'कॅश'लेस'च्या दुनियेत... (कृपादान आवळे)

krupadan awale
krupadan awale

कॅशलेस व्यवहारांमध्ये आता वाढ व्हायला लागली असून, त्यासाठी विविध ऍप्स उपयुक्त ठरत आहेत. आर्थिक व्यवहारांपासून मोबाईल रिचार्जपर्यंत अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि केलेल्या व्यवहारांवर "कॅशबॅक'सारखी बक्षीसंही देणाऱ्या अशा ऍप्सविषयी माहिती.

कॅशलेस व्यवहारांमध्ये हल्ली झपाट्यानं वाढ होत आहे; तसंच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनाही आणल्या जात आहेत. कॅशलेस व्यवहारांसाठी विविध सॉफ्टवेअर्सही सध्या विकसित करण्यात आली आहेत. विविध सरकारी आणि खासगी बॅंकांकडून मोबाईल बॅंकिंग सॉफ्टवेअर्स, ऑनलाइन बॅंकिंग किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी खातेदारांना माहिती दिली जात आहे. त्यामुळं हळूहळू कॅशलेस व्यवहारांकडे कल वाढायला लागला आहे. रिझर्व्ह बॅंकेनं ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या नागरिकांची आकडेवारी जारी केली आहे. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या नागरिकांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली असून, ही संख्या शंभर कोटींवर गेली आहे. जानेवारीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, तब्बल पाच हजार ऑनलाइन व्यवहार प्रत्येक सेकंदाला केले जातात.

"युनिफाइड पेमेंट्‌स इंटरफेस' (यूपीआय), "अनस्ट्रक्‍चरड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा' (यूएसएसडी), "प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट' (पीपीआय) आणि "इंटरनेट बॅंकिंग' या सेवांच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार केले जात आहेत. केंद्र सरकारनंही कॅशलेस व्यवहारांसाठी "भारत इंटरफेस फॉर मनी' (भीम) ऍप लॉंच केलं आहे. हे ऍप लॉंच केल्यानंतर देशातल्या सुमारे एक कोटींहून अधिक नागरिकांनी गूगल प्ले-स्टोअरवरून ते डाऊनलोड केल्याची माहिती समोर आली आहे.

देशातल्या विविध कंपन्यांनी पेमेंट्‌स ऍप्स विकसित केली आहेत आणि त्यांना जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. विविध बॅंकांनीही ग्राहकांच्या सुविधेसाठी ऍप्सची निर्मिती केली आहे. भारतीय स्टेट बॅंक, देना बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि सारस्वत बॅंक यांसारख्या असंख्य बॅंकांनी मोबाईल बॅंकिंग सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. अशाच काही ऍप्सची माहिती आपण घेणार आहोत.

भीम ऍप : हे ऍप सरकारी पातळीवर तयार करण्यात आलं आहे. या ऍपच्या माध्यमातून एखाद्याला पैसे पाठवता येतात किंवा एखाद्या व्यक्तीकडून पैसे स्वीकारताही येतात. यासाठी बॅंकेकडून सात आकडी "मोबाईल मनी आयडेंटिफायर नंबर' (एमएमआयडी) आणि "इमिजिएट मनी पेमेंट सर्व्हिस' (आयएमपीएस) गरजेचा असतो. या क्रमांकाच्या आधारे डिजिटल व्यवहार करता येऊ शकतात.

पेटीएम : या ऍपच्या माध्यमातून पैसे पाठवणं, स्वीकारणं, कोणत्याही बिलाचं ऑनलाइन पेमेंट करणं, चित्रपट तिकीट, ऑनलाइन खरेदी-विक्री यांसारखे कॅशलेस व्यवहार केले जातात. यासाठी गरज असते ती रजिस्ट्रेशनची. एकदा एखाद्या युजरनं रजिस्ट्रेशन केलं, की मोबाईल क्रमांक आणि पासवर्डचा वापर करून व्यवहार करता येतात. मात्र, यासाठी मोबाईल क्रमांक रजिस्टर करणं अनिवार्य आहे. रजिस्टर केलेला क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) प्राप्त होतो. या ओटीपीच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार पूर्ण केले जातात.

फ्रीचार्ज : हे ऍप इतर ऍप्ससारखंच असून, या ऍपच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करता येतात. मात्र, युजर्सना आकर्षित करण्यासाठी रिचार्ज किंवा काही व्यवहारांवर अतिरिक्त सवलत दिली जाते. अनेक व्यवहारांत कॅशबॅक मिळते- ज्याचा वापर पुढच्या व्यवहारांच्या वेळी करता येऊ शकतो.

मोबिक्विक : या ऍपच्या माध्यमातून रिचार्ज, ऑनलाइन बिल पेमेंट आणि इतरही व्यवहार करता येतात. या ऍपमध्ये केलेल्या व्यवहारांवर मिळणारी कॅशबॅक "सुपरकॅश'च्या स्वरूपात मिळते. या सुपरकॅशचा ठराविक भाग पुढच्या व्यवहारांच्या वेळी आपोआप वापरला जातो.या खासगी ऍप्सशिवाय विविध बॅंकांनीही ग्राहकांसाठी ऍप्स लॉंच केली आहेत.

एसबीआय एनीव्हेअर पर्सनल : स्टेट बॅंक ऑफ इंडियानं खातेदारांच्या सेवेसाठी हे ऍप लॉंच केलं आहे. हे ऍप अँड्रॉइड मोबाईल युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. या ऍपच्या माध्यमातून पैसे पाठवणं-स्वीकारणं, रिचार्ज यांसह इतर विविध ऑनलाइन व्यवहार करता येऊ शकतात.

भीम देना यूपीआय : हे देना बॅंकेचं ऍप असून, त्याच्या माध्यमातून पैसे पाठवता येतात, स्वीकारताही येतात. तसंच बॅंक स्टेटमेंट मिळवता येतं, विविध रिचार्जही करता येतात. यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी बॅंकेमध्ये करणं गरजेचं आहे.

एचडीएफसी बॅंक मोबाईल बॅंकिंग : एचडीएफसी बॅंकेच्या ऍपवरून खातेदारांना ऑनलाइन व्यवहारांसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. यामध्ये पैसे पाठवणं-स्वीकारणं आणि इतर विविध सुविधा देण्यात येत आहेत.

गो-मो मोबाईल बॅंकिंग : हे सारस्वत बॅंकेचं ऍप असून, त्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करता येऊ शकते. बॅंक स्टेटमेंट मिळवणं, खात्यांमधील ठेवींची माहिती मिळवणं, विविध रिचार्ज या गोष्टी करता येऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com