'लुंपेन'वर्ग रोखायला हवा ! (मिलिंद कसबे)

मिलिंद कसबे
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

कोपर्डीमधल्या अत्याचारासारख्या अमानुष घटना रोखण्यासाठी तरुणाईला प्रेमाचा आणि जगण्याचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. नव्या ग्लोबल दुनियेत माणसाची प्रतिष्ठा कशी वाढेल? त्याच्या मनातली माणुसकी कशी वाढेल? तो प्रेममय कसा बनेल यासाठीच्या योजना आखायला हव्यात.

कोपर्डीमधल्या अत्याचारासारख्या अमानुष घटना रोखण्यासाठी तरुणाईला प्रेमाचा आणि जगण्याचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. नव्या ग्लोबल दुनियेत माणसाची प्रतिष्ठा कशी वाढेल? त्याच्या मनातली माणुसकी कशी वाढेल? तो प्रेममय कसा बनेल यासाठीच्या योजना आखायला हव्यात.

नगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमधल्या अमानुष घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अगोदर जवखेडे, खर्डा, सोनईतल्या घटना ताज्या असतानाच सामूहिक अत्याचाराची ही दुसरी घटना घडावी ही चिंतेची बाब आहे. दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडाची आठवण करून देणारा हा प्रकार कोपर्डीत घडला. या घटनेचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यावर खडाजंगी चर्चा झाली, प्रसारमाध्यमांना एक ब्रेकिंग न्यूज मिळाली, सोशल मीडियावर नको त्या चर्चा फिरायला लागल्या. या प्रकरणाचं राजकीय श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भांडताना जनतेनं पाहिलं. कुणी हे प्रकरण जातीय रिंगणात नेऊन ठेवलं, तर कुणी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. पोलिस यंत्रणा तपास करत आहे, यावर राजकारण होत आहे तर माध्यमं चर्चा करत आहेत, असं सगळं चित्र आहे. परंतु या साऱ्या प्रकरणात ज्या पंधरा वर्षाच्या मुलीनं जीव गमावला, ज्यांनी आपली मुलगी गमावली त्या आई-वडिलांच्या दुःखाचं काय?

कठोर शिक्षेची गरज
स्त्रियांवरील बलात्कार, स्त्रियांच्या हत्या, महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड, आंतरजातीय विवाहांतून होणाऱ्या हत्या, दलित-सवर्ण वादातून होणाऱ्या हत्या या सर्व गोष्टी निंदनीय आणि निषेधार्ह आहेत. माणूस म्हणून जीवनावर प्रेम करणारा कुणीही माणूस या घटनांचं समर्थन करणार नाही, हेही तितकंच खरं आहे. पण सातत्यानं अशा घटनांना दडपणारे राजकारणी आहेत, मंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रीला प्रवेश नाकारणारे लोकही वाढत आहेत. एकूणच अंधाराची मस्ती वाढलीय हे नक्की. हा अंधार गडद करणारे कोण आहेत? ती माणसं आहेत की हजारो वर्षाच्या पुरुषी वर्चस्वाच्या फालतू कल्पना रुजवणारी व्यवस्था आहे हे एकदाचं नीट ओळखावं लागेल. माणसं पकडली जातील त्यांना शिक्षाही होतील; पण माणसांचे मेंदू खराब करणाऱ्या परंपरांचं काय? आणि त्या परंपरांना गडद करत समाजात जाती घट्ट करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या मतलबी राजकारण्यांचं काय?

आज जगभर हिंसाचार वाढतोय. धुमसतं काश्‍मीर, अस्वस्थ फ्रान्स आणि पेटता इराक आपण पाहत आहोत. जगभर दहशतवादाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतो आहे. आपल्या देशात मात्र ही लढाई अधिक जटिल आहे. एकीकडं दहशतवादाशी लढा आहे आणि दुसरीकडं सामंती व्यवस्थेनं माणसांच्या मनात कोंबलेल्या वर्चस्वाच्या भ्रामक कल्पनांशी लढा द्यावा लागत आहे. भारतातल्या अनेक धर्मांनी स्त्रियांना नेहमीच दुय्यम मानलं. तिचे नैसर्गिक हक्क नाकारून पुरुषी वर्चस्वाच्या ओझ्याखाली हजारो वर्षे तिची सर्जनशीलता गोठवली. कुटुंबव्यवस्थेनं तिला अधिक बांधून ठेवले. ती केवळ भोगाची वस्तू असल्याची माणसांच्या मनात आभाळातून तर पडली नाही?

राज्यघटना घराघरांत हवी
गेल्या दोन दशकांत भारतीय मानसिकता बदलतं आहे हे नक्की. स्त्रियांना कायद्यानं मिळालेले संरक्षण, हक्क आणि मालमत्तेतला सहभाग या साऱ्याच गोष्टी तिचं अस्तित्व अधिक घट्ट करणाऱ्या आहेत. पण संसदेत कायदे करून आणि पोलिसी धाक दाखवून भारतीय माणसाच्या मनात स्त्रीबद्दल आदरभाव वाढणार आहे का? हा मोठा प्रश्‍न आहे. ज्या धर्मव्यवस्थेनं स्त्रीला दुय्यम मानलं त्या धर्मव्यवस्थेच्या चिकित्सेची ही वेळ आहे. ज्या जातिव्यवस्थेनं तिच्यावर अमानुष बंधनं लादली त्या जातिव्यवस्थेचा अंत करण्याची ही वेळ आली आहे. कधी नव्हत्या एवढ्या ऑनर किलिंगच्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. दिवसा ढवळ्या स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. एकीकडं स्त्रीभ्रूण हत्येचा निषेध करून ‘बेटी बचाव’चा नारा देणारं सरकार, माणसांच्या मनात जातीच्या खोट्या प्रतिष्ठेनं निर्माण केलेल्या सरंजामी कल्पना कशा काढणार आहे? स्त्रियांवरील अत्याचार थांबावेत म्हणून आजपर्यंत अनेक वरवरचे उपाय झालेत; परंतु मुळांचं काय? ती मुळं नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाती भारतीय राज्यघटना दिली. पण भारतातल्या खेड्यापाड्यातील घराघरांत गीता, हनुमान चालिसा, शनिमाहात्म्य, आरत्या आणि पोथ्या पोचविण्यात आम्ही यशस्वी झालो; पण भारतीय राज्यघटना अजूनही घराघरांत पोचली नाही, हे आपलं सामाजिक दुर्दैव आहे.

कोपर्डीतील घटनेला अनेक कंगोरे आहेत. बलात्कार आणि त्यानंतर पीडित मुलीची क्रूरतेनं केलेली हत्या या दोन गोष्टी वेगवेगळ्या मानसिकतेवर तपासायला हव्यात. बलात्कार ही विकृत उद्रेकी अवस्था आहे, तर क्रूरता ही बेपर्वा मानसिकतेचा संकेत आहे. ही विकृती मनांमध्ये कशी विसावते, तर त्या अवस्थेला जोपासणारे आधार गल्लोगल्ली उभे असतात. बहुतांश आरोपी राजकीय वरदहस्तानं वावरतात, तर असंख्य आरोपी कायद्यातल्या त्रुटीचा वापर करून आपली सुटका करून घेऊन पुन्हा वावरतात. आपल्या कायद्यात असणाऱ्या अनेक पळवाटा बुजवून ते अधिक कठोर करण्याचे काम राजकारण्यांना करावं लागणार आहेत. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोपर्डीत कधी पोचले, या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्‌विट का केलं नाही, मीडियानं वेळेत दखल का घेतली नाही, राज्य महिला आयोग लगेच का सक्रिय झाला नाही, अशा प्रश्‍नांवर केवळ चर्चा करत बसण्यापेक्षा कोपर्डीमध्ये झालेलं कृत्यं पुन्हा कसं होणार नाही, तशी मानसिकताच निर्माण होणार नाही, अशा कठोर योजना करण्याची ही निर्णायक वेळ आली आहे.

पीडित मुलगी कुठल्या जातीची, आरोपींची जात काय या तर अत्यंत चुकीच्या चर्चा आहेत. याकडं लक्ष देण्याची गरज नाही. कोपर्डीतील घटना वेगळी आहे. इथं घडलेली घटना हे हैवानी कृत्य असंच म्हणावं लागेल. विकृतीला जात नसते. आरोपी कुठल्याही जातीचे असोत त्यांना जबर शिक्षा व्हायला हवी, यासाठी सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. बन्सी सातपुते व स्मिता पानसरे यांनी पीडित मुलीच्या आईचे शब्द सांगितले. आपल्या काळजाचा तुकडा गमावलेली आई जेव्हा म्हणते, ‘माझी मुलगी आता परत येणार नाही हे सत्य आहे; पण आरोपींना अशी शिक्षा करा की, अशा हैवानांना परत कुणाच्या मुलीकडं विकृत नजरेनं बघण्याची हिंमत व्हायला नको, या आईच्या आवाजाला साथ देण्याची ही वेळ आहे. या आवाजात कुणी जात शोधू नये. धर्म शोधू नये. याचं राजकारण करू नये. पण समाजात वावरणाऱ्या लुंपेन वर्गाला या चर्चा अधिक मोठ्या करण्यात राजकीय रस असतो. कार्ल मार्क्‍सनं अधोरेखित केलेला हा लुंपेन वर्ग सर्वत्र वाढतो आहे. या वर्गाला सत्ता कुणाची येवो याचं काही देणं-घेणं नसतं. फक्त मौजमजा करण्यासाठी पैसे कोण पुरवितो याकडं या वर्गाचं लक्ष असतं. या वर्गाला कुठलीही राजकीय विचारसरणी नसते. मूल्यं नसतात आणि समाजाप्रती आदरभावही नसतो. राजकीय पक्षात वावरणारे अनेक तरुण या लुंपेन वर्गाचे बळी आहेत. ते शाळा-महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थी आहेत, मोलमजुरी करणारे मजूर आहेत, तर शेतजमिनी विकून खोट्या राजकीय प्रतिष्ठेत वावरणारे चैनखोर आहेत. सर्व थरांतून हा वर्ग डोके वर काढतो आहे. राजकारणाला हा बेधुंद तरुण हवा आहे. कारण हाच वर्ग रस्त्यावर येऊन तोडफोडीला उपयोगी पडतो, हाच वर्ग बंद पुकारून सार्वजनिक मालमत्तेची वाट लावतो आणि हाच वर्ग कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यानं घरोघरी फिरून मतेही मिळवत असतो. खून, दरोडे, हाणामाऱ्या, बलात्कार, दंगल, जाळपोळ करण्यासाठी जी जी विघातक माणसे समोर येतात त्यांना रोखण्याऐवजी त्यांचाच चेहरा घेऊन हा लुंपेन वर्ग पोषक वातावरण तयार करतो. कार्ल मार्क्‍सनं भांडवलदार आणि मजूरवर्गापर्यंतच या वर्गाला गृहीत धरलं होतं. हा वर्ग भांडवलदारांचा हस्तक बनून कामगारांच्या लढाया विकलांग करील, अन्यायाला प्रतिकार करणारा आवाज क्षीण करील, असं मार्क्‍सला वाटत होतं. परंतु हे भाकीत अधिक भेसूरपणानं आज समोर येत आहे. भांडवलशाहीनं, बेकारी वाढवली, जागतिकीकरणानं सामान्य माणसाच्या न्यायाच्या कहाण्या संपविल्या. स्त्रीचं वस्तुकरण (कमॉडिटी) करून मार्केट कसं वाढेल, याच्या नव्या नव्या क्‍लृप्त्या काढल्या. समाजात मानवी प्रेमभावना नष्ट होऊन सेक्‍समार्केट वाढलं. अशा नव्या ग्लोबल दुनियेत माणसाची प्रतिष्ठा कशी वाढेल? त्याच्या मनातली माणुसकी कशी वाढेल? तो प्रेममय कसा बनेल यासाठीच्या सांस्कृतिक योजना करण्यात आपण कमी पडलो, हे नक्कीच म्हणावं लागेल.

संपूर्ण समाज प्रेममय बनावा
प्रेम ही जगातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे परंतु माणसं तिच्याकडं अतिशय उथळ आणि थिल्लर दृष्टीनं पाहत आहेत. माणसाच्या जगण्याला बळ देणाऱ्या या अतिशय मूलभूत आणि महत्त्वाच्या प्रेमशक्तीकडं थिल्लर वृत्तीनं पाहिल्यामुळं मानवी जीवन किती कुरूप आणि आत्मघातकी बनलं आहे हे आपण जगात घडणाऱ्या अनेक भीषण गोष्टी पाहून अनुभवत आहोत. माणसानं माणसावर प्रेम करणं ही कला आहे. ती आपोआप जमणारी गोष्ट नाही हे जगभरातल्या विचारवंतांनी सागितलं आहे. एरिक फ्रॉम यांनी तर ‘आर्ट ऑफ लव्हिंग’ असं एक पुस्तकच लिहून ठेवलं आहे. पोहणं, धावणं, शिल्पकला, चित्रकला, संभाषण कला, लेखनकला या कला जशा माणसाला शिकाव्या लागतात, तशी प्रेमाची कलाही माणसाला शिकावीच लागेल अशी भाकितंही विचारवंतांनी केली आहेत. परंतु दुर्दैवानं भारतातल्या शिक्षणतज्ज्ञांनी याकडं अजून लक्ष दिलेलं दिसत नाही. त्यामुळं आपल्याकडं बऱ्याच वेळा प्रेमाची परिणती व्यभिचारात, लैंगिक संबंधात होते आणि त्याचा परिणाम मानवी नातेसंबंधांना काळिमा फासमाऱ्या विघातक कृत्यांत होतो. महाराष्ट्रातल्या शिक्षणाच्या प्रश्‍नांचा अभ्यास करणारे संशोधक हेरंब कुलकर्णी यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शैक्षणिक स्थितीचा अभ्यास केला.

अनेक ठिकाणी विशेषतः आदिवासी दुर्गम भागात जाऊन त्यांना जशी शैक्षणिक अनास्था दिसली तशीच विद्यार्थ्यांच्या मनात स्त्री-पुरुष नात्यांबद्दल प्रचंड भीती आणि उत्सुकता आहे असंही दिसलं. याच मुलांना मानवी नात्यांबद्दल आणि मानवी शरीराबद्दल शास्त्रीय ज्ञान मिळालं की त्यांच्या मनातील अनामिक बेचैनी कमी होईल नक्की. लैंगिक शिक्षण हा एक प्रभावी उपाय होता. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात धर्मप्रेमी भारतीय शिक्षणपद्धती कमी पडली, असंच म्हणावं लागेल. मागील काही वर्षांत सुरू झालेल्या ‘सर्व शिक्षा अभियान’ आणि ‘मूल्यशिक्षणाचं’ काय झालं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
प्रेम शेतात उगवत नसते, ते बाजारात विकताही येत नाही. प्रेमात राजा आणि प्रजा, गरीब आणि श्रीमंत, स्त्री आणि पुरुष, सवर्ण आणि दलित असा कोणताही भेद नसतो. मानवी मनात प्रेमाचा एवढा प्रचंड साठा आहे, की तो कोणालाही उपलब्ध होऊ शकतो; परंतु त्यासाठी अट एकच आहे, ती अट म्हणजे प्रत्येकानं आपल्या मनातल्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे. अहंकाराचा त्याग म्हणजेच प्रेमाची प्राप्ती आहे. ‘प्रेम न बाडी उपजै, प्रेम न हाट बिकाय’ ही कबीरवाणी आजच्या युवकांसमोर पुन्हा पुन्हा जायला हवी. कबीरांनी सांगितलेला हा अहंकार केवळ एका व्यक्तीचा नाही तर तो जातीचा आहे, धर्माचा आहे. पुरुषी वर्चस्वाचा आहे, भूप्रदेशाचा आहे, संपत्तीचा आहे, राजकीय मस्तीचा आहे आणि सामंती मानसिकतेचा पण आहे. माणसं धर्मांसाठी जीव देण्यास तयार होतात, याची अनेक दाहक उदाहरणं आपण अनुभवत आहेत. आज मानवी मनातल्या प्रेमाची जागा त्याच्या अहंकाराने घेतली आहे. प्रत्येक जण, प्रत्येक समूह आणि प्रत्येक देश नार्सिस्ट झाला आहे. प्रत्येक माणसाला वाटतं, माझंच खरं आहे, माझाच धर्म खरा आहे, मीच सर्वस्वी आहे. साम्राज्यवादानं या कल्पना तर अधिक घट्ट केल्या आहेत असं जगभरातले वास्तव आहे. संपूर्ण जगाला युद्धभूमी बनवणारा हा मानवी अहंकार जेव्हा गळून पडेल तेव्हाच माणूस प्रेममय बनेल हे प्रत्येकानं उमजून घेणं ही आपल्या सुंदर जगण्याची गुरुकिल्ली आहे.

तरुणाईनं सुसंस्कृत व्हावं
शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या तरुणांनी आपलं जीवन नीटपणानं समजून घेतलं पाहिजे. निसर्ग माणसाला एकदाच जन्म देतो. तोच जन्माला घालतो आणि तोच मृत्यूही देतो. जन्म आणि मृत्यू यातलं अंतर किती सुंदरपणानं चालायचं हे आपल्या हातात असते. माणसाची श्रीमंती त्याच्याकडं असणाऱ्या पैशात मोजायची की त्याने घेतलेल्या सुंदर अनुभवात मोजायची हे एकदाचे नीटपणे समजून घ्यायला हवे. मानवी नात्यांत किती गोडवा आहे, तो गोडवा पैशात श्रीमंती मोजणाऱ्यांना निश्‍चितच कळणार नाही. आपलं जगणं बलात्कार करून सुंदर होणार नाही, हातात बंदूक घेऊन सुंदर होणार नाही, धर्माचं रक्षक होऊन सुंदर होणार नाही, आत्महत्या करूनही सुंदर होणार नाही आणि व्यसनं करून तर सुंदर होणार नाहीच. हे सारे राँग नंबर आहेत. ते कुणीतरी त्यांच्या भल्यासाठी आपल्या डोक्‍यात टाकले आहेत. हे असंच करत राहिले तर आपल्या हाती निराशेपलीकडं काहीही लागणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. नगर जिल्ह्यात अशा अमानुष घटनांचं प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत अशा घटना घडत आहेत; परंतु नगर जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे हे खरं आहे. हा जिल्हा संपूर्ण सधन नाही. या जिल्ह्यात एक भाग सुपीक, तर दुसरा भाग उजाड आहे. जो भाग कंगाल आहे तो आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीपासून दूर आहे. नगर जिल्ह्यात एकीकडं कारखानदारी आणि दुसरीकडं बेकारी आहे म्हणून बेकारी असलेल्या भागातली भरकटलेली तरुणाई अधिक आहे. या तरुणाईला दिशा नसल्यानं आणि त्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरणाऱ्या शक्ती असल्यानं लुंपेनवर्ग सतत वाढतो आहे. भांडवलशाहीत विशेषतः जागतिकीकरणात हा लुंपेनवर्ग वाढणार आहे आणि आपापल्या जातिधर्मातला हा भरकटलेला तरुणवर्ग वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या हाताशी धरून राजकारण करणार आहेत हे सत्य स्वीकारून हा जिल्हा जसा राजकीयदृष्ट्या जागरूक आहे तसाच तो सांस्कृतिकदृष्ट्याही विचारी व सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.

कोपर्डीतील घटनेचा काय बोध घ्यायचा, हे महत्त्वाचं आहे. ही घटना घडल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळून जी संवेदनशीलता दाखवली ती प्रकाशानं अंधाराला दिलेली चपराक आहे. महाराष्ट्रातला तरुण जागा होतोय, युवाशक्ती विचार करू लागली आहे. समाजात अन्यायाच्या प्रतिकाराची, नवी समाजशक्ती उभी राहत आहे. ही समाजशक्ती उभी राहत आहे. ही समाजशक्ती सरकार, पोलिस आणि न्यायव्यवस्थेला निर्भीड लोकशाही रुजविण्यासाठी निश्‍चितच सहकार्य करेल, असा संयमी आणि सकारात्मक संदेश राज्यातल्या जनतेनं देशाला देणं गरजेचं आहे.