एकाही जागेवर विजयाचा विश्‍वास नसलेला पक्ष

"100 जागा लढवून एकही जागा जिंकणार नाही', हे सांगणारा कार्यकर्ता!
"100 जागा लढवून एकही जागा जिंकणार नाही', हे सांगणारा कार्यकर्ता!

शंभर जागा लढवून आम्ही यातली एकही जागा जिंकत नाही आणि जास्तीत जास्त जागांवर आमचं डिपॉझीट जमा होणार हे प्रामाणिकपणे/राजकीयदृष्ट्या बावळटपणाने सांगणारा 73 वर्षांचा कार्यकर्ता भेटतो तेव्हा तुम्ही थक्क झालेले असतात, पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष.

73 वर्षांचे रामप्रताप त्रिपाठी आणि त्यांचे सहकारी पार्टीच्या कार्यालयात पेपर वाचत बसलेले असतांना मी पार्टी कार्यालयात आलो, मी पुण्याहून आलोय हे ऐकून त्रिपाठींनी बोलायला सुरुवात केली आणि पक्षाबद्दल आणि एकूण आजपर्यंतच्या पार्टीच्या प्रवासाबद्दल आपली observations मांडली.

आम्ही काळाच्या मागे पडलोत, जेव्हा मी पक्षात आलो तेव्हा आमची ओळख हि millitant thought process organisation होती. आज आमची भीती कुणालाही नाही उलट ज्यांना आमच्याबद्दल आदर आहे, आमच्या कामाबद्दल माहिती आहे ते सुद्धा म्हणतात "बेचारे इमानदार तो है' असं बोलणारे आम्हाला हिणवतात असं वाटतं. पार्टी ऑफिस सरजू पांडे या खासदाराने विकत घेऊन दिलंय आणि अजूनही इथेच आहे. सोबत जोडलेल्या फोटोमध्ये तुम्ही त्याची अवस्था बघू शकतात.

आम्ही मजदूर आणि असंघटित कामगारांसाठी लढलो आणि शेतकऱ्यांचा लढा मागे पडला. अनेक संधीसाधू पक्ष उभे राहिले. त्यामुळे लोकांना आमची गरज वाटेनाशी झाली. मजदूर तसेच असघंटीत क्षेत्रातील कामगार यांच्यावर अत्याचार होत नाही कि शोषण होत नाही असा दिवस नाही. आजही आम्ही हे शोषण किंवा अत्याचार रोखू शकलो नाहीत. म्हणजे आम्ही दोन्ही आघाड्यांवर हरलो. समाजवादी आणि आम्ही यातला मूळ फरक हा की त्यांना भांडवलाच्या धरणाला बांध घालायचा आहे आणि आम्हाला मात्र त्या धरणातले पाणी काढून सर्वांना समसमान वाटायचे आहे. बऱ्याच वेळेला त्यांच्या बोलण्यत Comrade डांगे यांचा संदर्भ आला. दंडवते आले. Comrade डांगे यांचेबद्दल बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये आदर आहे. कारण त्यांची विचारसरणी सोबतची बांधिलकी आणि आपल्या कामाप्रती निष्ठा. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची आणि त्याच्या समस्या समजवून घेण्याची, त्या सोडविण्यासाठी अपार मेहनत घेण्याची पद्धत यामुळे ते आपल्या मूळ प्रदेशापासून येथे आले तरीही कधीच परके वाटले नाहीत.

तत्त्व आणि काम यात खोटेपणा आला की आपण संपलो, असं मानणारे कम्युनिस्ट आता जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत. केरळ आणि पश्‍चिम बंगाल वगळता राजकारणात यांचा फारसा वावर नाही. सर्वहारा वर्गच प्रतिनिधित्व करताना डाव्यांनी जनसामान्यांना हवे असलेले बदल आपल्या अंतर्गत रचनेत केले नाहीत, की आपल्या नेतृत्त्वात पोथीबद्ध लोकांपेक्षा लोकांच्या भाषेत बोलणारे सामान्य मोठे केले नाहीत. लोक डाव्यांना गृहीतच धरत नाहीत, हे सर्वात मोठं अपयश आहे. मुख्तार अन्सारी आणि अफजल अन्सारी यांची उत्तर प्रदेशाच्या पूर्वांचल मधील वाढ ही डाव्या चळवळीतच झाली. तीन वेळा अफजल अन्सारी निवडून आला आणि आज बसपामध्ये सामील होऊन निवडणूक लढवत आहे. सरजू पांडे हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध डावे व्यक्तिमत्व. आज उत्तर प्रदेशातील डाव्या चळवळीची जागा स्थानिक पक्ष किंवा उमेदवार घेऊ पाहत आहेत. लोकसंख्येचा विस्फोट आहे. संसाधनांची कमतरता आहे. सरंजामी वृत्तीवर भरीस भर म्हणून युवकांची संख्या पण भरपूर आहे. म्हणजेच डाव्याच्या यशासाठी लागणारी सर्व संसाधन या ठिकाणी आहेत उपलब्ध आहेत तरीही जर का डाव्याची भट्टी येथे पेटत नसेल, तर डाव्यांनी आता पुनर्विचार करणे जरुरी आहे. जसा सत्ताधारी हा मजबूत निर्णयक्षम असावा लागतो, तसाच विरोधक हा नैतिक आणि सैद्धांतिक पाया मजबूत असणारा असावा लागतो. आणि तसा तो डाव्या चळवळीत आहे हे नाकारून चालणार नाही.

त्रिपाठी मला चहाला घेऊन गेले. बायपास नुकतीच झाली आहे. घरापेक्षा पार्टी ऑफिस बरं वाटतं. तसं पाहिलं तर पार्टी ऑफिस कमी, अडगळीची जागा वाटते. दोन हजार स्क्वेअर फूट ऑफिस असेल, पण माणसं फक्त तीनच दिसली. थरथरत्या हातात हात देऊन निरोप घेतला नि निघालो पुढच्या प्रवासाला. नंतर मी इतर सर्व पक्षांच्या कार्यालयात गेलो. पण त्रिपाठिंनी दाखवलेलं आतिथ्य मला कुठेच आढळलं नाही जाणवली ती service industry. हायटेक कार्यकर्ते आणि दुरावलेले नेते. कॉंग्रेसच्या कार्यलयात तर सकाळी दहापर्यंत रखवालदार वगळता कुणीही नव्हतं. एक मात्र नक्की, कार्यकर्ता हा 'मिसकॉल' देऊन बनत नसतो, तर पार्टीचं चुकत असेल तर ऑन रेकॉर्ड आवाज लावून तारस्वरात जगाला सांगणारा, संघटन व्यवस्थेत हवे ते काम करणारा, कार्यकर्ता तयार होऊ द्यावा लागतो. कार्यकर्ता तयार करण्यासाठी पक्षात वातावरण तयार करावे लागते. आपल्याकडे आणि एकूणच सर्वांकडे नेते तयार होतात हे दुर्दैव आहेच.

कम्युनिस्ट पक्ष भारतात अजून किती काळ तग धरून ठेवेल हे सांगता येत नाही. पण त्याचं सक्रिय राजकारणातून हद्दपार होणं, हे सामान्य आणि मागासलेल्यांच्या संवेदना आकांक्षांचे आवाज क्षीण झाल्यासारखेच असेन. राजकारणात कुणीही अस्पृश्‍य नसतो तसाच कुणीही हरलेला नसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com