ती कौतुकाची प्रेरक थाप.. (मधुवंती बोरकर)

ती कौतुकाची प्रेरक थाप.. (मधुवंती बोरकर)

किशोरीताई या शास्त्रीय संगीतातल्या एक प्रगल्भ शक्ती. ताईंचं गाणं ही वेगळी अनुभूती होती आणि आहे. त्यांच्या गायनातूनच मला सातत्यानं प्रेरणा मिळायची. माझ्या गुरू म्हणून मला मिळालेल्या त्यांच्या सहवासातले क्षण सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावेत असेच आहेत. ताईंचं शिष्यत्व मिळणं हे मोठं भाग्याचं असे. मी भाग्यवान आहे. ते मिळण्यासाठी निमित्त ठरलं ते त्यांची लातूर इथली भेट. ताई आमच्या राहत्या घरी लातूरला श्रीसरस्वती देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आल्या होत्या. या प्रसंगामुळंच ताईंच्या जवळ जाण्याची संधी मला मिळाली. यानंतर मुंबईला माझ्या आई-वडिलांसमवेत मी ताईंच्या घरी गेले आणि त्याच वेळी ताईंनी मला शिष्या म्हणून स्वीकारलं. याच काळात ताईंचा शिस्तबद्धपणा, नीटनेटकेपणा -केवळ गाण्यातलाच नव्हे तर व्यवहारातलाही- कसा आहे, याची अनुभूती आली. ताई आम्हा शिष्यांना शिकवताना सातत्यानं म्हणायच्या ः ‘गुरूनं एक तान शिकवली, की त्याच्या पन्नास ताना करून त्या तानांचा अभ्यास केला पाहिजे. रियाजात सातत्य ठेवलं पाहिजे.’ हे सांगून झालं, की या प्रक्रियेतूनच शिष्य सांगीतिक साधनेकडं कसा वळतो, ते ताई उलगडून सांगायच्या. ताईंची एकीकडं संगीतातली कडक शिस्त असायची, तर दुसरीकडं शिष्यवर्गावर त्या तेवढंच प्रेमही करायच्या. रियाजाच्या काळात त्यांच्या घरी राहून मला याविषयीचा अनुभव मिळाला. ताईंची साधना विलक्षण होती. ताई त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तीन ते चार महिन्यांपासून रियाज करायच्या. ताईंचे असे अनेक पैलू मी या काळात आत्मसात करण्याचे प्रयत्न करत होते. संगीतातली सूक्ष्म दृष्टी कशी आत्मसात करायची, संगीत म्हणजे स्वर...स्वर हे माध्यम आहेत...तर स्वरांचा गाभा हा भाव आहे आणि हा भाव संगीतात आणणं हीच ताईंच्या गाण्याची खासियत होती. ताईंचं गाणं श्रोत्याच्या हृदयाला भिडतं ते यामुळंच. ताईंचा रोजचा वर्ग हा जणू काही मैफलच असायची! त्या म्हणायच्या ः ‘शिष्यांनी गुरूच्या गाण्यातून गायचं कसं हे तर शिकलं पाहिजेच; पण त्याचबरोबर स्वतः विचार करून गाऊनही दाखवलं पाहिजे. हे जो करून दाखवेल, तोच खरा शिष्य.’

ताईंनी मला सुरवातीला शिकवला तो राग भीमपलास. राग शिकण्यापूर्वी माझ्यासारख्या साधारण विद्यार्थ्यानं ‘हा राग म्हणजे रागातले स्वर, शुद्ध कोमल, त्यांचा चढाव-उतार असा विचार करून ठेवलेला असतो.’ मात्र, या विचाराला छेद देणारे नवे पैलू ताईंनी शिकवले. ‘भीमपलास म्हणजे कारुण्य आणि ते प्रत्येक आलापातून जाणवलं पाहिजे...म्हणजे काय तर, भावाला प्राधान्य देऊन आलापी करायला हवी,’ असं  सांगत आलापी कशी करायची याचे धडे त्यांनी मला दिले. बंदिश शिस्तीत, तालबद्ध, लयबद्ध, भावरूप, तालाला अनुसरून कशी गायची...स, ष, च यांसारख्या अक्षरांचा उच्चार स्वरांना हानी न पोचू देता असा हळुवार करायचा अशा अनेक गोष्टी - ज्यांचा विचार करणं खूप आवश्‍यक आहे - ताईंकडून शिकायला मिळाल्या. आम्ही भीमपलास ‘रे... बिरहा...बमना...’ दोन वर्षं शिकत होतो. एकच राग रोज वेगळा दिसतो, वेगळा वाटतो। त्याच्या अनेक छटा ताईंनी मला दर्शवल्या. राग केदारमधल्या गांधार व शुद्ध निषादचं अस्तित्व सर्व संगीततज्ज्ञ अल्प मानतात. मात्र, ताईंचे याबाबतीतलं मत स्वतंत्र असं होतं व त्या शिष्यांना शिकवताना गांधार-निषादचा प्रयोग किती वेगवेगळ्या पद्धतीनं व जास्तीत जास्त कल्पकतेनं दाखवता येतो, हे स्पष्ट करत असत. श्रोत्यांनाही याचा मैफलीतून विशेष आनंद मिळायचा.

ताई म्हणायच्या ः ‘किती राग, किती बंदिश गायल्या, किती ताना गायल्या हे महत्त्वाचं नसून, एकाच रागात तुम्ही किती नावीन्यपूर्ण, भावपूर्ण विचार करू शकता हे महत्त्वाचं आहे.’ कसं गायचं, आवाज कसा मुलायम करायचा हे ताईंच्या गाण्यातून उलगडत जाई. असे आंतर्बाह्य संस्कार ताईंनी शिष्यांवर केले. त्या आम्हाला नेहमी म्हणायच्या ः ‘गाण्यावर टाळ्या मिळतील किंवा टाळ्या मिळाव्यात म्हणून गाऊ नका, तर तुमच्या गाण्यातून भावप्रदर्शन होऊन त्या वातावरणात कशी भावनिर्मिती होईल, याची अनुभूती रसिकांना येईल तेच गाणं खरं असेल.’ ताईंनी आम्हाला एकदा अभंग शिकवायला सुरवात केली. ‘माझे माहेर पंढरी’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘सोयरा सुखाचा’ हे अभंग त्यांनी शिकवले. त्या वेळी एका ओळीचे ३०-४० प्रकार आम्ही ऐकले. ताईंमधली निर्मितीक्षमता पाहून आम्ही थक्क झालो. त्यांना याबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या ः ‘हे प्रकार मी निर्माण करत नाही, तर गाण्यातले भावच मला उद्युक्त करतात.’ याच काळात गोव्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मला ताईंसोबत मैफलीत भीमपलास, सुहा, केदार हे राग गाण्याची संधी मिळाली. या मैफलीत ताईंसोबत गाताना भीती, दडपण होतं. मात्र, ताईंनी नंतर पाठीवर दिलेली ती कौतुकाची थाप मला मोठीच प्रेरणा देणारी ठरली. पुढं ताईंनी मला ‘दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रा’त गायनाची संधी दिली. ताईंनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. ताईंच्या गाण्यातलं मला भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या रागाच्या चौकटीत राहून स्वरनियम पाळून त्यामध्ये स्वरांमधला एकसंधपणा, त्यामधलं वैचित्र्य किंवा रागामध्ये अल्प प्रमाणात असलेला स्वरदेखील ताई अशा गुंफायच्या की तोही बाकीच्या स्वरांसारखाच वाटायचा!  आकार कसा असायला हवा, तानेमध्ये गमक कशी पाहिजे, गमक किती प्रकारची असते, मिंड किती प्रकारची, कशा प्रकारची यायला हवी, तसंच तानासुद्धा असंख्य प्रकारच्या व तिन्ही सप्तकांत फिरणाऱ्या अशा अनेक गोष्टींचं ज्ञान ताईंनी शिष्यवर्गाला दिलं. ताईंचं गाणं इतकं समृद्ध होतं, की ताईंचा आवाज आणि गाणं ऐकतच राहावं. ताईंची ही साधना त्यांच्याच बंदिशीतून व्यक्त होते. ती बंदिश अशी ः ‘नाद समुद्र को महाकठिन व्रत
करो विस्तार जाको कौन नर
सप्तसूर न है, नाद भेद को
गावत निकी तान कौन नर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com