साधेपणातल्या 'सखोलते'वर मोहर (मंदार कुलकर्णी)

साधेपणातल्या 'सखोलते'वर मोहर (मंदार कुलकर्णी)

मराठी चित्रपट गेली काही वर्षं नवनवीन भराऱ्या घेत आहे. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराचा मान ‘कासव’ या चित्रपटाला मिळाला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. या चित्रपटाची वैशिष्ट्यं, त्यामागचा विचार, त्यातला आशय, वेगळे प्रयोग आदींविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद.

म  राठी चित्रपट गेली काही वर्षं नवनवीन भराऱ्या घेत आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत ‘श्‍वास’, ‘देऊळ’, ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (सुवर्णकमळ) मिळाला आहे. यंदा हा सन्मान ‘कासव’कडं आला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटावर सुवर्णकमळाची मोहर उमटली आहे. या पुरस्काराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. काही वर्षांपूर्वी ‘वास्तुपुरुष’ या चित्रपटाच्या वेळी तांत्रिक कारणांमुळं या दिग्दर्शकद्वयीच्या हातातून गेलेलं हे ‘सुवर्णकमळ’ पुन्हा एकदा ‘कासव’गतीनं का होईना; पण त्यांच्या हातात आलं, याचं जास्त अप्रूप! गेल्याच वर्षी सुमित्राताईंना ‘अस्तु’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट संवादलेखनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता मात्र थेट सुवर्णकमळ मिळालं. ‘कासव’ला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्तानं या प्रतिभावान चित्रकर्मींशी संवाद साधायचा योग आला, तेव्हा त्यांनी या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत, मांडलेला आशय, तात्त्विक विचार, सर्जनशीलता आणि सामाजिक भान या दोन्ही गोष्टींचा घातलेला मेळ अशा सर्व गोष्टी उलगडत गेल्या.

‘सुवर्णकमळ’ जाहीर झाल्यावर काय भावना होत्या, असं विचारलं तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, ‘‘अर्थातच बरं वाटलं. आमचे चित्रपट, त्यांतली कथानकं त्यामानानं साधी दिसतात; पण त्या साधेपणामागं सखोल अनुभव आहे- तो काही वेळा मान्य करून घ्यावा लागतो. साधं असलं तरी ते उथळ नसतं. तो साधेपणा जाणवून, त्यातली सखोलता आता लोकांना मान्य होईल, असं मला वाटतं. आमचे चित्रपट ‘ग्लॉसी’, धाडकन लोकांच्या मनावर-दृष्टीवर आपटणारे नसतात; त्यामुळं काही वेळा त्यांचं महत्त्व कमी वाटतंय की काय असं वाटतं. आता ‘कासव’ला मिळालेल्या सर्वोच्च पुरस्काराच्या निमित्तानं आमच्या चित्रपटांचा अनुभव मनावर असा आपटणारा नसला, तरी त्यात आणखी खोल खोल जाता येईल, असं लोकांना वाटेल असं मला वाटतं.’’

‘वास्तुपुरुष’च्या वेळी हुकलेल्या पुरस्काराची अर्थातच आठवण झाली, असं सुनील सुकथनकर यांनीही प्रांजळपणे नमूद केलं. ‘‘खरं तर ‘वास्तुपुरुष’नंतर गिरीश कासारवल्ली, शाजी करुण असे अनेक चित्रकर्मी आमच्या कोणत्या ना कोणत्या चित्रपटावर अशी मोहर उमटेल, अशी वाट बघत होते. आज ती उमटली, त्याबद्दल आनंद वाटतो,’’ सुकथनकरांनी सांगितलं.

या चित्रपटाचा विषय कसा पुढं आला, हा प्रश्‍न अर्थातच मनात होता. सुमित्राताई म्हणाल्या ः ‘‘आम्ही ‘अस्तु’ चित्रपटाच्या वेळी डॉ. मोहन आगाशे यांच्याशी चर्चा करायचो. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशीही सतत चर्चा होत असते. त्यातून तरुणांमधलं नैराश्‍य हा खूप महत्त्वाचा विषय असल्याचं आम्हाला जाणवलं. तरुणांना आत्महत्या का करावीशी वाटते, त्यांना आयुष्य नकोसं का होतं, असे प्रश्‍न आम्हाला पडले आणि त्यांना आयुष्य आवडायला कसं लागेल, याचा शोध आम्ही चित्रपटातून घ्यायचं ठरवलं. त्याच दरम्यान कासवांच्या संवर्धनाविषयी आम्ही सहज म्हणून वाचत होतो. कासवावर जेव्हा हल्ला होण्याची शक्‍यता असते, तेव्हा ते सगळी इंद्रियं आत ओढून अंतर्मुख बनतं. तसं या ‘कासव’रूपानं अंतर्मुख झालेल्या तरुणांना बाहेर आणायला प्रयत्न केले पाहिजेत, असा विचार मनात आला. नैराश्‍यात बुडालेल्या आणि ‘दगड’ बनलेल्या मुलांना वाचवायचं कसं, तर त्यांना बाजूनं, मायेनं संरक्षण द्यायचं म्हणजे ती त्यांच्या कोशातून हळूहळू बाहेर येतील आणि ‘जीवनसागरा’त पोहायला लागतील, असा एक विचार कुठं तरी होता. कासवीण किनाऱ्यावर पिल्लं घालते आणि नंतर निघून जाते. त्यामुळंच तिच्या डोळ्यांत अश्रू असतात, असंही एक ‘मिथ’ही ऐकलं होतं. तोही धागा कुठं तरी मनात होता. त्यातूनच मग या चित्रपटाची कथा तयार होत गेली. तरुणांचं नैराश्‍य आणि कासवांचं दगड बनणं या दोन्ही गोष्टी एकत्र होत मग कथा तयार झाली.’’

या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे यातल्या कोणत्याही व्यक्तिरेखा एकमेकांच्या नात्यातल्या नाहीत. एकमेकांशी अजिबात संबंध नसलेल्या माणसांची ही गोष्ट आहे. मायेनं आणि प्रेमानं ती एकत्र येतात आणि एकमेकांना आधार देतात. त्यामुळं ते एक वेगळेपण असेल. आशयाला पूरकता येण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. रंगांचा विचार अर्थपूर्ण रीतीनं करण्यात आला आहे. पांढरा आणि काळा या दोन रंगांच्या मधल्या म्हणजे करड्या रंगाचा वापर ‘कासव’मध्ये विशेषत्वानं दिसेल. इतर रंगही मोजके आहेत. दागिने, कपडे यांचं वजन आशयावर पडू नये, म्हणून सगळ्याच कलाकारांचं कपडे साधे आहेत. कलाकारांची निवड करतानाही त्याच्यामागं एक ‘लॉजिक’ होतं. ‘आतून’ व्यक्त होणारी, अध्यात्माची आवड असणारी इरावती, वेगळ्या वाटेनं विचार करण्याची आवड असलेला आलोक राजवाडे, अभिनेत्याबरोबरच कवी असणारे किशोर कदम, कोकणातला ओंकार धाडी हा नैसर्गिक अभिनय करणारा मुलगा अशा कलाकारांनी ‘कासव’मधला आशय घट्ट करायला हातभार लावला आहे. सुकथनकर यांनी लिहिलेली गीतं आणि संकेत कानेटकर या तरुणाचं संगीत हेही आशयसंपन्न असल्याचं सुमित्राताईंनी सांगितलं.

‘कासव’मध्ये काही तांत्रिक प्रयोगही केले आहेत. ‘‘एक म्हणजे कुठंही कॅमेरा ‘ट्रायपॉड’वर ठेवलेला नाही. कॅमेरा ट्रायपॉडवर ठेवल्यानं जी ‘स्थिरता’ येते ती आम्हाला नको होती. कॅमेऱ्याची सततची लयबद्ध हालचाल ठेवावी, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही ‘रॉनिन’ हे उपकरण वापरलं. त्यामुळं कॅमेरा सतत हलत राहतो, त्याची लयबद्ध हालचाल होते. घरं, त्यातले कोपरे, त्यातल्या वाटा, समुद्रकिनारी जाण्याचा रस्ता या गोष्टी तुकड्यातुकड्यानं न येता सलगपणे कॅमेऱ्याच्या हालचालींतून दिसतात. ‘ड्रोन’चा वापर आम्ही पहिल्यांदाच केला. निसर्गाची भव्यता, समुद्राच्या लाटा, ते गाव या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी वरती तरंगणारा कॅमेरा आम्हाला हवा होता. विशेषतः गाण्यामध्ये वास्तवापासून दूर जाण्यासाठी ड्रोनचा वापर करावासा वाटला,’’ सुकथनकर सांगत होते. सुमित्राताईंनी ‘डेड पोएट्‌स सोसायटी’ या चित्रपटाचं उदाहरण दिलं. त्यातला शिक्षक मुलांना बाकांवर उभं राहायला सांगून नेहमीच्याच जगाकडं वेगळ्या दृष्टीनं बघायचा एक धडा देतो. तसाच ‘ड्रोन’च्या माध्यमातून त्याच जगाकडं वेगळ्या उंचीवरून बघण्याचा हा प्रयत्न होता, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

पुरस्कारविजेते चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत किंवा प्रेक्षक तितक्‍या उत्साहानं चित्रपटगृहांपर्यंत पोचत नाहीत, असं एक निरीक्षण आहे. सुकथनकर त्यासंदर्भात म्हणाले, ‘‘प्रेक्षकांना आमचा चित्रपट आवडतो, हे आम्हाला गेल्या काही वर्षांत समजलेलं आहे. प्रश्‍न येतो तो त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा. वितरण आणि जाहिरात करणारी व्यवस्था आम्हाला भेदायची आहे. प्रेक्षक आणि आम्ही यांच्यातलं नातं खूप चांगलं आहे. त्याच्या मधली ही वितरण व्यवस्थेची जी भिंत आहे, त्या भिंतीनं जागं व्हावं. चित्रपटाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे, त्यामुळं हा किंवा असे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं धाडस त्यांनी दाखवण्याची गरज आहे. प्रेक्षकांनीही थोडी मानसिकता बदलण्याची गरज आहे. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये एखादी जाहिरात आली, तरी पुरेसं असायचं; पण हल्ली मालिकांच्या मध्ये मध्ये ‘हॅमर’ केल्याशिवाय तोपर्यंत जणू काही तो चित्रपट अस्तित्वातच आला नाही, असा जो प्रेक्षकांचा कल झाला आहे, तो थोडा चिंताजनक वाटतो. मग चांगले चित्रपट लागून गेल्यावर ते हळहळ करत बसतात. त्याला आताची मार्केटिंगची व्यवस्था कारणीभूत आहे.’’

डॉ. मोहन आगाशे यांनी ‘अस्तु’ हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. ते स्वतः हा चित्रपट घेऊन भारतात अनेक ठिकाणी, अमेरिका, कॅनडामध्ये गेले, प्रेक्षकांशी त्यांनी संवाद साधला. तसंच हा चित्रपट वेगवेगळ्या मार्गांनी प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा विचार या चित्रपटाची ‘टीम’ करते आहे. तो छोट्या स्तरावरही दाखवण्याचा विचार आहे. केवळ रंजन करण्याचं नव्हे, तर तरुणांमधलं नैराश्‍य असा अतिशय ज्वलंत विषय मांडण्याचं काम या चित्रपटानं केलं आहे आणि ‘सुवर्णकमळ’ची मोहरही त्याच्यावर उमटली आहे. आता जबाबदारी आहे ती प्रेक्षकांची. ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासव जिकतं. हे ‘कासव’ आधीच जिंकलं आहे. आता त्याला आपणही दाद द्यायला हवी. त्यासाठी गरज आहे ती फक्त स्वतःच्या ‘कवचा’तून बाहेर पडून चित्रपटगृहापर्यंत पोचण्याची. कासवाच्या पिलांना जे आपोआप कळतं, ते आपल्याला कधी कळणार?

अक्षयकुमार, सोनम कपूरलाच महत्त्व
पुरस्कारांबद्दल सुनील सुकथनकर यांनी एक वेगळा मुद्दा मांडला. ‘‘चित्रपटक्षेत्रामध्ये पुरस्कार वगैरे गोष्टींना खूप महत्त्व आहे. एका मराठी चित्रपटाला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, हे ‘फिल्म फ्रॅटर्निटी’मधल्या लोकांच्या नजरेमध्ये नक्की येतं. सामान्य प्रेक्षकांपर्यंत हे अर्धंमुर्धं पोचतं. त्यांच्या मनामध्ये या सर्वोच्च पुरस्काराचं जेवढं महत्त्व असायला पाहिजे, तितकं सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनावर फार ठसलंय, असं मला वाटत नाही. अजूनही ‘ऑस्कर’लाच आपल्याकडं महत्त्व आहे. त्याच्याकडंच विशेषतः राष्ट्रीय माध्यमांचं लक्ष जास्त जातं. मला विशेष नमूद करावंसं वाटतं, की जेव्हा जेव्हा प्रादेशिक चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, तेव्हा तेव्हा राष्ट्रीय स्तरावरची माध्यमं त्याचं महत्त्व डावलतात. आमच्या चित्रपटांपेक्षा अक्षयकुमार आणि सोनम कपूर यांचीच जास्त चर्चा अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांत दिसली. ‘कासव’, ‘सुवर्णकमळ’ वगैरे विषय जवळजवळ अनुल्लेखानं मारल्याचं दिसलं. मराठीला पुरस्कार मिळालाय, मग तुमचं तुम्ही बघून घ्या, अशी मानसिकता मला ‘कलोनियल’ पद्धतीचीच वाटली. ‘महत्त्वाचं सगळं फक्त बॉलिवूडमध्येच घडत असतं,’ अशी त्यांची भावना असते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेल्या सुरभी लक्ष्मी या कलावतीचा चेहराच मी कुठल्या वाहिनीवर बघितलेला नाही. कुणाला त्यात रसच नाही. यामागं अज्ञान आणि गुलामगिरी आहे. त्यातून बाहेर पडल्याशिवाय ‘सुवर्णकमळा’चा खरा परिणाम आणि प्रभाव सर्वसामान्य प्रेक्षकांवर पडणारच नाही,’’ सुकथनकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com