हिमनगांच्या जागतिक राजधानीत... (जयप्रकाश प्रधान)

jayprakash pradhan's article
jayprakash pradhan's article

ग्रीनलॅंडचं नाव वस्तुतः ‘आइसलॅंड’ असायला हवं होतं; पण ते ग्रीनलॅंड कसं पडलं याची कहाणी मोठी गमतीदार आहे. गुलामाचा खून केला म्हणून एरिक द रेड या नॉर्वेजियन माणसाला सन ९८२ मध्ये आइसलॅंडमधून हद्दपार करण्यात आलं होतं. तो आइसलॅंडच्या वायव्येकडच्या एका फिओर्डच्या ठिकाणी येऊन राहिला व शेती करू लागला. चार-पाच वर्षांनंतर तो परत आइसलॅंडला गेला. तेव्हा, ‘तू काय करतोस? कुठं राहतोस?’ असं लोक त्याला विचारू लागले. त्यावर त्यानं उत्तर दिलं ः ‘‘जिथं सगळं काही हिरवंगार आहे, जो भाग अतिशय समृद्ध आहे, अशा ठिकाणी मी राहतो.’’ मग त्यानंतर इतर लोक तिथं बोटीतून यायला लागले व त्या भागाचं नाव पडलं ग्रीनलॅंड. तोच आजचा ग्रीनलॅंड!

‘ग्रीनलॅंड’ हे जगातलं सगळ्यात मोठं बेट. लोकवस्ती जेमतेम ५६ हजार; पण क्षेत्रफळ २१,६६,०८६ चौरस किलोमीटर. त्यापैकी ८१ टक्के भागावर पूर्णतः बर्फाचं साम्राज्य. ग्रीनलॅंडमधली ‘इल्युलिसाट’ ही हिमनगांची (आइसबर्ग्ज) जागतिक राजधानी मानण्यात येते. ‘युनेस्को’नं तिला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. टायटॅनिक बोटीला जलसमाधी देणारा अतिअजस्र हिमनग हा मूळचा इथलाच... अशा या ग्रीनलॅंडमध्ये आम्ही पती-पत्नी क्रूजनं १२ दिवस मनसोक्त भटकलो. जीवनातले ते सर्वोच्च आनंदाचे क्षण म्हणावे लागतील...

जगाच्या नकाशाच्या अगदी वरती विस्तीर्ण पांढरंशुभ्र बेट दिसून येतं, त्याचंच नाव ‘ग्रीनलॅंड.’ ‘आर्क्‍टिक सर्कल’मध्ये मोडणाऱ्या त्याच्या काही भागांवर हिवाळ्यात २४ तासांचा अंधार व ‘नॉर्दन लाइट्‌स’ इथं तर उन्हाळ्यात मध्यरात्रीचा सूर्य पाहायला मिळतो! मैलोन्‌मैल लांब पसरलेल्या बर्फाच्या चादरी, बर्फाच्छादित नद्या, अत्यंत निरुंद फिओडर्स (दोन डोंगरांच्या घळीतून वाहणारा पाण्याचा प्रवाह), वृक्षविरहित डोंगर, खडकाळ निसर्गसौंदर्य, उन्हाळ्यातही शून्य ते पाच डिग्री सेल्सिअस तापमान... सगळंच अभूतपूर्व... आगळं-वेगळं, स्तिमित करणारं...

भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिका खंडात; पण राजकीयदृष्ट्या युरोपमध्ये येणाऱ्या ग्रीनलॅंडचं नाव वस्तुतः ‘आइसलॅंड’ असायला हवं होतं; पण ते ग्रीनलॅंड कसं पडलं याची कहाणी मोठी गमतीदार आहे. गुलामाचा खून केला म्हणून एरिक द रेड या नॉर्वेजियन माणसाला सन ९८२ मध्ये आइसलॅंडमधून हद्दपार करण्यात आलं होतं. तो आइसलॅंडच्या वायव्येकडच्या एका फिओर्डच्या ठिकाणी येऊन राहिला व शेती करू लागला. चार- पाच वर्षांनंतर तो परत आइसलॅंडला गेला. तेव्हा, ‘तू काय करतोस? कुठं राहतोस?’ असं लोक त्याला विचारू लागले. त्यावर त्यानं उत्तर दिलं ः ‘‘जिथं सगळं काही हिरवंगार आहे, जो भाग अतिशय समृद्ध आहे, अशा ठिकाणी राहतो.’’  मग त्यानंतर इतर लोक तिथं बोटीतून यायला लागले व त्या भागाचं नाव पडलं ग्रीनलॅंड. तोच आजचा ग्रीनलॅंड!

ग्रीनलॅंड हा भाग डेन्मार्क राष्ट्रातला स्वायत्त भाग म्हणून ओळखला जातो. त्याचा कारभार स्वतंत्रपणे चालतो. त्यांची स्वतःची संसद आहे. मंत्रिमंडळाचा प्रमुख हा पंतप्रधान म्हणून ओळखला जातो. डेन्मार्क हे शेंजेन राष्ट्रात मोडतं; पण ग्रीनलॅंड हे शेंजेन नव्हे व १९८५ मध्ये ते युरोपीय आर्थिक समूहातून बाहेर पडलं आहे. सुमारे १६ हजार लोकसंख्येचं ‘नूक’ हे ग्रीनलॅंडच्या राजधानीचं शहर आहे. त्याखालोखाल ‘सिसिमुट’ या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात पाच हजार २००, तर ‘इल्युलिसाट’मध्ये पाच हजारांची वस्ती आहे. डॅनिश क्रोना हे स्थानिक चलन असून, साधारणतः एका युरोला साडेसात ते आठ क्रोना असं प्रमाण धरायला हरकत नाही.

भारतात ग्रीनलॅंड फारसं परिचित नाही, त्यामुळं तिथला व्हिसा कसा मिळवायचा याची माहिती घेतली. व्हिसासाठी दिल्लीच्या डेन्मार्क वकिलातीकडं अर्ज केला; पण मुख्य म्हणजे त्या व्हिसावर ‘व्हॅलिड फॉर ग्रीनलॅंड’ असा स्पष्ट उल्लेख असणं आवश्‍यक असतं. त्यासाठी ग्रीनलॅंडमधल्या प्रवासाचा संपूर्ण तपशील आम्ही पुरवला. त्यानंतर तशी लेखी परवानगी आम्हाला देण्यात आली.

ग्रीनलॅंडमध्ये फिरण्यासाठी रस्ते नाहीत. काही ठिकाणी विमानानं जाता येतं; पण ग्रीनलॅंडचा जास्तीत जास्त भाग बघायचा असेल तर क्रूज हाच एकमेव मार्ग आहे. सगळा अभ्यास केल्यानंतर ‘हुर्टिग्रुटन’ या आंतरराष्ट्रीय कंपनीची ‘एक्‍स्प्लोरिंग द ओल्ड नॉर्स हेरिटेज्‌’ ही १२ दिवसांची क्रूजसफर अत्यंत योग्य असल्याचं आम्हाला आढळून आलं. ‘एमएस फ्रॅम’ नावाच्या सुमारे २०० प्रवाशांच्या बोटीतून, ग्रीनलॅंडच्या दक्षिण, वायव्य आदी भागांतून सुमारे दोन हजार १०० नॉटिकल मैल म्हणजे तीन हजार ८९० किलोमीटरचा प्रवास आम्ही केला.

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन इथून ग्रीनलॅंडमधल्या कांगारलुसाक इथं जाण्यासाठी खास (चार्टर) विमानाची सोय होती. आमची सहल कांगारलुसाकहून सुरू होऊन आइसलॅंडची राजधानी रेक्‍याविक इथं संपणार होती. हुर्टिग्रुटन ही नॉर्वेची कंपनी असल्यानं कप्तान नॉर्वेजियन व बहुतेक सर्व कर्मचारी फिलिपिनो होते; पण आश्‍चर्य म्हणजे बोटीचा मुख्य सुरक्षा अधिकारी पीटर हा मुंबईचा तरुण होता. त्याच्याशी चांगली मैत्री झाली. आपल्या देशातले कुणीतरी या क्रूजवर आहेत, याचा त्याला इतका आनंद झाला होता, की कप्तानापासून सगळ्यांशी त्यानं आमचा आवर्जून परिचय करून दिला. जिथून जहाजाची सर्व सूत्रं हलतात, त्या कप्तानाच्या खोलीत- जिला ‘ब्रीज’ म्हणतात - तिथं नेऊन मुद्दाम सगळी माहिती आपुलकीनं करून दिली. आमची ही ‘लक्‍झुरियस’ नव्हे तर ‘एक्‍स्पिडिशन’ क्रूज होती. मात्र, खाद्यपदार्थांची रेलचेल होती. विविध प्रकारच्या स्थानिक मासळीपासून ते लॉबस्टरपर्यंत बरंच काही खायला मिळालं.

आमच्या बोटीचा पहिला प्रवास ग्रीनलॅंडच्या वायव्येकडच्या सिसिमुट, इल्युलिसाट, इटिलेक या आर्क्‍टिक प्रदेशांमधल्या बेटांमधून होता. हा भाग मध्यरात्रीच्या सूर्यासाठी, नॉर्दन लाइट्‌ससाठी आणि बर्फावरून गाड्या खेचणाऱ्या कुत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही जुलै महिन्यात प्रवास करत असतानाही तिथलं तापमान चार ते पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत होतं. ही गावं अगदी विखुरलेली असून, तिथं वस्ती अगदीच तुरळ. जेमतेम १००-१५० घरांचं गाव. डोंगरउतारांवर छोटी छोटी रंगीबेरंगी घरं, समोर रानटी; पण लक्ष वेधून घेणारी पांढरी- पिवळी फुलं हे इथलं मुख्य आकर्षण. गावांची, घरांची रचना जवळजवळ एकसारखीच. तिथं जी निरनिराळ्या रंगांची घरं दिसतात, त्यामागे इतिहास आहे. वसाहतींच्या काळात घरांच्या प्रत्येक रंगाला निरनिराळा अर्थ होता. उदाहरणार्थ ः पिवळा म्हणजे रुग्णालय, हिरवा म्हणजे दळणवळणाचं केंद्र, निळा म्हणजे पाणीपुरवठा, तांबडा म्हणजे व्यापार इत्यादी. इमारतीच्या रंगावरून ती इमारत कसली आहे, हे ओळखता येत असे. नंतरही लोकांनी हीच प्रथा सुरू ठेवली. आता रंगांचं महत्त्व राहिलं नसलं तरी रंगांमुळं घरं सुंदर दिसतात म्हणून रहिवासी घरांना रंग देऊ लागले. अर्थात, आजही तिथं रुग्णालयाच्या किंवा दवाखान्याच्या इमारतीला पिवळाच रंग दिला जातो.

ग्रीनलॅंडमध्ये मंगोलियन पद्धतीच्या चपट्या नाकाच्या लोकांची वसाहत आढळते. अलीकडं पर्यटन लोकप्रिय होत असलं, तरी मासेमारी हाच इथल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय. सॅमन, कॉड, ट्राऊट अशा माशांची शिकार करून आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून युरोप आदी ठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. इथं नागरिकांच्या उत्पन्नावर करांचं प्रमाण प्रचंड आहे. ४० ते ४६ टक्‍क्‍यांपर्यंत कर भरावा लागतो; पण वैद्यकीय आदी सर्व सेवा पूर्णतः मोफत आहेत. गावांत फिरताना काही मजेशीर अनुभव आम्हाला आले. इटिलेक नावाच्या जेमतेम १५० लोकवस्तीच्या एबना बेटावरच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आम्ही गेलो होतो. स्थानिक गाइड इड्डा हीसुद्धा बरोबर होती. ती आम्हाला त्या दुकानातल्या काउंटरवरच्या एकमेव व्यक्तीकडं मुद्दाम घेऊन गेली. ...आणि ‘हे आमच्या देशाचे माजी पंतप्रधान’ अशी त्या व्यक्तीची ओळख तिनं करून दिली! ते ऐकून कशी प्रतिक्रिया द्यावी, हेच आम्हाला कळलं नाही...

आमची क्रूज विशेषतः रात्रीच्या वेळी १२ ते १३ नॉटिकल मैल या वेगानं प्रवास करायची. सहलीच्या चौथ्या दिवशी ग्रीनलॅंडमधल्या इल्युलिसाट गावाकडं आम्ही निघालो. लोकसंख्येबाबत हे गाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहाटेच्या सुमाराला जाग आली, तेव्हा क्रूजचा वेग अगदी कमी झाला असल्याचं जाणवलं व मधून मधून बोटीला काहीतरी धडकत असल्यासारखं वाटलं म्हणून केबिनची खिडकी उघडली आणि समोरचं दृश्‍य बघून अक्षरशः धडकीच भरली. हा सर्व आर्क्‍टिक सर्कलचा भाग असल्यानं पहाटे चार वाजताही तिथं लख्ख उजेड पडला होता. त्या विशाल महासागरात, हिमनगांच्या लहान-मोठ्या आकारांच्या पांढऱ्याशुभ्र टेकड्या सर्वत्र विखुरलेल्या दिसत होत्या व त्यातून आमची बोट अवघ्या चार-पाच नॉटिकल मैलांच्या वेगानं मार्ग काढत होती. अलास्काच्या सफरीत आम्ही समुद्रातले हिमनग पाहिले होते. ‘इन्‌साइड पॅसेज’मधून ती क्रूज जात होती, तेव्हा असेच हिमनग दिसत होते व पुढं या हिमनगांचं प्रमाण वाढल्यानं क्रूज मागं वळवण्यात आली; पण इल्युलिसाटच्या मार्गावरचे हिमनग त्यापेक्षाही फारच मोठे होते. काही ठिकाणी हिमनगांच्या टेकड्या अतिशय उंच होत्या. समुद्रातल्या हिमनगांचं असं हे साम्राज्य आम्ही प्रथमच पाहात होतो. खवळलेला समुद्र, आठ आठ फूट उंचीच्या लाटा यांचाही अनुभव आम्ही पूर्वी घेतला होता; पण हिमनगांची धडक म्हणजे ‘टायटॅनिक’चीच आठवण आली आणि पोटात भीतीचा गोळाच उभा राहिला. ‘आपल्या एमएस फ्रॅम बोटीची रचना अगदी निराळी असून, हिमनगांना टक्कर देत ती मार्गक्रमण करू शकते,’ या माहितीपत्रकातल्या उल्लेखाची त्याच वेळी आठवण आली आणि स्वतःच स्वतःला दिलासा देऊन घेतला !

ग्रीनलॅंडिक भाषेत हिमनगांना ‘इल्युलिसाट’ असं म्हणतात, त्यामुळं या बेटाचंही नाव इल्युलिसाट आहे, यात आश्‍चर्य ते काहीच नाही. हे शहर अजस्र अशा हिमनगांनीच वेढलेलं आहे. त्याच्या सभोवतालचा अनेक मैलांचा परिसर हिमनगांनी व्यापलेला आहे. जिथपर्यंत दृष्टी जाईल, तिथपर्यंत पर्वतासमान उंचच उंच, लांबवर पसरलेले हिमनग दृष्टीस पडतात. त्यामुळंच इल्युलिसाटला ‘हिमनगांची जागतिक राजधानी’ मानण्यात येतं. ‘युनेस्को’नं २००४ मध्ये ही ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’ म्हणून घोषित केलेली आहे.

आमची क्रूज किनाऱ्यापासून काही अंतरावर लागली. त्या ठिकाणी आमचा चांगला दिवसभराचा मुक्काम होता. हे हिमनगर जवळून पाहण्याच्या काही सहली आता उपलब्ध होत्या. हेलिकॉप्टरमधून एखाद्या हिमनग, ग्लेशिअरवर उतरण्याचा अनुभव आम्ही ‘कॅनेडियन वॉकीज्‌’मध्ये घेतला होता. या वेळी अगदी निराळी सहल करण्याचं आम्ही ठरवलं आणि ती म्हणजे छोट्या बोटीतून अजस्त्र अशा हिमनगांच्या अगदी जवळ जायचं... हिमनगांच्या त्या राजधानीत भरपूर फिरायचं... त्यांचं मनसोक्त दर्शन घ्यायचं... खूप फोटो काढायचे... आणि हिमनगांविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवायची... साधारणतः १५-२० प्रवासीक्षमतेच्या त्या बोटीतून दोन-अडीच तास फिरण्यासाठी प्रत्येकी सुमारे १०० युरो निराळे मोजावे लागले; पण ‘पृथ्वीतलावरच्या अगदी आगळ्यावेगळ्या विश्‍वाचं दर्शन घडलं... पैसे कधीच वसूल झाले...’ अशी आमची सहलीच्या अखेरीस प्रतिक्रिया होती.

ग्लेशिअरचे (हिमनद्या) जे तुकडे सुटतात, तुटतात आणि सागरात पसरतात त्यांना हिमनग (आइसबर्ग) असं म्हणतात. ग्लेशिअर या अतिप्रचंड असतात, त्यामुळं हिमनग हेसुद्धा अजस्र असू शकतात. उत्तर गोलार्धातली सगळ्यात मोठी ग्लेशिअर इल्युलिसाट इथं असून, अतिविशाल फिओर्डच्या तोंडावरच ती आहे, त्यामुळं अतिविशाल हिमनग फिओर्डच्या मुखावरच आढळून येतात. इल्युलिसाट हे डिस्को बे चे ‘मेट्रॉपोलिटन सेंटर’ मानलं जातं. इथल्या सगळ्या हिमनगांचं मूळ हे Jakobshavan ग्लेशिअर असून, अत्यंत उत्पादनक्षम ग्लेशिअर अशी त्याची ओळख आहे. आम्ही या हिमनगांच्या जवळून, बाजूनं, मधून असा प्रवास छोट्या बोटीतून सुरू केला, तेव्हा सुदैवानं लख्ख ऊन होतं. त्यामुळं हे हिमनग सूर्यप्रकाशात अक्षरशः न्हाऊन निघत होते व त्यांचं सुरेख दर्शन आम्हाला झालं. दुपारच्या सुमारास आणखी काही पर्यटक हेच हिमनग पाहण्यासाठी गेले, तेव्हा सर्वत्र धुक्‍याचं साम्राज्य पसरलं व त्यांना १५ फुटांवरचंही काही दिसत नव्हतं. त्यादृष्टीनं आम्ही खूपच सुदैवी ठरलो.
हिमनगांचे डोंगर, टेकड्या म्हणजे आपल्याला प्रथमदर्शनी बर्फाच्छादित डोंगर वाटतात; पण प्रत्यक्षात ते अत्यंत ‘सॉलिड’ असे हिमनग असतात. काहींची उंची ७५ ते १०० फूट व लांबी चक्क चार-पाच किलोमीटर होती. त्यांना नानाविध आकार प्राप्त झालेले होते. काही मध्येच तुटलेले, खचलेले, तर काही लोण्याच्या पांढऱ्याशुभ्र गोळ्याप्रमाणे गुळगुळीत होते. जिथून पाणी झिरपत होतं, तो भाग खडबडीत वाटला. तज्ज्ञांच्या मते, बर्फाला एकूण पाच रंग असू शकतात. पांढरा, निळा, बॉटल ग्रीन, काळा आणि ट्रान्सपरंट - परावर्तित- पारदर्शक. यात बर्फावरून जेव्हा सूर्यकिरण परावर्तित होतात, तेव्हा तो पांढरा दिसतो. काही वेळा सूर्यकिरणांमधला निळा रंग बर्फ फिल्टर करतो आणि त्यामुळं ते हिमनग निळेही दिसतात. त्याचबरोबर मध्यरात्रीच्या सूर्यप्रकाशात आणि २४ तासांच्या अंधारात, नॉर्दन लाइट्‌सच्या झगमगाटात या हिमनगांचं दर्शन अप्रतिम भासतं. निरनिराळ्या ऋतूंमध्ये रात्री-दिवसा त्यांचं हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळत असते.

‘आपल्याला आसमंतात जे हिमनग दिसत आहेत, ते ‘यंग आइसबर्ग’ आहेत,’ आमच्या छोट्या बोटीची महिला कप्तान महत्त्वपूर्ण माहिती देत होती. दुपारचे १२ वाजले होते. चांगलं ऊन पडलेलं होतं. अर्थात, तापमान ० ते १ डिग्री सेल्सिअस व बोचरं वारं वाहत होतं; पण प्रत्येकजण काळजीपूर्वक ऐकत होता. ती सांगत होती ः ‘‘हे यंग आइसबर्गही १०० ते ३०० वर्षांचे जुने आहेत! याआधी पंधराशे वर्षांपूर्वीचे जुने हिमनगही होते; पण ते आता राहिलेले नाहीत. हिमनगाची घनता किती, यावरून तो हिमनग पाण्यात किती खोल आहे, याचा अंदाज येऊ शकतो.’’  बोट अगदी पायथ्याशी नेऊन कप्तानानं काही हिमनग दाखवले. ते पाण्याच्या वर १०० मीटर उंच व पाण्यात त्याच्या दहापट खोल, म्हणजे जवळजवळ सागराच्या तळाशी टेकलेले होते.
जागतिक हवामानात जे बदल होत आहेत, त्याचे गंभीर परिणाम इल्युलिसाट इथल्या हिमनगांवरही पाहायला मिळतात. या प्रमाणात वितळत असलेले हिमनग हे त्याचं ठळक उदाहरण मानण्यात येतं. या भागांतल्या ग्लेशिअर या काही वर्षांत सहा मैलांनी (१० किलोमीटर) आक्रसल्या; पण १९६० पासून त्या काही प्रमाणात स्थिर आहेत. आर्क्‍टिक सर्कलमधल्या हवामानाबाबतचा एक विस्तृत अहवाल २५० तज्ज्ञांनी तयार केला असून, नोव्हेंबर २००४ मध्ये तो प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी म्हटलं आहे ः ‘या शतकाच्या आत उन्हाळ्यात आर्क्‍टिक समुद्रातलं बर्फ संपूर्ण वितळेल आणि त्याचे गंभीर परिणाम पाण्यातले प्राणी, मासे, जीव, वनस्पती यांच्यावर होऊ शकतील. या हिमनगांच्या वितळण्यामुळं जागतिक समुद्रांच्या पाण्याच्या पातळीत २० फुटांची वाढ अपेक्षित आहे. ग्लेशिअर, हिमनग निसर्गाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त आहेत; पण ते धोकादायकही ठरू शकतात.’

सहल संपवून परत येत असताना कप्तानानं आणखी महत्त्वपूर्ण माहिती दिली. एका अतिविशाल हिमनगाला धडक दिल्यानं १९१२ मध्ये टायटॅनिक या दोन हजार ४०० प्रवाशांना घेऊन जात असलेल्या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. हा अपघात कॅनडातल्या हॅलिफॅक्‍सजवळ झाला होता; पण तो हिमनग मूळचा इल्युलिसाट इथलाच होता. तो तुटल्यानंतर वाहत-वाहत हॅलिफॅक्‍सपर्यंत पोचला होता. त्या हिमनगासंदर्भात ब्रिटिश तज्ज्ञ अभ्यास करत होते. त्यांचे निष्कर्ष आता प्रसिद्ध झाले आहेत. टायटॅनिकने धडक दिलेला तो हिमनग हा तब्बल एक लाख वर्षांचा जुना होता. धडक बसली तेव्हा त्याचं मूळ वजन ७५ टन व लांबी एक हजार ७०० फूट होती. टायटॅनिकची धडक बसल्यानंतर तो तुटला, तेव्हा त्याचं वजन दीड टन व लांबी ४०० फूट झाली. यावरून इल्युलिसाट इथल्या अजस्र हिमनगांची कल्पना येईल व त्याला हिमनगांची जागतिक राजधानी (World’s capital of icebergs) असं का म्हटलं जातं, हेही समजून येईल.

अनेक हिमनग समुद्राच्या पाण्यात खोलवर घट्ट रुतलेले असतात. एमएस फ्रॅमसारख्या बोटीमध्ये हिमनग तोडण्याची व्यवस्था असते. समोर पाण्यात कुठं व किती खोल हिमनग आहे, याची कल्पना आता अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळं जहाजाच्या कप्तानाला आधी येऊ शकते; पण जे हिमनग प्रचंड उंच आहेत व पाण्यात तळापर्यंत गेलेले असतात, तिथून मोठ्या बोटीही अजिबात नेण्यात येत नाहीत. त्या वेळी बोटीचा मार्ग बदलण्यात येतो. हिमनग हे अतिशय तीक्ष्ण व धारदार असतात. ते कुठल्याही क्षणी कर्दनकाळ ठरू शकतात... अडीच तासांची ही सफर, त्यात झालेलं हिमनगांचं आगळं-वेगळं दर्शन, त्यांचं अप्रतिम सौंदर्य, त्याचबरोबर त्यांच्या रौद्र रूपाची कल्पना देणारी माहिती... सगळंच अद्‌भुत... आयुष्यातले अविस्मरणीय असे ते क्षण होते.

ग्रीनलॅंड हे जगातल्या पर्यटकांचं मोठंच आकर्षण ठरत आहे. भारतात हा देश अजिबात परिचित नाही; पण अगदी निराळं विश्‍व बघू इच्छिणाऱ्यांनी ग्रीनलॅंडची क्रूज सहल जरूर करावी असं सुचवावंसं वाटतं.

-------------------------------------------------------------------------
कसे जाल?
ग्रीनलॅंडला जाण्यासाठी दिल्लीच्या डेन्मार्क वकिलातीकडं व्हिसासाठी अर्ज करावा लागतो; पण ग्रीनलॅंडमधल्या वास्तव्याचा संपूर्ण तपशील अर्जासोबत देणं आवश्‍यक असतं. मग ‘व्हॅलिड फॉर ग्रीनलॅंड’ असा स्पष्ट उल्लेख व्हिसावर केला जातो. ग्रीनलॅंड हे शेंजेन राष्ट्र नाही, त्यामुळं कोणत्याही शेंजेन व्हिसावर ग्रीनलॅंडमध्ये प्रवेश मिळत नाही. ग्रीनलॅंडमध्ये रस्ते नाहीत. काही ठिकाणी विमानानं जाता येतं; पण ग्रीनलॅंडचा जास्तीत जास्त भाग बघायचा असेल तर क्रूजखेरीज पर्याय नाही.

कधी जाल?
वर्षभरात कधीही; पण उन्हाळ्यात पाच ते १० डिग्री सेल्सिअस व हिवाळ्यात उणे १० ते उणे १५ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असतं, त्यामुळं थंडीशी सामना करू शकणारे उत्तम कपडे आवश्‍यक.

सुरक्षितता
पूर्ण सुरक्षित.

-------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com