घुसमट शहरांची... खिलाडूपणाची! (केदार ओक)

kedar oak write new delhi population article in saptarang
kedar oak write new delhi population article in saptarang

दिल्लीतल्या प्रदूषणाचे ढग नुकतेच भारत-श्रीलंका क्रिकेट सामन्यावरही जमल्याचं चित्र दिसलं. श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालूनच मैदानावर उतरले आणि सामना काही काळ थांबवावा लागला. हा श्रीलंकेचा ‘रडीचा डाव’ असल्याची टीका सुरू असताना, दुसरीकडं शहरांमधल्या घुसमटलेल्या श्‍वासाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली. क्रिकेटमध्ये लहरी हवेमुळं, इतर अतर्क्‍य गोष्टींमुळं आतापर्यंत सामन्यांवर कोणते परिणाम झाले त्याच्याशी संबंधित रंजक गोष्टी आणि त्याच वेळी शहरांमधल्या प्रदूषणावर एक नजर.

दिल्लीचं धुकं आणि प्रदूषण ही बाब आता नवीन नाही. गेल्या आठवड्यात भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यामुळं प्रदूषणाची गोष्ट अजून चव्हाट्यावर आली इतकंच. अशा खराब वातावरणात शंभरहून अधिक षटकं मैदानावर राहिल्यानं श्रीलंकेच्या खेळाडूंना, विशेषतः वेगवान गोलंदाजांना उलट्या आणि श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यामुळं दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये व्यत्यय येऊन थोडा वेळ खेळ थांबला. प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क ’मास्क’ घालून खेळण्यास सुरुवात केली.

नुकत्याच घडलेल्या या अभूतपूर्व घटनेच्या निमित्तानं बऱ्याच जुन्या घटनांची उजळणी करण्याची संधी मात्र चालून आली. पावसापासून धुळीच्या वादळापर्यंत अनेक गोष्टींनी क्रिकेटच्या सामन्यांना ‘ब्रेक’ लावला आहे. फक्त एवढंच नाही, तर काही वेळा अगदी अनपेक्षित आणि विनोदी कारणांमुळंही सामन्यात व्यत्यय आला आहे. क्रिकेटच्या इतिहासात डोकावून असेच काही रंजक आणि गंमतिशीर किस्से जाणून घेऊ या.

लहरी हवामान
एरवी क्रिकेटच्या सामन्यात हमखास अडथळा आणणारी गोष्ट म्हणजे पाऊस. क्रिकेट आणि पाऊस म्हटलं, की कुणाही क्रिकेटप्रेमी माणसाला पहिल्यांदा डकवर्थ-लुईस डोळ्यांसमोर येतात. पावसामुळं एकदिवसीय सामन्याचे निकाल लागणं कठीण व्हायला लागलं, म्हणून तेव्हाच्या प्रशासकांनी समजायला सोपी; परंतु बहुतांश वेळेस एका संघावर अन्याय करू शकणारी एक पद्धती आणली. १९९२ च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड असा उपांत्य सामना सुरू होता. ही गोष्ट डकवर्थ-लुईस नियम येण्याच्या आधीची आहे. आफ्रिकेला विजयासाठी १३ चेंडूंत २२ धावा हव्या होत्या. नेमका त्याच वेळी पावसानं खेळ थांबला. अल्पशा विश्रांतीनंतर खेळ चालू झाला, तेव्हा जुन्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १ चेंडूत २१ धावा करण्याचं अशक्‍य आव्हान मिळालं.आफ्रिकेवरच्या अन्यायामुळं डकवर्थ आणि लुईस या सांख्यिकीतज्ज्ञांना काहीतरी करावंसं वाटलं आणि त्यांनी क्रिकेट प्रशासकांशी चर्चा करून महत्प्रयासानं आधुनिक प्रणाली आणली. कोणतीही प्रणाली बिनचूक नसेल, कारण शेवटी तो एक अंदाज असतो; पण तरीही ही प्रणाली आजही वेळोवेळी अजून चांगली बनवण्याचा प्रयत्न सुरूच असतो. डकवर्थ, लुईस निवृत्त होऊन त्यांची जागा आता स्टर्न नावाच्या तज्ज्ञानं घेतली आहे. प्रणालीचं नावही आता ‘डकवर्थ-लुईस-स्टर्न’ असं आहे.

हवामानाचा ‘खोखो’
आपल्या मराठीत म्हणतात ना, की नारळ आणि मुलगा कसा निघेल सांगता येत नाही. त्यात इंग्लंडच्या हवामानाचा समावेश करायला हरकत नाही. लहरी हवामान आणि ब्रिटनचे अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. १९७५मध्ये डर्बिशर विरुद्ध लॅंकेशर असा सामना सुरू होता. पहिल्या दिवशी लख्ख सूर्यप्रकाशात लॅंकेशरनी भरपूर धावा चोपून काढल्या. दुसऱ्या दिवशी रात्री जबरदस्त हिमवादळ झालं, मैदानावर बर्फाचा थर बसला. त्यामुळं दुसऱ्या दिवशी अजिबात खेळ होऊ शकला नाही; पण हवामानानं पुन्हा एकदा पलटी मारली आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा खणखणीत सूर्यप्रकाश! बर्फामुळं खेळपट्टीची मात्र वाट लागली होती. त्याचा फायदा उठवत लॅंकेशरच्या गोलंदाजांनी डर्बीचं कंबरडं मोडून काढलं आणि जोरदार विजय मिळवला. अर्थात हिमवादळाचं हे एक टोक झालं.२००७मध्ये दुसरं टोक बघायला मिळालं. हा प्रकारसुद्धा ब्रिटनमध्येच झाला. एका स्थानिक एकदिवसीय सामन्यात प्रचंड सूर्यप्रकाश असल्यामुळं पांढरा चेंडू नीटसा दिसेनासा झाला, म्हणून पाऊण तास खेळ थांबवावा लागला होता. खरं तर स्वच्छ सूर्यप्रकाश खेळासाठी उत्तम असायला हवा; पण बिचाऱ्या क्रिकेटसाठी कोणती गोष्ट अडचण म्हणून उभी ठाकेल सांगता येत नाही.

खेळाला ‘ग्रहण’
१९८०मध्ये मुंबईत बीसीसीआयच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाप्रीत्यर्थ भारत आणि इंग्लंडदरम्यान एक सामना झाला होता. त्या सामन्यात तिसरा दिवस विश्रांतीसाठी राखीव होता; परंतु दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण होतं, असं समजल्यानं विश्रांतीचा दिवस एक दिवस मागं खेचण्यात आला. ग्रहणाच्या दिवशी विश्रांती झाली आणि पुढल्या दिवशी सामना सुरू झाला. अर्थात भारताची सुटका नव्हती. इयान बॉथम नावाचं ‘ग्रहण’ भारताला लागलंच. त्यानं एकूण १३ विकेट्‌स घेऊन आणि एक शतक ठोकून भारताला सुवर्णमहोत्सवी सामन्यात नामोहरम केलं. भारतीयांच्या आठवणीतला अजून एक व्यत्यय म्हणजे शारजातल्या धुळीच्या वादळाचा. १९९८मध्ये कोकाकोला कपमध्ये सचिननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन सामन्यांत केलेल्या शतकी खेळी भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. त्यातल्या शेवटच्या साखळी सामन्यात धुळीच्या वादळामुळं काही काळ खेळ थांबला होता. भारतासमोर आधीच कठीण असलेलं आव्हान अजून कठीण झालं. आपण सामना हरलो; पण अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आणि दोन दिवसांनी ऑस्ट्रेलियाला हरवून विजेतेपद पटकावलं. सचिनच्या त्या दोन शतकी खेळी, विशेषतः २२ एप्रिलची खेळी आजही ‘डेझर्ट स्टॉर्म’ म्हणून ओळखली जाते. असे हे निरनिराळ्या कारणांनी येणारे अडथळे ही क्रिकेटसाठी सवयीची गोष्ट आहे. तसं बघायला गेलं, तर क्रिकेट हा बऱ्यापैकी वेळखाऊ आणि संथ खेळ. त्याचबरोबर तो राजेशाहीसुद्धा आहे, कारण बाकीच्या खेळांच्या तुलनेत आपल्या क्रिकेटचे लाड खूप असतात. त्याला मोठं मैदान लागतं, हवामान शक्‍यतो चांगलंच लागतं; मैदानाची, चेंडूची खूप काळजी घ्यायला लागते. मात्र, तरीही आपल्या लाडक्‍या क्रिकेटमध्ये असा काहीतरी ‘एक्‍स फॅक्‍टर’ आहे, ज्यामुळं सगळे अवगुण झाकले जाऊन त्याला अनेक वर्षं जनाधार लाभला आहे.

चुकणारा मनुष्य
नैसर्गिक कारणांनी खेळ थांबतोच; पण मनुष्यानं स्वतःच्या फायद्यासाठी अनेक चुका करून पर्यावरणाची वाट लावली आहे, हेसुद्धा एक उघड गुपित आहे. मनुष्य कितीही हुशार असला तरी चुकतोच. अशाच काही मानवी चुकांमुळंही काही वेळेस खेळ थांबवला गेला आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमधलीच. अगदी ताजीच घटना. गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असणाऱ्या पालम मैदानावर दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश असा रणजी करंडकाचा सामना चालू होता. दिवसाचा खेळ संपायला काही वेळ शिल्लक असतानाच एका विक्षिप्त माणसानं सुरक्षारक्षक नसण्याचा फायदा घेत गाडी वाहनतळाकडं नेण्याऐवजी थेट मैदानातच घुसवली. खेळपट्टीपर्यंत जाऊन तिकडं वळसा घेऊन मग शर्मा नावाचा हा मनुष्य परत आला. अर्थात त्याला नंतर पकडलं गेलं. हे सगळं अगदी काही मिनिटंच चालू होतं; पण तोपर्यंत मैदानात असणाऱ्या खेळाडू आणि पंचांना चांगलाच धक्का बसला असेल. कुणीही जखमी झालं नाही हे नशीब समजायचं. हवाई दलाशी संबंधित अजून एक घटना घडली होती; पण भारतात नाही तर ब्रिटनमध्ये. खूप वर्षांपूर्वी (१९४४) भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट. लंडनच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर जुलै महिन्यात ‘आर्मी’ विरुद्ध ‘एअर फोर्स’ असा सामना रंगला होता. तेवढ्यात जर्मन सैन्यानं सोडलेला ‘डुडलबग’ बाँब मैदानावर पडणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यांनी आडोसा शोधला; पण बाँब मात्र मैदानाला चुकवून जरा पुढं जाऊन पडला. थोडा वेळ थांबून सामना पुन्हा सुरू झाला. विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच बाँबपासून जीव वाचलेल्या जॅक रॉबर्टसन नावाच्या फलंदाजानं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून नव्यानं सुरुवात केली.

रिकामं प्रेक्षागृह
क्षेत्ररक्षकांच्या हुल्लडबाजीमुळं खेळ थांबवला जाण्याच्या घटनांमध्ये फारसं नावीन्य नाही; परंतु या दुर्दैवी गोष्टीचा उल्लेख टाळून पुढंही जावंसं वाटत नाही. काही लोकांना दारुण पराभव सहन होत नाही, किंवा मुळातच गोंधळ घालण्याचीच त्यांची मनोवृत्ती असते. असे मूठभर लोक परिस्थितीचा फायदा घेत मनमानी करायला लागतात आणि बघताबघता बहुतांश ’गर्दी’ त्या प्रकाराला बळी पडत वाहवत जाते. कोलकात्यात १९९६ मध्ये विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध आपण या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. तो सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला. तीन वर्षांनी तिथंच पाकिस्तानविरुद्ध खेळतानाही प्रेक्षकांनी गोंधळ घालून सामना थांबवला होता. दुसऱ्या दिवशीही त्याचे पडसाद चालू होते. सगळ्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढून सामना चालू ठेवण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली. मोकळ्या मैदानात खेळायला कुणाही खेळाडूला आवडणार नाही, कारण प्रेक्षक हेच खरंतर कोणत्याही खेळाची संजीवनी असतात; परंतु कधीकधी नाईलाज असतो हेही सत्यच!

बदलत्या हवामानाचे परिणाम
खरं तर याशिवाय अजूनही अनेक गोष्टी आहेत; पण सगळयांचा ऊहापोह एकाच लेखात घेणं शक्‍य नाही. इतकं नक्की, की पृथ्वीचं वातावरण बदलतंय. त्याचा सगळ्याच गोष्टींवर फरक पडेल, तसा क्रिकेटवरही पडेलच. भयंकर नैसर्गिक आपत्तींमुळं मैदानाची, साधनसंपत्तीची मोठी नासधूस होते. क्रिकेटला हे परवडत नाही. मध्यंतरी अशी बातमी आली होती, की नैसर्गिक आपत्तींमुळं ब्रिटनमधल्या क्‍लब्सना लाखो युरोंचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातही उन्हाळ्यातलं तापमान वाढत चाललं आहे. तिकडं त्वचेच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. सतत मैदानावर असणाऱ्या खेळाडूंना हा धोका अधिक तीव्रतेनं भेडसावतो. ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणं आहेत; परंतु या ना त्या मार्गानं फरक तर सगळीकडं जाणवणारच आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत झालं ते वाईट होतं. प्रदूषणामुळे सामना थेट रद्द होण्याची नामुष्की भारतावर आली असती. धूर (स्मोक) आणि धुकं (फॉग) यांच्या युतीमुळे तयार होणारा ‘स्मॉग’ हा शब्द सध्या परवलीचा झालेला आहे.
श्रीलंकेच्या खेळाडूंनी बराच वेळ दवडला, विराट डाव घोषित करताना त्यांचं हसणंखिदळणं चालू होतं, कोहलीचं चित्त विचलित करण्याचा श्रीलंकेचा डाव होता वगैरे भरपूर आरोप आपण केले. त्यांची चेष्टाही केली; पण शेवटी आपल्या महंमद शमीलाही उलट्या झाल्याच की! कदाचित श्रीलंकेनं राईचा पर्वत केला असेल, असं आपण गृहीत धरू; पण आपण त्यांना चिडवल्यानं मूळ परिस्थिती बदलत नाही. श्रीलंकेचे खेळाडू निघून जातील; पण आपल्या दिल्लीवासीयांना त्या ‘गॅस चेंबर’मध्येच राहायचं आहे. ही चिंताजनक स्थिती शेवटी आपल्यालाच बदलायची आहे, कारण दिवसेंदिवस वातावरण चिघळतच जाणार आहे. दिल्लीवर स्वार झालेलं हे ‘भूत’ आपल्या मानगुटीवर कधी येऊन बसेल आपल्याला समजणारही नाही. शेवटी, आपण जितक्‍या लवकर हे मान्य करू आणि त्याबाबत प्रयत्न करू तितकं चांगलं होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com