लोणावळा ते आळंदी...

लोणावळा ते आळंदी...

वारकरी संप्रदायातली कोंडी फोडण्याचं काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत विष्णू नरसिंह जोगमहाराज यांनी केलं. त्यांची ही वेगळी परंपरा चालवली ती त्यांचे प्रशिष्य जगन्नाथ महाराज यांनी. त्यांच्या मते ‘गीता ही वेदोपनिषदांच्या पलीकडील असल्यानं तिचा अर्थ वेदोपनिषदांच्या चौकटीत बसत नाही. स्वतः ज्ञानेश्‍वरांनी लावलेला गीतेचा अर्थही या चौकटीबाहेरीलच आहे. ते असंही सांगतात ः ‘‘गीतेचं हे वैशिष्ट्य संस्कृत भाष्यकारांस मानवलंच नाही. ‘वेदांपरते तत्त्व’च या जगी असणं शक्‍य नाही हेच त्यांचं मनोगत. वेदवाक्‍याधारेच गीतेचा अर्थ लावण्याचा प्रयास सर्व आचार्यांनी केला.’’

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या धर्मजीवनातला मुख्य प्रवाह आहे. याविषयी कुणाचं दुमत होण्याचा संभव नाही. ज्ञानेश्‍वर नामदेवादी तेराव्या शतकातल्या संतांच्याही पूर्वी काही शतकं पंढरीचं विठ्ठल दैवत व त्याची वारी नावाची उपासनापद्धती यांच्या रूपात हा संप्रदाय नांदत होता. हे विठ्ठल दैवत म्हणजे द्वारकेहून पंढरीला आलेला कृष्णच अशी श्रद्धाही तितकीच प्राचीन आहे. विठ्ठल व कृष्ण यांच्यातल्या एकत्वाच्या या श्रद्धेमुळंच ज्ञानेश्‍वरांनी कृष्णाच्या भगवद्‌गीतेचा केलेला मराठी अन्वयार्थ ‘ज्ञानेश्‍वरी’ आपला मुख्य प्रमाणग्रंथ किंवा धर्मग्रंथ म्हणून स्वीकारायला विठ्ठलभक्त वारकऱ्यांना अडचण आली नाही.

ज्ञानेश्‍वरांचेच जीवलग असलेल्या संत नामदेवांच्या तात्त्विक अधिकाराला धक्का न लावता असं म्हणता येतं की ते उत्तम कुशल संघटक व प्रभावी प्रचारकही होते. त्यांनी वारकऱ्यांच्या ‘फड’ नावाच्या यंत्रणेला संस्थात्मक रूप देऊन वारकरी संप्रदाय थेट पंजाबपर्यंत नेला.

नामदेवरायांनंतर जवळपास एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत वारकरी संप्रदाय टिकला व पसरला तो मुख्यत्वे फडाच्याच माध्यमातून काटेकोर पद्धतीनं सांगायचं झालं तर दिंडी हे वारकरी संप्रदायाचं सर्वात लहान ‘युनिट’ होय. पूर्वीच्या काळातल्या बहुतेक दिंड्या कुठल्या ना कुठल्या फडाशी संलग्न असत, जशी महाविद्यालयं - विद्यापीठाशी संलग्न असतात. देहूकर, वासकर, आजरेकर, शिवळकर, धोंडोपंतदादा आदी फडांना मोठी परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या या रचनेची वर्णनं लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या लेखनातून वाचायला मिळतात. वारकरी संप्रदाय टिकला आणि वाढला तो याच फडांमुळं हे खरं असलं तरी आधुनिक काळात फडांमुळं संप्रदायाच्या वाढीवर मर्यादा पडल्या हेही खरं आहे. आजरेकरांसारखा एखादा लोकशाही पद्धतीनं चालणारा फड सोडला तर इतरत्र फडाची मालकी वंशपरंपरेने चालत राहते. संप्रदायात प्रविष्ट होण्यासाठी एखाद्या फडाच्या मालकाच्या हातून तुळशीमाळ गळ्यात घालावी लागायची. अशा प्रकारे एखाद्या फडाशी संलग्न झालेल्या वारकऱ्यानं दुसऱ्या फडावरच्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकणंही संमत नसे. दुसरं असं की ब्रिटिश राजवटीमुळं आधुनिक होत असलेल्या बदलांची आणि त्या बदलांमुळं निर्माण झालेल्या आव्हानांची खबरबातही या फडकऱ्यांना नसायची. वारकरी संप्रदायाची ही कोंडी फोडण्याचं काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी केलं. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचं घोषित केलं. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.

जोग महाराजांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेची सध्या शताब्दी आहे. आपण लावलेल्या बीजाचा वृक्ष झालेला पाहण्यास महाराज फार काळ जगले नाहीत. हा वृक्ष साधा वृक्ष नसून फांद्यापारंब्यांनी विस्तारलेला वटवृक्ष आहे, असं रूपक करून, जोग महाराजांच्याच प्रशिष्य म्हणजे  मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य जगन्नाथ महाराज पवार यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘वटवृक्ष’ नामक ग्रंथच प्रसिद्ध केला आहे. यानिमित्तानं संस्थेशी निगडित असलेले इतर अभ्यासकही काही लिखाण करतीलच, परंतु जगन्नाथ महाराजांच्याच पुस्तकात जोग महाराजांच्या फारशा ज्ञात नसलेल्या पैलूवर प्रकाश टाकला गेला आहे तो महत्त्वाचा. स्वतः जगन्नाथ महाराज यांचाही गुरे वळणारा, खेडेगावातल्या शेतकऱ्याचा मुलगा ते वेदांतवाचस्पती, काव्यतीर्थ असा प्रवासही थक्क करणारा आहे. उत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर गाजलेल्या जगन्नाथ महाराजांचं स्वरयंत्र कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं निकामी होऊन त्यांची कीर्तनसेवाच खंडित झाली. तेव्हा त्यांनी जिद्द न सोडता लेखणी हातात धरली व ग्रंथरचनेस सुरवात केली. विष्णुसहस्रनामावर दहा खंडांचं मराठी भाष्य प्रसिद्ध करून त्यांनी एक विक्रमच केला आहे. त्यातून ते लोकमान्यांचे सहकारी डॉ. ग. कृ. गद्रे, विनोबा, कुंदर दिवाण यांच्या परंपरेत विराजमान झाले आहेत. ‘वटवृक्ष’ ही त्यांची साठावी कृती आहे, हे लक्षात घेतलं म्हणजे त्यांच्या कामाचा उरक व झपाटा लक्षात येतो. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारनं ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरवही केला.

‘वटवृक्ष’ ग्रंथात त्यांनी ज्ञानेश्‍वर महाराज हे या वटवृक्षाचं बीज असून जोग महाराज त्याचा बुंधा आहेत. जोग महाराजांचे शिष्य चतुष्ट्यय-बंकटस्वामी, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, मारोतीबुवा गुरव आणि सोनोपंत दांडेकर म्हणजे वटवृक्षाच्या मुख्य शाखा असल्याचं सांगून त्या शाखांना फांद्या, डहाळ्या, पानं इतकंच नव्हे तर वृक्षाच्याच पारंब्या व वृक्षावर विहरणारे पक्षी असं सगळं रूपक रचलं आहे.
जोग महाराजांचे फारसे चरित्रतपशील ‘वटवृक्षा’त नाहीत. त्यांची गरजही नाही. मी माझ्या ‘तुकाराम दर्शन’ ग्रंथात आवश्‍यक ते तपशील दिले आहेत. शिवाय स्वतः मामासाहेबांनी महाराजांचं स्वतंत्र चरित्रच लिहिलं आहे. ते जिज्ञासूंनी जरुर पाहावं.

फडांच्या पलीकडं जाऊन वारकरी संप्रदायाचा विचार करणाऱ्यांची परंपरा स्पष्ट करताना जगन्नाथ महाराज ती ऐतिहासिक दृष्टीनं करतात. ‘‘संतवाङ्‌मय व समाज यांच्या समन्वय प्रक्रियेचा प्रारंभ साखरे घराण्यापासून झाला याबाबत दुमत होण्याचं कारण नाही. पण तो सनातनी वृत्तीतून वेदान्ताच्या परिभाषेत व त्यांच्याकडं शरणागत अशा अधिकारी श्रोत्यांपर्यंतच असल्यानं काहीसा मर्यादितच राहिला.’’ ही कोंडी जोग महाराजांनी फोडली, असं जगन्नाथ महाराजांचे निरीक्षण आहे. जोग महाराज जणू गौतमाच्या स्वरूपात पुढं आले आणि ‘‘त्यांनी ही संतवाङ्‌मय गंगा समाजसागरापर्यंत आणून तिचे सिंचन केलं. वेदान्त ग्रंथातील प्रक्रिया मान्य करून वेदान्ताच्या पुढं पाऊल टाकत या ‘वारकरी शिक्षण संस्था’ वटवृक्षाचं बीजारोपण केलं.’’

जगन्नाथ महाराजांचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. साखरे यांच्या परंपरेतले नानामहाराज साखरे यांनी ज्ञानेश्‍वरीवर प्रवचनं करून या ग्रंथाचा प्रसार केला. स्वतः जोग महाराजांनीही नाना महाराजांकडं श्रवण केलं होतं. तथापि, साखरे परंपरेत ज्ञानेश्‍वरांपासून तुकोबांपर्यंतचे सर्वच वारकरी संत आद्य शंकराचार्य प्रणित, मायावादी वेदान्ताचे व तदनुषंगाने वैदिक वर्णाश्रमधर्माचे पुरस्करर्ते होते असं समजून संतवाङ्‌मयाचा अर्थ लावला जातो. गीतेचा अर्थबोध हीच त्यांची धडपड व धारणा, अपूर्व अशा गीतार्थाचा संकोच करून तो वेदोपनिषदांच्याच जगन्नाथ महाराजांच्या मते, ‘‘गीता ही वेदोपनिषदांच्या पलीकडील असल्यानं तिचा अर्थ वेदोपनिषदांच्या चौकटीत बसत नाही. स्वतः ज्ञानेश्‍वरांनी लावलेला गीतेचा अर्थही या चौकटीबाहेरीलच आहे. ते असंही सांगतात की ‘‘गीतेचे हे वेगळं वैशिष्ट्य संस्कृत भाष्यकारांस मानवलंच नाही. वेदांपरते तत्त्वच या जगी असणे शक्‍य नाही हेच त्यांचं मनोगत, वेदवाक्‍याधारेच गीतेचा अर्थबोध हीच त्यांची धडपड व धारणा, अपूर्व अशा गीतार्थाचा संकोच करून तो वेदोपनिषदांच्याच अर्थात कोंबण्याचा म्हणण्याऐवजी त्याचाच अर्थ गीतेत कोंबण्याचा केविलवाणा प्रयास सर्व आचार्यांनी केला.’’

त्यातील शंकराचार्यांचा अर्थ प्रमाण धरून त्यानुसार ज्ञानेश्‍वरादी संतांच्या अभंग-ओव्यांचा परिपाठ नानामहाराजांनी पाडला. त्यासाठी उपनिषदं, ब्रह्मसूत्रं व गीता या प्रस्थानत्रयीवरील शंकराचार्यांच्या भाष्यग्रंथांबरोबरच उत्तरेतील जाट पंडित निश्‍चलदास यांचे विचारसागर व वृत्तिप्रभाकर असे ‘गाइड’वजा ग्रंथ साखरेपरंपरेत प्रतिष्ठा पावले. ‘ज्ञानेश्‍वरी’ हा तर गीतेवरील भाष्य ग्रंथच असल्यानं हे एक वेळ समजून घेता येईल. पण ज्ञानेश्‍वरांच्याच ‘अमृतानुभव’ या चिद्विलासवादाची मांडणी करणाऱ्या स्वतंत्र ग्रंथाचा अर्थही असाच करण्यात येऊ लागला. जगन्नाथ महाराज सांगतात की, ‘‘तत्कालीन प्रचलित परिस्थितीत प्रसंगी नानामहाराज साखरे यांचेकडं (जोग महाराजांनी) ग्रंथाध्ययन केलं. वक्‍त्याचं श्रवण व स्वतः मनन करून त्यात समाधान न झाल्यानं आपल्या शंका वाराणशीचे विद्वान कृष्णानंद स्वामींच्या समोर मांडल्यानं त्यांना प्रतिसाद मिळाल्यावर अनेक वर्षे मनःपूर्वक विचार करून वेदांतानुसार लावलेला अमृतानुभवाचा अर्थ अपूर्णच नव्हे तर अयोग्य ठरला, जोग गुरुजींना हे क्रांतिकारक कोडे उलगडले.’’

जगन्नाथ महाराजांनी जोग महाराजांच्यात या मतपरिवर्तनाकडं लक्ष वेधून या बदललेल्या मतांचा प्रसार करण्याच्या उद्देशानंच वारकरी शिक्षणसंस्थेची स्थापना करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. संस्था स्थापन झाली आणि ‘‘कठोर क्रूर काळाच्या किमयेने त्याच काळी हा कवीश्‍वर कोलमडला व तो स्वतंत्र सिद्धांत तेथेच अडकून पडला.’’ ‘‘चिद्विलासवादमंडणपूर्वक स्फूर्तिवाद हा विचारपरिपाक व वारकरी शिक्षण संस्था हा कर्तृत्वपरिपाक यांची जोपासना ही जबाबदारीच नव्हे तर आपलं सर्वांचं कर्तव्यच ठरलं आहे.

जगन्नाथ महाराजांच्या या मांडणीला समकालीन आधारही सापडतो. जोग महाराजांच्या मृत्यूनंतर ‘चित्रमय जगत्‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या श्रद्धांजलीपर लेखात अशी माहिती मिळते की, ‘‘शिक्षकाच्या गुणावगुणांचा विचार न करता नानामहाराज साखरे यांच्याकडं जोग यांनी ‘अनुभवामृत’ या ज्ञानदेवांच्या ग्रंथाचं अध्ययन केलं. नाना महाराजांची पद्धत अर्थातच पूर्णपणानं मायावादी होती. तिनं जोग महाराजांचं समाधान होईना. त्यांनी चोवीस वर्षे नीट मन लावून विचार केला. नानामहाराज यास मळमळीन असलेल्या अनुभवामृतातच सर्व उत्तरे निघाली. अनुभवामृताचा पूर्वीचा अर्थ उघडउघड चुकवणारा ठरला. आपणास उलगडलेला नवा अर्थ प्रकाशित करण्यासाठी मग त्यांनी लोणावळा इथं शिबिर घेतलं. तिथं बंकट स्वामी, पांडुरंग शास्त्री प्रभृती शिष्यांना ‘मायावादाची सांगडी’ सोडून अनुभवामृत लावायला त्यांनी शिकवलं.’’

या शिष्यांपैकी पांडुरंग शास्त्री म्हणजे पंडित पांडुरंग शर्मा कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवून ज्ञानेश्‍वरांच्याच तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र म्हणजे आशांकरीय, चिद्विलासवादी अर्थ लावणारं लेखन केले.
जगन्नाथ महाराजांना पांडुरंग शर्मांची नीट माहिती नसावी. पण संस्था वाढवण्यात त्यांचाही मोठा हातभार आहे. जगन्नाथ महाराजांनी उल्लेखिलेल्या वटवृक्षाच्या फांद्यांपैकी बंकटस्वामी शिबिरास उपस्थित होते. पण स्वतः स्वामी काय किंवा लक्ष्मणबुवा इगतपुरीकर काय यांचा बहुतेक वेळ महाराष्ट्रभर फिरून कीर्तनप्रवचने करण्यात गेला. त्यामुळं संस्थेच्या कारभारात ते फारसे नव्हते. या तिघांबद्दल गेल्या पिढीतील व्यासंगी अभ्यासक रा. ना. चव्हाण लिहितात, ‘लक्ष्मणबुवा म्हणाले ज्ञानेश्‍वरांना शंकराचार्यांच्या परंपरेत का घालतात हे समजत नाही. मी याबाबतीत दयानंद (म्हणजे बंडखोर) आहे.’ रा. ना. पुढे असेही म्हणतात की ‘‘म्हणजे शंकराचार्यांच्या पठडीत ज्ञानेश्‍वरांना घालण्याचा सोनोपंत व तत्सम ज्ञानेश्‍वरी प्रवचनकारांचा प्रयत्न लक्ष्मणबुवांना नापसंत होता व सोनोपंतांपेक्षा वेगळ्या व स्वतंत्र पद्धतीनं लक्ष्मणबुवांचा अभिप्राय १९४१-४२ च्या सुमारास ऐकला. खोरे ज्याप्रमाणे आपल्याकडे माती ओढते, त्याप्रमाणे आद्य शंकराचार्यांचे भक्त व पक्षपाती शंकराचार्यांना ज्ञानेश्‍वरांपाशी सदैव जोडीत.’’

या वादात दांडेकर मामा पुरेशी स्पष्ट भूमिका घेत नाहीत ही पांडुरंग शास्त्र्यांची तक्रार होती. त्यांनी ‘ज्ञानेशीय वाङ्‌मयाची करुण कहाणी’ या पुस्तिकेत याबाबत मामांनाही धारेवर धरायला मागंपुढं पाहिलं नाही. शर्मा हे प्रभावी व्यक्तिमत्त्व होतं. ते आळंदी नगरपालिकेचे अध्यक्ष व मुंबई विधिमंडळाचे सदस्य अशीही त्यांची ओळख होती.

शर्मांच्या पश्‍चात संस्थेत ज्ञानेश्‍वरांचं स्वतंत्र तत्त्वज्ञान सांगणारं कुणी उरलंच नाही. मामा पुण्यात राहायचे. मारुतीबोवा गुरवांची तर तात्त्विक बैठकच साखरे महाराजांकडं तयार झाल्यानं त्यांच्याकडून ती अपेक्षाही करणं चुकीचं होईल. परिणामतः जोग महाराजांमध्ये झालेला बदल तसा अज्ञातच राहिला. वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम व साखरे यांच्या आश्रमातला अभ्यासक्रम यात फारसा भेद उरला नाही. त्यामुळं जगन्नाथ महाराजांची अपेक्षा कशी फलद्रूप होणार? आळंदी आणि लोणावळा यांच्यातलं अंतर तसं कमीच आहे; पण लोणावळ्यावरून सुटलेली गाडी अद्याप तरी आळंदीला पोचली नाही, हे मात्र खरं !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com