दंतकथेच्या शोधात... (मंगेश नारायणराव काळे)

दंतकथेच्या शोधात... (मंगेश नारायणराव काळे)

भारतीय चित्रकलेच्या आधुनिकतापूर्व कालखंडात भारतीय पुराणकथांचं, त्यातल्या चरित्रांचं, देवी-देवतांचं खऱ्या अर्थानं मानवी रूपात रूपांतरण करण्याचं श्रेय जातं ते राजा रविवर्मा या ज्येष्ठ चित्रकाराकडं. तोपर्यंत देवी-देवता, पुराणातल्या, धर्मग्रंथातल्या चरित्रांची ओळख होती ती शब्दबद्ध असलेल्या संस्कृत श्‍लोकांमधूनच. मात्र, ही असंख्य चरित्रं मानवी रूपात साकारली ते राजा रविवर्मा यांनी. हे देवी-देवतांचं मानवी रूप एका अर्थानं राजा रविवर्मा यांनी उभं केलेलं एक नवं मिथकच होतं.

सृष्टिरचनेच्या अगोदर एकाकी देव
सृजनप्रक्रियेत जसा
एकटेपणातून ‘अनेक’त्वात परावर्तित होतोय
तसा मी विचार करतोय की
जो एकाकी आहे, ज्याला कुठल्याच संवादाची
जराशीही गरज नाही, तो एकटा कसा?
मग तो उन्मत्त आहे का?
मृत सतीचं कलेवर खांद्यावर टाकून
मौन, जड्‌वत निघालेल्या शिवाच्या
‘त्या’ रूपाची मी कल्पना करतोय
त्या शिवाचं एकटेपण कसं असेल?
- गणेश पाइन (पत्रातून)


साहित्य, चित्रकलेत मिथकांचं पुनर्सर्जन ही एक सतत चालत राहणारी प्रक्रिया आहे. जगभरातल्या विविध संस्कृतींच्या इतिहासात, तिथल्या आद्यसंस्कृतीत पुराकथांचं, मिथकांचं वारंवार पुनर्सर्जन होत गेलेलं दिसतं. सृजनाच्या म्हणून ज्या काही अतोनात शक्‍यता असतात, त्या शक्‍यता पडताळून पाहत असताना प्रत्येक वळणावर, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिथकांचं अवतरण अनुभवता येतं. इतिहासाच्या खिडकीतून मिथकांनी व्यापलेला साहित्य, चित्रकलेचा एक मोठा पट पाहता येतो.
साहित्य, चित्रकला या ‘रचण्या’च्या गोष्टी आहेत. कल्पिताच्या साह्यानं साहित्यात किंवा चित्रकलेत निर्मिती होत असते. तृष्णेची, सृजनाची संततधार त्या त्या कलेला एक नवा चेहरा या रचण्याच्या प्रयत्नात प्रदान करत असते. कला-साहित्याच्या निर्मितीमागं उभ्या असलेल्या असंख्य प्रेरणा आपण पाहतो, अनुभवतो. या असंख्य प्रेरणारूपांमध्ये मिथकांचं, दंतकथांचं एक अद्भुत, गूढ, विस्मयचकित करणारं वलय दिसून येतं. नव्या कलारूपात ते अधिक साक्षात्कारी होऊन प्रकटत असतं. म्हणूनच मिथकांच्या आश्रयानं जगभरातल्या अनेक मानवी संस्कृतींमध्ये सातत्यानं कलाविष्कार घडत असतात. वर्तमानातल्या साहित्य, कलारूपाला एक प्रकारची दिव्यता, विलक्षणता या दंतकथा प्रदान करत असतात.

आदिम काळातली पौराणिक किंवा मध्ययुगीन मिथकं कलावंतांना जशी आपल्याकडं आकर्षित करून घेत असतात, तशीच ती प्रेक्षक-रसिक-वाचकालाही खोलवर प्रभावित करत असतात. मराठी साहित्यात किंवा एकूणच भारतीय साहित्यात दंतकथांची, मिथकांची एक स्वतंत्र अशी भूमी आपण पाहू शकतो, जिच्यावर भारतातल्या अनेक महत्त्वाच्या कवी-लेखक-नाटककारांनी समृद्ध असं सृजन केलेलं आहे. जी. ए. कुलकर्णी, गिरीश कर्नाड, विलास सारंग, अरुण कोलटकर अशा कितीतरी कवी-लेखकांची इथं आठवण काढता येईल, ज्यांनी पूर्वीची मिथकं आपल्या निर्मितीत नव्यानं उभी केली, त्यांचा एक नवा अन्वयार्थ सांगितला. इतिहास-परंपरेतल्या मिथकांच्या अवतरणातून वर्तमानाची नव्यानं विचारपूस केली.

भारतीय चित्रकलेच्या संदर्भातही असं काहीएक विधान करता येईल. भारतीय चित्रकलेच्या गेल्या १०० वर्षांतल्या परंपरेचं अवलोकन केलं असता दिसून येतं, की अनेक भारतीय कलावंतांच्या कलाकृतींमध्ये मिथक अथवा दंतकथा एक महत्त्वाचा ‘एलिमेन्ट’ राहिलेला आहे. कोणतंही मिथक जेव्हा नव्यानं पुनर्सर्जित होत असतं, तेव्हा ते आपल्यासोबत वहन करत असलेल्या ‘कथ्या’सोबतच त्या कलाकृतीची नाळ तिथल्या इतिहास-समाज-संस्कृतीशी जोडत असतं. यातून कलावंत नि संस्कृतीचं एक नवं द्वैत आकारास येत असतं. अशा द्वैतातून ती परंपरा प्रत्येक वळणावर समृद्ध होत जाते. मात्र, प्रत्येक वेळी प्राचीन, अर्वाचीन मिथकांची वर्तमानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न हा यशस्वी होईलच, असं मात्र म्हणता येत नाही. मिथकं ही वर्तमानापेक्षा इतिहासाचंच पुनर्कथन करण्यात खर्ची पडतात. नवं मिथक निर्माण होण्याऐवजी जुन्याचीच पुनर्स्थापना केली जाते. कारण, या प्रक्रियेत कलावंताला आपला काळ समजून घेता आलेला नसतो. यासाठी मिथकांकडं सर्वप्रथम समकालीनतेतून पाहता येणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही कलानिर्मितीसाठी भूतकाळाविषयी आस्था असणं, चिंताभाव असणं जसं महत्त्वाचं असतं, तसंच वर्तमानाला, कलावंताच्या वैयक्तिकतेला मिथकात विसर्जित करता येणं, मिसळून टाकणं, एकजीव करता येणं महत्त्वाचं असतं. कारण, भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालण्याचं, नव द्वैत उभं करण्याचं काम मिथकं करत असतात.

युरोपमध्ये १९ व्या शतकाच्या सुरवातीलाच आधुनिकतेनं चंचुप्रवेश केला तो कलेच्या क्षेत्रात. साहित्याच्या क्षेत्रात तो उशिरा म्हणजे दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात झाला. आधुनिक साहित्यानं, कलाप्रवाहांनी भारतीय साहित्यात नि कलेत आमूलाग्र बदल घडवून आणले. मिथकांचं सर्जन, सृजन नि निरूपणही आपल्याकडं आलं ते याच आधुनिकतेच्या रेट्यातून. इंग्लिशमथला Myth आपण अपभ्रंश करून ‘मिथक्‌’ म्हणून स्वीकारला. पुराकथा, दंतकथा अशी समांतर रूपंही स्वीकारली. भारतासारख्या पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भूमीत नि हजारो पुराणं, पोथ्या, वाङ्‌मय, भीमबेटका, अजिंठा, वेरूळ यांच्यासारखा वारसा उपलब्ध असलेल्या प्रदेशात तर आधुनिकतेनं बहाल केलेल्या ‘मिथ्‌’च्या ‘आयरॉनिक’ वापराला एक मोठी संधीच उपलब्ध झाली. एक नवं समृद्ध दालन उघडलं गेलं. भारतीय चित्रकलेत अनेक कलावंतांनी या दालनातून भरभरून स्वीकारलं, नवनिर्मिती केली.

भारतीय पुराणकथा, त्यांतली अनेक चरित्रं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं, खलत्व नि देवत्व, मानव नि प्राणिसंकरातून तयार झालेली विविधी रूपं, तर कधी वैचित्र्यपूर्ण निर्मिती म्हणजे अर्धनारीनटेश्‍वर, दत्तात्रेय, नृसिंह, वराह, श्रीगणेश, नाग, यक्ष, पऱ्या अशी असंख्य रूपं भारतीय मनानं नुसतीच स्वीकारली नाहीत, तर ती पूजनीयही मानली. त्यामुळं या रूपांविषयी सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारचा आदरभाव, श्रद्धा, कुतूहल कायम राहिलेलं दिसतं. या सगळ्यांचा एक खोलवर परिणाम भारतीय मानसिकतेवर झालेला दिसून येतो; विशेषतः कला-साहित्याच्या प्रांतात या पुराकथांचा, दंतकथांचा, त्यातल्या असंख्य चरित्रांचा पुढच्या काळात वेगवेगळा अन्वयार्थ लावण्यात आला. या मिथकांचं नव्या रूपात पुनर्सर्जन होत गेलं. उत्तराधुनिक काळातल्या साहित्य-कलांमध्ये तर मिथकांचा ‘आयरॉनिक’ वापर हा अधिक ठळक होत गेलेला दिसतो. एखादी गोष्ट सांगण्यासाठी, एखादं दृश्‍य निर्माण करण्यासाठी नवे ‘कल्प’ रचण्यापेक्षा पुराणातलं, इतिहासातलं एखादं मिथ्‌ वापरून ते अधिक तीव्रतेनं सांगता येऊ लागले, चितारता येऊ लागले. आपल्याकडं प्राण्यांच्या विश्‍वाशी, आदिम प्रेरणांशी नातं सांगणाऱ्या शिव-शक्ती, स्त्री-पुरुष, ॲनिमा-ॲनिमस यांच्या द्वैताच्या अनेक दंतकथांचा, मिथकांचा मोठा प्रभाव गेल्या शतकभरातल्या साहित्यावर, कलेवर झाला किंवा त्या काळातल्या अनेक कवी-लेखक-चित्रकारांनी या दंतकथांकडं प्रेरणा म्हणून पाहिल्याचे दाखले दाखवता येतात. भारतीय चित्रकार तय्यब मेहता यांच्या ‘काली’ या दैवी मिथकावर आधारलेल्या चित्रांनी कोट्यवधी रुपयांची किंमत ओलांडून हे मिथक अधिकच गडद केलं. प्रदर्शनाची वाट न पाहता रसिकांनी, संग्राहकांनी गणेश पाइन, मनजित बावा यांच्यासारख्या कितीतरी चित्रकारांची मिथकं आपल्या घरात वाढवली.

प्रत्येक कलावंत आपापलं संचित सोबत घेऊन आपली निर्मिती करत असतो. त्याच्या प्रेरणांचा शोध त्यानं त्याच्या परीनं घेतलेला असतो. चित्रकलेच्या भारतीय परंपरेत ‘दंतकथेच्या शोधात’ निघालेल्या राजा रविवर्मा याच्यापासून ते गणेश पाइन, मनजित बावा, रॉबिन मंडल, गुलाम मोहम्मद शेख, बद्रिनारायण, लक्ष्मा गौड, एम. एफ. हुसेन (काही चित्रं), अर्पणा कौर, सुरेंद्रन नायर अशा कितीतरी कलावंतांनी भारतीय दंतकथा, मिथकं यांना आपल्या चित्रसृष्टीत नुसती जागाच दिली नाही, तर स्वतःच्या चित्रसृष्टीचं एका मिथकात रूपांतर केलं! आंतरराष्ट्रीय कलाबाजारात खास ‘भारतीय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय मिथकांचं पुनर्सर्जन असलेल्या अनेक कलाकृतींनी स्वतःची मोहोर उमटवली.

या लेखाच्या सुरवातीलाच गणेश पाइन या भारतातल्या एक श्रेष्ठ-ज्येष्ठ चित्रकाराच्या पत्रातल्या मजकुराचं अवतरण दिलं आहे. पाइन यांची चित्रसृष्टी ही वेगवेगळ्या मिथकांनी भारलेली नि नवं मिथकं निर्माण करणारी आहे. भारतीय चित्रकलेतल्या मिथकांच्या शोधात त्यामुळंच गणेश पाइन हे नाव अग्रभागी येतं. त्या वरच्या मजकुरातही पाइन हे शिवरूपाचं नवं मिथ कसं असेल, ते कसं रचता येईल, याविषयी बोलताना दिसतात. त्यातला लक्ष वेधून घेणारा ध्वनी म्हणजे या ‘एकटे’पणाचं काय करायचं? कुठून येतो हा एकटेपणा मानवी, दैवी जीवनात? एकटेपणाचं, एकांताचं मिथ्‌ साहित्यातून नि चित्रकलेतून वारंवार रचलं जातं. हा एकाकीपणा पहिल्यांदा ‘लोकेट’ झाला तो आधुनिकतेत. आधुनिक कला-साहित्यप्रवाहात ‘एकाकी’पण केंद्रभागी ठेवून मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. ज्या अस्तित्ववादी जाणिवेनं जगभरातल्या साहित्य नि कलेला प्रभावित केलं, त्या अस्तित्ववादी जाणिवेच्या मुळाशी याच ‘एकाकी’पणाचा विचार आहे. एकाकीपण हे भोवतालच्या नैराश्‍यातून जन्माला येत असतं. फ्रॉईड म्हणतो त्याप्रमाणे ‘जाणिवेतला कल्पनाविलास ही भवतालातल्या हताश करणाऱ्या वास्तवाला दिलेली प्रतिक्रिया असते. त्यामुळं काल्पनिक वासनापूर्ती होते.’ अबोध मन आणि कल्पनाविलास यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. त्यामुळं मिथकात अनेकदा स्वैर कल्पनाविलासाचं प्राबल्य आढळतं; विशेषतः कलावंताच्या संदर्भात तर फॅंटसी ही त्याच्या जाणीव-नेणिवेत मध्यस्थाची भूमिका बजावत असते. त्यामुळं जगात जेव्हा जेव्हा अराजक वाढतं, एकाकीपणा वाढीस लागतो, तेव्हा तेव्हा त्या त्या समाजातले कवी-लेखक-कलावंत हे वर्तमानाला थेट भिडण्याचं टाळून भूतकाळाच्या खिडकीतून वर्तमानाचा वेध घेत असतात. या प्रक्रियेत ते बऱ्याचदा जुन्या मिथकांचा आधार घेतात. त्यांचं नव्यानं सर्जन करतात.

इथं पाइन हे ‘शिवाचं एकाकी रूपक’ रचू पाहताहेत. ज्यांना पाइन यांची चित्रसृष्टी परिचयाची असेल, त्यांच्या लक्षात येईल, की त्यांच्या कलाकृतींमध्ये एक खास बहुसंकरता दिसून येते. आदिम कला, प्राचीन मध्ययुगीन मूर्तिकला, लोककला, बंगाल स्कूलची कला, पुनर्जागरण कला इत्यादी अनेक संस्कार स्वीकारून पाइन यांनी त्यांच्या चित्रसृष्टीचं मिथक साकार केलं आहे. तिथं केवळ चित्रात्मक वृत्तान्त म्हणून दंतकथा अवतरत नाही, तर त्या एक प्रकारच्या पार्श्‍वभूमीसारख्या  (Background) उभ्या असतात. त्या चित्राला केवळ रूपतत्त्व, आशयतत्त्व पुरवत नाहीत, तर त्या पूर्वीच्या ‘कथ्या’चं एका नव्या कथनात रूपांतरण करतात. चित्राला समकालीनत्व प्रदान करतात.
भारतीय चित्रकलेच्या आधुनिकतापूर्व कालखंडात भारतीय पुराणकथांचं, त्यातल्या चरित्रांचं, देवी-देवतांचं खऱ्या अर्थानं मानवी रूपात रूपांतरण करण्याचं श्रेय जातं ते राजा रविवर्मा या ज्येष्ठ चित्रकाराकडं. तोपर्यंत देवी-देवता, पुराणातल्या, धर्मग्रंथातल्या चरित्रांची ओळख होती ती शब्दबद्ध असलेल्या संस्कृत श्‍लोकांमधूनच. मात्र, ही असंख्य चरित्रं मानवी रूपात साकारली ते राजा रविवर्मा यांनी. हे देवी-देवतांचं मानवी रूप एका अर्थानं राजा रविवर्मा यांनी उभं केलेलं एक नवं मिथक होतं. हे मिथक जसं राजे-राजवाडे, धनिक, रसिक, प्रेक्षकांना वेडावणारं होतं, तसंच ते सर्वसामान्यांना भुलवणारंही होतं. राजा रविवर्मानं स्वतःचा छापखाना काढून या दैवी प्रतिमांना सामान्यजनांच्या घराघरात पोचवलं. त्यानंतर अनेक चित्रकारांनी राजा रविवर्माचा कित्ता गिरवत पुराणातल्या, धर्मग्रंथातल्या एकूण एक व्यक्तिरेखा मानवी रूपात चित्रित केल्या. मात्र, तोवर आधुनिकतेचा प्रवाह भारतात येऊन थडकला होता. पिकासो, हेन्‍री मॅतीस, व्हिन्सेंट व्हॅन गॉग, जॉर्ज ब्राक, हेन्‍री मूर, ब्रांकुशीसारख्या जगातल्या अव्वल  चित्रकार-शिल्पकारांचा प्रभाव भारतीय चित्रकारांवर पडला होता. या प्रभावातून ऊर्जा घेऊन उभ्या राहिलेल्या ‘कलकत्ता ग्रुप’नं राजा रविवर्मानं उभं केलेलं मिथक नाकारलं. ‘कलावंतांनी देव-देवतांच्या गराड्यात सापडून आविष्कार करण्याचा काळ आता संपला आहे. आपलं युग, आपले लोक व समाज यांच्याकडं आता कलावंताला डोळेझाक करता येणार नाही.’१९४४-४५ च्या सुमारास या ग्रुपच्या प्रदर्शनापासून प्रेरणा घेऊन मुंबईत ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’ या - पुढच्या काळात भारतीय चित्रकलेत मोलाची भर घालणाऱ्या - कलाचळवळीचा उदय झाला. या ग्रुपमधल्या सूझा, रझा, आरा, हुसैन, गाडे, बाक्रे किंवा पुढच्या काळात ग्रुपशी जोडले गेलेले रामकुमार, तय्यब मेहता यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांनी भारतीय चित्रकला नुसती समृद्धच केली नाही, तर प्रत्येकानं आपापल्या शैलीत स्वतःचं मिथक घडवलं, दंतकथा निर्माण केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com