायकेलच्या भन्नाट मेंदूनं रॉथच्या मनातलं काळंबेरं बरोब्बर टिपलं; पण काहीही हालचाल केली नाही. उलट रॉथच्या क्‍यूबातल्या धंद्यात पार्टनरशिपची तयारी दाखवली. त्याच्यासोबत तो हवानाला गेला. पार्टनरशिपसाठी वीस लाख डॉलर्स देण्याची तयारी दाखवली. अमेरिकेच्या शेजारच्या क्‍यूबा बेटावर तेव्हा क्रांतीची मशाल पेटली होती. ते वर्ष १९५८ असेल, हुकूमशहा फुल्गेन्शिओ बाटिस्टाची अमेरिकाधार्जिणी सत्ता उलथून टाकण्यात फिडेल कास्ट्रोचे क्रांतिकारक धडपडत होते. आज ना उद्या, इथं सत्तापालट होऊन आपला धंदा बोंबलणार, हे मायकेलनं ओळखलं. क्‍यूबामधल्या नववर्षाच्या संध्याकाळी मायकेलला आपल्यावर हल्ला घडवून आणणाऱ्या ‘त्या’ घरभेद्याचं नाव कळलं. तो होता त्याचा मोठा भाऊ फ्रेडो. दु:खातिरेकानं आपल्या भावाचं तिखट चुंबन घेऊन मायकेल म्हणाला : ‘तो तूच होतास, हे मला माहितीये फ्रेडो. तू माझं हृदय विंधलं आहेस...’

रॉथवर गोळीबार झाला; पण तो वाचला. बहुधा मायामीला पळून गेला. त्याचा साथीदार जॉनी ओला याला गळा घोटून मारण्यात आलं. फ्रेडो न्यूयॉर्कमध्ये कुठं तरी दडून बसल्याचं कळलं.

* * *

सन १९५९ मध्ये कोर्लिओने फॅमिलीच्या काळ्या धंद्यांची चौकशी करण्यासाठी एक सिनेट समिती नेमण्यात आली. ‘‘सन १९४६ मध्ये तुम्ही एका पोलिस अधिकाऱ्याचा खून केल्याचा आरोप आहे...तुम्हाला मान्य आहे?’’ समितीच्या मेंबरानं विचारलं.

‘‘नाही’’

‘‘कोर्लिओने टोळीची स्मग्लिंग, जुगार किंवा वेश्‍याव्यवसायात आर्थिक आणि प्रत्यक्ष गुंतवणूक आहे...हे खरं आहे?’’

‘‘नाही...माझ्यावर आरोप करण्यापूर्वी मेहेरबान समितीनं साक्षीदार आणले तर बरं होईल!’’ मायकेल म्हणाला. कोर्लिओने फॅमिली हे एक सुप्रतिष्ठित खानदान असून त्यांनी एका शाळेला लाखो डॉलर्सची देणगी दिली आहे. मी त्यांना चांगलं ओळखतो, असा निर्वाळा समितीवरचे एक सिनेटर गिअरी यांनी दिला आणि एकच खळबळ उडाली. अर्थात या गिअरीमहाशयांच्या हातून एका वारांगनेची हत्या झाली होती, ते प्रकरण मायकेलनं रफादफा केलं होतं, हे त्यामागचं गुपित होतं. सिनेट समितीची चौकशी अर्थात बारगळली. दरम्यान, फ्रेडोला हुडकून मायकेलनं त्याला अभय दिलं.

‘‘मी तुझ्यापेक्षा मोठा आहे माइक. कधी वागवलंस मला मोठ्या भावासारखं? सारखं आपलं ‘फ्रेडो त्या अमक्‍याला आणायला विमानतळावर जा...त्या तमक्‍याला रात्रीची सफर घडवून आण...फ्रेडो, जरा फोन घे. फ्रेडो, जरा ज्यूस आण...’अरे, मला काही स्वाभिमान आहे की नाही? मला स्वत:चं स्थान निर्माण करायचं होतं, माइकी. तुझ्या जिवावर नव्हतो उठलो मी...मी फसवला गेलोय माईक...’’ फ्रेडोनं आवेगानं सांगितलं.

‘‘तू आता माझा भाऊ नाहीस. मित्र नाहीस. वैरीही नाहीस, फ्रेडो. तू जा...’’ मायकेलनं त्याला कोरडेपणानं सांगितलं. आई, कार्मेला जिवंत असेतोवर फ्रेडोला दगाफटका होता कामा नये, असं त्यानं आपल्या डाव्या-उजव्या हातांना बजावलं.

मायकेलच्या रक्‍तलांच्छित कारभाराला कंटाळून केनं लहानगा अँथनी आणि मेरी यांना घेऊन निघून जाण्याचं ठरवलं. त्यात पुन्हा दिवस गेल्यानं तिनं गर्भपात करून घेतला. सिसिलीतल्या कुठल्याच पुरुषाला हा अपमान सहन झाला नसता. केच्या कानसुलात मारून मायकेलनं तिला जवळपास घरातून हाकलून दिलं. काही महिन्यांतच कार्मेलाचं निधन झालं. अंत्यदर्शनाला आलेल्या फ्रेडोला मायकेलनं जवळ घेतलं आणि त्याला असलेला अभयकाळ संपल्याची खूण त्यानं अल्‌ नेरीला केली.

...मासेमारी करायला गेलेला फ्रेडो बुडून मेला म्हणे. त्याच्या मस्तकात कुणीतरी गोळी घातली होती, हे मात्र कुणीही उघड बोललं नाही.

...लेक टाहोच्या किनाऱ्यावरल्या आलिशान कंपाउंडमध्ये बसलेला मायकेल पश्‍चात्तापानं जळत राहिला. तो अगदी एकटा होता...एकटा.

* * *

डॉन मायकेल व्हितो कोर्लिओने आता साठीला आला आहे. ते वर्षं १९७९ असावं. चिकाटीनं धंदा वाढवत मायकेलनं फॅमिलीला उत्कर्षाकडं नेलं होतं. आपल्या माजी पत्नीला दिलेल्या शब्दाला तो जागला. हळू हळू त्यानं सगळे काळे धंदे विकून कायदेशीर उद्योगव्यवसायात बस्तान बसवलं होतं. तिथंही अमाप पैसा कमावला. माफियाच्या पाशातून जवळपास सुटका झाली होती; पण आता खूप उशीर झाला होता. केनं दुसरं लग्नही केलं होतं.

जुन्या पापांपासून मुक्‍त होण्याचा मार्ग म्हणून मायकेलनं ‘व्हितो कोर्लिओने पाउंडेशन’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यासाठी सेंट सेबॅस्टियन चर्चला लक्षावधी डॉलर्सची देणगी दिली. पाउंडेशनच्या मेजवानीसाठी त्यानं के आणि मुलांना आवर्जून बोलावलं. अँथनी आता छाकटा तरुण झाला होता. त्याला संगीतक्षेत्रात नाव कमवायचं होतं. माफिया डॉनच्या घरात हे कविमनाचं पोरगं कसं काय जन्माला आलं? कुणास ठाऊक. मेरीचं रूपांतर तर सुस्वरूप युवतीत झालं होतं. 

‘‘ माइक, अँथनीला गायक व्हायचंय...त्याच्या करिअरला जमलं तर शुभेच्छा दे. किमान आडकाठी तरी करू नकोस,’’ के म्हणाली.

‘‘का? माझाही मुलगा आहे तो...तू वकील हो, अँथनी. ही गाणीबजावणी होत राहतात,’ मायकेल कळवळून म्हणाला. 

पोरानं त्याला स्पष्ट ‘नो’ असं सांगितलं. त्याच पार्टीत मेरीला एक देखणा तरुण दिसला. व्हिन्सेंट मॅन्सिनी असं त्याचं नाव होतं. काळ्या डोळ्यांचा. सडपातळ बांध्याचा. केस मागं वळवलेला. तो तिचा सावत्र चुलतभाऊ होता. दिवंगत सांतिनोच्या रखेलीचा मुलगा. व्हिन्सेंट आणि मेरी ही खरं तर चुलतभावंडं; पण एक अलवार नातं तिथं जन्माला आलं. व्हिेन्सेंट आणि मेरीची जवळीक वाढतेय, ही बाब मायकेलला काळजीत टाकणारी होती.

* * *

इम्मोबिलियारे ही रिअल इस्टेट क्षेत्रातली अवाढव्य कंपनी. जगभर तिचे हात-पाय पसरले आहेत. हजारो तगडे गुंतवणूकदार आहेत; पण कंपनीचं २५ टक्‍के भाग व्हॅटिकन बॅंकेकडं आहेत. आर्चबिशप गिल्डे यांना हाताशी धरून मायकेल आणि त्याचा नवा वकील बी. जे. हॅरिसन यांनी वाटाघाटी चालवल्या. तब्बल सहाशे दशलक्ष डॉलर्स ट्रान्स्फर करून हा व्यवहार तडीस नेण्याचा त्यांचा इरादा होता. खुद्द पोप पॉल सहावे यांच्या मान्यतेनंतरच हा व्यवहार होऊ शकणार होता; पण यात अडचणी होत्या. कोर्लिओने हे नाव भद्र समाजात बद्दू होतं. शिवाय, पोपमहाशयांची तब्येत खूपच बिघडलेली होती. डॉन आल्टोबेलो नावाच्या न्यूयॉर्कच्या माफिया बादशहानं मायकेलला गाठून ‘आम्हालाही आमचे पैसे इम्मोबिलियारे डीलमध्ये पवित्र करून दे,’ असा आग्रह धरला. मायकेलला या लोकांना आता दूर ठेवायचं होतं. त्यानं अटलांटिक सिटीतल्या एका पंचतारांकित हॉटेलात शेवटची मीटिंग बोलावली. त्या मीटिंगमध्ये कोट्यावधी रुपये विविध फॅमिलीज्‌ना वाटून टाकले आणि ‘आता पुरे’ अशी विनंती केली. बहुतेकांनी पैसे स्वीकारले; पण एक कपर्दिकही न मिळालेला डॉन जो झाजा मात्र भडकला. मीटिंग सोडून ताडताड निघून गेलेल्या झाजा आणि आल्टोबेलो यांच्या हस्तकांनी त्याच हॉटेलच्या छतावरून हेलिकॉप्टरमधून बेफाम गोळीबार केला. मायकेल, व्हिन्सेंट वगैरे मंडळी सुदैवानं वाचली.

मधुमेहानं ग्रासलेल्या मायकेलची त्याच रात्री रक्‍तातली साखर अचानक कमी होऊन तो बेशुद्ध झाला. त्याला इस्पितळात हलवावं लागलं.

* * *

बरा झाल्यानंतर मायकेलनं सहकुटुंब सिसिलीची सहल केली. त्याच्या मुलाचा, अँथनीचा तिथं ऑपेरामध्ये कार्यक्रम होणार होता. के आणि मेरीसुद्धा आल्या. व्हिन्सेंट साथीला होताच. मायकेलनं ‘व्हिन्सेंटला माझ्या पोरीपासून दूर राहा, तिचा जीव धोक्‍यात घालू नकोस’ असं सांगितलं. व्हिन्सेंटनं ऐकलं.

दरम्यान, पोप पॉल सहावे यांचं निर्वाण झालं. त्यांच्याजागी नवे पोप निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली. कार्डिनल लाम्बेर्तो यांच्यासाठी मायकेलनं काही सूत्रं हलवली. लाम्बेर्तो यांनी त्याला आयुष्यातलं पहिलं आणि अखेरचं कन्फेशन करायला लावून त्याच्या पापमुक्‍तीसाठी प्रार्थना केली. 

हे सगळं घडेपर्यंत शत्रू प्रबळ झाला होता. मायकेल कोर्लिओनेला उडवण्याचा कट रचला गेला. त्याचा सुगावा लागताच मायकेलनं व्हिन्सेंटला बोलावलं. 

‘‘तुझं मॅन्सिनी हे आडनाव आता टाकून दे...तू आता कोर्लिओने आहेस...बस या खुर्चीवर!’’ मायकेलनं व्हिन्सेंटला आज्ञा केली. याच दिवसासाठी व्हिन्सेंट इतकी वर्षं माफियाविश्‍वात धडपडत होता. अँथनी कोर्लिओनेचा ऑपेरा सुरू असतानाच अनेक हत्याकांडं झाली. दोन्ही बाजूंचे मारेकरी, म्होरके धडाधड उडाले. ऑपेरागृहाच्या पायऱ्यांवर मायकेलवर गोळीबार झाला; पण तो बचावला होता. शेजारी उभ्या असलेल्या मेरीच्या गाऊनवर मात्र रक्‍ताचे डाग होते.

‘‘डॅड?’’ असं विचारून मेरी खाली कोसळली. डोळ्यांदेखत आपली लाडकी लेक हकनाक गेलेली पाहून मायकेलचा हंबरडा फुटलाच नाही. त्याचा मौन आकांत साऱ्यांचं काळीज चिरत गेला...

हे एवढं सगळं अंधारात घडलं...आणि दडलंही.

(गॉडफादर : एक दगड मैलाचा : पुढील अंकी) 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com