साथ साथ (डॉ. श्रुती पानसे)

साथ साथ (डॉ. श्रुती पानसे)

‘आई-बाबांना आवडणार नाही,’ या कारणामुळं मुलं आई-बाबांपासून कित्येक गोष्टी लपवू बघतात. अर्थात मुलं पालकांना आवडत नाही म्हणून ती गोष्ट लपवतात- ‘करायची’ थांबवत नाहीत. यातून पुढं वाईट संगत, व्यसनं हा धोका निर्माण होऊ शकतो. असा कोणताही धोका निर्माण होऊ द्यायचा नसेल, तर आई-बाबांना सांगावं, असा मुलांच्या मनात विश्वास पाहिजे. आई-बाबा आणि मूल यांच्यामध्ये विश्वासाची भावना असणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे; पण विश्वास वेळोवेळी व्यक्त करावा लागतो. तरच मुलं आपल्याशी मोकळी होण्याचा निदान विचार तरी करतील. मुलांनी आपल्याशी येऊन बोलावं यासाठी पालकपणाची झूल थोडी बाजूला सरकवून त्यांचे मित्र-मैत्रिणी बनावं लागेल.

अंतर पडणं हे वाईटच! मग ते कोणतंही का असेना! म्हणून शक्‍यतो हात हातात हवेत. पाश्‍चात्त्य संस्कृतीत मूल चौदा-पंधराव्या वर्षी आई-बाबांपासून सुटं व्हायला लागतं. आपल्याकडं अजून ती परिस्थिती नाही. मात्र, याचा अर्थ घराघरांमधलं वातावरण अगदीच गुण्यागोविंदाचं असतं असंही नाही. 

कित्येक घरांमध्ये आई-बाबा म्हणतात ते आणि मुलांना वाटतं ते- यामध्ये भलंमोठं अंतर पडतं. स्वत:च्या मनात येणारे विचार आई-बाबांना ‘असलं काही’ आवडणार नाही, हे लक्षात येऊन बोलतच नाहीत. ‘त्यांना आवडणार नाही,’ याच कारणासाठी मुलं आई-बाबांपासून कित्येक गोष्टी लपवू बघतात. मैत्री लपवतात, क्‍लास बुडवणं लपवतात, हिंडणं-फिरणं लपवतात, यामुळंच धोका वाढतो. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की मुलं पालकांना आवडत नाही म्हणून ती गोष्ट लपवतात- ‘करायची’ थांबवत नाहीत. याला कारण कदाचित थ्रिल हवं हे असेल. गंमत असेल. मात्र, मुलं हे करतात हे नक्की! यातून पुढं वाईट संगत, व्यसनं हा धोका निर्माण होऊ शकतो. असा कोणताही धोका निर्माण होऊ द्यायचा नसेल, तर आई-बाबांना सांगावं, असा मुलांच्या मनात विश्वास पाहिजे. दुसरीकडे आईबाबांना असं वाटतं, की सावधगिरीच्या ढीगभर सूचना मुलांना द्याव्यात. ‘तुझ्यावर विश्वास आहेच; पण जगावर नाही.’ हे म्हणणं पालकांनी मुला-मुलींपर्यंत पोचवायला हवं. आई-बाबा आणि मूल यांच्यामध्ये विश्वासाची भावना असणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे; पण विश्वास वेळोवेळी व्यक्त करावा लागतो. तरच मुलं आपल्याशी मोकळी होण्याचा निदान विचार तरी करतील. मुलांनी आपल्याशी येऊन बोलावं यासाठी पालकपणाची झूल थोडी बाजूला सरकवून त्यांचे मित्र-मैत्रिणी बनावं लागेल. 

मुलं आणि पालक एकमेकांशी मन मोकळं करत असतील, तेव्हा दोघांनीही अतिशय शांतपणे प्रतिक्रिया द्यायला हवी. चित्रपटातल्या पारंपारिक आई-बाबांसारखी प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल; पण चिडून- संतापून बोललात, तर हा संवाद संपू शकतो. मैत्री टिकवायचा, आपला प्रयत्न आहे. तो चालू ठेवायचा आहे. पालकांची भीती वाटते, म्हणूनच मुलं घरात येऊन बोलत नाहीत. आपला दृष्टिकोन खाप पंचायतींसारखा नाही ना, हे तपासून बघायला हवं. कोणताही निर्णय घेताना मुलांना आणि मुलींना त्या निर्णयाच्या जास्तीत जास्त पैलूंकडं बघायला लावा. प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लावा. गाइडसारखे रेडीमेड उपदेश नकोत. चांगल्या आणि वाईट गोष्टींची चर्चा करायला हवी. त्यातूनच मार्ग सापडेल. हा मार्ग त्यांचा त्यांना सापडला तर ती त्याप्रमाणं वागतील. नाही तर तो धुडकावून लावण्याचीच शक्‍यताच जास्त. 

मुलं स्वतंत्र होऊ बघताहेत. त्यांचे प्रश्नही तितक्‍याच नाजूकपणे सोडवले गेले, तर खरं तर सर्वांच्याच दृष्टीनं योग्य ठरेल. मात्र, अजूनही बऱ्याच घरांमध्ये जिथं मुला-मुलींच्या बदलत्या आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वालाच स्वीकारलेलं नसतं. आम्ही म्हणू ते करायचं, अशी हुकूमशाही असते.  

एकमेकांचं ऐकून घेणं आणि स्वीकारणं म्हणजे दुसऱ्याची मनमानी सहन करणं असं नाही, तर जे काही चालू आहे, त्याबद्दल बोलत राहणं. जाणून घेणं. अंतर कमी करणं. शेवटी पालक आणि मुलं- मुली यांची दिशा एकच! स्वतंत्र निर्णय घेऊ बघतात, म्हणून त्यांचं एकदम शत्रूत रुपांतर होत नाही. हा गुंता विचारांनी सोडवणं महत्त्वाचं! मुलं जसजशी मोठी होतात, तसं त्यांचं क्षेत्र व्यापक होतं. अशा वेळेस मुलं आपल्यापासून दुरावताहेत की काय, अशी शंका पालकांच्या मनात येते. मुलं आपल्यापासून लांब जाऊ नयेत, म्हणून ते त्यांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या याच प्रयत्नात मुलं अजूनच लांब जातात. तुटतात. मुलांना वाटतं ः ‘माझं काहीच हे समजून घेत नाहीत.’ पालकाना वाटतं ः ‘आम्ही इतकं करतो, तरी मुलं आमच्याशी अशी का वागतात?’ मुलं जवळ असावीत असं वाटत असेल, तर आपलं वर्तुळ मोठं करायला हवंय. 

दोन कुटुंबांनी यावर उपाय काढला आहे. मुलांना शिंगं फुटली, की ती आई-बाबांमधले दोष काढायला लागतात, त्यांच्या तक्रारी वाढतात. यातून भांडणं आणि पुढे विसंवाद निर्माण होतात. हे सर्व होण्यापेक्षा मुलांना त्यांच्या मनातलं न घाबरता पालकांशी बोलता आलं, तर पुढचे अनेक प्रश्न मिटतील. यासाठी एका कुटुंबानं दर रविवारी सकाळची वेळ घरच्यांच्या मीटिंगसाठी ठेवली आहे. घरातले सर्व जण एकत्र बसून या आठवड्यात काय झालं याचा आढावा घेतात आणि पुढच्या आठवड्यात काय करायचं हे ठरवतात. त्यावेळी एकमेकांच्या खटकलेल्या गोष्टीही एकमेकांना सांगतात. मनं स्वच्छ होऊन पुढची दिशा ठरवणं सोपं जातं. भांडणातून मुद्दे बाहेर पडण्याऐवजी ज्या त्या वेळी, मनात साठून न ठेवता आणि शांतपणे बाहेर पडतात. याचा फायदा कुटुंबाला नक्कीच होतो. दुसऱ्या एका उदाहरणात एका कुटुंबानं विशिष्ट ठिकाणी एक पारदर्शक फोल्डर ठेवलं आहे. ज्यावेळेस एकमेकांना काही सांगायचंय; पण भीती वाटते आहे अशी परिस्थिती असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या नावे पत्र लिहून फोल्डरमध्ये ठेवलं जातं. ज्याच्या नावानं पत्र असेल, तीच व्यक्ती ते पत्र वाचते. अशा पद्धतीनं मन मोकळं करण्याच्या काही पद्धती विचारी कुटुंबांनी तयार केल्या आहेत.

मोठ्या माणसांसमोर एखादा प्रश्न उभा राहिला, त्यांना तो प्रश्न सोडवता येत नसेल तर ते आई-बाबा एकमेकांशी बोलतात. मित्र-मैत्रिणींशी बोलतात. त्या विषयावरची पुस्तकं वाचतात किंवा व्यावसायिक कन्सल्टंट्‌सची मदत घेतात. एकमेकांशी नुसतं बोलूनही त्यांचा ताण बराचसा कमी होतो. प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं काही मार्ग सापडतो. मात्र, वयात येणाऱ्या मुलामुलींसमोर असे कोणतेही उपाय नसतात. मुलंमुली शक्‍यतो आपल्या आई-बाबांबद्दल कोणाशी वाईट बोलत नाहीत. आपले प्रश्न शक्‍यतो मित्रमैत्रिणींसमोर, नातेवाईकांसमोर मांडत नाहीत. पुस्तकं वाचून, गुगल सर्च करून आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत नाहीत. त्यांनाही ताण असतो. विविध प्रकारचे ताण असतात. खूप सारे गोंधळ मनात असतात. शरीरात असतात. पण ती कोणाशीच बोलत नाहीत. समुपदेशकाकडं जावं वगैरे तर त्यांना सुचतही नाही. ती एकटीच सहन करत राहतात. अक्षरश: एकटीच! आपण खूप शूरवीर असण्याचा आव बाहेरून आणतात; पण मन मात्र अस्थिर, अस्वस्थ असतं. 

अशा वेळी एखाद्या प्रसंगात घरात भांडणं सुरू होतात. सगळ्यांचाच पारा चढतो. मुलांच्या उर्मट-उद्धट शब्दांचा पालकांना मनस्ताप होतो. दुसरीकडं मुलांमध्ये साठून राहिलेल्या ताणाचा अचानक स्फोट होतो. मुलं एकदम काहीतरी चुकीचं बोलून जातात. घरानं कधी न ऐकलेल्या शिव्या या स्फोटात बाहेर पडतात. आई-बाबांना अपमानास्पद वाटतील अशी वाक्‍यं ज्वालामुखीसारखी बाहेर पडतात आणि यामध्ये राख होते ती सगळ्यांच्याच भावनांची. यातून बाहेर पडणं सोपं नसतं. हा अवघड प्रसंग आपलं प्रेम, लाड, आदर, कौतुक यांच्या कसोटीचा असतो. ताणाच्या या स्फोटानंतरची परिस्थिती हाताळणं हेच खूप महत्वाचं असतं. कटुतेतून फक्त कटुताच जन्माला येते.... निदान त्या क्षणी कटुतेला डोक्‍यावर बर्फ ठेवून वळसा घालावा. पुन्हा त्याच जागेवर यावं. म्हणजे अंतर पडत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com