Hemant Juvekar writes about shravan
Hemant Juvekar writes about shravan

सिर्फ एहेसास है ये... रुह से महेसूस करो !

गर्भरेशमी श्रावणधारा, 
पहापहाता येती जाती, 
मांडूनी गोंडस 
काचतळ्यांचा लख्ख पसारा, 
आणि ढगांच्या घरट्यामधला 
पक्षी उन्हाचा उतरून खाली 
फुलपायांनी संथ डुंबतो 
त्यात फुलवूनी 
किरण पिसारा... 

सदानंद रेगे यांची ही कविता. श्रावणचित्रच नजरेसमोर उभी करणारी. पण शब्दांची खासियत हीच, की ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्याचं स्वतंत्र विश्व उभं करतात. रेगेंच्या कवितेने कुणाच्या डोळ्यासमोर पावसाचं पाणी साठलेलं निर्मळ काचतळं उभं राहिलेलं असेल, कुणाच्या डोळ्यासमोर मंदिराशेजारची पुष्करणी, कुणाच्या डोळ्यासमोर हिरवाईच्या तुकड्यातला आकाश दिसणारा पाण्याचा आरसा आला असेल; तर कुणाला दिसले असतील सिमेंटच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात इमारतीच्या आडून येणारे सूर्यकिरण. उत्तम कलाकृती नेहमीच उत्कट अनुभव देते. मग ती कविता असो की एखाद्या सिनेमातलं गाणं. ते पडद्यावर मांडण ही अवघडच गोष्ट. हे प्रत्येकाला वेगळं दिसणारं चित्र फिल्मवर सहीसही उतरवणं सहजशक्‍य नाहीच. त्यातून ते पाऊसगाणं असेल तर... 

सिनेमातली पाऊसगाणी पाहण्याआधी ऐकली की त्यांच्या दिसण्याविषयी, त्यांच्या पिक्‍चरायझेशनविषयी मनात एक चित्र होतं तयार. पण मनातलं चित्र ते गाणं प्रत्यक्षात पाहताना समोरच्या पडद्यावरही उमटेलच असं नाही होत. "जिंदगीभर नही भुलेगी, वो बरसात की रात' हे गाणं रफीच्या आवाजात नुसतं ऐकायला भारीच वाटतं. पण पडद्यावरच्या भारतभूषणचा अजिबात न हलणारा जडभारी चेहरा पाहिला आणि बात कुछ जमी नही असं वाटून गेलं. (तरी मधुबालाच्या असण्यानं शिडकाव्यांचं काम केलं होतं म्हणा...) 

याउलट "परख'मधलं, "ओ सजना, बरखा बहार आयी'. तेही ब्लॅक आणि व्हाईटच; पण तरीही बिमल रॉयनी काय पाऊस सजवून मांडलाय त्यात. मुळात गाणं अप्रतिम. शैलेंद्रचे शब्द आणि सलीलदांचं (चौधरी) क्‍लासिकल संगीत. आणि लताच्या आवाजात गाणारी साधना. तिचं साधंसं; पण गोडं दिसणं एकदम आवडूनच जाण्यासारखं. 
असंच आणखी एक सुंदर गाणं. "मंझील'मधलं. "रिमझिम गिरे सावन'. पण किशोरचं नाही, लताचं. किशोरचं चांगलंच आहे; पण पडद्यावर लताबाईंचंच सरस वाटतं. मरीन ड्राईव्ह परिसरातलं कोसळत्या पावसातलं अमिताभ आणि मौशमीचं फिरणं दिसत असलं तरी गाणं या दोघांच्याही ओठी नाही. पण तेही समोर दिसणाऱ्या पावसाचा एक भाग बनून भिजवत असतं. 

"दहेक' नावाचा सिनेमा येऊन गेला मधल्या काळात. अक्षय खन्ना आणि सोनाली होते त्यात. त्यात एक गाणं आहे. "सावन बरसे, तरसे दिल'. आनंद-मिलिंदचं संगीत होतं त्याला. मजरूह सुलतानपुरीचे शब्द. गाणं फार नाही गाजलं. नुसतं ऐकलं तर कदाचित आवडणारही नाही; पण पडद्यावर ते खूप छान पेश होतं. या दोघांचं भेटायचं ठरलेलं असतं नि पाऊस घात करतोय की काय वाटत असतं. पण त्या पावसात त्यांचं एकमेकांसाठी आसूसून, पावसात चिंब होत एकमेकांना भेटण्यासाठी येणं, खूपच छान व्यक्त होतं या गाण्यातून. 

काही वर्षांपूर्वी आमीर आणि काजोलचा "फना' आला होता. त्यातलं "देखो ना' हे गाणं खूप मस्त वाटलं होतं नुसतं ऐकायलाही. "ये साजिश है बुंदो की, कोई ख्वाईश है चुप चुप सी, देखो ना...' अशा शब्दांमुळे ते पाहण्याची फारच उत्सुकता होती. (शब्द ः प्रसून जोशी, संगीत ः जतीन ललित) आधुनिक कॅमेऱ्यामुळे पाऊस काय मस्त दिसलाय त्या गाण्यात बरसताना. 

पण अशी काही गाणी अपेक्षाभंग करणार आणि काही सुखद धक्का देणारच. जसं की "ओ घटा सावरी, थोडी थोडी बावरी' हे पाऊस मांडणारं शब्द (गीतकार ः मजरूह) असणारं (लक्ष्मी-प्यारेचं) गाणं. हेमामालिनी नवी असतानाचा हा एक सिनेमा. अभिनेत्री. पण या गाण्यात भरपूर मेकअप केलेली हेमा चक्क व्यायाम करताना दिसते. उलट नवीन निश्‍चल आणि प्रिया राजवंशच्या ("हसते जख्म' मधल्या) "तुम जो मिल गए हो' या गाण्याच्या शब्दात पाऊस नसूनही चित्रीकरणातून मात्र जाणवतो. 

पाऊस तसा अनेक दिग्दर्शकांचा लाडका; पण त्यापैकी अनेकांना ती वाटते संधी... भिजलेल्या नायिकेचे कपडे होत्याचे नव्हते करण्याची. पावसात ते नायिकेचंच रूप दाखवू पाहतात. पावसाचा देखणेपणा दाखवण्याची संधी फार कमी दिग्दर्शक साधतात. 
म्हणूनच, पाऊसगाणी हिंदी सिनेमात बक्कळ असली तरी त्यातली भिडणारी तशी कमीच. आणि त्यातही ती कुणाला कशी भिडतील हे सांगणही कठीण. 
कारण पुन्हा तेच. शब्द प्रत्येकाला वेगळं चित्र दाखवतात. ते पडद्यावर कोण कसं मांडेल, ही आणखी वेगळी गोष्ट. 

गुलजारसारखा प्रतिभावंत शायर, "सिर्फ एहेसास है ये, रुहसे मेहसूस करो, हातसे छुके इसे रिश्‍तोका इल्जाम न दो' असं लिहू शकतो आणि "कजरारे' या तद्दन आयटम सॉंगमध्येही, "आँखे भी कमाल करती है, पर्सनलसे सवाल करती है'सारख्या ओळीही मांडू शकतो. यातलं काहीही कमअस्सल नाही.  महत्त्वाचं हेच, की त्यातली अनुभूती किती तीव्रतेने आपल्यापर्यंत पोहोचतेय. म्हणूनच, पाऊस पडद्यावरचा असो की पुस्तकातला, तो अनुभवायचा असतो मनातून, मनापासून...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com