प्रत्येक भूमिकेवर मनापासून प्रेम! (जयंत सावरकर)

‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकातील एका प्रसंगात जयंत सावरकर.
‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकातील एका प्रसंगात जयंत सावरकर.

गेली ६१ वर्षं मी रंगभूमीवर काम करतो आहे आणि त्याच्या आधीही दहा-बारा वर्षं बॅकस्टेजवर काम करण्याच्या रूपानं रंगभूमीशी जोडला गेलो होतोच. ‘एकच प्याला’मधला तळीराम, ‘तुझं आहे तुजपाशी’मधला श्‍याम आणि आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधला अंतू बर्वा, हरितात्या अशा किती तरी भूमिकांनी मला खूप काही दिलं. बहुतेक सगळ्या जुन्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. या सगळ्या भूमिका करताना आधीच्या कलाकारांकडून काय घेता येईल, हे मी बघितलं. प्रत्येकाकडून काही ना काही शिकत गेलो. प्रत्येक भूमिकेवर मी मनापासून प्रेम केलं.

मी  केलेल्या प्रत्येक भूमिकेवर मनापासून प्रेम केलं. त्यामुळं माझी प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या दृष्टीनं चांगली होती. माझा रेकॉर्ड असा आहे, की मी आज ६१ वर्षं रंगभूमीवर काम करत आहे. त्याआधी दहा-बारा वर्षं बॅकस्टेजवर काम केलं आहे. परंतु, त्याची मोठी दखल घेतली गेली नाही, याची एक सल मनात आहे. मी किती तरी नाटकांमध्ये त्या नाटकांतल्या मूळ पात्रांची रिप्लेसमेंट केली आहे. ‘एकच प्याला’ हे राम गणेश गडकरी यांचं नाटक फार गाजलं. १९१८ मध्ये हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं. या नाटकात ‘तळीराम’ची भूमिका माझ्या आधी कितीतरी दिग्गजांनी साकारली. आता ती मी करत आहे आणि गेल्या ३० वर्षांत मी केलेली ही तळीरामची भूमिका लोकांना सगळ्यांत जास्त आवडली. आजकाल या नाटकाचे फार प्रयोग होत नाहीत. अमेरिकेत आमच्या या नाटकाचा प्रयोग झाला होता, त्या वेळीही माझ्या तळीरामच्या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. खरंतर तळीराम हा नाटकातला खलनायक आहे, असं खूप लोक समजतात; पण मला तसं वाटत नाही. तळीरामानं ‘मदिरा मंडळ’ स्थापन केलं. पण त्यामुळं सुधाकरला त्यानं दारूची सवय लावली, ही गोष्ट मला पटली नाही. ते पूर्ण नाटक त्यासाठी वाचलेलं असलं पाहिजे. बहुतेक कलाकार फक्‍त त्यांचीच भूमिका वाचतात; पण सगळ्या भूमिका वाचल्यानं त्यांना दुसऱ्या पात्रांची ओळख होते. पाच अंकी असणारं नाटक हे दोन अंकांत करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा प्रत्येक पात्रांचे वेगवेगळे कंगोरे त्यात समाविष्ट नसतात; त्यामुळं पूर्ण नाटक वाचणं हे आवश्‍यक आहे. त्यामुळं नाटक पूर्ण वाचल्यावर तळीराम हा खलनायक नाही, असं माझं मत बनलं आहे.

मी ‘एकच प्याला’मध्ये काम करायला सुरवात केली, ती अगदी छोट्या भूमिकेपासून. तळीरामच्या ‘मदिरा मंडळा’त दारू वाढणाऱ्या मुलाच्या भूमिकेपासून सुरवात केली आणि एक-एक पायरी वर चढत गेलो. त्याच नाटकात मी भगीरथाचं काम केलं, तेव्हा माझ्या आकांक्षा वाढल्या आणि तळीरामची भूमिका आपण का करू नये, असा विचार माझ्या मनात आला. रंगभूमीवर जेवढे गाजलेले तळीराम आहेत, त्या सगळ्या कलाकारांबरोबर मी भगीरथाचं काम केलं होते आणि मी त्यांची कामं पाहिली होती. त्यामुळं मला तळीरामची भूमिका करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी प्रत्येक कलाकाराकडून थोडं-थोडं चांगलं घेतलं आणि माझ्या दृष्टिकोनातून तळीरामचं स्वतंत्र व्यक्‍तिमत्त्व लोकांसमोर मांडलं. त्यामुळं मी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या सगळ्या जुन्या नाटकांचं शिक्षण मी जोगळेकर यांच्याकडून घेतलं. तळीराम हा कायम दारू पितो, त्यामुळं त्याच्या बोलण्यात दारूचा प्रभाव फारसा दिसता कामा नये, असं त्यांनी मला तळीरामच्या भूमिकेबद्दल सांगितलं. कारण वर्षानुवर्षं दारू प्यायल्यामुळं तळीरामचा आवाज तसाच झाला आहे. त्याचं नेहमीचं बोलणंही नशेत असलेल्या माणसासारखंच आहे. तो त्याचं भान पूर्णपणे गमावतो, अशा त्यासाठी मग विशिष्ट ठिकाणीच त्याच्या आवाजातला वेगळा फरक जाणवला पाहिजे. नाही, तर पूर्ण नाटकात एकाच थोड्याफार नशेच्या आवाजात तळीराम बोलत असतो.  

‘व्यक्‍ती आणि वल्ली’ मधला अंतू बर्वा आणि हरितात्या याही माझ्या आवडत्या भूमिका आहेत. मी जुन्या बहुतेक सगळ्याच नाटकांमधून काम केलं आहे. ‘सौजन्याची ऐशी-तैशी’मधली मंडलेकर नावाची भूमिकाही मला आवडते. मला अजूनही त्याबद्दल बऱ्याच जणाचे फोन येतात ‘आम्हाला कंटाळा आला, किंवा विरंगुळा म्हणून आम्ही ‘सौजन्याची ऐशी-तैशी’ हे नाटक लावतो आणि दोन-तीन तास पोटभर हसतो,’ असं ते सांगतात. ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’, ‘एकच प्याला’, ‘भावबंध’, ‘राजसंन्यास’, ‘प्रेमसंन्यास’ अशा बहुतेक सगळ्या जुन्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. या सगळ्या भूमिका करताना आधीच्या कलाकारांकडून काय घेता येईल, हे मी बघितलं. प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकत गेलो. त्यामुळं मला माझ्या सगळ्याच भूमिका आवडल्या आहेत. अशीच एक भूमिका म्हणजे ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकातली.

‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाशी मी पहिल्यापासून जोडला गेलो आहे. १९५७ मध्ये हे नाटक आलं, तेव्हा मी या नाटकासाठी बॅकस्टेजला काम करत होतो. पु. ल. देशपांडे यांनी या नाटकाच्या घेतलेल्या तालमी मी बघितल्या होत्या. त्यामुळं मी या नाटकात काम करीन, तर श्‍यामचीच भूमिका करीन, असं मी मनाशी निश्‍चित केलं होते. ते नाटक साहित्य संघाकडून बाहेर येऊन सगळीकडं त्याचे प्रयोग होऊ लागले, तेव्हा त्यात मला श्‍यामची भूमिका करायला मिळाली. श्‍यामचं काम मी ७००-८०० प्रयोगांमध्ये केलं आहे. पण त्यानंतर मी ते बंद केलं आणि नंतर त्याच नाटकात आचार्यांची भूमिका करायला सुरवात केली. श्‍यामची भूमिका सरळपणानं बोलण्याचीच भूमिका आहे. कुठंही फार अभिनय करण्याची गरज भासत नाही. फक्‍त चेहरा निरागस दिसण्याची गरज असते. तरच त्यातली मजा प्रेक्षकांना घेता येते आणि विनोद कळतो. त्या निरागसपणामुळं तो किती अनभिज्ञ आहे, ते समजते आणि त्याला व्यवहारज्ञान नाही, हे कळतं. मुद्दाम कोणी विनोद करायला गेलं, तर तो प्रयोग फसतो, असं मला जाणवलं. या श्‍यामच्या भूमिकेमुळे मला खूप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. मी श्‍यामची भूमिका करत असताना राजा परांजपे, श्री. जोगळेकर, चंद्रकांत पेंडसे, मामा गोखले या दिग्गजांनी आचार्याची भूमिका केली होती. मी आचार्यांची भूमिका केली तेव्हा परखड, स्पष्ट बोलणं, हे मामांकडून घेतले, तर रिॲक्‍शन्स मी राजा परांजपे यांच्याकडून घेतल्या. मी प्रत्येक कलाकाराकडून काही ना काही घेतल्यामुळे मी जेव्हापासून आचार्यांची भूमिका करायला घेतली, तेव्हापासून शेवटचा पडदा पडण्यापूर्वी टाळ्यांच्या कडकडाटानं नाट्यगृह दुमदुमून जायचं.

‘रिंगा रिंगा’ या चित्रपटात मी सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांची भूमिका केली होती. या भूमिकेची गंमत अशी, की मला या भूमिकेसाठी आयत्या वेळी बोलावलं गेलं. माझी भूमिका नेमकी काय आहे, ते मला तिथं गेल्यावर कळलं. त्यामुळं त्या भूमिकेच्या तयारीसाठी फार काही करता आलं नाही; पण चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या अनेक सहकलाकारांचे मला फोन आले आणि माझा अभिनय हा खूपच नैसर्गिक झाला आहे, असं त्यांनी मला सांगितलं. ते ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण माझा नेहमीच नैसर्गिक अभिनय करण्याकडंच जास्त कल असतो. मी स्वत:ला दामू केंकरे यांचा शिष्य म्हणवतो. काही संस्कार माझ्यावर सुधा करमरकर यांनी केलेले आहेत. त्यांच्या बालरंगभूमीमुळंच मला कोणत्याही प्रकारचं काम करण्याची शक्ती आणि स्फूर्ती मिळाली. त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका मला दिल्या आणि मी अष्टपैलू भूमिका करायला शिकलो. माझे उच्चार जन्मजातच स्पष्ट होते; पण त्याला पैलू पाडण्याचं काम सुधा करमरकर यांनी केले. संयम ठेवून भूमिका कशी करायची हे मी दामू केंकरे यांच्याकडून शिकलो.    

सध्या ‘अ..आईचा ब...बाईचा’ या नाटकात मी आजोबाची भूमिका करतो आहे. त्या नाटकांत चार कुटुंबांची कथा दाखवली आहे आणि प्रत्येक कुटुंबात मी आजोबांचीच भूमिका करत आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे, की खूप पात्रांची गरज असतानासुद्धा हे नाटक सहा पात्रांमध्ये फिरवलं आहे. माझी भूमिका या नाटकांत तरुण पिढीची बाजू घेणारी आहे. तररुण पिढीचे विचार आता आपल्याला कसे काळानुरूप पटवून घ्यायला पाहिजेत, याचं विश्‍लेषण करणारी ही भूमिका आहे. ही भूमिका करताना नैसर्गिक भूमिका होण्यासाठी स्वत:ला ते विचार आधी पटणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं मी या नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि त्यांचे विचार त्यांच्या दृष्टीनं कसे बरोबर आहेत, हे मला पटलं. त्यामुळं ती भूमिका करताना मला फार काही मेहनत करावी लागली नाही. माझे बाबा मला म्हणायचे, ‘‘नाटकात तुम्ही काम करता तेव्हा अनेक कठीण प्रसंगांना तोंड देणाऱ्या भूमिका साकारता. गंभीर परिस्थितीतून मार्ग काढताना त्या भूमिका दिसतात. अनेक प्रसंग आणि उपाय तुमच्यासमोर येतात. मग खऱ्या आयुष्यात असे प्रसंग येतात. तेव्हा ते उपाय आपण का नाही करू शकत? त्या प्रसंगांना तोंड देताना तुम्हाला कठीण जाऊ नये.’’ मी या गोष्टीचा विचार केला आणि माझ्या आयुष्यातही काही बदल झाले. माझ्या कुटुंबाकडं बघण्याचा माझा दृष्टिकोनही बदलला.  

माझ्या वाट्याला ज्या भूमिका आल्या, त्या सगळ्या करुण रसातल्या भूमिका होत्या. त्यामुळं माझ्या खासगी आयुष्यातसुद्धा मी भावूक बनलो आहे. त्यामुळं अशा भूमिका करताकरता त्याची इतकी सवय झाली आहे, की कोणतीही भूमिका करताना मला डोळ्यात कधीही ग्लिसरीन घालावे लागले नाही. आणि माझा नैसर्गिक अभिनय करण्याचा पण कायम राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com