कारदग्याशी साहित्याची नाळ घट्ट 

कारदग्याशी साहित्याची नाळ घट्ट 

"माझी मराठीचिया बोलू कौतुक 
अमृतातेही पैजा जिंके' 

या काव्यपंक्तीनुसार अमृताचा वर्षाव ज्या भाषेतून होतो आणि जो ही भाषा आत्मसात करतो, तो अमर होतो असे म्हणायला हरकत नाही. या भाषेचा व मराठी साहित्याचा जागर गेल्या 21 वर्षांपासून कारदगानगरीत होत आहे. संमेलनाची वाढती प्रगती उल्लेखनीय आहे. कृषी केंद्रीत समाजरचना आस्तित्वात असूनही साहित्याची नाळ येथे घट्ट झाली आहे. प्रत्येक ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची सुरवात होते, तशी दिवाळीनंतर कारदगा संमेलनाच्या जागराची चाहूल लागते. 

या गावात मार्च-एप्रिलमध्ये येणाऱ्या पाडव्यानंतर बंगालीबाबांच्या उरुसाची ओढ लागते. त्याप्रमाणे साहित्य संमेलनाचीही आतुरतेने सर्वजण वाट पाहतात. लेखक, कवी, कथाकारांना प्रेरणा देणारा हा सण आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथदिंडीचे आकर्षण असते. युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवापासूनच संमेलनाचे वेध लागतात. घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरी साहित्यिक मंडळ येण्याची आस असते. या संमेलनामध्ये बा. भ. बोरकरांच्या, 
"देखणे की ते हात 
ज्यांना निर्मितीचे डोहाळे 
मंगलाचे गंधलेले, 
सुगंधाचे सोहळे' 
या काव्याची सांगड घालता येते. संमेलनाच्या निर्मितीमध्ये आबाल-वृद्धांचे हात गुंतलेले असतात. सर्वांना अन्नदान करण्यासाठी सर्वांची मदत होते. या काळात प्रत्येकामध्ये उत्साह संचारलेला असतो. म्हणूनच साहित्याचा जागर येथे होत आहे. 

मराठीचे संवर्धन, वृद्धी, तिचे साहित्याची जपणूक व अभिजात दर्जा मिळविण्यासाठी हा प्रयत्न आहे. श्रोते व रसिक यांच्या अभिप्रायाने "प्रत्येकाच्या घरी संमेलन' असा प्रेरणा मंत्र रुजत आहे. या विधायक कार्याची सुरुवात सन 1996 पासून झाली. म्हणूनच प्रत्येकजण साहित्याच्या गावा मिळेल त्या वाहनाने येत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रेरणा, उत्साह हाच आमच्या मंडळाचा मोलाचा सण असतो. दातृत्वाची वृत्ती, एकीचे बळ आणि शुभेच्छांचा वर्षाव यातून हे संमेलन साहित्य शिखरावर विराजमान झाले आहे. 

( लेखिका कारदगा येथील साहित्य विकास मंडळाच्या अध्यक्षा आहेत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com