कुमार गंधर्वांनी रंगवली गद्य मैफल...

कुमार गंधर्वांनी रंगवली गद्य मैफल...
कुमार गंधर्वांनी रंगवली गद्य मैफल...

कुमार गंधर्व गेले, त्या गोष्टीला आजच (गुरुवारी) पंचवीस वर्षं होताहेत. 12 जानेवारी 1992 या दिवशी पहाटे देवास येथे त्यांचं देहावसान झालं, त्याच्या महिनाभर आधी ते कोल्हापूरला आले होते, तेव्हा त्यांच्या भेटीचा योग आला होता. त्याचं असं झालं, महिपतराव बोंद्रे हे शेतीनिष्ठ शेतकरी. त्यांचा शास्त्रीय संगीताशी तसा काही संबंध नाही, ते भजनं गायचे, तेही सुराबिरात नाहीच. पण का आणि कसं कोणास ठाऊक, पण पं. कुमार गंधर्व नावाचा एक थोर गायक कोल्हापुरात आलेला आहे आणि त्याचा आपण आदरसत्कार केला पाहिजे असं त्यांना वाटलं खरं. त्यांनी कुमारांना आपल्या घाण्यावर- घाणा म्हणजे गुऱ्हाळघर; खरा शब्द घाणा हाच आहे, पण अलीकडे "घाणा' असं न म्हणता "गुऱ्हाळघर' असं म्हणायची पद्धत आलीय. तर, "पापां'नी (महिपतरावांना पापा म्हणायचे), कुमारांना फुलेवाडीच्या आपल्या घाण्यावर बोलावलं. त्यांच्याबरोबर काही पत्रकारांनाही बोलावलं. तिथं कुमारांसह सर्वांना उत्कृष्ट गुळाचा आस्वाद मिळाला.

ती काही मुलाखत नव्हती, वार्तालाप नव्हता, होत्या फक्त मनमोकळ्या गप्पा. एवढ्या दिग्गज गायकाशी गप्पा मारायला मिळताहेत म्हणून मी रोमांचित झालो होतो.
""माझ्या आयुष्यात मी समाधानी नाही; खऱ्या कलाकारानं समाधानी असूच नये. आजपर्यंत मी बरीच वाटचाल केलेली आहे. खूप काही केलं, पण अजूनही बरंच काही करायचं आहे, बरीच वाटचाल करायची आहे आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी कलेची सेवा करत राहणार आहे, "" आपल्या खास ढंगात कुमार बोलत होते. मात्र, त्यांच्या बोलण्यातला "तो' क्षण आता महिन्याभरावर येऊन ठेपलेला आहे, हे तेव्हा कुणाला माहीत होतं?

ज्ञानसाधना केव्हा पूर्ण झाली असं समजायचं? असं विचारल्यावर, ""अहो, ज्ञानसाधना कधीच संपत नाही. आयुष्य पुढं पुढं जात असतं, तशी ज्ञानसाधना वाढत असते. जीवनात सतत पुढं जावं लागतं...''

हिंदुस्थानी संगीतातला हिमालय मानले गेलेले पं. कुमार गंधर्व सहजपणे आपल्या आयुष्याबद्दल, संगीत साधनेबद्दल आणि सामाजिक परिस्थितीबद्दलही बोलत होते. गुलाबी रंगाचा झब्बा आणि शुभ्र लेहंगा परिधान केलेले पंडितजी खूप निवांत दिसत होते. खाटल्यांवर गाद्या, तक्के लोड टाकले होते, त्यावर रेलून गुळापासून बनवलेल्या वड्यांची चव चाखत गप्पा मारत होते, आमच्या ओंजळीत अमूल्य विचारधन टाकत होते. आम्ही कानांचा प्राण करून ऐकत होतो. मैफलीत रंगणारा महान गायक अशा गद्य मैफलीतही रस भरत होता.

""एखादी गोष्ट- मग ती कोणतीही असो, सातत्यानं बारा वर्षं केली म्हणजे झक मारत यश मिळेल की नाही? मिळणारच. पण सातत्य हवे. म्हणून बारा वर्षांचं तप म्हणतात. कामात सातत्य हवं. अहो, काहिलीत रस ओतून ठराविक वेळ उकळल्याशिवाय गूळ तयार होत नाही, तसंच सगळ्या गोष्टींचं आहे.'' गुऱ्हाळावर बसल्याचा परिणाम म्हणून पंडितजींनी तो संदर्भ लगेच दिला.

गुळाचाच संदर्भ देत ते पुढं म्हणाले, ""गूळ काय आपण आज करतो? गूळ करण्याचं शास्त्र जुनं आहे. पण तरीही आपण गूळ बनवण्याच्या शास्त्रातही प्रगती केली. अधिकाधिक प्रगत साधनं वापरून आपण आता गूळ बनवू लागलो आहोत. त्याचप्रमाणं जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती झालेली आहे. ती व्हावीच लागते. ज्ञानसाधना अखंड सुरू राहते.

त्यांना सहज विचारलं की, आपण एवढी साधना केली, एवढा अनुभव घेतला, आयुष्यात अनेक कडुगोड अनुभव घेतले. तर आत्मचरित्र का नाही लिहिलं? लिहिणार आहात का?

पंडितजींनी मार्मिक उत्तर दिलं, ""मी आत्मचरित्र लिहावं असं अनेक लोक म्हणतात. पण मला अजून तसं वाटत नाही. पण मी लिहिणारच नाही असं मात्र नाही हं. खरों सांगू का? आत्मचरित्रामुळं तरुणांना प्रेरणा वगैरे मिळते असं लोक म्हणतात? पण ह्या सगळ्या फालतू गप्पा आहेत. घेणारे घेतात आणि साधना करतात; साधना महत्त्वाची आहे. कुणाचं आत्मचरित्र नुसतं वाचून कुणी मोठं होत नाही.'

पण अखेर त्यांचं आत्मचरित्र झालं नाही ही गोष्ट खरी!

हिंदुस्थानी संगीतातले गौरीशंकर असं ज्यांना म्हटलं जातं, ते जयपूर- अत्रौली घराण्याचे गायक अल्लादियाखॉंसाहेब हे राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारचे गायक होते. तो संदर्भ मला आठवला म्हणून मी विचारलं, ''पूर्वी शास्त्रीय संगीताला राजाश्रय होता. तो आता नसल्यामुळं शास्त्रीय संगीत मागं पडतंय, त्याची उपेक्षा होतेय, असं आपल्याला वाटतं का?''

पंडितजी उत्तरले,""मला तसं वाटत नाही. राजाश्रय नसला, तरी लोकाश्रय आहे. लोक भरभरून दाद देतात. शिवाय सरकारही कलेसाठी खूप काही करतं. त्यामुळं तशी काही उपेक्षा वगैरे होते असं मला काही वाटत नाही. आजही शास्त्रीय संगीताचे प्रेमी समाजात आहेत. शास्त्रीय गायनाच्या मैफलींना ते आवर्जून उपस्थित राहतात. संख्या कदाचित कमी असेल, पण ती आहे एवढं नक्की. पुढच्या काळात ती वाढतही जाईल.''

...आणि खरोखर आज शास्त्रीय संगोताचे कानसेन वाढलेले आहेत हे दिसतं. कुमारांची ही पंचवीस वर्षापूर्वीची वाणी आहे.

""शास्त्रीय संगीत शिकणारी खूप मुलं अलीकडच्या काळात येताहेत. नव्या उमेदीनं ती शिकतात. समाजातील अभिरुची संपलेली नाही. आणि म्हणूनच गाणं शिकणारेही तयार होत आहेत.

हेही अगदी खरं. पंचवीस वर्षापूर्वी शिकायला लागलेल्या दमदार गायकांची पिढी आज मोठ्या तयारीनं गाताना आज दिसते आहे.विचारलं, ""पंडितजी, संगीत नाटकाचं काय? रसिकांची वाण संगीत नाटकाला जाणवते का?''

""तुलना करतो तेव्हा जाणवतं. पण त्याचं असं आहे, नाटकाचे संगीतकार संपत चालले आहेत. म्हणून संगीत नाटकं पूर्वीसारखी येत नाहीत. त्यासाठी नाट्यसंगीत देणारे संगीतकार निर्माण व्हायला हवेत. पूर्वीसारखे कलाकारही राहिलेले नाहीत. पूर्वीचे कलाकार स्टेजवर येऊन स्वतः गाणारे होते. तसे कलाकार आता शिल्लक राहिलेले नाहीत. असे गाणारे नट तयार झाले तर संगीत नाटकाला चांगले दिवस येतील. जबरदस्तीनं काही संगीत नाटकं तयार होणार नाहीत. सर्व स्तरात शास्त्रीय संगीताचे, नाट्यसंगीताचे रसिक आहेत. त्यांच्यासाठी संगीत नाटकं यायला हवीत.''
""नवोदित कलाकार सवंग प्रसिद्धीच्या मागं लागतात असं आपल्याला वाटत नाही?''
""तुम्ही पेपरवाल्यांनीच तशी सवय लावलेली आहे. आपलं नाव छापून येण्याची प्रत्येकाला हौस असते. वास्तविक वृत्तपत्र हे एक अतिशय प्रभावी असं माध्यम आहे. कलाकाराला किंवा कोणालाही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य वृत्तपत्रात असतं. हे चांगलंच आहे. आधुनिक साधनांमुळे वृत्तपत्रं चांगली आणि लवकर निघतात. त्यांचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. नवोदित कलाकारांनी सवंग प्रसिद्धीच्या मागे लागू नये. सतत साधना करावी. तरीसुद्धा मी नव्या पिढीबाबत निराशावादी नाही. ही मुलं उत्साही आहेत. त्यानी खूप मेहनत करावी. परिश्रमावर त्यांचं मोठेपण अवलंबून आहे. जे चांगलं आहे, ते टिकणारच. वाईट काही टिकणार नाही.''

"'शास्त्रीय संगीत सर्वसामान्य लोकांना कळत नाही, पण लावणीसारखी गाणी त्यांना कळतात, ही शास्त्रीय संगीताची मर्यादा समजायची का?'' असं विचारल्यावर हसत हसत पंडितजी म्हणाले, ""शास्त्रीय संगीताचा कॅनव्हास खूप मोठा आहे. पण सर्वांना राग कळलेच पाहिजेत असं काही नाही. आनंदाची निर्मिती करणं हा संगीताचा हेतू असतो. सामान्य माणूस लावणीकडे आकृष्ट होत असला तर त्यात वाईट काहीच नाही. शास्त्रीय संगीत सर्वांना कळावंच असा हट्ट धरणं काही बरोबर नाही. सर्वसामान्यांनी लावणी ऐकत पुढं जावं. शास्त्रीय संगीत समजण्यासाठी त्यांना तितकं उंच व्हावं लागेल. अभिरुची उच्च झाल्याशिवाय त्याना शास्त्रीय संगीत कळणार नाही. त्याला तडजोड नाही. ज्ञानेश्वर सगळ्यांना समजावा असं वाटत असेल, तर पातळी तितकी उंच व्हायला हवी. आमच्या दृष्टीनं गरीब- श्रीमंत सगळे सारखेच. मनोरंजन ही संगीताची मर्यादा नाही. संगीत हे त्याच्याही पलीकडचे आहे. शास्त्रीय संगीत कोणाला आवडत नसेल, तर त्याचा विचार आम्ही का करावा? एखाद्याला गुळाची ऍलर्जी आहे, म्हणून गूळ बनवायचं आपण थांबत नाही. नव्या कलाकारांना माझं एवढंच सांगणं आहे की, शिकताना लाजू नका. लाजून काही शिकता येत नाही. मी गेली साठ वर्षं सतत शिकतोय. सातव्या वर्षी मी गायला सुरुवात केली, आज 67 वर्षाचा झालोय, तरी गातोय. ज्ञानसाधना करा. सतत पुढं पहा. मागे वळून पाहणाऱ्याला पुढचं दिसत नाही. डरपोक माणसंच मागे वळून पाहतात. थोडक्‍यात काय, तर पुढं जात रहा...''
वेळ जाईल तशी रंगतच गेलेली ही मैफल नाइलाजानं वेळेअभावी आवरती घ्यावी लागली. 25 वर्षं होऊन गेली, तरी ती अजून ताजी आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com