एक दगड मैलाचा (प्रवीण टोकेकर)

Godfather Movie
Godfather Movie

सुरवातीलाच एक इटालियन लोककथा थोडक्‍यात सांगणं भाग आहे. इतालो काल्विनो नावाचे एक लेखक-पत्रकार होते. त्यांनी सन १९५६ मध्ये लिहिलेल्या इटालियन लोककथांच्या पुस्तकातली ही छोटीशी गोष्ट :

गावात एक विधवा होती. तिला तेरा वर्षांचा मुलगा होता. त्याचं नाव जॅक. ‘पैसा कमावण्यासाठी मलाही बाहेरगावी जायला हवं’, असा हट्ट तो करू लागला. आई म्हणाली : ‘बाहेरगावी जाऊन तू काय करशील जॅक? जग कसं आहे हे तुला माहीत नाही. तू अजून लहान आहेस.’ तरीही जॅक ऐकेना. शेवटी आईनं सांगितलं : ‘ते समोर पाइनचं झाड दिसतंय ना, ते लाथ मारून पाडण्याइतकी शक्‍ती तुझ्यात आली की मग मी म्हणेन की तू बाहेर जाण्याइतका मोठा झालास.’ 

...दिवस गेले. महिने गेले. वर्षं गेली. जॅक रोज त्या झाडाला लाथा मारून यायचा. एक दिवस त्याच्या लाथेनं खरंच ते झाड पडलं. विधवा आईनं नाइलाजानं परवानगी दिली.

खूप दिवस चालत गेल्यावर जॅक एका नगरात आला. तिथल्या राजाचा रोंदेलो नावाचा लाडका घोडा होता. तो खूप नाठाळ होता. तो कुणालाच पाठीवर स्वार होऊ देत नसे. राजानं दवंडी पिटवली की जो कुणी रोंदेलोला वठणीवर आणेल त्याला इनाम देण्यात येईल. जॅक तिथं पोचला. बारकाईनं घोड्याचं निरीक्षण केल्यावर त्यानं ओळखलं की बिचारा रोंदेलो नाठाळ नाही. तो फक्‍त स्वत:च्या सावलीला घाबरतो आहे. जॅकनं रोंदेलोला कुरवाळलं. चुचकारलं. कानात काही सांगितलं. मग ठीक दुपारी बारा वाजता घोड्यावर मांड ठोकली आणि गावात झकास रपेट मारली.

...जॅकला अर्थातच इनाम मिळालं. रोंदेलो गरीब शेळीसारखा वागू लागला; पण त्यानंतरही जॅक सोडून त्यानं कुणालाच स्वत:च्या पाठीवर स्वार होऊ दिलं नाही.

* * *

या लोककथेनं ‘गॉडफादर’ या अभूतपूर्व महाकादंबरीचं बीजारोपण केलं, यावर कुणाचा विश्‍वास बसेल का? पण तसं बोललं जातं हे खरं. मारिओ गियानलुइगी पुझो नामक एका चमत्कारी लेखकानं ‘गॉडफादर’ ही आधुनिक ‘गुन्हेगाथा’ लिहिली, त्याला आता ५० वर्षं लोटली. सन १९६९ च्या मार्च महिन्यात ही कादंबरी प्रकाशित झाली. पुढल्या दोन वर्षांत तिच्या जगभरात तब्बल ९० लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. सलग ६७ आठवडे ती बेस्टसेलर राहिली होती. तिच्यावर आधारित चित्रपट त्रिधारेनं इतिहास घडवला. तिन्ही चित्रपटांनी मिळून २९ मानांकनांपैकी तब्बल नऊ ऑस्कर पुरस्कार मिळवले. देशोदेशी या चित्रपटाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. माफियापटांच्या हाताळणीचा एक फॉर्म्युला तयार झाला. गुन्हेगारी-विश्‍व हे आपल्या नागरीकरणाच्या हव्यासातून निर्माण झालेलं बटबटीत वास्तव आहे, याची टोकदार जाणीव करून देणाऱ्या या कलाकृतींनी समाजशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्त्यांना विचारात पाडलं. हे सगळंच अभूतपूर्व होतं.

तुफान वाचल्या गेलेल्या या सर्वतोमुखी कादंबरीवर आधारित चित्रपट काढणं फ्रान्सिस फोर्ड कोपोलासारख्या दिग्दर्शकानं का ठरवलं असेल? ‘कोपोला यांना ही अवदसा आठवली आहे’, असं म्हणणारेही तेव्हा चिक्‍कार होते; पण कोपोला यांनी हट्ट सोडला नाही. आपल्या मन:चक्षूंना ही कादंबरी जशी दिसली, तशीच्या तशी लोकांना दाखवायची त्याची ऊर्मी अनिवार होती. त्यांच्या तिन्ही चित्रपटांनी मिळून अक्षरश: हजारो कोटी डॉलर्सचा धंदा केला. हे नेमकं कशाचं लक्षण होतं?

* * *

पुझो यांचं बालपण न्यूयॉर्कच्या पश्‍चिमेला मॅनहटननजीक ज्याला ‘हेल्स किचन’ म्हणत - अशा बदनाम बस्तीत गेलं. इटालियन निर्वासितांची ही वस्ती. दारिद्य्र हा तिथल्या हरेक उंबऱ्याचा स्वभाव होता. मारिओचे वडील रेल्वे लायनीत हातोडा घेऊन फिरणारे ‘ट्रॅकमन’ होते. पुढं त्यांनी वैतागून बायकोला सोडून दिलं आणि दुसरा घरोबा केला. अर्थात, तत्पूर्वी इटालियन पुरुषार्थाला जागत त्यांनी डझनभर मुलं जन्माला घातली होती. या बारा पोरांना वाढवत मारिओ पुझो यांच्या आईनं जे काही भोगलं असेल, ती वेगळीच कहाणी होईल. 

कॉलेजात शिकून मारिओ लष्करात भरती झाला. लहान वयातच जाड भिंगाचा चष्मा लागलेल्या मारिओला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धभूमीवर पाठवण्याचं धाडस अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांच्या छाताडात नव्हतं! त्यांनी त्याला लष्कराच्या जनसंपर्क खात्यात कारकुनाचं काम दिलं. 

...पुढं जर्मनीतल्या अमेरिकी लष्करी जनसंपर्क कचेरीत त्यांची बदली झाली. तिथं रिकाम्या हपिसात बसून मारिओमहाशयांनी वेळ सत्कारणी लावला. म्हणजे लग्नही जमवलं आणि एखाद्‌-दोन कादंबऱ्याही लिहून काढल्या. ‘डार्क अरिना’ आणि ‘फॉर्च्युन पिलग्रिम’ या त्या कादंबऱ्या. जास्तीचा पैसा मिळवण्यासाठी त्यांनी लष्करातली नोकरी सांभाळूनच पल्प मासिकं छापणाऱ्या एका कंपनीत लग्गा लावला. मारिओ क्‍लेरी या टोपणनावानं ते तिथं लेखन करत. सन १९५५ च्या सुमारापर्यंत पुझोमहाशयांनाही पाच मुलं झाली होती. लष्कराचा पगार तुटपुंजा. आधीच्या दोन पुस्तकांमधून कपर्दिकही मानधन मिळालं नव्हतं. वीसेक हजार डॉलर्सचं कर्ज बोडख्यावर होतं. अशा कडकीच्या काळात अंतिम उपाय म्हणून त्यांनी ‘द गॉडफादर’ लिहिली. 

‘द गॉडफादर’ ही कादंबरी खरं तर फूटपाथवाली. भद्र समाजानं तिला उचलून धरण्याचं कारण नव्हतं; पण साठोत्तरी साहित्यातल्या प्रवाहबदलाचा फायदा आपोआप ‘गॉडफादर’ला झाला. वास्तविक, ते जग निराळ्याच धुंदीत असावं तेव्हा...हेमिंग्वे, मिलर आदी मातब्बर मंडळी अभिजाताचे रंग उलगडत होती. फ्योदोर दस्तयेवस्कीच्या ‘ब्रदर्स कारमाझोव’नं गारुड केलं होतं. साहित्यक्षितिजावर नुकतेच तळपू लागलेले कोलंबियन लेखक गॅब्रियल गार्सिया मार्केझ ऊर्फ ‘गाबो’ यांच्या ‘हंड्रेड इअर्स ऑफ सोलिट्यूड’नं रसिकजनांचं लक्ष झटकन वेधून घेतलं होतं. अशा वातावरणात फूटपाथी साहित्यकचऱ्यात आपली जागा धरून पडलेल्या ‘गॉडफादर’नं अचानक अभिजात साहित्याच्या दालनात एंट्री घेतली. हे अगदी वास्तवातल्या डॉनसारखं झालं. गणेशोत्सवाच्या मांडवात अचानक एखाद्या नामचीन ‘भाई’नं दर्शनासाठी सहकुटुंब प्रविष्ट व्हावं आणि बंदोबस्ताच्या पोलिसांसकट आख्खा मांडव चिडीचूप व्हावा तसं काहीसं!

भद्र समाजाच्या सुलक्षणी जीवनस्तराच्या खाली एक क्रूर, अटळ असं अधोविश्वही जगत असतं आणि त्यातली विकारविलसितं ही कुठल्याही शेक्‍सपीरिअन मध्ययुगीन कहाण्यांपेक्षा कमी गडद रंगांची नाहीत, हे ‘गॉडफादर’नं दाखवून दिलं. जणू खुद्द गॉडफादर पंजा नाचवत विचारू लागला ः ‘शेक्‍सपीअरच्या व्यक्‍तिरेखांमधले अभिजात रंग शोधताय ना? मग हे घ्या, या कहाणीतल्या रंगांचं काय करता?’

* * *

जर्मनीतला मुक्‍काम मायदेशी हलल्यानंतर न्यूयॉर्कमधल्या लष्कराच्या राखीव दलाच्या कचेरीत पुझो कारकुनी करू लागले. शहराच्या पश्‍चिमेला ४२ व्या रस्त्यावर हे हपिस होतं. राखीव दलात भरती होणं हा पब्लिकचा आवडीचा प्रकार होता. थेट युद्धावर जावं लागत नाही. राखीव दलात राहून भत्ते खायचे, आराम करायचा, अशी कल्पना. भरतीचे अर्ज स्वीकारणं, उमेदवाराला ‘कॉल’ पाठवणं ही कामं अव्वल कारकून मारिओ पुझो करत. या काळात पुझो यांनी बरेच पैसे खाल्ले, म्हणे. जवानामागं २२५ डॉलर्स. सन १९५० च्या दशकात ही रक्‍कम तशी मोठीच होती. 

‘‘होय, खाल्ले मी पैसे. कडकी ही चीज कुठल्याही सज्जन माणसाचं डोकं फिरवते...’’ असं नंतर म्हाताऱ्या पुझोआजोबांनी एका मुलाखतीत सांगून टाकलं होतं. ‘‘ ‘गॉडफादर’ लिहिण्यापूर्वी मी कुठल्याही डॉनला आयुष्यात भेटलो नव्हतो. साधी ओळखही नव्हती. डॉन व्हितो कोर्लिओने आणि माझ्या आईत मात्र साम्य आहे...’’ असंही ते म्हणाले होते; पण त्यांच्या या विधानावर कुणीही विश्वास ठेवला नाही. एफबीआयनंही त्यांच्या मागं चक्‍क माणसं लावून आडून आडून चौकशी आरंभली. 

इटालियन वस्तीतल्या लोकांचं वागणं बघून, काही इटालियन पुस्तकं वाचून ग्रामीण इटालियन जाणिवांविषयी पुझो यांची काही मतं तयार झाली होती. लेखक म्हणून ते प्रतिभावान होते; पण त्यांचं भाषावैभव ग्रेट होतं, असं म्हणायला काही जागा नाही. नाही म्हणायला ‘मशिनगन बाळगणाऱ्या शंभर गुंडांपेक्षा एक ब्रीफकेसवाला वकील जास्त पैका मिळवतो’ किंवा ‘आपल्या माणसांना नेहमी जवळ ठेवावं, शत्रूला तर अधिक जवळ ठेवावं’ असलं बकाली शहाणपण सांगणारे संवाद त्यांनी भन्नाट पेरले. अधूनमधून दस्तयेवस्की किंवा बाल्झॅकची वचनं उद्‌धृत केल्यानं लेखनालाही भारदस्तपणा आला.

डॉन कोर्लिओनेचा असाच एक जगात गाजलेला डायलॉग म्हणजे : ‘‘आय विल मेक हिम ॲन ऑफर, ही कान्ट रिफ्यूज..!’’ या वाक्‍यात चक्‍क मृत्यूची धमकी होती. 

काहीही असलं तरी कंटाळत, त्रयस्थपणे काही सांगू पाहणारी त्यांची शैली माफियांच्या कहाण्या सांगताना प्रभावी वठली हे खरंच. पुझो यांनी पुढं ‘द सिसिलियन’पासून शेवटच्या ‘ओमेर्ता’पर्यंत आठ-दहा कादंबऱ्या लिहिल्या; पण ‘द गॉडफादर’च्या तोडीची त्यातली एकही नाही. 

हे कथासूत्र पुझो यांना कसं सुचलं असेल? त्याचं उत्तर वर दिलेल्या लोककथेत आहे. ही लोककथा आणि दस्तयेवस्कीची ‘ब्रदर्स करमाझोव’ ही महाकादंबरी यांचा एकत्रित परिणाम पुझो यांच्यावर असा काही झाला की व्हितो कोर्लिओने नावाचा एक इटालियन डॉन त्यांना अस्पष्ट दिसू लागला...

‘ब्रदर्स कारमाझोव’मध्ये फ्योदोर पावलोविच कारमाझोव नावाच्या एका तालेवार गृहस्थाची कहाणी आहे. तो आणि त्याची तीन मुलं यांच्या भवतालचं विश्व टिपणारी ही महाकादंबरी मूल्य, विश्‍वासघात, संशयाचे भोवरे, न्यायदान आणि व्यवहार या घटकांची चर्चा करत पुढं जाते. कारमाझोवचा थोरला मुलगा दमित्री भलताच हळवा, उसळणारा. मधला इवान बोथट मनाचा, काहीसा एकांडा गडी, तर धाकटा अलेक्‍सेई ऊर्फ अल्योशा सळसळत्या रक्‍ताचा उमदा तरुण. पावेल स्मेदर्याकोव हा चौथा मुलगाही कारमाझोव खानदानात आहे; पण तो अनौरस संतती असल्यानं घरात नोकर म्हणूनच वावरतोय! ‘ब्रदर्स कारमाझोव’ या कादंबरीचा नायक ठरतो तो धाकटा अल्योशा.

...हे सगळं तपशिलात सांगायचं कारण एवढंच की ‘द गॉडफादर’मधलं कोर्लिओने खानदान चक्‍क या कारमाझोव कुटुंबावरच बेतलेलं आहे. तो रशियन मूल्यांचा संघर्ष मारिओ पुझो यांनी इटालियन माफियाच्या गडद रंगात बुडवून काढला. ‘द गॉडफादर’च्या प्रारंभीच बाल्झॅकचं एक सुभाषित लक्ष वेधून घेतं : ‘बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन, देअर इज क्राइम...हरेक वैभवाच्या मागं एक तरी गुन्हा दडलेला असतो.’ ओनोरे दे बाल्झॅक हा अठराव्या शतकातला एक जानामाना फ्रेंच लेखक; पण हे वाक्‍य त्याचं आहे, याचा एकही थेट पुरावा नाही. ‘तुमच्याकडं भरपूर बेहिशेबी पैसा असेल तर त्याचा अर्थ एवढाच की तो तुम्ही उत्तमरीत्या दडवलेला आहे आणि त्याचा स्रोत कालौघात विस्मरणात जाईल, हेही तितकंच खरंच आहे...’ अशा आशयाचं एक वाक्‍य बाल्झॅकच्या लेखनात आढळतं, एवढंच.

* * *

‘द गॉडफादर’बद्दलच्या स्टोऱ्या तर शेकड्यानं ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ ः कोपोला यांना ‘अवघ्या ४७ दिवसांत शूटिंग आटोपून घ्या’ अशी तंबी प्रारंभीच मिळाली होती. कोपोला यांनी पुझो यांना साथीला घेतलं आणि पहिली संहिता तयार करूनही टाकली. या संहितेसाठी पुझो यांना ऑस्कर मिळालं. एक ‘पल्प’ लेखक अभिजनांच्या वर्तुळात पोचला. 

व्हितोचा थोरला मुलगा सांतिनोची भूमिका जेम्स कान यानं केली. चिडका, उतावळा सांतिनो ऊर्फ सनी त्यानं असा काही पेश केला, की त्याला जगभरातून दाद मिळाली. मधला भाऊ फ्रेडो कोर्लिओने याची भूमिका खूप अवघड होती. काहीशी बोटचेपी, बोथट. जॉन काझाले या तरुण अभिनेत्यानं ती सुंदर साकारली. रंगभूमीवर रमलेला हा उमदा अभिनेता सन १९७८ मध्ये अकाली वारला. विख्यात तारका मेरिल स्ट्रीपचा हा प्रियकर किंवा सखा आता फक्‍त ‘गॉडफादर’च्या फूटेजमध्ये उरला आहे. ‘गॉडफादर’च्या कुटुंबातला एक ‘उपरा’ सदस्य म्हणजे फॅमिलीचा वकील टॉम हेगन. बालपणापासून पाळलेल्या या पोराला गॉडफादरनं शिकवून-सवरून मोठं केलं. ही सुंदर भूमिका रॉबर्ट डुवालनं इतकी अप्रतिम केली की अनेक गुन्ह्यांची प्रकरणं हाताळणारे वकील त्याच्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करू लागले. 

‘द गॉडफादर’मध्ये जॉनी फाँतेन या व्यक्‍तिरेखेचं एक उपकथानक आहे. हॉलिवूडचा हा गायक-सितारा डॉन व्हितोचा आश्रित असल्यामुळंच नावारूपाला आला असून एका निर्मात्यानं त्याला वाटेला लावल्यानं डॉननं त्या निर्मात्याचाच लाडका घोडा कापला, असं ते उपकथानक. ही जॉनी फाँतेनची व्यक्‍तिरेखा विख्यात गायक फ्रॅंक सिनात्रासारखी होती. सिनात्राचे माफियाशी संबंध होते, हे जगजाहीर होतं. जोसेफ फिशेत्ती आणि फ्रॅंक मोरेत्ती या माफिया गॅंगस्टरांशी त्याचे थेट संबंध असल्याचं एफबीआयच्या दोन हजारपानी अहवालात नमूद केलं गेलं आहे. ‘गॉडफादर’ थिएटरात लागल्यानंतरची गोष्ट. न्यूयॉर्कच्या एका कॉफीशॉपमध्ये पुझो बसलेले असताना तिथं अचानक फ्रॅंक सिनात्रा आला आणि त्यानं भरलेल्या हॉटेलात पुझो यांना आईमाईवरून शिव्या घातल्या. त्याचा अवतार बघून पुझोमहाशय तिथून अक्षरश: पळून गेले. हा प्रसंग वृत्तपत्रांनी चिक्‍कार चघळला...अशा एकेक कहाण्या. 

डॉन व्हितोचा थोरला मुलगा सांतिनो ऊर्फ सनीची भूमिका खरं तर अल्‌ पचिनोला हवी होती. तसा त्याचा हट्टही होता; पण कोपोला यांनी त्याला पटवून मायकेलची भूमिका दिली. या भूमिकेनं अल्‌ पचिनोच्या अभिनयाची ताकद जगाला दिसली. तरुण वयात अल्‌ पचिनोनं मायकेल साकारला. पुढं साठी उलटलेला डॉन मायकेलसुद्धा त्यानं सहजतेनं पेश केला. फॅमिलीला कायदेशीर करण्याची त्याची धडपड, पत्नी के ॲडम्सबद्दलची त्याची ओढ, मधूनच फणा काढणारं त्याचं सिसिलियन रक्‍त, थंडगार नजरेनं भावाचाच केलेला खून आणि सर्वात अखेरीस पोटची पोर पोटात बंदुकीच्या गोळ्या खाऊन मरून पडते, तेव्हाचा त्याचा मौन हंबरडा...अल्‌ पचिनोला शंभर ऑस्कर घाऊकरीत्या देऊन टाकावेत, असा सगळा मामला. 

आता थोडंसं मार्लन ब्रॅंडोबद्दल. कोपोला यांनी ‘द गॉडफादर’ चित्रपटाची घोषणा केली तेव्हा ब्रॅंडोचं नाव त्याच्या मनात नव्हतं. चित्रपटनिर्मात्या युनिव्हर्सल स्टुडिओचा आणि ब्रॅंडोचा तर छत्तीसचाच आकडा होता. उतारवयातल्या ब्रॅंडोनं स्वत: उचल खाऊन ही भूमिका मिळवली होती. एकेकाळी हॉलिवूडवर राज्य करणारा हा चित्रसम्राट एरवी त्याच्या वाह्यात वर्तणुकीबद्दल बराच बदनाम होता; पण ‘अत्यंत कमी पैशात काम करीन, सेटवर दारू पिणार नाही, भानगडी करणार नाही, वेडंवाकडं बडबडणार नाही,’ असल्या सतराशे अटी मान्य करून ब्रॅंडोनं ही भूमिका पदरात पाडून घेतली. इटालियन डॉनची देहबोली आत्मसात करण्यासाठी काही माफियादादांची त्यानं भेटही घेतली होती, असं म्हणतात. त्या काळात फ्रॅंक कोस्टिलो नावाचा एक खराखुरा डॉन होता. डॉन व्हितोचं पात्र साकारताना ब्रॅंडोनं कोस्टिलोची भाषा आणि देहबोली उचलली. ब्रॅंडोला डॉन व्हितो कोर्लिओनेच्या भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं; पण ते स्वीकारायला ब्रॅंडो आलाच नाही. इंडियन अमेरिकनांवर होणाऱ्या भयानक अत्याचारांच्या निषेधार्थ त्यानं ऑस्करच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. दोन वर्षांनी आलेल्या ‘गॉडफादर २’ मध्ये डॉन व्हितोची भूमिका रॉबर्ट डीनिरोनं केली. त्या भागात तरुणपणीचा डॉन व्हितो दाखवला आहे. त्या कामगिरीसाठी डीनिरोला ऑस्कर मिळालं. म्हणजे चमत्कार पाहा, डॉन व्हितो कोर्लिओने ही व्यक्‍तिरेखा एकच; पण ती साकारली दोन अभिनेत्यांनी आणि दोघांनाही ऑस्कर! याला काय म्हणावं?

‘गॉडफादर’चं भावविभोर संगीत हा एक स्वतंत्र विषय आहे. सुरवातीपासून मनाचा ठाव घेणारी ती गॉडफादरची मृत्युगर्भ धून आजही रसिकांच्या काना-मनात अधूनमधून मुक्‍कामाला येते. ही सिंफनी इटालियन संगीतकार निनो रोटा यांनी पूर्वीच तयार करून ठेवली होती. सन १९५८ च्या ‘फॉर्च्युनेला’ नावाच्या चित्रपटासाठी तयार केलेली ही धून तेव्हा वापरलीच गेली नव्हती. ती धून थोडीशी बदलून ‘गॉडफादर’मध्ये तिचा अचूक वापर झाला. इतकं अभिजात संगीत असूनही केवळ, ते ओरिजिनल नाही, म्हणून ऑस्करची बाहुली काही संगीतकार रोटा यांना मिळाली नाही. 

...गॉडफादर ही एक शिरजोर कलाकृती आहे. त्याबद्दल जितकं बोलाल, तितकी तिची उंची वाढत जाणार. मनाचा नव्हे तर मानसिकतेचा ठाव घेणाऱ्या कलाकृती फार फार क्‍वचित जन्माला येतात. ‘गॉडफादर’ हा चित्रपटांच्या उत्क्रांतीचा एक टप्पा मानला जातो...मैलाचा दगड म्हणा हवं तर. तो ओलांडून पुढं जाता येत नाही कुणाला. किंवा असं म्हणा हवं तर की... 

...‘गॉडफादर’नं जगभरातल्या रसिकांना अशी काही ऑफर दिली की ती नाकारणं शक्‍यच नव्हतं. 

(समाप्त)
 

भाग दोन : अंधारातचि घडले सारे... (प्रवीण टोकेकर)
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं; पण घडलं उलटंच. 

भाग एक : आतंकाच्या अंत:करणी... (प्रवीण टोकेकर)
अभिजात चित्रपटांचा धांडोळा घेताना "गॉडफादर'ला वळसा घालून पुढं जाणं शक्‍यही नाही. हा मैलाचा दगड न ओलांडता येणारा. या चित्रपटानं चित्रभाषेचं परिमाण बदललंच; पण विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या अधोविश्वाची परिभाषाही बदलली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com