नक्षत्रांचं देणं... 

hemanta juvekar writes about kajawa mahotsav
hemanta juvekar writes about kajawa mahotsav

शहरापासून दूर,खुल्या आभाळाखाली पहुडल्यावर वर जे दिसतं ते लखलखत्या झुंबरासारखंच असतं. पण हे झुंबर पावसाळ्याच्या सुरुवातीला रानात जणू कोसळतं...त्याला कारण असतात ते काजवे! हे नक्षत्राचं रान भंडारदऱ्याच्या काजवा त्सवाच्या निमित्तानं अनुभवता आलं. त्या प्रकाशाचं देणं देण्याचा हा प्रयत्न... 

भंडारदऱ्याला जायचं होतं. काजवे महोत्सवासाठी. भारी वाटत होतं. 
एका मित्राला कळलं, तेव्हा तो म्हणला, भलत्या रोमॅंटिक कल्पना घेऊन जाऊ नकोस. अंधार पहायला चाललायस असं समज. उत्साहावर पाणी ओतण्याची त्याची सवय जुनीच. त्याला आठवण करून दिली, त्या कट्यार काळजात घुसली चित्रपटातील गाण्याची. मनमंदिरा...ची.त्या गाण्यात काजवे असे मस्त लखलखताना दिसतात 
तर म्हणला, फोटोशॉप आणि प्रत्यक्ष फोटो यात फारच फरक असतो रे बाबा. 
असूदे, म्हणून निघालो. 

भंडारदऱ्याला गाडीतून उतरलो आणि छान गारवा सोबतीला आला. एमटीडीसीचं एक आहे. त्यांची सारीच रेस्ट हाऊसेस खूप भन्नाट ठिकाणी आहेत. भंडारदऱ्याचं तर विल्सन तलावाच्या अगदी काठावर. त्यामुळे वारा आणि गारवा दोन्ही भन्नाट. 
मुंबईच्या चिकचिक वातावरणातून, (अगदी एसी गाडीतून आलो असलो तरी) तशा मोकळ्या वातावरणात आल्यानं, एकूण मस्तच वाटलं. त्यातून ती होती पौर्णिमा. आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता. आजूबाजूचा परिसर चंद्रप्रकाशानं मस्त उजळलं होतं. 
तेवढ्यात तो मित्र आठवला आणि शंका आली... या चंद्रप्रकाशात दिसतील का काजवे? 
पण काही वेळाने जेव्हा प्रत्यक्ष जंगलात जेव्हा गेलो तेव्हा तो मित्र किंवा ती शंका यापैकी काहीच नाही आठवलं. कारण नजरेसमोर होतं ते नक्षत्रांचं रान. चंद्राच्या साक्षीनं लक्षज्योती उजळल्या होत्या. 

आमच्या बरोबर असलेला मार्गदर्शक सांगत होता, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हे काजवे दिसतात. आणि त्यांचं आयुष्य म्हणे दोनच दिवसांचं असतं. 
उर्दू शायरीतल्या परवान्यांच्‌ आयुष्यही असंच अल्प असतं म्हणतात. पण ते प्रकाशावर झेप घेणारे. आणि हे साक्षात प्रकाशकण. स्वतःच प्रकाश झाल्यावर आयुष्य थोडं असलं तरी काय, ते उजळून निघाल्याचं समाधान त्याहून मोठं असणारच की. 
तिथल्या सगळ्यांच झाडांवर अशी प्रकाशाची वस्ती होती. काहींवर थोडी जास्त. पण त्यापैकी काहींवर काजव्यांची मैफल चालावी तसा प्रकार होता. सगळं झाडच्या झाड एकाच वेळी अगदी बटण दाबल्यासारखं प्रकाशमान होई आणि ते डोळ्यात साठवेपर्यंत पुन्हा अंधार. काही झाडांवर खेळकर काजवे असावेत. सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये क्रमाने उभं राहून लाटा उसळण्याचा फील देणारी गर्दी असते ना, तशाच प्रकाशलाटा ते त्या झाडांवर निर्माण करत होते. 
गाईड सांगतच होता, सादडा, बेहडा अशा काही झाडांवर काजवे जास्त दिसतात. कुणीतरी विचारलं, त्यांना खूप छान फुलं येतात म्हणून? त्याचं उत्तर नकारार्थी होतं. पण त्या झाडांना वेगळ्या फुलांची गरजच काय? इतर कोणत्या झाडांवर असतात का अशी प्रकाशफुलं? 

कुणीतरी माहिती शेअर केली की, या कीटकांच्या शऱीरात असलेल्या ल्युसिफेरीन या द्रव्याची ऑक्‍सिजनची प्रक्रिया घडली ना की तो चमकतो. 
पण त्या क्षणी नजरेला दिसत असलेलं थेट ह्रदयात उतरणारं होतं. त्यामुळे ही माहिती डोक्‍यात साठण्याऐवजी डोक्‍यात गेली. अरे हा किटक नाही, तो प्रकाशदूत आहे, असं सांगावसंही वाटलं. पण फार भावनिक होण्यात अर्थ नव्हता. अंधार पहायला जा, म्हणणाऱ्या मित्रासारखे खूप जण असणारच अवतीभवती. 
शिवाय काजव्यांचं हे चमकणं मादीला आकर्षित करण्यासाठी असलं तरी पर्यटकांना ते अंमळ जास्तच आकर्षित करतं . कारण अधूनमधून तिथल्या शांत वातावणात वारंवार गाड्यांचा आवाज आणि प्रकाश येत होताच. आजुबाजूच्या अनेक तरुणांना या काजव्यांनी रोजगार दिलाय हे जाणवत होतं. दोन दिवसात पेटून विझणाऱ्या त्या काजव्यांनी अनेकांची आयुष्य उजळली होती तर... 
दो दिनकी असली तरी ही जिंदगानी भारी खऱीच. कारण समोर दिसणाऱ्या काजव्यांच्या लक्षज्योती नजरेत मावतच नव्हत्या. तेवढयात बहुतेकांनी मोबाईल काढून फोटो काढायला सुरुवात केलेली दिसली. म्हटलं हे चांगलंय. त्या मित्राला जळवूया, हे फोटो शेअर करून. 
पण मोबाईलच्या कॅमेऱ्याने टीपला तो फक्त अंधारच. खूप प्रयत्न केले. पण नजरेला दिसणारं मोबाईलमधल्या कॅमेऱ्याला काही दिसेना. 
मग कळलं. निसर्ग सांगतोय, ही फोटोंमधून पहाण्याची नाही, प्रत्यक्ष अनुभवण्याचीच गोष्ट आहे. 
इथे सेल्फी विथ काजवा नाही काढता येणार, 
पण इथल्या अंधारात, कदाचित स्वतःचा शोध मात्र लागू शकेल... 

भंडारदरा काजवे महोत्सव 
इथला काजवे महोत्सव 20 जून पर्यंत असेल. एकदा पावसाने जोर धरला की काजवे कमी होत जातात. अर्थात त्यानंतर जायचं असेल तरीही हरकत नाही. कारण पावसाळ्यात काजवे नसले तरी इथला निसर्ग अनुभवता येईलच. 

कसे जाल? 
मुंबईपासून 117 किमी अंतरावर असलेल्या भंडारदऱ्याला रस्तेमार्गानं जाणंच बेस्ट. 

कुठे रहाल? 
सगळ्यात उत्तम एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ)चे रेस्ट हाऊस. अर्थात इतर अनेक ठिकाणीही निवास-न्याहरीची व्यवस्था होऊ शकते. 

काय पहाल? 
अर्थात काजवे... पण त्याच बरोबर जवळच रंधा आणि अंब्रेलाच्या धबधबाही आहे. पाऊसकाळात गेलात तर जवळच असलेल्या घाटघरला अवश्‍य जायला हवं. पावसाने कवेतच घेतलेल्या या परिसरावरचा ढगांचा पडदा कधीतरी अचानक दूर होतो आणि अप्रतिम दृश्‍य दाखवतो. हे दृश्‍य डोळ्यात साठवेपर्यंत पुन्हा ढग येतात. बाजुलाच असलेल्या रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिर म्हणजे शिल्पकलेचा खजिनाच. याशिवाय कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड, सांदण व्हॅली सगळं काही इथून अगदी जवळ आहे. 

अधिक माहितीसाठी www.maharastratourism.gov.in. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com