रंग एकाकीपणाचे... (हर्षद सहस्रबुद्धे)

रंग एकाकीपणाचे... (हर्षद सहस्रबुद्धे)

कंटाळवाण्या दिनक्रमातनं सुटका होण्याकरता एकाकी आजीनं एक खासा विरंगुळा शोधलाय. तो विरंगुळा म्हणजे काडेपेट्यांवर छापलेली चित्रं जमवणं आणि ती पाहणं. रोजची कामं झाल्यावर, दुपारच्या निवांत वेळी काहीवेळ आजी तिच्या आरामखुर्चीत बसून ही छानशी, तिच्या हृदयाजवळ असलेली अशी पेटी उघडते. त्यातली रंगीबेरंगी चित्रं पाहायला सुरवात करते. ते पाहतापाहता त्या चित्राचा भाग होते. मग सुरू होते तिच्या मनातली रंगीत दुनिया...

सध्या अनेक घरांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती एकेकट्या राहताना दिसून येतात. हा एकटेपणा त्यांना खायला उठतो. आयुष्याच्या संध्याकाळी बरेचदा तब्येतीच्या तक्रारी असतात, काहींच्या बाबतीत आर्थिक स्थैर्य नसतं, हवासा शेजार नसतो, बोला-बसायला कुणी नसतं, रोजचा दिवस कसा ढकलायचा हा प्रश्न असतो. एक ना अनेक प्रश्न. भारतीय ॲनिमेटर गीतांजली रावची ‘प्रिंटेड रेनबो’ ही शॉर्ट फिल्म, आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या जगाचे पापुद्रे बाजूला सारून ते जग दाखवते. ज्येष्ठ नागरिकांचं एकाकीपण इतकं तरल पद्धतीने कुठं रेखाटलं गेलं नसावं. ही शॉर्ट फिल्म गीतांजलीनं, तिची आई आणि आईच्या लाडक्‍या मांजराच्या स्मरणार्थ निर्मिली आहे. ही पूर्णतः ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे. गीतांजली तिची दिग्दर्शिका, निर्माती आहे. सगळी चित्रं आणि ॲनिमेशनही तिचंच आहे. अनेक वर्षं श्रमून गीतांजलीनं ही सर्व रेखाटनं केली आहेत. आपलं रोजचं म्हणजेच रुटीन आयुष्य कंटाळवाणं असतं. मोनोटोनी आलेली असते. ही मरगळ झटकायला, माणूस आपापल्या आवडीप्रमाणं काही ना काही उपाय योजतो. गीतांजलीची शॉर्ट फिल्म त्यावरच आधारित आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये एक आजी आहे. एकटीच एका अपार्टमेंटमध्ये राहणारी. सोबतीला फक्त तिचं मांजर आहे. फिल्मच्या सुरवातीला आपल्याला आजीचा आणि मांजराचा दिनक्रम पाहायला मिळतो. रुटीनचं अव्याहत चालणारं रहाटगाडगं. अनेक अपार्टमेंट्‌सनी मिळून बनलेलं हे एक मोठं संकुल असतं. आजीच्या फ्लॅटच्या खिडकी आणि गॅलरीतून आपल्याला समोरच्या अपार्टमेंट्‌समध्ये चालणारी हालचाल दिसते. समोरच्या फ्लॅट्‌समध्ये राहणारे लोक, त्यांचे दिनक्रम, बदलत जाणारं ऋतुमान, दिवस आणि रात्रीच्या पाठशिवणीचा खेळ हे सारं दिसतं. कंटाळवाणं रुटीन, गीतांजलीनं काळ्या, पांढऱ्या आणि राखाडी (ग्रे) रंगात दर्शवलं आहे. मांजराच्या हालचाली मोठ्या लोभस आहेत. पडद्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीखुरी भासते, इतकी ती चित्रं आणि ॲनिमेशन जिवंत आहे. आजीच्या हालचाली, दिनक्रमात व्यग्र असणं, वाऱ्यानं तिचं केस भुरभुरणं, चेहऱ्यावरचे हावभाव, बदल हे सगळं फार बारकाईनं दर्शवलं आहे.

कंटाळवाण्या दिनक्रमातनं सुटका होण्याकरता आजीनं एक खासा विरंगुळा शोधलाय. तो विरंगुळा म्हणजे काडेपेट्यांवर छापलेली चित्रं जमवणं आणि ती पाहणं. आजीची ही खास रंगीत दुनिया एका पेटीत बंद आहे. रोजची कामं झाल्यावर, दुपारच्या निवांत वेळी काहीवेळ आजी तिच्या आरामखुर्चीत बसून ही छानशी, तिच्या हृदयाजवळ असलेली अशी पेटी उघडते. त्यातली रंगीबेरंगी चित्रं पाहायला सुरवात करते. एखादं चित्र पाहून त्यात हरवते. ते पाहतापाहता त्या चित्राचा भाग होते. मग सुरू होते तिच्या मनातली रंगीत दुनिया. आजी चित्रात जाऊन अक्षरशः ते चित्र, त्या चित्रातलं वातावरण जगते. आजीच्या मन:पटलावर उमटणारी दृश्‍यं प्रेक्षकांना दिसतात. तिथलं आगळंवेगळं संगीत, तिथला परिसर, तिथला दिनक्रम हा उत्साहपूर्ण आणि नवरसानं युक्त असा असतो. काळ्या, पांढऱ्या, राखाडी रंगाच्या दैनंदिन कार्यक्रमापेक्षा ही रंगीत स्वप्नं आणि हे रंगीत जादुई जग आजीला प्रिय असतं. आभासी असूनदेखील रोजच्या जगाइतकंच खरं असतं, आजीसाठी. या जगात पोचून ती आपली सर्व मरगळ झटकते. प्रत्येक चित्रातलं जग जगते. प्रत्येक चित्र आणि तिथल्या परिसराप्रमाणे संगीतही वेगळं असतं. सुमधुर, मुग्ध करणारं. प्रत्येक जगाचा कालावधीही वेगवेगळा. कधी तो पुराणकाळ असतो तर कधी आजचा. कधी ती स्वप्ननगरी असते. जिथं वागण्यावर कुठलीही बंधनं नसतात. कसलीही शारीरिक/मानसिक समस्या नसते. असतो तो फक्त आनंद आणि मनमोकळं स्वातंत्र्य! सुंदर, मनमोहक चित्रं. रंग, संगीत यांचा सुरेख वापर आपल्याला पहावयास मिळतो.

ॲनिमेशन आणि लघुपटाची ताकद ‘प्रिंटेड रेनबो’मध्ये वारंवार जाणवत राहते. तिचा शेवट मात्र चटका लावणारा आहे. हा चटका लावणारा शेवटही विचारपूर्वक योजल्याचं दिसून येतं. ही फिल्म हुरहूर लावते. २००६च्या कान महोत्सवात ही फिल्म प्रथमतः दाखवली गेली. तिथं समीक्षकांकडून गौरवली गेली. तीन पुरस्कार मिळवले. वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांत ही फिल्म दाखवली गेली. प्रत्येक ठिकाणी पुरस्कारही मिळवले. गीतांजली रावनं जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतली. ॲनिमेशन, फिल्ममेकिंग आणि थिएटर या प्रांतात तिनं आपला विशिष्ट असा ठसा निर्माण केला. तिनं या लघुपटात अत्यंत आगळावेगळा असा फॉर्म वापरलाय. अत्यंत कल्पक आरेखनं, विचारपूर्वक केलेली प्रसंगांची मांडणी, नीरस दैनंदिन जीवन, स्वप्नातली आकर्षक दुनिया, वास्तव आणि आभासी जग यासाठी वेगवेगळी कलर थीम आणि संगीतयोजना ही ‘प्रिंटेड रेनबो’ची वैशिष्ट्यं. तरलता आणि निरागसता या लघुपटाचा पाया आहे. जीव ओतून केलेली फिल्म आहे ही. एका चित्रातून दुसऱ्या चित्रात जातानाचा एकसंधपणाही वाखाणण्याजोगा. कुठंही कसलंच जोडकाम नाही. ‘प्रिंटेड रेनबो’ हा कारुण्याची झालर असणारा; पण हवाहवासा अनुभव किमान एकदा तरी निश्‍चित घेण्यासारखा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com