Gandhi Jayanti : शस्त्र अहिंसेचे...!

Gandhi Jayanti : शस्त्र अहिंसेचे...!

‘गांधी’ चित्रपटातील एक दृश्‍य आहे. सत्याग्रहाचे. हत्यारबंद ब्रिटिश पोलिसांची तुकडी उभी आहे. हातात लाठ्या घेतलेली. त्यांच्यासमोर एकामागे एक आडवी रांग करून गावकरी उभे आहेत. शांततेत. अंगात खादीचे स्वच्छ कपडे घातलेले. चेहऱ्यावर तणाव. बाजूला काही महिला स्वयंसेविका उभ्या आहेत. त्या परिचारिका. पुढे काय होणार हे त्यांना माहीत आहे. तयारीत आहेत त्या.

काही क्षण असेच तणावात जातात आणि एका क्षणी सत्याग्रहींची पहिली फळी पुढे सरकू लागते. ब्रिटिश अधिकारी त्यांना निघून जाण्याचा इशारा देतो. हे हटत नाहीत. पुढेच सरकत असतात. निर्धाराने. सरकत सरकत जवळ येतात ते पोलिसांच्या. आणि त्याचबरोबर त्या पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या डोक्‍यावर, अंगा-खांद्यावर सपासप कोसळतात. कोणाचे डोके फुटलंय, कोणाचे हाड तुटलंय. ते पाहताच त्या स्वयंसेविका धावतात. एकेकाला उचलून बाजूला नेतात. त्यांच्यावर प्रथमोपचार सुरू करतात. वाटते, संपले सगळे; पण नाही.

मागची तुकडी आता सरसावते. पुढे येऊ लागते. पुन्हा तेच घडते. त्याच लाठ्या, तीच डोकी फुटणे, रक्तबंबाळ होणे... आणि हे सारे न घाबरता, हातही न उचलता...

काय म्हणावे याला? भ्याडपणा, भिरुता? तिचा तर लवलेशही नव्हता तेथे. होते ते प्रचंड धैर्य, कळीकाळाचाही सामना करण्याची नीडरता. सोपे नव्हते ते. मनात आणले असते तर त्या गावकऱ्यांनी पोलिसांचा खिमा केला असता तेथे. पण, आपल्या वेदनेतून समोरच्याचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयोग सुरू होता तो त्यांचा. ती अहिंसा होती त्यांची. शूरांची अहिंसा. आणि तेच त्यांचे शस्त्रही होते.

इतर कोणत्याही शस्त्राने लढणे हे तसे सर्वसामान्यांसाठी कठीणच. समोरचा आपल्याहून शक्तिमान असला तर मग विचारायलाच नको. आणि समोर राज्यसंस्था असली तर? तिच्या बळासमोर कोणाचा निभाव लागणार? हे तर आपण रोजच अनुभवत आहोत. तुम्ही पिस्तुले झाडा, बॉम्ब फोडा; पण अखेर तुमचे संपणे अटळ असते. आणि सामान्य माणसे आणणार तरी कुठून ती शस्त्रे? साधी असतात ती. कुटुंबवत्सल वगैरे. जबाबदाऱ्या असतात त्यांच्या अंगावर जगण्याच्या, जगवण्याच्या. आणि त्याचमुळे राज्ययंत्रणेविरुद्ध लढणारे हे कोणत्याही काळात तुलनेने मूठभरच राहात आलेले आहेत. या मूठभरांच्या जोरावर थोडीबहुत जीवितहानी, वित्तहानी करता येते. स्वातंत्र्य नाही मिळवता येत. अपवाद अर्थात त्यालाही आहेत; पण त्यामुळेच तर नियम सिद्ध होतो. अशा वेळी करायचे काय?

येथे आपल्याला गांधी भेटतात. अहिंसावाले गांधी. आज राज्ययंत्रणा ती लोकशाहीतील असो की, हुकुमशाहीतील. अत्यंत प्रबळ झालेली असताना, आधुनिक तंत्रज्ञानाच्या योगे तिची नजर लोकांच्या शयनगृहांपर्यंत पोहोचलेली असताना तिच्याविरोधात उभे राहण्याची वेळ आलीच, तर हे सत्य आणि अहिंसावाले गांधीच उपयोगी पडू शकतात. मर्यादा आहे त्या अहिंसेला. ती पिस्तुलाची गोळी चुकवू शकत नाही. अणुबॉम्ब अडवू शकत नाही; पण बॉम्ब टाकू पाहणाऱ्या, लाठ्याकाठ्या मारू पाहणाऱ्या मनांशी लढू गेलो, तर कदाचित ती अहिंसा उपयोगी ठरू शकते. त्यात डोकी फुटतील; पण इप्सित साध्य होण्याची त्यात अधिक हमी आहे. हे अण्णा आंदोलनाने दाखवून दिले. अरब क्रांतीतून दिसले. तत्पूर्वी मंडेलांनी त्याचा प्रयोग केला. ऑग सान स्यूची ने तो मार्ग पत्करला.

तो मार्ग शूरांच्या अहिंसेचा होता. दुर्बलांच्या अहिंसेला तसेही कोण विचारते? गांधीजींना तशी अहिंसा अभिप्रेतच नव्हती.

************************************

गांधीजींचे चरित्र आणि माझ्या अनुभवावरून मी अहिंसा शिकलो आहे. मानवी आयुष्य हे ईश्‍वराने दिलेले अतिशय खास भेट आहे आणि कोणत्याही कारणास्तव कोणालाही ते काढून घेण्याचा अधिकार नाही. अहिंसा ही हिंसेपेक्षा प्राभवी आहे.
- सिझर चॅवेझ (अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीतील नेते)

हिंसेचे विरोधक म्हणून गांधीजींनी वाईट गोष्टींचा विरोध केला. त्यांनी द्वेष करण्याऐवजी प्रेमाने प्रतिकार केला. अस्सल शांततावादी वाईट गोष्टीला अवास्तविकतेला किंमत देत नाही. प्रेमाच्या शक्तीने वाईटाचा प्रतिकार करण्यात खरे धैर्य आहे.
 - मार्टिन ल्युथर किंग (अमेरिकेतील नागरी हक्क नेते)

महात्मा गांधी आले आणि भारतातील लाखो असहाय लोकांच्या दाराजवळ उभे राहिले. त्यांचे वस्त्र परिधान केले, त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलले... त्यांनी भारतीय लोकांचा विशाल जनसमुदाय त्यांचा देह आणि रक्त म्हणून स्वीकारला आहे. 
- रवींद्रनाथ टागोर (लेखक, कवी)

गांधीजींच्या अनेक सिद्धांतांमध्ये वैश्‍विक उपयोगिता आणि शाश्‍वत वैधता आहे. मी आशा करतो की, भविष्यात शांततेच्या प्रचारासाठी त्यांचे सिद्धांत आजच्या एवढेच उपयोगी ठरतील. 
- यु थांट (म्यानमारचे सनदी अधिकारी)

गांधीजींचे विचार आमच्या काळातील इतर राजकीय व्यक्तींपेक्षा अधिक तेजस्वी होते. आपल्या स्वार्थासाठी हिंसाचार न करता आणि ज्यामध्ये वाईट गोष्टी आहेत, त्यात सहभागी न होता मार्गक्रमण करणे फायदेशीर आहे.
- अल्बर्ट आइन्स्टीन, भौतिकशास्त्रज्ञ

महात्मा गांधी केवळ भारतीय इतिहासाचे नायक नसून, संपूर्ण जगाच्या स्मृतीत त्यांनी स्थान निर्माण केले आहे. पाश्‍चात्य देशातील लोकांनी त्यांच्या ख्रिस्ताबद्दलच्या विचाराचे नूतनीकरण केले. 
- रोमां रोलाँ, (फ्रेंच नाटककार) 

गांधीजींची विचारसरणी भविष्यातील जागतिक राजकीय संरचनेचे नेतृत्व करू शकते. ज्या संरचनेत अण्वस्त्रांपेक्षा गांधीविचार त्या देशाला अधिक सुरक्षित ठेवतील. इतर राष्ट्रांना दुर्लक्षित करण्यापेक्षा त्यांच्या स्वारस्यात सहभागी करून भविष्याची वाटचाल करता येईल.
- वॉर्नर हेसनबर्ग (जर्मन भौतिकतज्ज्ञ)

मला खात्री आहे की, गांधीजींचे शत्रूदेखील मान्य करतील की, ते असामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या विचाराने जगाला प्रेरणा दिली. गांधीजी सत्याबद्दल इतके वचनबद्ध होते की, लोकांना आणि त्यांच्या शत्रुंनाही त्याबद्दल प्रचंड आदर वाटायचा.
- जॉर्ज ऑरवेल,(ब्रिटीश लेखक, पत्रकार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com