आइसलॅंड... ‘लॅंड ऑफ फायर’

jayprakash pradhan
jayprakash pradhan

आइसलॅंड या देशाची ओळख ‘लॅंड ऑफ फायर अँड आइस’ अशी करून दिली जाते. अग्नी आणि बर्फ हे दोन्ही विरोधाभास एकत्र नांदत असल्याचं आगळंवेगळं दृश्‍य तिथं पाहायला मिळतं. उत्तर अटलांटिक आणि आर्क्‍टिक ओशन यांच्यामध्ये वसलेलं आइसलॅंड प्रजासत्ताक हे अशा परस्परविरोधी नैसर्गिक चमत्कारांनी व्यापलं आहे. इथं बर्फाच्या मोठमोठ्या ग्लेशिअर्सबरोबरच अत्यंत ज्वलंत असे ज्वालामुखीही आढळून येतात. अंतर्गत भागात वाळू आणि लाव्हारसाची पठारं, उंचच उंच पर्वत आणि बर्फाचे ग्लेशिअर दिसतात. देशाच्या विविध भागांतून असंख्य हिमनद्या सागराला जाऊन मिळतात. अनेक ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत, त्यामुळं आर्क्‍टिक सर्कलच्या अगदी जवळ असूनही तिथं सौम्य हवामानही आढळतं आणि आर्क्‍टिक सर्कलचा परिसर आणि सागरी प्रभावामुळं इथल्या बहुतेक बेटांवर उन्हाळ्यातही चांगली थंडी जाणवते. आइसलॅंडची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात असून, क्षेत्रफळ एक लाख तीन हजार चौरस किलोमीटर आहे. युरोपमधला अत्यंत विरळ लोकवस्तीचा देश म्हणून तो ओळखला जातो. रेजाविक (Reykjavik) हे राजधानीचं आणि सर्वांत जास्त लोकवस्तीचं शहर. या वेळी मी सपत्नीक ग्रीनलॅंड आणि आइसलॅंड अशा दोन देशांमध्ये फिरणार होतो. डेन्मार्कमधून प्रथम ग्रीनलॅंडमध्ये आम्ही प्रवेश करायचं ठरवलं, त्यामुळं डेन्मार्कचा शेजेन व्हिसा घेतला आणि आइसलॅंड हे शेजेन राष्ट्रच असल्यानं त्या व्हिसावर आइसलॅंडमध्येही फिरणं आम्हाला शक्‍य झालं. आमची ग्रीनलॅंडची बारा दिवसांची क्रूझ सफर, आइसलॅंडची राजधानी रेजाविक इथं संपली. तिथून आम्ही आइसलॅंड ट्रॅव्हल कंपनीची ‘आइसलॅंड कम्प्लिट’ ही दहा दिवसांची सहल घेतली. त्यातून आइसलॅंडच्या पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर सर्व दिशांना बसमधून मनसोक्त भटकलो आणि रेजाविकला आणखी पाच दिवस राहून, जे बघायचं राहिलं होतं, तेही बघून घेतलं. अशा प्रकारे आइसलॅंडमध्ये पंधरा दिवसांत सुमारे पाच- साडेपाच हजार किलोमीटर फिरलो. एक अगदी आगळावेगळा असा तो अनुभव म्हणावा लागेल. 
आइसलॅंडची वसाहत नवव्या शतकातली आहे. त्यानंतर प्रामुख्यानं नॉर्वेजियन आणि स्कॅंडेनेव्हियन लोकांनी तिथं वास्तव्य केलं. या देशाला १९१८मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि १७ जून १९४४मध्ये ते प्रजासत्ताक बनलं. युथोपियन समूहाचं सदस्यत्वही त्यांना १९९४मध्ये प्राप्त झालं. आइसलॅंडिक क्रोना हे इथलं स्थानिक चलन आहे. 

गरम पाण्याची सुंदर कारंजी 
राजधानी रेजाविक इथं पाच-सहा दिवसांचा मुक्काम करून, आसपासच्या अन्य काही सहली करता येतात. त्यात गोल्डन सर्कल टूर ही महत्त्वाची. त्याची सुरवात आम्ही जमिनीतून वरती उसळणाऱ्या गरम पाण्याच्या कारंज्यापासून (गायझर) केली. अमेरिकेत यलो स्टोन नॅशनल पार्कमध्ये आम्ही दोन दिवस मुक्काम केला होता. तिथलं ओल्ड फेथफुल कारंजं आणि अन्य गरम पाण्याची रंगीबेरंगी डबकी आम्ही चांगली पाहिली होती. त्यामुळं आइसलॅंडच्या भूऔष्णिक (जिओथर्मल) क्षेत्राबद्दल मोठं कुतूहल होतं. इथं जिवंत ज्वालामुखीच्या क्षेत्रात अत्यंत उच्च तापमानाचे गायझर, झरे आढळून येतात. जमिनीच्या खाली तीन हजार फुटांपर्यंत त्यांचं तापमान ४६० फॅरनहाइटपर्यंत (२४० अंश सेल्सिअस) वाढू शकतं. हे ‘गायझर जिओथर्मल’ क्षेत्र जवळजवळ तीन चौरस किलोमीटर परिसरात पसरलं आहे. भूरचना शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, इथले गायझर्स निदान दहा हजार वर्षांपासून अस्तित्वात आहेत. हे गायझर्स- गरम पाण्याचे झरे निरनिराळ्या नावांनी ओळखले जातात. त्यातलं ‘स्ट्रोकूर’ (Strokkur) हे मुख्य आकर्षण मानण्यात येतं. गरम पाण्याचं हे कारंजं दर दहा मिनिटांनी उडतं. ते उडण्याच्या काही क्षण आधी त्याच्या तोंडाशी सुंदर निळे बुडबुडे जमायला लागतात आणि मग जमिनीतून हळूहळू वाफ वर येण्यास सुरवात होते. ती जमिनीपर्यंत पोचली, की पाणी एकदम १०० ते १३० फूट उंच कारंजाप्रमाणं बाहेर पडतं. अर्थात, प्रत्येक वेळी त्याची उंची कमी-जास्त होते. हे कारंजं वर उडतं, तेव्हा खरोखरच मोठं आकर्षक वाटतं आणि त्या वेळी ‘यलो स्टोन’ची आठवण येते. स्ट्रोकूर गायझर हा १७८९मध्ये झालेल्या भूकंपातून तयार झाला आणि १८९६च्या दुसऱ्या भूकंपापर्यंत तो ॲक्‍टिव्ह होता. १९६३मध्ये त्याचा प्रवाहमार्ग जवळजवळ मोकळा झाला आणि आता तो नियमितपणे उडतो. त्याच्या आजूबाजूला आणखी काही गायझर्स आहेत. इथंही एकाचं नाव ‘ओल्ड फेथफुल’ आहे. तो तीस ते शंभर मिनिटांच्या कालावधीत उडत असे. ‘स्टीम होल’ बेभरवशाचा म्हणावा लागेल, कारण तो वर्षातून कधी तरी उडतो. हे गायझर्स पाहण्यासाठी वर्षभर पर्यटकांची भरपूर गर्दी असते. 

तिथून जवळच हविता नदीवरचा ‘गुलफॉस’ (gulfoss) `गोल्डन धबधबा’ हासुद्धा अतिशय पाहण्यासारखा आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात तो अक्षरशः प्रचंड आवाज करत नुसता कोसळत असतो. हिवाळ्यात मात्र तो पूर्णतः गोठून जणू स्तब्ध बर्फासारखा होतो. गुलफॉस दोन टप्प्यांत कोसळतो, म्हणजे त्याचे दोन धबधबे तयार झाले आहेत. त्याच्यामध्ये दोन किलोमीटरची दरी निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यात तो दहा मीटर्स खाली कोसळतो. अगदी समोरून ते दृश्‍य मस्त पाहता येतं. मग हविता नदी एकदम वळते आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी वीस मीटर्स खाली उडी घेते. गुलफॉस धबधब्याची एकूण लांबी ही जवळजवळ अडीच किलोमीटर असून, एकूण खोली ७० मीटर आहे. या धबधब्यातून १०९ क्‍युबिक मीटर्स पाणी दर सेकंदाला कोसळतं. म्हणजे पाण्याची वाहतूक करणारे साठ मोठे कंटेनर इथं एका सेकंदात भरू शकतील, असं सांगण्यात आलं. 

पण एवढ्यापुरतंच या धबधब्याचं महत्त्व नाही. त्याच्यामागं फार मोठ्या स्त्रीशक्तीची कहाणी लपलेली आहे. या धबधब्याच्या ठिकाणी, पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करण्याची योजना आखण्यात आली. ज्यांच्या जागेत हा धबधबा होता, त्यांनी आणि सरकारनंच ही योजना तयार केली आणि तिला अंतिम मंजुरीही मिळाली. पण, त्या जागेच्या मालकाची मुलगी सिगरिअर (sigriour) हिनं मात्र त्या प्रकल्पाला जोरदार विरोध केला. हा भाग नैसर्गिकरीत्या आहे तसाच राहिला पाहिजे, असा तिचा आग्रह होता. त्यासाठी तिनं चक्क वडील आणि सरकार यांच्याविरुद्ध लढा उभारला. आजूबाजूच्या गावकऱ्यांनीही तिला चांगला पाठिंबा दिला. त्यामुळं प्रकल्पाचं काम सुरूच होऊ शकलं नाही. नंतर ती सारी मालमत्ता एका बड्या उद्योगपतीनं विकत घेतली. तो उद्योगपती निसर्गप्रेमी होता, त्यामुळं धबधब्याची संपूर्ण जमीन, १९७६मध्ये आइसलॅंड निसर्ग संरक्षण संस्थेलाच त्यानं दान म्हणून दिली. 

सुंदर ‘ब्ल्यू लगून’ 
रेजाविक इथलं ‘ब्ल्यू लगून जिओथर्मल पूल’ (गरम पाण्याचं कुंड) हे जगातल्या पंचवीस आश्‍चर्यांपैकी एक मानलं जातं. या ‘ब्ल्यू लगून जिओथर्मल (भूऔष्णिक) स्पामध्ये स्वारसेगी थर्मल वॉटर प्लॅंटमधून येणाऱ्या गरम, कोमट पाण्यात डुंबण्याची खास सोय करण्यात आली आहे. त्या पाण्यामध्ये सल्फर डायॉक्‍साईड, सिलिका आणि अन्य काही खनिजं असतात. ती औषधी मानण्यात येतात. त्यामुळं ज्यांना विशेषतः कातडीचे विकार आहेत, त्यांच्यासाठी ते गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. या पाण्याचा शोध सर्वप्रथम १९८०च्या सुरवातीला लागला. हा संपूर्ण प्रदेश उन्हाळ्यातही चांगला थंड असतो. त्यामुळं सुरवातीला स्थानिक लोक या गरम पाण्यात बसण्याची, स्नान करण्याची मजा लुटू लागले. ते पाहून प्रशासनानं त्यात विविध सोयी करण्यास सुरवात केली. बाहेर आठ-दहा अंश सेल्सिअस तापमान असताना, १०० फॅरनहाइट (३८ अंश सेल्सिअस) तापमानाच्या गरम, औषधी पाण्यात डुंबणं सर्वांनाच आवडू लागलं. आता या ब्ल्यू लगूनमध्ये ९० लाख लिटर पाणी ठेवण्यात येतं. यातल्या सिलिकावर सूर्यकिरण पडून ते परावर्तित होतात, त्यामुळं हा लगून निळा आणि अतिशय सुंदर दिसतो. वर्षभर पर्यटकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, गरम पाण्यात मसाज, स्किन ट्रीटमेंट घेऊन आरामात उत्तम जेवणाची सोयही तिथं करण्यात आली आहे. 
रेजाविकपासून काही अंतरावर आइसलॅंडच्या दक्षिण किनाऱ्यावर ‘वेस्टमन अय्यर’ नावाचं एक मुख्य बेट असून, त्याच्या आजूबाजूला छोटी-छोटी बेटं आहेत. तिथली एकूण स्थानिक लोकवस्ती जेमतेम चार हजार. फेरीनं तिथं जाता येतं. वेस्टमन अय्यर आणि परिसरातल्या बेटांकडं साऱ्या जगाचं एकदम लक्ष वेधलं गेलं ते १९७३ मध्ये तिथं झालेल्या ज्वालामुखीच्या अतिप्रचंड उद्रेकामुळं. इथल्या हैमेपान या बेटावर हा उद्रेक सर्वप्रथम झाला. ज्वालामुखीचा रुद्रावतार एवढा होता, की सारं विश्‍व अक्षरशः स्तीमित झालं. त्या वेळी समुद्र अक्षरशः पेटला होता आणि गरम दगडांचा (Hot stones) पाऊस पडू लागला. ज्वालामुखीच्या या उद्रेकामुळं सारं गाव उद्‌ध्वस्त होणार, कोणीच जिवंत राहणं शक्‍य नाही, अशीच भीती वाटत होती. पण गावकऱ्यांचं नशीब मोठं बलवत्तर. या ज्वालामुखीच्या आधी प्रचंड वादळ झालं होतं. त्यामुळं सर्व बेटांवरच्या मच्छीमारांच्या १८० बोटी बंदरातच नांगरून ठेवल्या होत्या. त्यामुळं गावातल्या ५२०० लोकांना येथून त्वरित हलवणं शक्‍य झालं. या आपत्तीत केवळ एक माणूस मृत्युमुखी पडला; पण तो ज्वालामुखीमुळं नव्हे, तर खोलीत वायू कोंडला गेल्यामुळं. कोणतीही आपत्कालीन योजना तयार नसतानाही, गावकऱ्यांच्या तत्परतेमुळं आणि कर्तव्यदक्षतेमुळं सर्वांचे प्राण वाचले. साऱ्या युरोपमध्ये त्याचं कौतुक झालं. ज्वालामुखीचा हा उद्रेक इतका जबरदस्त होता, की पूर्वी या बेटाचं क्षेत्रफळ ११.२ चौरस किलोमीटर होतं. ते वाढून १३.४ चौरस किलोमीटर झालं. इथं दगड आणि माती यांचं मिश्रण असलेला टेफ्रा दर सेकंदाला १८० टन या वेगानं पाच महिने दहा दिवस बाहेर पडत होता आणि एकूण ५० दशलक्ष क्‍युबिक मीटर्स लाव्हा वर आला. त्यामुळं वेस्टमनअय्यर हे महत्त्वाचं बंदरच नामशेष होण्याची भीती वाटत होती. लाव्हा प्रचंड प्रमाणात ओकला गेल्यानं बंदराचं प्रवेशद्वार अरुंद झालं. ते पूर्ण अरुंद होऊ शकलं असतं आणि अशा परिस्थितीत वेस्टमनअय्यरचा साऱ्या जगाशीच संपर्क तुटला असता. परंतु, लाव्हा शांत करण्याच्या अथक प्रयत्नांमुळं बंदराच्या दिशेनं लाव्हाचा ओघ थांबवण्यात यश आलं. तीन जुलै १९७३ रोजी वेस्टमनअय्यर इथला ज्वालामुखीचा उद्रेक थांबला असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं. ती शनिवारची रात्र होती. त्यामुळं बेटावरचे पबचे दरवाजे उघडण्यात आले. ती रात्र लोकांनी नाच, गाणी म्हणून साजरी केली. आता गावात एक व्होल्कॅनिक म्युझियम उभारण्यात आला आहे. ७३च्या ज्वालामुखीत घरांची, रस्त्यांची कशी दुर्दशा झाली होती, याची कल्पना म्युझियमला भेट दिल्यानंतर येते. 

कमालीचं प्रादेशिक वैविध्य 
आइसलॅंडच्या पूर्व-पश्‍चिम, दक्षिण-उत्तर भागांत फिरताना, ठिकठिकाणी लॅंडस्केपिंगमध्ये कमालीची विविधताच आढळून येते. कुठं हिरवळ, त्यात चरण्यासाठी बसलेल्या मेंढ्या, तर काही ठिकाणी जमिनीतून चक्क वाफा वर येताना दिसतात. तिथल्या गरम पाण्याची रंगीबेरंगी डबकी पाहून आपण थक्क होतो. बऱ्याच जागी ज्वालामुखीमुळं तयार झालेली काळी जमीन, कातरलेले डोंगर, मैलोन्‌ मैल पसरलेले, विखुरलेले लहान-मोठे नानाविध आकारांचे दगड पाहायला मिळतात. अस्कजा हा जगद्विख्यात ज्वालामुखी इथलाच आहे. त्याचा प्रचंड मोठा उद्रेक १८७५मध्ये झाला. त्यातून तिथली आजची पर्वतराजी तयार झाली. 
हॅवानॅडल (Havannadal) हा इथला महत्त्वाचा व्होल्कॅनिक ग्लेशिअर म्हणून ओळखला जातो. तिथं सगळीकडं काळ्या रंगाचे बर्फाचे अजस्र कडे दिसत होते. काळ्या बर्फाचा हा डोंगर आम्ही प्रथमच पाहत होतो. त्याच्या पायथ्याशी गेलो. लांबवर लहान-मोठ्या टेकड्याही तयार झाल्या होत्या. भूगर्भातल्या ज्वालामुखीमुळं त्याला हा काळा रंग प्राप्त झाला होता. हा ग्लेशियर तीन ते पाच हजार वर्षांचा जुना आणि त्याची उंची २११९ मीटर्स एवढी आहे. आम्ही जिथं उभे होतो, त्यापासून काही अंतरावरून एक नदी वाहत होती आणि त्यातून हे काळेकुट्ट बर्फाचे, लहानमोठ्या आकाराचे हिमनग पुढं सरकत होते. आम्ही बाजूच्या पायऱ्यांवरून थोडं आणखी वर चढलो, तेव्हा समोर एक प्रचंड मोठा काळा हिमनग जबरदस्त आवाज करत तुटला. याआधी पांढरे, निळे हिमनग तुटताना आम्ही पाहिले होते; पण इथलं ग्लेशिअर आणि त्यापासून तुटलेले हिमनग चक्क काळेकुट्ट होते. त्यांचे लहान-मोठे अनेक तुकडे होऊन ते तिथं आपोआप तयार झालेल्या नदीच्या पात्राच्या दिशेनं जात होते. या काळ्या ग्लेशिअर्सवर अत्यंत सराईत गिर्यारोहक, गिर्यारोहणासाठी जातात. 
दक्षिणेकडं व्हटनायोकुल (Vatuajokull) नॅशनल पार्क हा आइसलॅंडमधला आणि पश्‍चिम युरोपातला सर्वांत मोठा नॅशनल पार्क म्हणून ओळखला जातो. त्याची स्थापना २००८मध्ये करण्यात आली. त्याचं क्षेत्रफळ साधारणतः १३,९०० चौरस किलोमीटर आहे. या पार्कचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, इथला ८१०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा व्हटनायोकुल ग्लेशिअर आणि त्यात आणि त्याच्या सभोवताली असलेले अनेक जिवंत ज्वालामुखी. बर्फ आणि अग्नी यांच्या परस्पर क्रियांमधून हा पार्क तयार झाला आहे. त्यामुळं बर्फ, ज्वालामुखी, भू-औष्णिक क्षेत्र आदी निसर्गसौंदर्याची अनेक रूपं इथं पाहायला मिळतात. अर्थात, ग्लोबल वॉर्मिंगची झळही अनेक ठिकाणी जाणवते. 

पेट्राचं विरळं संग्रहालय 
पूर्व आइसलॅंडच्या भटकंतीत, ॲस्ट्रॉलॅंडमधल्या पेट्राच्या स्टोन आणि खनिजांच्या संग्रहालयाला भेट द्यायलाच हवी. खासगी व्यक्तीनं गोळा केलेला, जगातला हा सर्वांत मोठा खजिना म्हणून ओळखला जातो. पेट्रा नावाच्या मुलीला अगदी लहानपणापासून निरनिराळ्या रंगांचे, आकारांचे, वैशिष्ट्यपूर्ण दगड जमवण्याची आवड होती. ठिकठिकाणाहून ती असे दगड गोळा करत असे. पूर्व आइसलॅंडच्या ज्या भागात ती राहात होती, तिथं १९६०मध्ये रस्ते वगैरे काही नव्हते. त्यामुळं समुद्रकिनारी, डोंगरमाथ्यांवर जाणं फार कठीण असायचं. पण छोटी पेट्रा आपली रगसॅक पाठीला लावून सकाळीच घराबाहेर पडायची आणि रात्री उशिरा परतायची. त्या वेळी तिच्या सॅकमध्ये निदान तीस-चाळीस किलो वजनाचे दगड असायचे. काही दगड खूप मोठे असत. ते बॅगेतून आणणं शक्‍य नसे. तेव्हा ती ते दगड डोंगरांवरून ढकलत, ढकलत डोंगरांच्या पायथ्याशी आणून ठेवायची. मग काही दिवस ते तिथंच पडून असत आणि हिवाळ्यात बर्फ पडायला लागला, की कुत्र्यांच्या गाडीतून ती ते घरी आणत असे. पेट्राचं घर म्हणजे निरनिराळ्या आकारांचे, रंगांचे अक्षरशः हजारो लहान- मोठे दगड, शंख, शिंपले यांचं जणू संग्रहालयच बनलं. अनेक नागरिक ते पाहण्यासाठी येऊ लागले. मग १९७४मध्ये हे संग्रहालय सर्वच पर्यटकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं. अक्षरशः शेकडो पर्यटक रोज या संग्रहालयाला भेट देतात. पेट्राच्या निधनानंतर तिची चार मुलं या संग्रहालयाची देखभाल ठेवतात. या संग्रहालयात फेरफटका मारताना, दगडांचे हजारो नमुने पाहून आपण थक्क होतो. त्यांचे आकार, रंग चित्र-विचित्र तर होतेच; पण काही अक्षरशः सोन्या-चांदीप्रमाणं लखलखतही होते. 
निसर्गाच्या विविध रूपांनी नटलेल्या आइसलॅंडची आर्थिक स्थिती आता सुधारते आहे. मासेमारी, ऊर्जा, कंप्युटर्स, पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय. पाणी ही सर्वांत मोठी साधनसामग्री. त्यातून प्रचंड ऊर्जानिर्मिती होते. तिथं दिवसाही दिवे लावण्यात येतात. अर्थात आता पर्यटनानं चांगलाच वेग घेतला असून, या सर्वांमुळं बेकारी हळूहळू कमी होत आहे; पण ‘पॉलिश्‍ड टुरिझमचे’ धडे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. अर्थात, अगदी ग्रामीण भागांतही पर्यटकांसाठी मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि त्यांचा दर्जाही चांगला आहे.

 आइसलॅंडमध्ये करांचं प्रमाण प्रचंड आहे. ३७ ते ४६ टक्‍क्‍यांपर्यंत कर नागरिकांना भरावा लागतो; पण जनतेला शिक्षण, वैद्यकीय सोयी वगैरे मोफत देण्यात येतात. इथं प्रचंड महागाई आहे. एका फिश सूपसाठी निदान १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. जेवणाचे, एका माणसाचे, एका वेळचे अडीच ते तीन हजार रुपये कुठंच गेले नाहीत... पण तरीही आइसलॅंडची सफर आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे. ज्यांना काही तरी वेगळं, ‘ऑफ बिट’ बघण्याची इच्छा आणि आवड आहे, त्यांना ‘आइसलॅंड’ निश्‍चितच पसंत पडेल..... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com