आस्था (डॉ. श्रुती पानसे)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

मुलं विशिष्ट वयाच्या पुढं गेली, की मनात खूप असूनसुद्धा पालक प्रेम दाखवत नाहीत. कौतुकानं मुलं शेफारतील, अतिलाडानं बिघडतील अशी भावना बऱ्याचदा असते. मात्र, मुलांबद्दलची आस्था त्यांना नेमक्‍या पद्धतीनं जाणवून दिली पाहिजे. ती मुलांपर्यंत योग्य प्रकारे पोचली, की अनेक गोष्टी सोप्या होतात. 

''बाळाला सारखं मांडीवर घेऊन बसू नका नाहीतर त्याला मांडीची सवय लागेल आणि सुटणार नाही.'' 

''उगाच कौतुक करत बसू नका, नाहीतर एक दिवस डोक्‍यावर बसेल आणि मिरे वाटेल.'' 

अशी वाक्‍यं आपण अनेकदा ऐकली आहेत. थोडक्‍यात काय, तर मुलांचं कौतुक केलं तर ती शेफारून जातील हा विचार करायला आपल्याला कोणीतरी शिकवतं आणि मग आपण खूपच मोजून-मापून मुलांचं कौतुक करायला लागतो. 

काही घरांमध्ये मात्र खरोखरच या कौतुकाचा अतिरेकी उपयोग करतात आणि मग जाता-येता कौतुक, सारखंच समोर कौतुक, सोशल मीडियावर कौतुक या गोष्टींमुळे मुलं शेफारून जाणारच आणि प्रत्येक वेळेला आपलं कौतुक झालंच पाहिजे अशा हट्टाला पेटतात, यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्या समस्या निर्माण होतात. काही घरं या उलट असतात. मुलं स्वत:तले बावनकशी गुण दाखवतात, आपली हुशारी दाखवतात, सर्जनशीलता दाखवतात, तरीही त्यांच्या वाट्याला चमचाभरसुद्धा कौतुक येत नाही. अशी मुलं केवळ कौतुकालाच नाही, तर प्रेमालासुद्धा पारखी होत आहेत का असं वाटतं. 

एखादं चांगलं काम केल्यावर, शिस्तीचं काम केल्यावर, दुसऱ्याला आपणहून मदत केल्यावर कौतुकाची थाप किंवा नजरेची पावती तरी द्यायला पाहिजे. कारण यामुळं त्यांना कसं वागायचं आहे याची सकारात्मक दिशा मिळते. 

बाळ जन्मल्यानंतर पहिल्या वर्षात त्याच्यावर कौतुकाचा, प्रेमाचा खूप वर्षाव होतो. पहिलं वर्ष बाळ आणि स्वत: यावर आईबाबा खूश असतात. त्यामुळं हे प्रेम उतू जात असतं. पहिल्या वर्षाचा वाढदिवस तर दणक्‍यात साजरा होतो. मात्र जसजसं बाळ मोठं होतं, तसतशी प्रेमाची अभिव्यक्ती मात्र कमी होते. वास्तविक आई-बाबा मुलांवर निरतिशय प्रेम करतात. त्याची किती तरी रूपं असतात. त्या प्रेमात कौतुक असतं, लाड असतात, जवळीक असते, आस्था असते, काळजी असते, माया असते. जबाबदारी तर असतेच. याशिवायही कळत-नकळत जाणवणाऱ्या अनेक छटा असतात. 

जेव्हा मुलं मोठी होतात आणि त्यांना शिस्त लावण्याची वेळ येते किंवा त्याहीपुढं जाऊन मुलांचा अभ्यास घेण्याची वेळ येते, तेव्हा मनात कितीही असलं तरीही आईबाबा आणि घरातले पालक लोक प्रेम दाखवत नाहीत. याचं एकमेव ज्ञात कारण म्हणजे विविध प्रकारे शिस्त लावण्याचे प्रयत्न. जिथं धाकानं गोष्टी करवून घ्यायच्या आहेत, तिथं जर प्रेम वाटलं तर मुलं आपलं ऐकणार नाहीत हा विचार असतो. या विचारांमुळं आई-बाबा आपल्या स्वत:मध्ये असलेला खेळकरपणा विसरून जातात आणि कडक चेहऱ्यानं घरात वावरतात. हे अशासाठी, की चुकूनही घरातली शिस्त कमी होऊ नये आणि आपला धाक बसावा. कारण 'जिथं धाक आहे, तिथंच शिस्त आहे आणि जिथं प्रेम आहे, तिथं लाड आहेत आणि जिथं लाड आहेत, तिथं अतिलाड आहेत. साहजिकच जिथं अतिलाड असतात तिथं बेशिस्त असते,' हेच संस्कार आई-बाबांवरही असतात. या विचारांमुळं काहीकाही घरांमध्ये साधंसुधं प्रेमसुद्धा व्यक्त करायला पालक कचरतात. प्रेम व्यक्त केलं, तर धाक कमी होईल, या भीतीपोटी घरात लष्करी शिस्त निर्माण होते आणि घर प्रेमहीन होतं. खूप स्तुतीच्या वातावरणामुळं मुलांना शिस्त लागते, की जेव्हा जमेल तेव्हा ती शिस्त तोडायला बघतात, हा अजून वेगळा भाग. 

प्रेमाचं रूप नेहमी लाडाकडंच जाईल आणि त्यातून अतिलाड निर्माण होतील असंच का समजलं जातं? प्रेमाची वेगवेगळी रूपं मुलांना समजतात, त्यांना हवी असतात, त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्यांना त्या-त्या वेळेला ती पुरतातसुद्धा. 

आपल्या मुलांविषयी प्रेम असणं वेगळं आणि त्या प्रेमाची एक अभिव्यक्ती म्हणजे आस्था असणं आणि ती दाखवणं हे वेगळं. आपण बऱ्याचदा मुलांची काळजी करतो आणि ती काळजी या ना त्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचत असते. मात्र, त्या काळजी करण्याच्या आधीची एक पायरी म्हणजे त्यांच्याबद्दल आस्था असणं. ती बऱ्याचदा दाखवायची राहूनच जाते. अनेकदा नात्यामध्ये घोळ सुरू होण्याची ही एक छोटीशी सुरवात असू शकते. 

उदाहरणार्थ, 'आता अमुक ठिकाणी जाऊ नकोस,' ही आज्ञा असते; पण 'त्यांनी अमुक ठिकाणी जायचं नाही,' यामागं एखादी विशिष्ट काळजी असू शकते. मुलं लहान असतात, दहा-अकराच्या वयाच्या आतली असतात, तेव्हा ही काळजी पुरेशी असते. आई किंवा बाबा म्हणाले, की 'अमुक ठिकाणी जाऊ नकोस,' तर मुलं जायचा विचारही करत नाहीत. आपल्या आईला किंवा बाबांना काळजी वाटते म्हणून जायचं नाही हेदेखील त्या वयापर्यंत त्यांना मान्य होतं. मात्र, जसजशी ती मोठी होतात, तसतशी 'का जायचं नाही,' हा प्रश्‍न त्यांच्या मनात येतो. शिंगं फुटण्याच्या वयात नुसतंच 'मला तुझी काळजी वाटते,' हे वाक्‍य पुरत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमागचं कार्य-कारण समजावून सांगावं लागतं. 

एखाद्या गोष्टीला 'नाही' म्हणण्याचं कारण आईबाबा आपली सुरक्षितता बघतात, ते जाणवून द्यावं लागतं आणि यापेक्षा कोणत्याही अन्य कारण महत्त्वाचं नाही हेही पटवून द्यावं लागतं नाही. 'नाही'पासून सुरवात केली, तर मुलं बरोबर विरुद्ध पक्षात जाऊन उभी राहतात. आई-बाबांपासून काही गोष्टी लपून करू बघतात. मात्र, 'सुरक्षितता महत्त्वाची' इथून सुरवात केली, तर त्यातली आस्था त्यांना जाणवते आणि भावना पोचतात. मुलांना एखाद्या गोष्टीपासून रोखणं, हा बऱ्याचदा आईबाबांचा हेतू नसतो, तर 'मुलांना त्यातला धोका कळत नाही, अजून लहान आहेत,' हा विचार त्यामागं असतो. 

एकदा का एखाद्या निमित्तानं 'सुरक्षितता महत्त्वाची' आहे याकडे मुलांचं लक्ष वळवलं, तर प्रत्येक वेळेला वादाचे मुद्दे राहणार नाहीत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मोठं होण्याच्या या वयात त्यांना 'इतर कोणत्याही कारणापेक्षा आणि कोणाच्याही इगोपेक्षा आपल्या सुरक्षिततेची काळजी ही सर्वात महत्त्वाची आहे,' या पद्धतीनं विचार करण्याचं वळण लागेल. या वयात फ्रंट्‌ल लोबचा विकास होत असतो, स्वतंत्र व्हावंसं वाटतं, हे नैसर्गिकही आहे; पण धोका कळत नाही, हेही नैसर्गिकच आहे. हळूहळू मुलं आपल्यापासून स्वतंत्र होणार आहेत, याची ही सुरवात आहे. अशा वेळी आपण त्यांच्या वतीनं स्वीकारलेल्या आणि सांभाळलेल्या जबाबदाऱ्या त्यांना केव्हातरी सोपवायला हव्यात. त्यातली पहिली आणि महत्त्वाची म्हणजे स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेणं. या सर्व गोष्टी भांडून, संतापून, घरात कलह निर्माण करून योग्य गोष्टी घडतीलच असं सांगता येत नाही; पण आस्थेनं सांगितलं तर मात्र त्यांच्यापर्यंत नक्की पोचू शकतं. मात्र, त्यासाठी थोडा वेळ हवा आणि जास्त संयम हवा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com