महाराष्ट्रातल्या सणांची उपयुक्त माहिती

महाराष्ट्रातल्या सणांची उपयुक्त माहिती

कोणत्याही मातीत रुजू फुलणाऱ्या लोकजीवनाला घडवण्यात; विवक्षित संस्कृतीचं रंगरूप प्राप्त करून देण्यात सण, उत्सवांचं अस्तित्व महत्त्वाचं ठरतं. माणसांना जवळ आणण्याचं, एकत्र बांधून ठेवण्याचं, भावनिक एकोप्याबरोबर एकात्मता साधण्याचं मौलिक सांस्कृतिक कार्य सण, उत्सव करत असतात. म्हणूनच आपल्या देशातल्या सांस्कृतिक जीवनात सण, उत्सवांना महत्त्व आहे. आता काळ बदलत आहे. जीवन व्यग्र आणि गतिमान होत आहे. अगदी पूर्वीप्रमाणं नसलं, तरी सण, उत्सव साजरे करण्याची मानसिकता आजच्या पिढीतसुद्धा कायम आहे. प्रश्‍न येतो, तो सणाची पार्श्‍वभूमी, परंपरा, सण साजरा करण्याची पद्धत, खाद्यपदार्थ इत्यादींविषयी माहिती असण्याचा. मराठी माणूस आज फक्त देशातल्या अन्य राज्यांमध्येच नव्हे, तर परदेशातसुद्धा नोकरी, उद्योगासाठी मोठ्या संख्येनं पसरलेला आहे. त्यांना गणेशोत्सव माहिती असतो; पण श्रावणातल्या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ का म्हणतात, हे माहीत नसतं. ‘नारळी भाताची’ कृती माहीत नसते. विशेषत- आजच्या पिढीला महाराष्ट्राबाहेर, परदेशात राहणाऱ्यांची उणीव दूर करण्याच्या दृष्टीनं ‘सकाळ प्रकाशना’नं ‘फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र’ (Festivals of Maharashtra) हे उपयुक्त पुस्तक इंग्रजीत प्रसिद्ध केलं आहे.

गुढीपाडवा, नारळी पौर्णिमा/ रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र/दसरा, दिवाळी, मकरसंक्रांत आणि होळी या महत्त्वाच्या उत्सवांची, सणांची निवड करण्यात आली आहे. होळी, नारळी पौर्णिमा हे सण पौर्णिमेच्या दिवशीच येतात. परंतु, अन्य महिन्यांतल्या पौर्णिमांनाही महत्त्व आहे. यासाठी ‘पौर्णिमा’ (Purnimas) या स्वतंत्र विभागात हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा), गुरुपौर्णिमा (आषाढी पौर्णिमा), कार्तिकी पौर्णिमा-त्रिपुरा पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा), भाद्रपद पौर्णिमा, कोजागिरी (अश्‍विन पौर्णिमा), दत्तजयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) या दिवसांची थोडक्‍यात माहिती देऊन महत्त्व स्पष्ट केलं आहे.

आपली प्राचीन भारतीय संस्कृती अध्यात्मप्रवण होती. जीवनाला अध्यात्म, भक्तिभावाचा स्पर्श देण्यासाठी सर्वच सण-उत्सवांना देवकल्पना, पौराणिक कथा-कल्पनांची जोड दिली आहे. विशिष्ट देवतेचं अधिष्ठान, श्रद्धा, भक्तिभाव, पूजा, व्रत, नैवेद्य इत्यादींची जोड दिल्यामुळं सण धार्मिक भावनेनं, श्रद्धेनं साजरे केले जातात. भारतीय सण-उत्सवांची परंपरा, स्वरूप, पार्श्‍वभूमी, संकल्पना विचारांत घेऊनच प्रस्तुत पुस्तकाची मांडणी, रचना, माहिती इत्यादींची व्यवस्थित आखणी केली आहे.

‘पंचांग’ म्हणजे तिथी, वार, महिना, नक्षत्र यांनुसार सण, उत्सवांची नेमकी माहिती देणारी दिनदर्शिकाच. पंचाग म्हणजे नेमकं काय, याविषयी मोहन दाते यांचं प्रारंभी टिपण आहे. त्यानंतर सुरवातीलाच बारा मराठी महिने, सहा ऋतू यांनुसार येणाऱ्या सणांचं एक सचित्र चक्र दिलं आहे. संपूर्ण वर्ष आणि सण, उत्सव यांचं सूत्ररूपानं स्वरूप त्यातून स्पष्ट होतं. त्यानंतर गुढीपाडव्यापासून प्रत्येक सणाची ओळीनं माहिती येते. प्रत्येक सणाशी संबंधित देवतेच्या उपासनेचे श्‍लोक प्रथम दिले आहेत. त्याचं लगेच इंग्रजी भाषांतर आहे. त्यानंतर उत्सवाचा काळ, स्वरूप, त्यामागची पौराणिक संकल्पना, कथा, धार्मिक दृष्टीनं असणारं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं आहे. सण साजरा करण्याची पद्धत, खानपानाच्या पद्धतीही सांगण्यात आल्या आहेत. विशिष्ट देवतेचं अधिष्ठान असेल, तर पूजा साहित्य, पूजेची पद्धत, मांडणी करण्याची रीत सचित्र समजावून दिली आहे. उदा. नवरात्रात घटस्थापना कशी करतात, कोणकोणत्या वस्तू लागतात, देवीवर माळ कशी लावतात याविषयी सचित्र माहिती येते. गुढीपाडव्याला गुढी कशी उभी करतात, कोणत्या वस्तू लागतात याची सचित्र यादी आहे. त्यामुळं माहितीत नेमकेपणा आला आहे. शंका उरणार नाही.

प्रत्येक सणाच्या दिवशी होणारे खास खाद्यपदार्थ तर आपल्या सणांचं खास वैशिष्ट्य. पुरणपोळीशिवाय होळीची, तीळगुळाशिवाय संक्रांतीची आणि चकलीशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. हे ओळखूनच प्रत्येक सणाच्या निमित्तानं होणाऱ्या पदार्थांची माहिती कृतीसह देण्यात आली आहे. पाडव्याच्या श्रीखंडपुरीच्या माहितीबरोबरच कडुलिंबाच्या पानांच्या चटणीही कृतीही आहे. नारळी पौर्णिमेचा नारळीभात, गणपतीचे उकडीचे मोदक, होळीची पुरणपोळी, दिवाळीसाठीची चकली-शंकरपाळे इत्यादी पदार्थांच्या कृतींची सचित्र माहिती हे या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. पुस्तकाची उपयुक्तता आणि संग्रहमूल्य त्यामुळं वाढलं आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशीच्या भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरीसुद्धा भेटते; पण तीळगूळ आणि गुळाची पोळी कशी विसरली, याचं आश्‍चर्य वाटतं. प्रत्येक सणाच्या वेळेचे सुसंयोजित रंगीत फोटो पुस्तकाचे आकर्षण ठरले आहे. कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग, नरसिंहानं हिरण्यकश्‍यपूचं पोट फाडण्याचा प्रसंग, देवीचं महिषासुराबरोबरचं युद्ध इत्यादी चित्रं आपली परंपरा आणि धार्मिक कल्पनांचा जीवनावर असणारा प्रभाव अप्रत्यक्षपणे स्पष्ट करतात. भारतीय सण-उत्सवांमागे पर्यावरणाची जाणीवही महत्त्वाची आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं वाटणं, दिवाळीमध्ये तळलेला फराळ करणं, संक्रांतीला तीळगूळ, गुळाची पोळी करणं यामागं पर्यावरण, बदलतं ऋतुमान, आरोग्याची जाणीव आहे. त्या दृष्टीनं माहितीची थोडक्‍यात जोड हवी होती, हे वाचताना जाणवत राहतं. तरीसुद्धा विषयाला विविध बाजूंनी स्पर्श करून महाराष्ट्रातल्या उत्सवांना माहितीपूर्ण स्वरूपात वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. पुस्तकासोबत श्‍लोकांची सीडीसुद्धा भेट म्हणून दिली आहे. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांची प्रस्तावना आहे. ‘फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक माहितीपूर्ण, उपयोगी आणि संग्राह्य तर झालं आहेच. दिवाळी जवळ आल्यामुळं भेटवस्तू म्हणूनही पुस्तकाचा विचार करण्यास हरकत नाही.

पुस्तकाचं नाव - फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे
(०२०-२४४०५६७८)
पृष्ठं - १३०, / मूल्य - ९०० रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com