'उत्तर' रंग परीक्षांचा...

'उत्तर' रंग परीक्षांचा...

परीक्षांचा काळ सुरू झाला आहे आणि पुढचे एक-दोन महिने सगळीकडं परीक्षांचाच ‘माहौल’ असेल. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठीही हा ताणाचाच काळ. हा ताण हलका कसा करायचा, शैक्षणिक वर्ष अगदी शेवटच्या टप्प्यावर असताना अभ्यासाची ‘स्मार्ट’ पद्धत कोणती, राहून गेलेला अभ्यास भरून कसा काढायचा, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-पालकांनी काय काळजी घ्यायची, उत्तरपत्रिकांचा विचार कसा करायचा, वेळेचं नियोजन कसं करायचं अशा सर्व गोष्टींचा वेध.

निवडणुकीचे नगारे बंद झाले आणि परीक्षांचा हंगामा सुरू झाला. सगळीकडं अभ्यासाचं वातावरण जाणवू लागलं. पहिल्यांदा दहावी-बारावी बोर्ड परीक्षा आणि नंतर पहिली ते नववीची दुसरी सत्र परीक्षा असं वेळापत्रक आहे. याच काळात महाविद्यालयांच्या परीक्षाही आहेत. परीक्षा म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनात धाकधूक, भीती, ताण, कुतूहल आणि उत्साह यांचं मिश्रण असतंच. आई-बाबा आणि संपूर्ण घर संवेदनशील झालेलं असतं. प्रत्येक जण आपापल्या परीनं परीक्षेची तयारी करत असतो. माझ्या आठवणीत दोन-तीन उदाहरणं आहेत, ती मुद्दाम आपल्यासमोर मांडतो.

रविवारचा दिवस होता. सुटी होती. बदल म्हणून मी माझ्या जुन्या मित्राच्या घरी गप्पा मारण्यासाठी गेलो होतो. सकाळची दहाची वेळ होती. त्याच्या घरी पोचलो. उत्साहाच्या भरात जोरात बेल वाजवली. माझ्या मित्रानंच लगबगीनं दरवाजा उघडला. मी जोरानं ‘हेलोऽऽ’ म्हणालो. त्यानं मला एकदम शांत केलं. तोंडावर बोट ठेवून ‘गप्प बैस’ची ॲक्‍शन केली. ‘‘हळू बोल, कशाला आलास?’’
‘‘अरे, गप्पा मारायला.’’
‘‘अरे बापरे, इथं नको- बाहेर चल. घरात सुनीता (मित्राची सून) मुलीचा अभ्यास घेतीय. दोन-तीन दिवसांनंतर परीक्षा सुरू होत आहे.’’
मी कुतुहलानं विचारलं, ‘‘कितवीत आहे रे तुझी नात?’’ मित्रानं उत्तर दिलं, ‘पाचवीत’ आणि तो पुढं म्हणाला, ‘‘अरे, या काळात आमच्या घरात हा ‘परीक्षा’नामक वेताळ भुतासारखा संपूर्ण घरात वावरत असतो. घरात अगदी स्मशानशांतता असते. घरातला सगळा आनंदच नाहीसा झालाय.’’ 

खरंच परीक्षांच्या या दिवसांमध्ये काय काय ऐकायला आणि पाहायला मिळतं ना? एका घरात समोरच भिंतीवर परीक्षेचं वेळापत्रक लावलं होतं. आई-बाबा दोघांनीही पंधरा दिवस रजा काढली होती. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामांत वेळ जाऊ नये म्हणून एक महिन्यासाठी पाच माणसांचा सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा डबा लावला होता. मुलाला परीक्षेसाठी आईनं सोडायला जायचं, तर पेपर सुटल्यावर बाबांनी आणायला जायचं, याचंही नियोजन छापील करून भिंतीवर लावलं होतं. टी.व्ही. लॉफ्टवर गेला होता, तर मुलाला अभ्यासाच्या खोलीत ‘डांबून’ ठेवलं होतं. आजी-आजोबांची रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ सक्तीनं देवळात रवानगी केली होती. सहज चौकशी केली, तर कळलं मुलगा होता सहावीत. 

याच्या बरोबर उलट चित्रं मावशीच्या घरी दिसलं. तिच्या घरी गेलो, तर तिचा दहावीतला नातू चक्क कॅरम खेळत होता. मी गेलो, तर मला म्हटला, ‘‘या काका. एक गेम खेळू या.’’ खेळता-खेळता मी त्याला प्रश्‍न केला, ‘‘दहावीत ना? परीक्षा सुरू आहे ना? कशी चाललीय परीक्षा?’’ त्यानं अगदी सहजतेनं आणि आत्मविश्‍वासानं उत्तर दिलं, ‘‘छान चालली आहे. वर्षभर पुरेसा अभ्यास झाला आहे, ९०-९२ टक्के पडतील.’’

या तीनही उदाहरणांवरून माझ्या लक्षात आलं, की वर्षभर सातत्यानं प्रयत्न आणि अभ्यास केल्यास परीक्षा ही निश्‍चितपणे आनंद देणारी प्रक्रिया आहे. खरंच परीक्षा, परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे हो? अहो, शिक्षण प्रक्रियेवर जिची जबरदस्त हुकमत आहे, तिला म्हणतात परीक्षा. शिक्षण व्यवस्थेची ती ‘चेतासंस्था’च आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास, ‘वर्गात शिकवलेला पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना कितपत समजला आहे, अपेक्षित वर्तनबदल किती झालेले आहेत, अभ्यासक्रमातली उद्दिष्टं किती प्रमाणात साध्य झाली आहेत, विद्यार्थ्यांना पाठ्यघटकांचं आकलन किती झालं आहे, त्यांच्या अध्ययनात नेमके कोणते कच्चे दुवे राहिले आहेत, हे तपासून पाहण्यासाठी विशिष्ट स्वरूपात तयार केलेल्या प्रश्‍नपत्रिकांच्या मदतीनं विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या प्रक्रियेला ‘परीक्षा’ म्हणतात. आपल्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर परीक्षा अपरिहार्यच आहेत. विशिष्ट नोकरी, शाखाप्रवेश, अभ्यासक्रम यासाठी परीक्षा अनिवार्य आहेत. व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यासाठी हे आव्हान स्वीकारणं आवश्‍यक आहे.

परीक्षांचं महत्त्व
आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे. त्याला विविध प्रसंगांतून जावं लागतं. विविध स्पर्धांना तोंड द्यावं लागतं. या स्पर्धेची तयारी शालेय परीक्षांमधून होते. आपण इतर लोकांच्या संदर्भात कोठे आहोत, याचं भान आल्याशिवाय आपल्याला कुठं जायचं आहे, हे कसं समजणार? परीक्षा व्यक्तीला स्वतःचं स्थान दाखविण्यासाठी उपयुक्त आहेत.

परीक्षांमुळं विद्यार्थी अभ्यास करतात. त्याना योग्य अशा अभ्यास-सवयी लागतात.

परीक्षांमुळं विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार होतं. त्यामुळं विद्यार्थी सतत प्रयत्नशील आणि कृतिशील राहतात.

परीक्षांमुळं विद्यार्थ्याला आपण कितपत क्षमता प्राप्त केलेली आहे, पाठ्यक्रमातल्या आशयावर कितपत प्रभुत्व मिळवलं आहे, हे समजतं.

शिक्षकांना प्रभावी काम करण्यासाठी दिशा हवी. विद्यार्थ्यांना काय शिकवावं, किती शिकवावं, कोणते अध्ययन अनुभव द्यावेत, यासंबंधीचं मार्गदर्शन परीक्षांमुळं होते. शिक्षकांच्या अध्यापनाची परिणामकारकता अजमावून पाहण्यासाठीसुद्धा परीक्षा उपयुक्त ठरतात.

परीक्षेसाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेतः
१) अभ्यास, २) उजळणी, ३) सराव, ४) वेळेचे नियोजन ५) उत्तरपत्रिका लेखन कौशल्य, ६) प्रकृतीची काळजी, ७) ताण-तणावविरहित राहणं.

अभ्यास 
प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन करून त्यावर प्रभुत्व मिळवा.
अवघड वाटणाऱ्या विषयाची तयारी आधी करा.
आपल्याला जो पाठ्यभाग येत नाही, समजला नाही, कळला नाही तो शिक्षकांकडून किंवा हुशार मित्र-मैत्रिणीकडून समजून घ्या.
कोणताही पाठ्यघटक ‘ऑप्शन’ला टाकू नका.
एकाच विषयाचा अभ्यास तीन-तीन दिवस करणं असं न करता रोज दोन किंवा तीन विषयांचा अभ्यास होईल, असं नियोजन करा.
ठराविक किंवा एकाच पद्धतीनं अभ्यास करत राहिल्यास अभ्यासाचा कंटाळा येतो. असं होऊ नये, यासाठी अभ्यासात विविधता येण्याच्या दृष्टीनं वाचन, लेखन, पाठांतर, चर्चा, मनन आणि उजळणी या पद्धतींचा वापर करावा.

संतुलित अभ्यास - परीक्षेची तयारी करताना आवडत्या विषयातला आवडता भागच सतत अभ्यासला जातो, त्यामुळं नावडत्या भागाकडं दुर्लक्ष होते आणि तो घटक कच्चा राहतो. परीक्षेच्या दृष्टीनं हे योग्य नाही. सर्वच घटकांना समान वेळ देऊन अभ्यास करावा.
पाठांतर - परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवायचं असेल, तर काही विषयांसाठी काही घटकांचं पाठांतर आवश्‍यकच आहे. भाषा विषयातल्या कविता, संस्कृतमधले श्‍लोक, गणित आणि विज्ञानातल्या व्याख्या आणि सूत्रं, इतिहासातल्या तारखा पाठच करायला पाहिजेत.

उजळणी
वाचलेली किंवा अभ्यासलेली कोणतीही गोष्ट हळूहळू विसरली जाते. हे होऊ नये म्हणून शिक्षणात उजळणीला सर्वांत जास्त महत्व आहे. सर्वांचे सध्याचे दिवस किंवा कालावधी उजळणींचा आहे. 
उजळणीचं तंत्र पुढीलप्रमाणं आहे.
टप्पा १ - रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या पाठ्यभागाचं मनन करणं.
टप्पा २ - धड्याच्या शेवटी पुस्तकात जे स्वाध्याय दिले आहेत, त्याची उत्तरं वाचणं, स्वाध्याय तोंडी सोडवणं.
टप्पा ३ - पूर्वीच्या किंवा जुन्या प्रश्‍नपत्रिकेतल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधणं आणि ती लिहून काढणं.
टप्पा ४ - प्रत्येक विषयाच्या नोट्‌समधून किंवा पाठ्यपुस्तकातून प्रश्‍नांच्या उत्तरातले फक्त मुद्दे किंवा महत्त्वाचे शब्द (key words) काढणं आणि ते पाठ करणं, लक्षात ठेवणं.
टप्पा ५ - आपल्या मित्र/मैत्रिणींशी वाचलेल्या/अभ्यासलेल्या पाठ्यभागाविषयी चर्चा करणं. न समजलेला भाग मित्रांकडून समजून घेणं. एखादा घटक आपल्याला उत्तम समजला असेल, तर तो आपल्या मित्राला समजून सांगणं.
टप्पा ६ - यासाठी तंत्रज्ञानाचं साह्य घ्यावं. एखादी गोष्ट सतत आपल्या कानावर पडली, तर ती आपोआप पाठ होते आणि कायमची लक्षात राहते. यासाठी सीडी प्लेअरचा वापर करा. बाजारात तयार सीडी मिळतात, त्या आणून सतत ऐका. ज्याला शक्‍य आहे, त्यानं स्वतःच्या आवाजात प्रश्‍नोत्तरं ध्वनिमुद्रित करावीत आणि ही सीडी उजळणी म्हणून सतत ऐकावी. पालकांनी याबाबत पुढाकार घ्यावा.

सराव
इयत्ता पहिली ते बारावी सर्वच इयत्तांतल्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांच्या जुन्या प्रश्‍नपत्रिका सोडवाव्यात. 
दहावी, बारावीच्या जुन्या प्रश्‍नपत्रिका बाजारात विकत मिळतात. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना मात्र या प्रश्‍नपत्रिका शाळेच्या मुख्याध्यापकांकडं अर्ज करून, ग्रंथालयातून मिळवाव्या लागतील. हे काम पालकांनी करावं. जुन्या प्रश्‍नपत्रिकांमधून प्रश्‍नपत्रिकेचं स्वरूप, वस्तुनिष्ठ प्रश्‍नाला किती गुण आहेत, दीर्घोत्तरी-लघुत्तरी प्रश्‍न किती आणि कशा स्वरूपाचे आहेत, एकूण प्रश्‍नसंख्या आणि त्यासाठी किती वेळ दिला आहे, हे यामधून आपल्याला समजतं आणि त्यानुसार या वर्षीची तयारी करणं सोपं जातं. पालकांनी यासाठी पाल्याला मदत, मार्गदर्शन, सहकार्य आणि आधार द्यावा. त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. 

वेळेचं नियोजन
वर्षभर केलेले प्रयत्न, कष्ट आणि अभ्यास यांपेक्षा या उरलेल्या दिवसांत किंवा वेळेत केलेला अभ्यास आणि प्रयत्न उज्ज्वल यशासाठी फार महत्त्वाचे आहेत. 

वेळेच्या नियोजनात दोन भाग आहेत. एक परीक्षापूर्व म्हणजेच उरलेल्या दिवसांचं नियोजन आणि दुसरं म्हणजे परीक्षा कालावधीचं नियोजन. 

दिवसातल्या २४ तासांचं नियोजन योग्यपणे करावं, झोप (फक्त रात्रीची), प्रातर्विधी, जेवण, क्‍लास, शाळा-कॉलेज यांचं त्या-त्या इयत्तांनुसार आणि गरजांनुसार नियोजन करावं आणि ते काटेकोरपणे पाळावं. त्यात काही वेळ मोकळाही ठेवावा. 

अभ्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेचे पहाट, सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र यांप्रमाणं टप्पे करावेत आणि आपापल्या सोयीनं विषयाची वाटणी करून अभ्यास करावा.

परीक्षा काळातल्या वेळेचं नियोजन आई-वडिलांच्या मार्गदर्शनानुसार करावं.

उत्तरपत्रिका लेखनकौशल्य
उज्वल यश किंवा चांगले गुण मिळवण्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळण्याची दोन कारणं असतात. एक म्हणजे उत्तरपत्रिकेत एकदम कमी लिहिलेलं असतं आणि दुसरं म्हणजे जे लिहिलेलं असतं ते अत्यंत खराब पद्धतीनं लिहिलेलं असतं. 
 

विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांनी दोन गोष्टींचा गांभीर्यानं विचार करावा. शिक्षकांनी, पालकांनी चांगल्या, हुशार मुलांच्या उत्तरपत्रिका फोटोकॉपी करून त्या आपल्या पाल्याला दाखवाव्यात. चांगलं पाहिलं म्हणजे चांगलं लिहिलं जाईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी दोन-तीन उत्तरपत्रिका या उद्देशानंच लिहाव्यात. उत्तरपत्रिका चांगली दिसण्यासाठी उत्तम हस्ताक्षर, मुद्देसूद लेखन, आकृत्यांचा जास्तीत जास्त वापर, परिच्छेदांचा योग्य वापर, काळ्या किंवा निळ्या एकाच शाईत लेखन करणं, परीक्षेत पूर्ण वेळ परीक्षा हॉलमध्ये थांबून जास्तीत जास्त लेखन करणं, या गोष्टी लक्षात घ्याव्यात. 

प्रकृतीची काळजी
पुरेशी झोप (सात ते आठ तास) घ्या. दिवसा झोपू नका.
दोन्ही वेळचं जेवण थोडं कमीच करा.
परीक्षा होईपर्यंत रस्त्यावरचे पदार्थ, शीतपेयं, आइसक्रीम खाऊ नका.
ध्यान, प्राणायाम, सूर्यनमस्कार, शवासन असे हलक्‍या स्वरुपांतले व्यायाम किमान अर्धा तास करावेत.

परीक्षा आणि ताण 
शिक्षण आणि परीक्षा यांचा एक अतूट संबंध आपण तयार केला आहे. पास आणि नापास एवढेच शिक्षणाचे ठोकताळे आहेत, हे पक्कं झालं आहे. खरं म्हणजे पास-नापासच्या पलीकडंही खूप शिक्षण आहे, हे शैक्षणिक संस्था, शाळा, शासन, पालक यांनी कधी लक्षातच घेतलेलं नाही. परिणामी शाळेत पाय ठेवण्यापूर्वीच मुलांची आणि पालकांची परीक्षा होऊ लागली. शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर परीक्षा, शाळेत टिकायचं असेल तर परीक्षा, वरच्या वर्गात जायचं असेल तर परीक्षा... शिक्षणाचं नावच ‘परीक्षा’ झालं. ध्येयच ‘परीक्षा’ झालं. पालकांच्या अपेक्षा वाढल्या. ‘आपल्या मुलानं वर्गात पहिलं यावं, त्याला नव्वदच्या पेक्षा जास्त गुण मिळावेत, गुणवत्ता यादीत झळकावं,’ असं त्यांना वाटतं, त्यामुळं परीक्षेच्या काळात मुलांच्या मनावर असह्य ताण येऊ लागतात. आपल्याला आई-बाबांच्या अपेक्षानुसार गुण मिळाले नाहीत, तर ते नाराज होतील, त्यांना आपला राग येईल, असं मुलांना वाटू लागतं. पालक आपल्यावर पूर्वीसारखं प्रेम, आपले लाड करणार नाहीत, अशा विचारांनी मुलांना खूप असुरक्षित वाटू लागतं. ती खूप निराश होतात. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. ती प्रचंड भीती आणि दडपणाखाली राहतात. पालक आपल्या मुलाची कुवत, क्षमता, बलस्थानं आणि उणिवा लक्षात घेत नाहीत. ‘मी उच्चशिक्षित, डॉक्‍टर, इंजिनिअर, ऑफिसर आहे; मग माझ्या मुलाला कमी गुण मिळाले, तर लोक काय म्हणतील, नातेवाईकांमधे नाचक्की होईल,’ या विचारांनी पालक अस्वस्थ होतात. काही पालक तर मुलांना दमच देतात- ‘‘या वेळी तुला परीक्षेत ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळाले नाहीत, तर पुढच्या वर्षी बोर्डिंगमध्येच टाकीन.’’ अशा धमक्‍यांमुळं मुलं अधिक अस्वस्थ, असुरक्षित होतात. या प्रचंड मानसिक ताणामुळं शरीरक्रिया बिघडतात आणि नेमकं परीक्षेच्या वेळी मुले आजारी पडतात. काही मुलं परीक्षेत गैरप्रकार करतात. त्यामुळंच मुलांना ताणमुक्त करणं गरजेचं आहे.

परीक्षेतले गैरप्रकार 
परीक्षेतल्या गैरप्रकारांमुळे आज शिक्षणाची विश्‍वासार्हता कमी होत चालली आहे. शिक्षण व्यवस्थेचं संपूर्ण आरोग्यच धोक्‍यात आलं आहे. दहावीच्या इंग्रजीच्या प्रश्‍नपत्रिका उत्तरासहित परीक्षेच्या आधीच उपलब्ध, हिंदीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपूर्वीची प्रश्‍नपत्रिका तारीख बदलून जशीच्या तशीच दिली, गणिताचा पेपरही व्हॉटस्‌ॲपवर, अमुक एका केंद्रावर ‘सामूहिक कॉपी’ सुरू, पर्यवेक्षक शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तरं सांगत होते, तर काही केंद्रावर शिक्षकच विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका लिहीत होते, कॉपी करण्यासाठी परीक्षा हॉलचा लिलाव झाला, वरच्या तुकडीत विद्यार्थिसंख्या कमी पडायला नको म्हणून खालच्या तुकडीत परीक्षेच्या वेळी शिक्षकच फळ्यावर उत्तरे लिहून देत होते, सातवीच्या मुलानं शाळेतून प्रश्‍नपत्रिका चोरल्या, हुशार मुलांना उत्तरं दाखवण्यासाठी दमबाजी, दहशत, पालकांना खूष करण्यासाठी प्रगतिपुस्तकात खोटे गुण भरणं, असे किती तरी प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत. परीक्षेला आणि परीक्षेतील यशाला, गुणांना जोपर्यंत अवास्तव महत्त्व आहे, तोपर्यंत हे प्रकार घडतच राहणार. या गैरप्रकारांमुळं समाजाचा आणि सरकारचा सुद्धा पारंपरिक परीक्षांवर विश्‍वास नाही म्हणूनच प्रत्येक अभ्यासक्रमानंतर टीईटी, नीट, जेईई, सीईटी, बॅंक किंवा रेल्वे भरती परीक्षा अशा वेगवेगळ्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या जात आहेत. हे बदलायचं असेल, तर मूळ परीक्षा पद्धतीत, व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे.

परीक्षेला ताण कमी करून, परीक्षेतील यशाचं प्रमाण वाढविण्यासाठी काय करावं?
विद्यार्थी  

परीक्षेला भिऊ नका. आपल्यापैकी काही जण अभ्यास झालेला असतानासुद्धा आत्मविश्‍वास गमावतात, निराश होतात. काही जण कॉपी करण्याचा विचार मनात आणतात. हे सर्व गैरप्रकार आहेत. हे विचार मनात न येण्यासाठी....
इतरांशी तुलना करू नका, स्वतःमधील क्षमता व मर्यादा ओळखा.
परीक्षा काळात दिवसभराचं वेळापत्रक तयार करा. त्यात मनोरंजन, व्यायामासाठी थोडा वेळ ठेवा.
अभ्यासात सातत्य, एकाग्रता, जिद्द, महत्त्वाकांक्षा ठेवा आणि आत्मविश्‍वास वाढवा.

शिक्षक 
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे अध्यापन, दृष्टिकोन, बांधिलकी, भूमिका महत्त्वाची ठरते. त्यासाठी ः
स्वतःच्या विषयाची उत्तम तयारी करून सर्व विद्यार्थी आपल्या विषयात उत्तीर्ण होतील असा प्रयत्न करावा.
गरजू व अप्रगत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करावं.
विद्यार्थ्यांना प्रश्‍नपेढी, समांतर प्रश्‍नपत्रिका, प्रश्‍नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान तक्ता, उत्तरपत्रिका लेखनकौशल्य यांविषयी पुरेसं मार्गदर्शन करावं.
परीक्षेच्या आधी पालकसभा घेऊन पालकांना परीक्षेचं संपूर्ण स्वरूप व्यवस्थित समजून सांगावं.
विद्यार्थ्यांकडून जुन्या प्रश्‍नपत्रिका वर्गात सोडवून दाखवाव्यात. त्या घरी सोडवण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावं, प्रोत्साहन द्यावं.
विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार करू नयेत, यासाठी परीक्षेपूर्वीच योग्य त्या सूचना द्या. समुपदेशन करा.

पालक 
आपल्या मुलाची इतरांशी तुलना करू नका. त्यांची अवहेलनाही करू नये.
मुलांना अभ्यासाचे नियोजन आणि वेळापत्रक तयार करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करा.
कौटुंबिक वातावरण सकारात्मक, आनंदी, उत्साहवर्धक ठेवावं.
मुलांशी सतत सुसंवाद करावा.
मुलांच्या अभ्यासात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
मुलांचं आरोग्य उत्तम राहील, हे कटाक्षानं पाहावं.
परीक्षेचा बाऊ करून मुलांना अधिक ताण देऊ नये.
भरपूर गुण मिळवण्यापेक्षाही मुलांनी भरपूर कष्ट, प्रयत्न आणि अभ्यास करायला लावा. गुणांचा ध्यास न ठेवता मुलांना अभ्यासात आनंद मिळवायला शिकवा. ‘तू तुझ्या परीनं पूर्ण प्रयत्न केलेस हेच महत्त्वाचं आहे,’ अशा तऱ्हेनं मुलांना पाठिंबा द्या. आई-वडिलांनी सुरवातीपासूनच मुलांच्या मनात परीक्षेबद्दल एक निरोगी आणि निकोप दृष्टिकोन निर्माण करणं, ही आजच्या काळाची खरी गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com