लावण्य लवणाचं...! (माधव गोखले)

लावण्य लवणाचं...! (माधव गोखले)

मीठ हा आपल्या खाद्ययात्रेतला एक अफलातून घटक आहे. मीठ नसलं, तर सगळंच कसं अळणी, बेचव होऊन जाईल. म्हणून मीठ हवंच हवं; पण त्याचं प्रमाणही राखायला हवं. शेती करायला लागल्यापासून माणूस स्थिरावला आणि त्या आसपासच मीठ त्याच्या आयुष्यात आलं आणि त्यानंतर त्यानं मानवी आयुष्याचा अक्षरशः ताबा घेतला. भाषेपासून संस्कृतीपर्यंत आणि अर्थकारणापासून राजकारणापर्यंत अनेक गोष्टींना ‘चव’ देणाऱ्या या ‘लवणविश्‍वा’ची रोचक सफर.

उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया.....’ ही ओळ पहिल्यांदा वाचली ती सातवीत असताना- भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचताना. महात्मा गांधी यांच्या एका छोट्याशा भासणाऱ्या कृतीनं या देशातल्या सर्वसामान्य माणसालाही स्वातंत्र्यलढ्याशी जोडून घेतलं. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवणं, ते विकणं एवढंच काय; पण असं ‘बेकायदा’ मीठ जवळ बाळगण्याला गुन्ह्यांच्या यादीत टाकणाऱ्या कायद्यासमोर गांधीजींनी आव्हान उभं केलं. सर्वसामान्य माणसाला एक कार्यक्रम दिला. पुढं ग. दि. माडगूळकर यांची ती संपूर्ण कविताही वाचायला मिळाली; पण ती खूप नंतर. आजच्या भाषेत बोलायचं तर मीठ नावाचा पदार्थ (अधिक काटेकोरपणे बोलायचं तर संयुग) गांधीजींनी एक ‘स्ट्रॅटेजिक इमोशनल कनेक्‍ट’ म्हणून वापरला. ‘गदिमां’ची ही ओळ मी जेव्हा-जेव्हा वाचतो, तेव्हा-तेव्हा शब्दांचं सामर्थ्य मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात पुनःपुन्हा अधोरेखित होतं. पाऊणशे वर्षांपूर्वी मिठाच्या सत्याग्रहाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणाऱ्या अनेकांना जी ऊर्जा दिली असेल, ती या ओळीतून आजही जाणवते.

एरवी केवळ खारटपणाशी जोडल्या गेलेल्या या संयुगाचा ‘इमोशनल कनेक्‍ट’ आज्जीकडून ऐकलेल्या एका गोष्टीमुळंही मनात जाऊन बसला होता. कृष्ण आणि रुक्‍मिणीची ही गोष्ट तशी सुपरिचित आहे. सोळा हजार एकशे आठ बायकांच्या या भ्रताराचं आपल्यापेक्षा सत्यभामेवर जास्त प्रेम आहे, अशा संशयानं ग्रासलेल्या रुक्‍मिणीनं भगवंताना एकदा प्रश्‍न केला, ‘तुम्हाला जास्त कोण आवडते? मी की ती (सत्यभामा)?’ श्रीकृष्णांनी दिलेलं उत्तर मोठं मजेदार होतं. सत्यभामेचं त्यांच्या आयुष्यातलं स्थान साखरेसारखं आहे, आणि रुक्‍मिणीचं मिठासारखं, असं त्यांनी सांगितलं. (हा प्रसंग मथुरेत घडला की द्वारकेत, हा तपशील आज्जीच्या गोष्टीत नव्हता.) झालं... या उत्तरानं विदर्भकन्या संतापली. ‘म्हणजे ती... सत्यभामा... साखरेसारखी आणि आपण मीठ -खारट.’ (हे वाक्‍य साधं सरळ आहे. उगाच ‘बिटवीन द लाइन्स’ म्हणजे परवाच्या निवडणुकांचे निकाल ‘वाचण्या’च्या गर्दीत असलेल्या स्वयंघोषित राजकीय पंडितांप्रमाणं शब्दच्छल करत, ‘साऽऽखर म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्र...’ वगैरे भूगोल डोळ्यांसमोर आणू नये.) तर, काही ‘अपौरुषेय’ वाक्‍यांत संताप व्यक्त करत रुक्‍मिणीनं भगवंतांशी बोलणंच टाकलं. राजवाड्यात गडबड उडाली. भगवान मात्र शांत होते. दोन-तीन दिवसांनी त्यांनी मुख्य बल्लवाला बोलावून घेऊन त्याला ‘आज दुपारी जरा खास मेन्यू करा,’ असं सांगितलं. काही सूचना दिल्या. दुपारी पंगत बसली. साक्षात भगवंत पंगतीला होते. रांगोळ्या घातल्या होत्या. धुपाचा वास भरून राहिला होता. सोन्याची ताटं, चांदीच्या वाट्या. पुरोडाश, करंभ, भाज्या, वडे, घारगे, पुऱ्या, चटण्या, कोशिंबिरी... एक ना दोन! जेवणाला सुरवात झाली... आणि.... पहिलाच घास तोंडात अडला. एकाही पदार्थात मीठ नव्हतं. सगळा स्वयंपाक ठार अळणी. रुक्‍मिणीनं चोरट्या नजरेनं श्रीकृष्णांकडं पाहिलं, तर कृष्ण भगवान गालातल्या गालात स्मित करत नजरेनं जणू रुक्‍मिणीदेवींना विचारत होते, ‘आता सांगा बरं, जेवणात मीठ महत्त्वाचं का साखर....?’
आपल्या सगळ्यांच्याच प्रवासात प्रत्येक वळणावर अशी ‘मिठा’सारखी माणसं भेटत राहतात. काही जगण्याची चव वाढवतात आणि काही जण नकोसा खारटपणा.
***

मीठ हा आपल्या खाद्ययात्रेतला एक अफलातून घटक आहे. मीठ नसेल, तर सगळंच कसं अळणी, बेचव होऊन जाईल. म्हणून मीठ हवंच हवं; पण त्याचं प्रमाणही राखायला हवं. आपली ‘सु’रस यात्रा या अर्थानं मिठाभोवती फिरत राहते. रासायनिक परिभाषेत मीठ म्हणजे सोडियम हायड्रॉक्‍साइड आणि हायड्रोक्‍लोरिक ॲसिड यांच्यात रासायनिक विक्रिया होऊन बनणारे एक लवण. एनएसीएल (ए आणि एल लहान लिपीतले) हे मिठाचं रासायनिक सूत्र. म्हणजे मिठाच्या रेणूतला एक अणू सोडियमचा आणि एक क्‍लोरिनचा. शेती करायला लागल्यापासून माणूस स्थिरावला आणि त्या आसपासच मीठ त्याच्या आयुष्यात आलं. म्हणजे ते त्या आधीही होतं; पण खाण्यात शेतीजन्य पदार्थ वाढायला लागल्यापासून त्याच्या आहारातली मिठाची गरज वाढायला लागली. आणि त्यानंतर आपले गुणधर्म कधीही न बदलण्याचा त्या काळातही अत्यंत दुर्मिळ (आणि आता तर जवळपास नामशेष झालेला) गुणधर्म लाभलेल्या असेंद्रिय मिठानं मानवी आयुष्याचा अक्षरशः ताबा घेतला.

मिठामुळं साम्राज्य उभी आणि धुळीलाही
मिठाबद्दल अगदी पहिल्यांदा वाचलं ते विश्‍वकोषात. एक-एक संदर्भ घेऊन शोधत जायला लागलं तर स्तिमित व्हायला होतं. गांधीजींनी उचललेल्या मूठभर मिठामुळं कवीला साम्राज्याचा पाया खचल्यासारखा दिसला, ही अनेकांना अतिशयोक्त कल्पना वाटते; पण मिठाचा इतिहास वाचताना रोजच्या वापरात असूनही एरवी कोणाच्या प्राधान्ययादीत नसणाऱ्या या पदार्थानं साम्राज्यं उभीही केली आहेत आणि धुळीलाही मिळवली आहेत, हे सत्य ठळकपणे पुढे येतं. ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ असा नारा देत अनियंत्रित राजेशाही उलथवून टाकत युरोपच्या इतिहासाला कलाटणी देणारी फ्रेंच राज्यक्रांती होण्यामागं राजसत्तेकडून होणारी पिळवणूक हे महत्त्वाचं कारण होतं आणि सत्ताधाऱ्यांवरच्या रोषाचं एक कारण होतं ‘गाबेल’ हा मिठावरचा अन्याय्य कर. सोळाव्या शतकाच्या मध्यापासूनच फ्रान्सच्या दक्षिण भागातल्या शेतकरी मिठावर लादलेल्या जाचक निर्बंधांच्या विरोधात उभे ठाकले होते. तिथपासून ते व्हेनिसमधल्या भव्य वास्तू आणि सुंदर पुतळे, इंग्लंड आणि स्कॉटलंडदरम्यानचा तणाव, चीनची प्रचंड भिंत आणि आज महाशक्ती असल्याचा समज असणाऱ्या अमेरिकेची निर्मितीही कुठं तरी मिठाच्या अर्थ आणि राजकारणाशी जोडली गेली आहे. मार्क कुर्लान्स्की या अमेरिकन पत्रकारानं मिठाचा जगभरातला सांस्कृतिक आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे आर्थिक आणि राजकीय इतिहास, भूगोल मांडणारं एक पुस्तकच लिहिलं आहे- ‘सॉल्ट - अ वर्ल्ड हिस्ट्री.’ दोन-तीन वर्षांपूर्वी वीणा गवाणकरांनी करून दिलेला या पुस्तकाचा विस्तृत परिचय वाचनात आला होता. त्याच वेळी ‘वेळ काढून वाचायचीच...’ अशा पुस्तकांच्या यादीत हा मिठाचा जागतिक इतिहास त्याच वेळी जाऊन बसला होता.

ऋग्वेदोत्तर वेदवाङ्‌मयात मिठाचे उल्लेख सापडतात. छांदोग्यपनिषदात आरूणी आणि श्‍वेतकेतूच्या संवादात सूक्ष्म तत्त्वासंबंधीच्या चर्चेत मिठाचा उल्लेख आहे. सूक्ष्म तत्त्वाबद्दल सांगताना आरूणीनं आपल्या मुलाला मीठ देऊन ते रात्रभर पाण्यात टाकून ठेवायला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मीठ परत मागितलं. श्‍वेतकेतूनं पाण्यात हात घालून पाहिलं; पण त्याला मीठ मिळालं नाही. त्या मिठानं पाण्याची चव मात्र बदलली होती. ते विलीन होऊन गेलं होतं. ‘दिसत नसलं तरी पाण्यात मीठ आहेच. सूक्ष्म तत्त्व तसंच आहे,’ असं आरूणी आपल्या मुलाला सांगतो. वाचत गेलो, तसं तसं मीठ आणखी उलगडत गेलं. बौद्ध वाङ्‌मयातल्या त्रिपिटकाचा भाग असलेल्या विनयपिटकात आणि चरकसंहितेत मिठाच्या सैंधव, सागरी मीठ, बीडलवण आदी पाच प्रकारांचा उल्लेख आहे. ग्रीक महाकवी होमरनी तर मिठाला ‘दैवी पदार्थ’ म्हटले आहे.
***

भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्ट्यांवरच्या मिठाच्या शेतीला सुमारे सात हजार वर्षांचा इतिहास आहे. उत्तर भारतात खनिज मिठाचे साठे आहेत. त्याशिवाय सांभार, नावा, राजस, फलोडी, सुजनगड अशी खाऱ्या पाण्याची सरोवरंही आहेत. त्यातूनही मिठाचं उत्पादन घेतलं जातं. ब्रिटिशांनी, त्यांच्या मीठ उद्योगाच्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी, मिठाचा प्रश्‍न उभा करेपर्यंत मिठाचा अद्‌भुत खारेपणा आपल्याकडं फक्त अन्नपदार्थांची रुची वाढवत होता. विश्‍वकोषातल्या नोंदीप्रमाणं मिठाचं उत्पादन आणि पुरवठा यावर मौर्यांच्या काळापासून नियंत्रण असावं. मिठाच्या व्यापारावर सत्ताधाऱ्यांचं नियंत्रण होतं आणि मीठ हे राज्याच्या उत्पन्नाचं एक साधन होतं, तरी त्याबाबत असंतोष वगैरे नसावा. राज्यकर्त्यांची एकूण भूमिका आपल्या राज्यातल्या लोकांच्या बाजूची असावी. मिठाच्या संदर्भानं याचं एक उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारात सापडतं. कोकणपट्टी ताब्यात घेतल्यानंतर तिथली घडी बसवताना महाराजांनी कोकणातल्या मिठाच्या व्यापाराकडंही लक्ष दिल्याच्या नोंदी आहेत, असं अभ्यासक सांगतात. पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या बारदेशातलं मीठ स्वस्त असल्याने स्वराज्यातला मिठाचा व्यापार मंदावतो, हे लक्षात आल्यानंतर राजांनी कुडाळच्या सुभेदाराला बारदेशचं मीठ स्वराज्यात महाग पडेल इतकी जकात बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुढं ब्रिटिश आमदानीत मिठाची आयात सुरू झाली; मात्र विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून आपल्याकडं मिठाचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर ही आयात बंद झाली. गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थान ही मिठाच्या उत्पादनात अग्रेसर असलेली राज्यं. वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, आजमितीला भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा मीठ उत्पादक देश आहे. चीन आणि अमेरिका (यातही) आपल्यापुढं आहेत. आता भारतातून मिठाची निर्यातही होते.
***

‘चवीनुसार’ म्हणजे किती?
खाद्यपदार्थ आणि मीठ यांच्या नात्याचा विचार करताना मला एक मुद्दा कायम छळत असतो. बहुतेक सगळे रेसिपी रायटर्स पदार्थातले घटक आणि कृती सांगताना मिठाचा उल्लेख ‘चवीनुसार’ एवढाच करतात. मला अजूनही ‘चवीप्रमाणं’ म्हणजे किती हे प्रमाण समजलेलं नाही. मी अनेक गृहकृत्यदक्ष गृहिणींकडून हे प्रमाण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ‘‘म्हणजे भाजीत किंवा आमटीत घातलेलं मीठ चवीपुरतं आहे, हे कसं समजतं...’’ या प्रश्‍नावर दहातल्या सहा जणींनी माझ्याकडे दयार्द्र नजरेनी पाहिलं. चौघींच्या प्रतिक्रिया ‘‘हा काय प्रश्‍न असतो...’’ अशा अर्थाच्या होत्या आणि सौभाग्यवतींच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते असे शब्दांत मांडणं शक्‍य नाही.
मिळालेली उत्तरं साधारणतः ‘‘कळतं बरोबर’’, ‘‘सवय असते,’’ अशा आशयाची होती; तरी पण चवीपुरतं म्हणजे नेमकं किती, त्याची काही तरी केमिस्ट्री असेल ना?... मग एका वहिनींनी त्यातल्या काही खुब्या स्पष्ट करून सांगितल्या. स्वयंपाक शिकताना आई किंवा आज्जी आधीच सल्ला देते- ‘मीठ जरा बेतानंच वापर. मधूनच चव घेऊन पाहावी, कमी वाटलं तर मीठ वाढवता येतं; पण जास्त झालं तर पंचाईत होते. मग सवय होऊन जाते.’ रेग्युलर स्वयंपाक करणाऱ्या कोणालाही अंदाज येऊन जातो. माठ, मेथी अशा पालेभाज्यांमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असतं. रस असणाऱ्या भाज्यांमध्ये मीठ वापरल्यानं त्या शिजवताना वेगळं पाणी वापरावं लागत नाही. काही पदार्थांच्या स्वादात फरक पडतो. मीठ वापरताना हे लक्षात घ्यावं लागतं; श्रुती, स्मृती या आपल्या पारंपरिक पद्धतींमधून ते अंगवळणी पडत जातं.
***

‘द ग्रेट इंडियन हेज’ किंवा ‘इंडियन सॉल्ट हेज’ - जवळजवळ अडीच हजार मैल लांब म्हणजे वायव्येत (आता पाकिस्तानात असलेल्या) मुलतानपासून ते आग्नेयला थेट ओडिशात बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेलं, बारा फूट उंचीचं आणि तितकंच रूंद काटेरी झाडं आणि बांबूच्या बेटांचं नैसर्गिक कुंपण. या अवाढव्य उद्योगाचा उल्लेख राहिला, तर मिठाची गोष्ट अळणीच राहील. ज्या कारणासाठी हे कुंपण उभारलं गेलं आणि नंतर मोडलं तो धागा पुढं गांधीजींच्या दांडी यात्रेपर्यंत पोचतो.

अठराव्या शतकात ब्रिटिशांच्या फ्रेंचांबरोबर लढाया सुरू होत्या. या लढायांमध्ये बंदुकीच्या दारूसाठी लागणारं मीठ ब्रिटिश तत्कालीन ओरिसातून नेत असत. शतकाच्या अखेरीला इंग्लंडमधल्या चेशायर सॉल्टचं उत्पादन वाढल्यावर त्यांना इंग्लंडबाहेरच्या बाजारपेठांची गरज भासायला लागली. ओडिशातल्या मिठाची गुणवत्ता चेशायर सॉल्टच्या तुलनेत उजवी होती आणि किमती कमी. बाजारपेठेच्या शोधात असलेल्या ब्रिटिशांनी ओरिसात बनलेलं सगळंच्या सगळं मीठ कंपनीला विकावं, असा प्रस्ताव ओरिसाचे अधिपती असलेल्या दुसऱ्या रघुजीराजे भोसले यांच्यासमोर ठेवला. ब्रिटिश आपल्या मिठासाठी हा खटाटोप करताहेत, हे ओळखून रघुजीराजांनी कंपनीला नकार दिला. लगोलग कंपनीनं ओरिसाच्या मिठावर बंदी घातली. परिणामी, ओरिसातून बंगालमध्ये मिठाची चोरटी आयात होऊ लागली. ओरिसातलं मीठ बंगालच्या बाजारपेठेत मिळत असल्यानं चेशायर सॉल्टचा मिठाचा व्यापार धोक्‍यात आला. या घटना सन १७९८ ते १८०४च्या दरम्यानच्या. नोव्हेंबर १८०४मध्ये ओरिसाच ईस्ट इंडिया कंपनीच्या कब्जात गेल्यावर कंपनीनं तिथल्या मिठाच्या उत्पादनावर आणि व्यापारावर निर्बंध लादले. (हाच तो मिठाचा कुप्रसिद्ध कायदा. सन १८७९मध्ये लादलेला हा कायदा १९४६मध्ये पंडित नेहरूंच्या हंगामी मंत्रिमंडळानं रद्द केला.) मीठ आणि काही प्रमाणात साखरेचा चोरटा व्यापार थांबवण्यासाठी कंपनीनं बंगालच्या पश्‍चिम सीमेवर इनलॅंड कस्टम्स लाइन उभारली; या ‘कस्टम लाइन’चा एक अवाढव्य भाग म्हणजे ‘द ग्रेट इंडियन हेज.’

पुढं भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलेल्या काँग्रेसचे एक संस्थापक किंवा पक्षी अभ्यासक म्हणून परिचित असणारे ॲलन ऑक्‍टेव्हिअन ह्यूम त्या वेळी आंतर्देशीय कस्टम्स कमिशनर होते. सुकलेल्या वनस्पती वापरून हे कुंपण उभं करण्याऐवजी बाभळीसारखा काटेरी झाडोरा वाढवून आणि दाट वाढणारी बांबूची बेटं तयार करून ‘जिवंत’ कुंपण उभारण्याचा प्रयोग ह्यूम यांनी केला. पुढं भारताचा बहुतेक भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर हे अवाढव्य कुंपण इतिहासजमा झालं. पंधराएक वर्षांपूर्वी रॉय मॉक्‍झॅम या ब्रिटिश लेखकानं हे कुंपण पुस्तकबद्ध केले. या कुंपणभिंतीबद्दल मराठीतही ‘ब्रिटिश अमानुषतेची कुंपणनीती’ हे पुस्तक आहे.
***

मिठाचे औषधी आणि औद्यागिक उपयोग असंख्य आहेत; पण औद्योगिक क्रांतीमुळं मिठाचं महत्त्व कमी झालं. डबाबंद खाद्यपदार्थ, अन्न टिकवून ठेवणारे रेफ्रिजरेटर्स यामुळं पदार्थ साठवून ठेवण्यासाठी ते खारवायची गरज संपली; पण तोपर्यंतच्या प्रवासात मिठामुळं औद्योगिक क्षेत्रात बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. विहिरींमधलं खारं पाणी खेचण्याच्या गरजेपोटी पाणी खेचणारे पंप निर्माण झाले होते, ड्रीलिंगचं तंत्र विकसित व्हायलाही मिठाचे खडक फोडण्याची गरज कारणीभूत ठरली. मिठाच्या वाहतुकीच्या निमित्तानं युरोपात कालवे, रस्ते झाले; पण मिठाच्या शोधात लागलेली सगळ्यात मोठी लॉटरी म्हणजे पेट्रोलियम. टेक्‍सासमधल्या स्पिंडलटॉपच्या मीठ क्षेत्रात खोदकाम सुरू असताना अचानक तेलाचा फवारा उडाला आणि पुन्हा एकदा मिठामुळंच जगाच्या अर्थ आणि राजकारणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं.

भाषेला, संस्कृतीला ‘चव’
तरीही विनिमयाचं साधन म्हणून मिठाचा उपयोग आज अनाकलनीय वाटेल. जगाच्या अनेक भागांत जुलमी राजसत्तांशी जोडल्या गेलेल्या मिठाचा वापर गुलामांच्या व्यापारापासून ते भाडोत्री सैनिकांच्या फौजा पाळण्यापर्यंत असंख्य प्रकारे होत होता. भाषा आणि संस्कृतीतही मीठ वेगवेगळ्या प्रकारे डोकावत राहतं. ‘सॅलरी’, ‘सोल्जर’, ‘सॅलॅक्‍स’ अशा अनेक शब्दांचं मूळ ‘सॅल’ या लॅटिन भाषेतल्या मिठासाठीच्या शब्दांत सापडते. मराठीतही ‘मिठाची गुळणी धरणं’, ‘जखमेवर मीठ चोळणं’, ‘मीठ तोडणं’, ‘मीठ-मोहऱ्या ओवाळणं’पासून ते ‘खाल्ल्या मिठाला जागण्या’पर्यंत अनेक वाक्‌प्रचार मानवी स्वभावाचे कंगोरे उलगडून दाखवतात. मिठाच्या भोवती फिरणाऱ्या अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा, समजुती जगभरात आहेत. कुठल्या ‘पांढऱ्या’ सोमवारी साखर, मैदा यांसारख्या पांढऱ्या पदार्थांबरोबर मीठ वर्ज्य असतं, कुठं ‘अळणी’ मंगळवार, बुधवार किंवा एकादशी असते आणि कुठं मिठाच्या मोदकाचं संकष्ट व्रत असतं. आपल्या हातानं मिठाची चिमूट कोणाला दिली तर भांडणं होतात, अशी आपल्याकडं समजूत आहे. तिन्हीसांजेला मिठाची खरेदी-विक्री करू नये, असं म्हणतात. आपल्याकडं नैवेद्याच्या ताटात मीठ नसतं, तर युरोपातल्या काही देशांमध्ये मीठ कसं हाताळावं याबद्दलही नियम होते.

मिठाचे गुणधर्म बदलत नाहीत. ‘खाल्ल्या मिठाला’ जागण्याची कल्पना यातूनच आली असावी. अनेक समुदायांमध्ये मीठ हे निष्ठा आणि मैत्रीचं प्रतीक मानलं जातं.
प्रत्यक्ष वापरात मात्र मिठाशी फार घट्ट दोस्ती नसावी, असं वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी आवर्जून सांगतात. लोहयुक्त किंवा आयोडिनयुक्त मिठाचा वापर गलगंडासारख्या विकारांमध्ये प्रतिबंधक म्हणून उपयोगी पडते. मात्र, मिठाचा अतिरिक्त वापर टाळलेलाच बरा, असं आवर्जून सांगितलं जातं. मिठाचंही व्यसन लागू शकतं. मीठ ही अशी एक वस्तू आहे, की एकदा खाल्ली की खाल्ल्यावाचून राहवत नाही, असं दुर्गा भागवतांनी एका लेखात नोंदवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार, प्रत्येक व्यक्तीला दररोज फक्त पाच ग्रॅम मीठ पुरतं. विषुववृत्तीय प्रदेशात राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना घाम जास्त येतो, हे लक्षात घेतलं, तर हे प्रमाण फार तर सात- आठ ग्रॅमवर जाईल. आता सांगा- तुम्ही स्मार्ट आहात का? ‘डॉक्‍टरांनी एखाद्याला मीठ किंवा साखर बंद करायला सांगितली तर मला त्या माणसाची फक्त कीव येते,’ असं सांगताना माझ्या एका मैत्रिणीच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते पाहता, माझ्या डॉक्‍टरांवर मला असं सांगण्याची वेळ येऊ नये, यासाठी आधीच शहाणं झालेलं बरं...
तूर्त एवढाच धडा मी घेतलाय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com