'अखिलेश'च सबसे बडा खिलाडी

Akhilesh Yadav and Mulayam Singh Yadav
Akhilesh Yadav and Mulayam Singh Yadav

उत्तरेच्या रणांगणामध्ये पुन्हा एकदा " अखिलेश यादव'च हेच सबसे बडे खिलाडी ठरले आहेत, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षात घडलेल्या महाभारतामुळे निदान प्रचाराच्या मैदानात तरी यादव कंपनीने आघाडी घेतली आहे.

अर्थात या सगळ्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना कितपत फायदा होतो हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. अखिलेश यांचे बंड आणि त्यांची नेताजी मुलायमसिंह यादव यांनी केलेली हकालपट्टी हे सगळं प्रिप्लॅन होते. यामुळे दोन गोष्टी साध्य झाल्या एक मुलायम यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याने आपल्या मुलाचा म्हणजे अखिलेशचा खुंटा हलवून तो पुन्हा मजबूत केला. राज्य सरकारविरोधात जी प्रस्थापितविरोधी लाट निर्माण झाली होती ती आता क्षीण झाल्याने भाजपसमवेत अन्य विरोधक काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. पण याचा अर्थ समाजवादी पक्षामध्ये कोणतेच मतभेद नव्हते असे नाही. ते होते आणि त्याची किंमतही पक्षाला आगामी निवडणुकीमध्ये मोजावी लागू शकते.

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचा यंदाचा सैफईमधील वाढदिवस पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने विशेष चर्चेचा विषय ठरला होता. त्याला कारण होते अमरसिंह. सहा वर्षांचा राजकीय विजनवास संपवून मुलायम कृपेने समाजवादी पक्षामध्ये प्रवेश मिळवणाऱ्या अमरसिंह यांचे पुनरागमन होताच पक्षामध्ये पुन्हा खडाखडी सुरू झाली. त्यावेळी माध्यमांना उत्तर देताना ज्येष्ठ आझम खान यांनी केलेले विधान विशेष चर्चेचा विषय ठरले होते.

अमरसिंह यांच्या आगमनाबाबत पत्रकारांनी विचारले असता सूचक स्वरात ते म्हणाले होते, "" गढे हुए मुडदे मत उखाडिए, तुफान के साथ कुडा कंकर भी आता आहे''. त्यांच्या बोलण्याचा रोख हा अमरसिंह यांच्याकडे होता. कारण कधीकाळी मुलायम यांना सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या अमरसिंहांनी यादव कुटुंबीयांच्या खासगी बाबींमध्ये हस्तक्षेप करायला सुरवात केल्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस आणखीनच वाढली होती. अमरसिंहांच्या या कारवायांना अखिलेश यांचे महत्त्वाकांक्षी काका शिवपाल यांची साथ लाभली, यामुळे अखिलेश यांना राज्य कारभार करणेही अवघड होऊन बसले. त्यात परत मुलायमसिंह यांच्यातील राजकीय नेता गप्प बसत नव्हता. ते दरवेळेस शिवपाल, अमरसिंह लॉबीचे ऐकून अखिलेश यांची जाहीर कानउघाडणी करत होते, प्रशासनात ढवळाढवळ करत होते. यामुळे तरूण रक्ताच्या अखिलेश यांच्यातील "बंडखोर यादव' जागा झाला नसता तरच नवल. अखेर अखिलेश यांनी जोरदार फिल्डिंग लावत थेट काकांनाच शिंगावर घेतले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढ असताना समाजवादी पक्षातील अंतर्गत मतभेद देखील चव्हाट्यावर येत होते. पुढे नेताजींनी अखिलेश यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर त्यांनीही काका शिवपाल आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. काका आणि पुतण्यामधील हा संघर्ष पुढे एवढा विकोपास गेला की ते दोघेही जाहीर व्यासपीठावर परस्परांना भिडू लागले. वयोमानाने थकलेल्या मुलायमसिंह यांनाही हा संघर्ष गपगुमान सहन करावा लागत होता. बिहारच्या धर्तीवर उत्तरप्रदेशात देखील कॉंग्रेसशी महाआघाडी केली जावी यासाठी अखिलेश आग्रही होते. कॉंग्रेसचे रणनीतीकार प्रशांतकिशोर, ज्येष्ठ नेते राजीव शुक्‍ला, तेहसीन पूनावाला यांनी अनेकवेळा याअनुषंगाने अखिलेश यांच्या भेटी घेतल्या होत्या. पण प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी महाआघाडीमध्ये खोडा घालत. परस्पर पक्षाच्या उमेदवार याद्या जाहीर करायला सुरवात केली. हे करताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने स्वत: जबाबदारी घेणे टाळत सगळे मुलायमसिंह यांच्या नावावर खपविल्याने अखिलेश यांचा पारा वाढला.

अखेरीस मुलायम यांनी अखिलेश समर्थकांना डावलून 325 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांच्या संतापाचा स्फोट झाला आणि त्यांनी 235 उमेदवारांची थेट समांतर यादीच प्रसिद्ध केली. यात अखिलेश यांना मोलाची साथ लाभली ती त्यांचे चूलत काका प्रोफेसर रामगोपाल यादव यांची. इतिहास आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या रामगोपाल यांची समाजवादी पक्षावर मजबूत पकड आहे. त्यामुळे नेताजींनी पहिल्यांदा कारवाईचा बडगा उगारला होता तो रामगोपाल यांच्यावरच. शिवपाल यांच्या टीकेचा रोखही नेहमीच रामगोपाल यांच्याच दिशेने असायचा पण विद्यमान राजकारणात अखिलेश हेच हुक्‍मी एक्का ठरू शकतात हे ओळखलेल्या रामगोपाल यांनी शेवटी आपली सगळी ताकद अखिलेश यांच्या पाठीशी उभी केली. मुलायम यांनी पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत अखिलेश आणि रामगोपाल यांची पक्षातून हकालपट्टी केली खरी पण दोनशेपेक्षाही अधिक आमदारांचे बळ अखिलेश यांच्या पाठीशी उभे राहिले आणि सगळी चक्रेच फिरली. शिवपाल यांनाही या निमित्ताने आपण किती पाण्यात आहोत हे समजले. आज सकाळी अखिलेश यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेतल्यानंतर थेट मुलायमसिंह यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. मुलायमसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अखिलेश, शिवपाल आणि आझमखान देखील सहभागी झाले होते.

समाजवादी पक्षातील हा अंतर्गत संघर्ष मिटविण्यात आझमखान यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते. पण या बैठकीनंतर शिवपाल यादव यांनी घेतलेला यूटर्न बराच बोलका आहे. नेताजींच्या आदेशावरून अखिलेश आणि रामगोपाल यादव यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे अखिलेश यांची पुढची वाटचाला अधिक निर्धोक झाली आहे.

सगळा ड्रामा प्रीप्लॅन
समाजवादी पक्षातील हा सगळा ड्रामा प्रीप्लॅन असल्याचे सांगितले जाते. अखिलेश यांचे अमेरिकेतील रणनितीकार स्टीव्ह जार्डिंग यांच्या उघड झालेल्या मेलमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. पक्षांतर्गत विरोधकांना बाजूला करण्यासाठी मुलायमसिंह यांनी स्वत: हा डाव आखला होता. या संघर्षानंतर अखिलेश यांची निर्माण झालेली स्ट्रॉंग लीडरची भूमिका पक्षाला फायदेशीर ठरणार आहे. मुलायम यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे त्यांनी शिवपाल यांना गप्प करत अखिलेश यांचे तख्त आणखी मजबूत केले. अमरसिंह यांच्या लॉबीसही यामुळे योग्य संदेश पोचला आहे.

विरोधक कोपऱ्यात
समाजवादी पक्षातील या सगळ्या लाथाळ्यांमुळे विरोधक एका कोपऱ्यात गेले आहेत. पण या सगळ्याचा समाजवादी पक्षाला लाभ होईल असा दावा आता करणे धाडसाचे ठरेल. पंतप्रधान मोदी यांनी परिवर्तन रॅलींच्या माध्यमातून तयार केलेली वातावरणनिर्मिती आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आखलेली रणनिती हे फोडणे तितकेसे सोपे नाही. त्यात परत मायावतींच्या आव्हानाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. अखिलेश पक्षांतर्गत लढाईत "सबसे बडे खिलाडी' ठरले आहेत पण खरे युद्ध तर अजून बाकी आहे. आता या संघर्षानंतर संभ्रमावस्थेत गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रचाराच्या कामाला जुंपणे विरोधकांशीही टक्कर घेणे अशा दोन पातळ्यांवर अखिलेश यांना संघर्ष करावा लागेन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com