सरकारी शाळेत हाऊसफुल्लची पाटी!

zpschool
zpschool

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून 14 हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित झाले असल्याचे वृत्त वाचून सरकारी शाळेमधील तमाम शिक्षक मंडळींना खुप अभिमान वाटला आणि छाती फुलून गेली. पुढील एक दोन वर्षात सरकारी शाळेत हाऊस फुल्लची पाटी बघायला मिळेल असे स्वप्न पाहण्यास हरकत नाही. गेल्या दीड- दोन वर्षापासून महाराष्ट्रात शिक्षणाचे परिर्वतनाचे वारे मोठया प्रमाणात वाहत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत राज्यातील शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल शाळा, रचनावादी शिक्षण आणि स्पोकन इंग्रजीचे धडे आणि विविध मार्गाने विद्यार्थ्यांना प्रगत करत आले आहेत आणि ही प्रक्रिया निरंतर चालूच आहे. या शिक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी ख-या अर्थाने अधिक दर्जेदार शिक्षण मिळू लागले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचा परिणाम असा झाला की राज्यातील अनेक खाजगी अनुदानीत शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील अनेक विदयार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेले आहेत, आता पर्यंत सुमारे 14 हजार विदयार्थानी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घतला आहे, असे अधिकृत आकडा सांगण्यात येतो कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकते. आज पालकाचा सरकारी शाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला याचे सर्व श्रेय शिक्षक मंडळींना जातो. यात काही वाद नाही. पण खरोखरच अजुन काही वेगळे प्रयत्न केले असते तर ही संख्या लाखाच्या घरात गेली नसती काय? असाही प्रश्न निर्माण होतो.

शिक्षक संख्या
शाळेत शिकविणारे शिक्षक संख्या पूर्ण असेल तर पालक जवळची शाळा सोडून जातच नाही. येथे वर्ग तितके शिक्षक संख्या नसल्यामुळे सरकारी शाळेतील अत्यंत हलाखीचे चित्र रोज पाहणारा पालक आपल्या पाल्यास येथे प्रवेश काय म्हणून देईल? तो इंग्रजी शाळा किंवा खाजगी मराठी शाळेकडे वळतो. वर्गाला एक शिक्षक संख्या असल्या शिवाय प्राथमिक वर्गात दर्जेदार अध्यापन होऊ शकणार नाही आणि ते शिक्षक त्या विद्यार्थ्यास न्याय देऊ शकणार नाही. विद्यार्थी संखेच्या आधारावर संचमान्यता करून दरवर्षी शिक्षक पदाचे समायोजन करता करता अधिकारी लोकांची दमछक होऊन जात आहे. सरकारी शाळा टिकविणे, वाढवीणे आणि त्याचा विकास करणे ही जबाबदारी पूर्णपणे शिक्षक मंडळींवर येऊन पडली आहे. शाळेत टिकून राहायचे असेल तर आणि अतिरिक्त होऊन बाहेर पडायचे नसेल तर तसेच 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्येमुळे शाळा बंद होऊ द्यायचे नसेल तर काहीही करा पण विद्यार्थी मिळवा असे बंधन शिक्षक लोकांवर आहे. दरवर्षी होणाऱ्या या समायोजन प्रक्रियामुळे शिक्षक वर्षभर चिंताग्रस्त राहतो. त्यामुळे जेवढे वर्ग तेवढे शिक्षक असे धोरण तयार केल्यास सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या नक्की वाढली असती. शासनाने असे धोरण जर तयार करुन या बाबीवर नक्की विचार करावे.

शिक्षक भरती
गेल्या पाच-सहा वर्षा पासून शिक्षक भरती पूर्णतः बंद आहे. दरवर्षी हजारोच्या संखेने डी. टी. एड. पदविका धारक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहेत. त्यांच्या हाताला काहीच काम मिळत नाही. 

विद्यार्थी संख्या वाढ होऊन देखील शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रश्न सुटत नाही. आज ही कित्येक शिक्षक अतिरिक्त आहेत ज्याना शाळा ही नाही, शासन त्यांना फुकट पोसत आहे. दरवर्षी तेच ते समायोजन करून नव्याने शिक्षक भरती केव्हा करणार ? शिक्षक भरती बंद असल्यमुळे डी. टी. एड. धारक लाखो विद्यार्थी नोकरीच्या शोधात बेकार फिरत आहेत. त्यांचे हाल बघवत नाही. जर हे हात सरकारी शाळेसाठी मदतगार ठरले असते तर आजचे सरकारी शाळा चे चित्र नक्की वेगळे दिसले असते. राजकीय इच्छाशक्ति कुठे तरी कमी पडतेय त्यामुळे शिक्षक भरती चा प्रश्न निदान यावर्षी तरी सुटणार नाही कारण यावर्षी जेवढे पद रिक्त आहेत तेवढेच पद अतिरिक्त आहेत. म्हणजे बरोबर ला बरोबर. पुढील वर्षात अशीच सरकारी शाळेत प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या वाढ झाली तर ही भरती ची प्रक्रिया करता येईल. समायोजन ही न संपणारी आणि अविरत चालणारी प्रक्रिया आहे.

विविध योजना
विद्यार्थी शाळेत यावा, शिकावे, आणि टिकावे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना तयार करते आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा करते. मात्र सर्वच योजना फक्त सरकारी शाळेला दिली असती तर कदाचित आज दिसत असलेले चित्रापेक्षा वेगळे चित्र बघायला मिळाले असते असे वाटते. यामुळे इंग्रजीच नाही तर खाजगी अनुदानित मराठी शाळेतील मुले देखील सरकारी शाळेत आले असते म्हणजे सरकारी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली असती म्हणून सरकारी योजना फक्त सरकारी शाळेलाच देण्यात यावे जसे की, मोफत पाठ्यपुस्तक योजना - ही योजना सरसकट सर्व शाळेला विनाअनुदानित सोडून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिल्या जाते. त्यामुळे साहजिक आहे पालक आपल्या पाल्यास सरकारी शाळेऐवजी खाजगी शाळेत प्रवेश देतो. सरकारी शाळेच्या सर्वसोईसुविधा इतर शाळेत मिळत असतील तर इथे कोण प्रवेश घेईल ? याचा कोणी विचार करताना दिसून येत नाही. आपल्या मुलांना खाजगी शाळेत प्रविष्ट करून पालकाची खर्च करण्याची तयारी असेल तर त्यांना का म्हणून योजना द्यायची त्यापेक्षा त्यातील पैसा सरकारी शाळेवर खर्च केल्यास सरकारी शाळेचा दर्जा नक्की वाढेल. खाजगी शाळेला योजना देणे बंद करावे मग पहा सरकारी शाळा फुल्ल होतात की नाही ते. अशीच दुसरी योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि विद्यार्थी शाळेत टिकून रहावे यासाठी शासनाने सन 2003 पासून ही योजना मध्यान्ह भोजन योजनेत रूपांतरित केली. तत्पूर्व मुलांना महिन्याकाठी 2 किलो 30 ग्राम तांदूळ मिळायचे. शाळेत जेवण सुरु झाल्यापासून खरोखरच मुलांची उपस्थितीत वाढ झाली आणि ते नियमित शाळेत येऊ लागली. शहरी भागात हे चित्र तुरळक प्रमाणात दिसत असेल पण ग्रामीण भागात मात्र हे वास्तव आहे. एखाद्या दिवशी अचानक शाळेत अन्न शिजविण्यात आले नाही तर मुलासमोर प्रश्न पडतो की आत्ता मी काय खाऊ ? कारण घरची सर्व मंडळी शाळेच्या भरवश्यावर घराला कुलूप लावून शेताला जातात. म्हणून ग्रामीण भागात आज ही योजना म्हणजे विद्यार्थ्यासाठी वरदान आहे. जशी सरकारी शाळेत ही योजना राबविली जाते तसे खाजगी अनुदानित शाळेत देखील राबविली जाते. त्यामुळे पालकाचा ओढा अर्थातच खाजगी शाळेकडे असणार यात शंका नाही. सरकारी शाळेत विद्यार्थी संख्या वाढ करायची असेल तर ही योजना फक्त आणि फक्त सरकारी शाळेस लागू करावी म्हणजे पालकाना आणि विद्यार्थ्यांना या निमित्ताने आकर्षित करता येऊ शकेल.

RTE ची अंमलबजावणी
शिक्षणाचा अधिकार कायदा सन 2009 मध्ये तयार करण्यात आला आणि एप्रिल 2010 पासून राज्यात त्याची अंमलबजावणी सुरुवात झाली. आज सहा वर्षा नंतर सुद्धा या कायद्यातील काही गोष्टीची अंमलबजावणी झालेली नाही. इयत्ता चौथी वर्गास पाचवा वर्ग जोडने आणि सातव्या वर्गास आठवा वर्ग जोडण्याची प्रक्रिया अजून ही पूर्ण झाली नाही. अधिकार कायद्यातील नियमानुसार शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. उच्च प्राथमिक वर्गास आज डी. टी. एड. धारक शिक्षक अध्यापन करीत आहे. यावरून त्या शाळेची आणि विद्यार्थ्याची काय गुणवत्ता अपेक्षित करणार ? कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शिक्षक संख्या कशी वाढविता येईल याचा विचार केल्यास नक्कीच दर्जा सुधारेल. खाजगी शाळेत काम करणाऱ्या कर्मचारी मंडळीना शासन वेतन देते मात्र तेथे त्यांचे काहीही चालत नाही. हा एक विरोधाभास चित्र बघायला मिळते. काम करायचे एकाचे आणि त्याचा मोबदला मात्र दुसऱ्यानी द्यायचा. मध्यंतरी खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याची भरती शासन करणार असल्याचे वृत्त वाचण्यात आले होते. पण पुढे काय झालं ? कुठे माशी शिंकली माहित नाही, ते ही गुलदसत्यात आहे. शाळेला पूर्ण अनुदान मिळत असेल तर त्या शाळावर शासनाचे नियंत्रण आल्यास सरकारी शाळा नक्कीच सुधारणा होईल असे वाटते. शहरात आज ही सरकारी शाळा ओस पडलेल्या आहेत. माध्यमिक शाळाची अवस्था तर पाहू वाटत नाही म्हणून काही तरी उपाय योजना करणे आवश्यक आहे. यास पूर्णपणे राजकीय ईच्छाशक्तीची गरज आहे. त्याच्यापुढे कोणाचे काही काही चालत नाही. सरकारी शाळा हेच लक्ष्य ठेवल्यास खुप काही बदल होऊ शकतो. यातून अनुदानित किंवा विना अनुदानित शाळा व शिक्षक यांचे मन दुखावण्याचा अजिबात हेतू नाही फक्त सरकारी शाळा कसे टिकतील ? याविषयी विचार मांडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com