आरोग्याचं तंत्र (योगेश बनकर)

आरोग्याचं तंत्र (योगेश बनकर)

स्वतःच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी आपण जॉगिंग, स्विमिंग, जिम यासारख्या बऱ्याच गोष्टी करतो. व्यायामाच्या माध्यमातून स्वतःला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, तर काही जण आपला नियमित दिनक्रम सांभाळून मिळेल त्या वेळेत फक्त चालूनदेखील स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्वांसाठी आपण फिट राहण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची नोंद ठेवण्यासाठी; तसंच आपल्याला त्याची नियमित आठवण करून देण्यासाठी "फिटनेस ट्रॅकर' हा एक चांगला पर्याय आहे. व्यायामाबाबत किंवा वजन कमी करण्याबाबत अनेकदा आपण काही तरी ध्येय निश्‍चित करतो; मात्र आपल्या दिवसभरातल्या वेगवेगळ्या क्रियांमधून आपण त्यापर्यंत पोचण्यासाठी नक्की हवी तितकी मेहनत घेतो का, हे कळण्यास मार्ग नसतो. फिटनेस ट्रॅकरमुळं आपण करत असलेल्या प्रयत्नांची नोंद ठेवण्यास मदत होते. मनगटावर घड्याळाप्रमाणं लावलेले हे फिटनेस ट्रॅकर ब्लूटूथद्वारे आपल्या स्मार्ट फोनशी कनेक्‍ट करता येतात आणि आपल्या स्मार्ट फोनमधल्या ऍपवर सगळी माहिती बघता येते. काही फिटनेस ट्रॅकरमध्ये दिलेल्या छोट्या स्क्रीनवरही ही माहिती पाहता येते. 

या फिटनेस ट्रॅकरमुळं आपण दिवसभरात किती पावलं चाललो, कोणत्या दिवशी किती व्यायाम केला, कोणत्या प्रकारचा व्यायाम केला, त्यामुळं किती कॅलरीज कमी झाल्या याची नोंद राहते. नोंद केलेल्या या माहितीवरून काही फिटनेस ट्रॅकर येत्या काळातल्या टार्गेटबद्दलही सुचवतात. बराच वेळ जर एकाच ठिकाणी बसलेले असलो, तर त्याचीही आठवण आपल्याला करून देतात. काही फिटनेस ट्रॅकर आपल्या हृदयाचे ठोके मोजतात. यासोबतच आपण नेमके किती तास झोपलो, त्यापैकी किती वेळ गाढ झोपेत होतो याचीही नोंद हे ट्रॅकर ठेवतात. अशाच काही फिटनेस ट्रॅकरची माहिती आपण आज घेऊयात. 

गार्मिन विवोस्मार्ट 3 (Garmin Vivosmart 3) ः गार्मिन हा फिटनेस ट्रॅकरचा सध्याचा लोकप्रिय ब्रॅंड आहे. "गार्मिन विवोस्मार्ट 3'वर असलेल्या मोनोक्रोम डिस्प्लेवर हार्टरेट, स्टेप्स याबाबतची नोटिफिकेशन्स आपण पाहू शकतो. हा फिटनेस ट्रॅकर वॉटर रेझिस्टंट आहे. याची बॅटरी 5-6 दिवसांपर्यंत चालू शकते. स्मार्ट फोनवरच्या ऍपद्वारे फिटनेस ट्रॅकरनं नोंद ठेवलेल्या गोष्टी आपण पाहू शकतो. गार्मिनच्या विवोस्मार्ट "एचआर+' या मॉडेलमध्ये जीपीएसदेखील देण्यात आलं आहे. त्यामुळं स्मार्ट फोनशिवायही आपण कोणत्या ठिकाणाहून कुठपर्यंत चाललो किंवा सायकलिंग केली यांसारख्या गोष्टींची नोंद ठेवता येते. 

सॅमसंग गिअर फिट 2 प्रो (Samsung Gear Fit 2 Pro) : सॅमसंगच्या या फिटनेस ट्रॅकरमध्ये 1.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. इतर फिटनेस ट्रॅकरपेक्षा याची स्क्रीन मोठी असल्यानं नोंद ठेवण्यात येणाऱ्या गोष्टी चांगल्या प्रकारे पाहता येतात. अँड्रॉइड; तसंच आयओएस डिव्हाइससोबत हा ट्रॅकर वापरता येतो. यामध्ये स्विमिंग मोडही देण्यात आला आहे. इतर फिटनेस ट्रॅकरप्रमाणं हादेखील स्टेप्स, झोप, हार्टरेट यासारख्या गोष्टींची नोंद ठेवतो. 

फिटबिट चार्ज 2 (Fitbit Charge 2) ः हा फिटनेस ट्रॅकर दिवसभरातल्या आपल्या हालचालींची नोंदी ठेवतो. हेल्दी राहण्यासाठी आवश्‍यक असलेल्या अनेक गोष्टींची काळजी हा ट्रॅकर घेतो. इतर फिटनेस ट्रॅकरप्रमाणं हासुद्धा आपले हार्टरेट, आपण चाललेली पावलं, झोप, कॅलरीज याची नोंद ठेवतो. ब्लूटूथद्वारे आपल्या स्मार्ट फोनशी कनेक्‍ट केलेलं असल्यास फिटबिटच्या स्क्रीनवर आपण कॉल्स, मेसेजेस यांची नोटिफिकेशनही पाहू शकतो. आपल्या स्मार्ट फोनच्या साह्यानं जीपीएसद्वारे आपल्या लोकेशनची नोंदही हा ट्रॅकर ठेवतो. "फिटबिट चार्ज 2'सोबतच "फिटबिट ब्लेझ', "फिटबिट सर्ज', "फिटबिट अल्ट्रा एचआर', "फिटबिट फ्लेक्‍स 2' ही इतर मॉडेल्सही बाजारात उपलब्ध आहेत. 

गार्मिन विवोस्पोर्ट (Garmin Vivosport) : या गॅजेटवर कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटर रेझिस्टंट असलेल्या या फिटनेस ट्रॅकरमध्ये जीपीएस देण्यात आला आहे. स्मार्ट फोनशिवायही आपल्या लोकेशनची नोंद ठेवता येते. याची बॅटरी साधारणतः सात दिवसापर्यंत चालते. धावणं, सायकल चालवणं यासारख्या क्रियांची नोंद अतिशय अचूकपणे ठेवली जाते. 

शिओमी एमआय बॅंड 3 (Xiomi MI Band 3) ः शिओमीचे फिटनेस बॅंड इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असल्यानं लोकप्रिय आहेत. "शिओमी एमआय बॅंड 2', "एचआरएक्‍स', "एसआय बॅंड 3' या मॉडेल्समध्ये हे ट्रॅकर उपलब्ध आहेत. "एमआय बॅंड 3' हे त्यातलं लेटेस्ट मॉडेल आहे. स्टायलिश लूक असलेलं हे गॅजेट हार्टरेट मॉनिटर करतं, आपण चाललेल्या पावलांची नोंद ठेवतं, आपल्या झोपेची नोंद ठेवतं. यावर असलेल्या डिस्प्लेवर कॉल्स, मेसेज यांची नोटिफिकेशन्सही पाहता येतात. स्मार्ट फोनमधल्या ऍपद्वारे नोंद ठेवलेल्या गोष्टी पाहू शकतो. तसंच सेटिंग्जही बदलू शकतो. "एमआय बॅंड 3'च्या डिस्प्लेवर हवामानाबाबत माहितीही दिसते. अलार्म, स्टॉपवॉच यासारखी फिचर्सही यात मिळतात. "एमआय बॅंड 3'मध्ये जीपीएस नसल्यानं लोकेशन ट्रॅकिंगसाठी स्मार्ट फोन सोबत असणं गरजेचं आहे. 

हुवाई बॅंड 2 प्रो (Huwai Band 2 Pro) : हुवाईचा हा फिटनेस ट्रॅकर स्लिम आहे. यामध्ये हार्टरेट मॉनिटर करण्यासोबतच झोप; तसंच चालणं, धावणं यांसारख्या क्रियांची नोंद ठेवता येते. याची बॅटरी वीस दिवसांपेक्षा अधिक दिवस चालते. 

टॉमटॉम स्पार्क 3 (TomTom spark 3) ः गाणी ऐकत जॉगिंग करण्याची किंवा व्यायाम करण्याची अनेकांना सवय असते. अशा लोकांसाठी हा फिटनेस ट्रॅकर एक चांगला पर्याय आहे. आपली आवडती गाणी यामध्ये आपण अपलोड करू शकतो. त्यामुळं जॉगिंगला जाताना फोनऐवजी फक्त आपला ब्लूटूथ हेडफोन सोबत असला, तरीही गाणी ऐकता येतात. त्यासोबत यामध्ये इनबिल्ट जीपीएस असल्यानं लोकेशन ट्रॅकिंग करू शकतो. यामध्ये नॅव्हिगेशनची सोयही देण्यात आली आहे. त्यामुळं आपल्याला रस्ते माहीत नसलेल्या नव्या ठिकाणीदेखील आपण जॉगिंग करण्यासाठी कसलीही चिंता न बाळगता जाऊ शकतो. 

अमेझफिट बीप (Amazfit Bip) : स्मार्ट वॉचसारखा दिसणारा हा फिटनेस ट्रॅकर ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनसह येतो. इतर फिटनेस ट्रॅकरप्रमाणं हादेखील हार्टरेट, स्टेप्स, झोप यांची नोंद ठेवतो. याची बॅटरी एक महिन्यापर्यंत चालू शकते. अँड्रॉइड; तसंच आयओएस डिव्हाइससोबत हा फिटनेस ट्रॅकर वापरता येतो. यामध्ये इनबिल्ट जीपीएसदेखील आहे. 

गार्मिन विवोफिट 4 (Garmin Vivofit 4) ः या फिटनेस ट्रॅकरची खास बाब म्हणजे याची बॅटरी एक वर्षापेक्षाही अधिक काळ चालते. यावर कलर डिस्प्ले देण्यात आला असून, हे उपकरण वॉटर रेझिस्टंट आहे. अँड्रॉइड; तसंच आयओएस डिव्हाइससोबत कनेक्‍ट करून हा फिटनेस ट्रॅकर वापरता येतो. यामध्ये हार्टरेट ट्रॅकर देण्यात आलेला नाही. त्यामुळं हार्ट रेट सोडलं तर झोप, चाललेली पावलं यांसारख्या गोष्टी त्याद्वारे ट्रॅक करता येतात. 

मूव्ह नाऊ (Moov Now) : सहा महिन्यांची बॅटरी लाइफ असलेल्या या फिटनेस ट्रॅकरवर डिस्प्ले नाही; तसंच यामध्ये हार्टरेट ट्रॅकरही नाही. हा फिटनेस ट्रॅकर आपण चाललेली पावलं ट्रॅक करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये स्विमिंग मोडही देण्यात आला आहे. यासोबतच हे गॅजेट झोपेचीसुद्धा नोंद ठेवतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com