दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते... (मंगला सामंत)

दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते... (मंगला सामंत)

दीप हे त्यातल्या पेटत्या ज्योतीसह अग्नीचं एक मोहक आणि सुबक असं रूप आहे. अग्नीचे मानवजातीवर जे अनंत उपकार आहेत, ते भारतीय संस्कृतीत जपलेले आढळतात. माणसानं आपण आनंदी, समाधानी, क्षेमकुशल आहोत, आपली भरभराट आहे, हे व्यक्त करण्यासाठी नेहमीच दीपप्रज्वलनाचा आधार घेतला. दिवाळीच्या चार दिवसांतही भारतीय संस्कृतीत प्राचीन काळात घडलेल्या विविध आनंददायक प्रसंगाच्या आठवणी, इतिहासाच्या स्मृती आपण दीप उजळवून जपून ठेवल्या आहेत. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सणांचा वेगळा अर्थ सांगणारं हे विश्‍लेषण.

‘दीपावली’ म्हणजे दिव्यांची रांग! ही ‘दीपावली’ कशी निर्माण झाली, चार दिवस हे दीप प्रज्वलित करण्याजोगं काय घडलं होतं?... ‘दीपावली’ या शब्दामध्ये ‘दीप-दिवा’ या अर्थाने, हा दिव्यांचा आणि त्यातील ज्योतीचा सण-सन्मान आहे, असा सूचक संदेश आपल्याला मिळतो. दीप हे त्यातील पेटत्या ज्योतीसह अग्नीचं एक मोहक आणि सुबक असं रूप आहे. अग्नीचे मानवजातीवर जे अनंत उपकार आहेत, ते भारतीय संस्कृतीत आश्‍चर्यकारकपणे जपलेले आढळतात. त्याबाबत एक कविता १९५५च्या सुमारास शाळेतल्या पाठ्यपुस्तकात होती, त्यामध्ये अग्नीच्या वेगवेगळ्या रूपांचं वर्णन केलेलं आहे. ती कविता अशी-
आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती
झाले इवली मग पणती, घराघरातून मिणमिणती।।
  समई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी।।
तिथून आले बाहेर, ओकीत काळासा धूर,
काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणतो, मीच तयातील परी ज्योती।।
   बत्तीचे ते रूप नवे पुढे मिळाले मज बरवे,
   वरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे ।।
आता झाले मी बिजली, घरे-मंदिरे लखलखली ।।
  देवा, ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे
  एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकळांना
कसलेही मज रूप मिळो, अन्‌ जग उजळो।।

या कवितेचा कवी कोण आहे, हे आठवणीत नाही. कवितेच्या या आठवणीद्वारे त्यास नम्र अभिवादन! जंगलातल्या अग्नीनं, मानवाच्या जीवनात प्रवेश केला आणि मानवाबरोबर संस्कृती युगापर्यंत त्यानं वाटचाल कशी केली, हेच एक प्रकारे सांगत या कवीनं आपल्यापुढं जणू अग्नीची उत्क्रांतीच साकार केलेली आहे. ही उत्क्रांती करत-करत, आपण आजच्या दीपज्योतीकडं पोचलो. ‘आधी होते मी दिवटी’ या शब्दांमध्ये ‘दिवटी’ हे अग्नीचं पूर्वस्वरूप आहे. ‘झाले इवली मग पणती’ म्हणजे मातीची भांडी अग्नीवर तापवून तयार होऊ लागल्यावर पहिली निर्माण झाली ती प्रकाश देणारी मातीची ‘पणती’!...म्हणजे आजच्या दिवाळीची पणती इतकी प्राचीन आहे.

अग्नीनं निव्वळ प्रकाशच नाही दिला, तर माणसाला अन्न शिजविण्याचा उपाय दिला, हिंस्र श्‍वापदांपासून संरक्षण दिलं, उत्पादनाला नवनवी दिशा दिली, थंडीत ऊब दिली. उघड्यावर अग्नी पेटवता येण्यामुळं माणूस समूहजीवन शिकला. त्यातून मानवी समाज स्थापन झाला. असा हा अग्नी विझला, तर मनुष्य टोळी रात्री अंधारात बुडे-त्यामुळं पशूंचे किंवा शत्रूंचे हल्ले होत, उत्पादनं बंद पडत, अन्नाअभावी उपासमार होई. त्यातून अग्नी विझणं हे वाईट आहे, अशुभ आहे ही भावना माणसाला घेरून राहिली, ती आजतागायत! याउलट अग्नी पेटत आहे, तो विझला नाही म्हणजे टोळीत सगळं क्षेमकुशल असणार, आपण प्रगतीपथावर राहणार अशी खात्री माणसामध्ये निर्माण झाली. माणसानं मग आपण आनंदी, समाधानी, क्षेमकुशल आहोत, आपली भरभराट आहे, हे व्यक्त करण्यासाठी नेहमीच दीपप्रज्वलनाचा आधार घेतला. पुढं माणसाने संस्कृतीयुगात प्रवेश केला, तो अग्नीला सोबत घेऊनच; मग तो विवाहातला यज्ञरूपी होम असेल, कुणाच्या यशाचं कौतुक करणारं औक्षण असेल किंवा चांगल्या घटनांचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीपप्रज्वलन असेल. दिवाळीच्या चार दिवसांतही भारतीय संस्कृतीत प्राचीन काळात घडलेल्या विविध आनंददायक प्रसंगाच्या आठवणी, इतिहासाच्या स्मृती आपण दीप उजळवून जपून ठेवल्या आहेत.

भारतातले बरेच सण हे या उपखंडात काही काळापूर्वी मातृसंस्कृती नांदत असल्याचे सूचित करतात, तर काही सण मातृसंस्कृती आणि पितृसंस्कृती यांचा मिलाफ दाखवितात. दिवाळी हा असाच दोन संस्कृतीचा मिलाफ दाखविणारा सण आहे. नरक चतुर्दशी हा दिवस, महाभारतातल्या श्रीकृष्णाची आठवण आपल्याला करून देतो. महाभारत काळात विवाहाच्या संकल्पनेनं प्रवेश केलेला असल्यामुळे, मातृसंस्कृती अस्ताला चाललेली होती आणि पितृसंस्कृती उदयाला येत होती. अशा संक्रमणाच्या काळातला हा कृष्ण आहे. कृष्णाचे आई-वडील देवकी आणि वासुदेव हे मातासंस्कृती मानणाऱ्या गणातले होते. मुलीकडून वारसा हक्क तिच्या मुलांकडं जाणारा तो काळ! मग देवकीला मातृ-वारसानं मिळालेली जमिनीची मालकी तिच्या मुलांना मिळू नये म्हणून, देवकीचा भाऊ कंस यानं तिच्या मुलांना ठार करण्याचा सपाटा कसा लावला आणि मग बाळकृष्णाला त्यातून कसं वाचवलं गेलं ही कथा आपल्याला माहीतच आहे. कृष्ण हा अशा रितीनं मातृ आणि पितृ संस्कृतीच्या सीमेवर आहे- म्हणून त्याचा विवाहही झालेला आहे आणि त्याच्या अनेक गोपिका मैत्रिणीसुद्धा आहेत. आपल्या मैत्रिणींना उपद्रव करणाऱ्या एका नरकासुराला तो ठार करतो आणि त्याच्या छळातून आपल्या असंख्य मैत्रिणींची सुटका करतो. त्याची आठवण आपण नरक चतुर्दशीला पहिली पणती लावून आणि गोड पदार्थ वाटून साजरी करतो.

दुसऱ्या दिवशी आपण करतो, लक्ष्मीचं पूजन! आज त्याला धन-दागिन्यांच्या पूजनाचं स्वरूप आलेलं असलं, तरी लक्ष्मी ही विवाहित गृहलक्ष्मी आहे. वस्तुतः तिचं पूजन हे ‘गृहलक्ष्मी’ म्हणून आहे. हे आता विस्मरणात गेलेलं आहे. याच दिवशी केरसुणी (झाडू); तसंच धान्य पाखडण्याचं ‘सूप’ यांची केली जाणारी पूजा, मातीच्या चुलींना सारवणं, पाण्याची भांडी-तपेली घासून लख्ख करणं आणि शक्‍य असेल तिथं त्यावर झेंडूची माला किंवा फूल वाहणं हे लक्ष्मीपूजनाचं खरं मूळ स्वरूप आहे. गृहिणीच्या घरकामाचा तो एक प्रकारे सन्मान आहे. समकालीन स्त्रिया या तत्कालीन मातृपरंपरेप्रमाणं अविवाहित माता होत्या. विवाह नाकारणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. विवाह ज्या जमातींनी ताबडतोब स्वीकारला, अशा तत्कालीन पहिल्या विवाहित जोडप्यांपैकी एक म्हणजे ‘विष्णू-लक्ष्मी’! तत्कालीन सर्वसामान्य स्त्री विवाहाबाबत अनुकूल व्हावी, तिनं विवाहाला नाकारू नये, म्हणून विवाहित लक्ष्मीची गृहिणी म्हणून पूजा, हा उद्देशसुद्धा या पूजनामागं असावा. म्हणून फक्त लक्ष्मीचं पूजन दिसत आहे, विष्णूचं नाही; पण लगेच दुसरा दिवस जोडून येतो, तो प्रतिपदेचा म्हणजे पाडव्याचा! पितृसंस्कृती जिच्या आधारानं आणली गेली, ती नव्यानं आलेली विवाहप्रथा समाजमनावर ठसवण्याचा हा दुसरा प्रयत्न आपल्या पूर्वजांचा दिसतो.

मातृ-पितृ संस्कृतींचा मिलाफ
एरवी शेतीचा हंगाम संपून सुगीच्या हंगामाच्या वर्षारंभाचा हा दिवस मानण्याचा रिवाज भारतीय संस्कृतीत विवाहाआधीच्या मातृकाळापासून आहे. आलेल्या नव्या पिकाचं स्वागत आणि वर्षभरातील देण्यांचा हिशेब हे त्याचं शेती-जीवनातलं मूळ स्वरूप होतं. जीवनातल्या बदलांमुळं नंतर व्यापाराला महत्त्व आलं. त्यातून देण्या-घेण्याचा हिशेब ठेवण्याचं काम शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्याकडं आल्यावर तो अलीकडं व्यापाऱ्यांचा वर्षारंभ झालेला दिसत आहे. मुळात हा दिवस बलिप्रतिपदेचा म्हणजे मातृसंस्कृतीतल्या बळिराजाचं स्मरण करणारा आहे. बळिराजा हा संपन्न आणि उदार शेतकरी, तत्कालीन ग्रामस्थांचा दिलदार राजा होता. तो मातृकुळांचं नेतृत्व करणारा होता. आपल्या विरोधकांशी संघर्ष करताना त्याला मृत्यू आला; पण भारतीय समाज त्याला विसरला नाही. बळिराजाच्या बलिदानानंतर अस्ताला जाणाऱ्या मातृसंस्कृतीला वंदन करणं आणि नव्यानं उदयाला येणाऱ्या पितृसंस्कृतीचं महत्त्वाचं प्रतीक म्हणजे ‘पती-पत्नीची जोडी’ यानिमित्तानं पुढं आणणं असा दोन्ही संस्कृतींचा मिलाफ म्हणजे ही प्रतिपदा किंवा पाडवा. त्यासाठी या दिवशी पत्नीनं दीपप्रज्वलन करून पतीचं औक्षण करणं आणि पतीनं तिला प्रेमानं भेटवस्तू देण्याची नवी पद्धत, निर्माण केली गेली. तेव्हा लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या पणतीबरोबर, बलिप्रतिपदेची ही तिसरी पणती आपण दिवाळीला लावत असतो.

वेगळ्या प्रेमाचं नातं दृढ करण्याचा प्रयत्न
आता ‘भाऊबीज’ या दिवाळीच्या चौथ्या दिवसाची पणती आपण प्रकाशित करूया..! वास्तविक हा दिवस सर्वांत प्राचीन आहे, कारण त्याची सुरवात विवाहपूर्व काळातल्या आणि संस्कृतीयुगात प्रवेश केलेल्या मातृगणातल्या भाऊ-बहीण नात्यातून आहे. या दिवसाला ‘यमद्वितीया’ असंही म्हणतात. या प्राचीन संबोधनात या दिवसाचं रहस्य दडलेलं आहे. स्त्री-पुरुषांच्या अन्य नात्यापेक्षा हे वेगळ्या प्रेमाचं नातं निर्माण करण्यात तत्कालीन मातांनी अथक परिश्रम घेतलेले असणार. तेव्हाच हे नातं एका जबाबदारीनं स्त्री-पुरुषांत स्थिर झालेलं आपण पाहत आहोत. शेतीचा हंगाम संपून सुगीचे दिवस आलेले आहेत. धान्याची कापणी झालेली आहे. भाऊ शेती-कामातून निवांत झाल्यावर येणारी कार्तिक महिन्यातली चंद्रकलेची ही पहिली द्वितीया! शेती हा स्त्रीचा महत्त्वाचा उद्योग नांगराच्या शोधानंतर जमीन कसण्यासाठी कुळातल्या भावांकडं गेला आणि बहिणीकडं मातेकडून येणारा जमिनीचा वारसा हक्क तिच्या हातातून निसटून गेला. शिवाय विवाह प्रथेमुळं तिची पतीगृही पाठवणी होऊ लागली. पण, वर्षातून एकदा तरी बहिणीला तो हक्क मिळावा म्हणून भाऊ जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा (फळं-कंदमुळं आणि धान्य) वाटा तिच्याकडं घेऊन जातो आणि ही भेट घेऊन पोचणाऱ्या भावाचं औक्षण-आरती करून बहीण कौतुक करते. असा हा भाऊ-बहीण नात्याचा अपूर्व सोहळा आपण चौथी पणती लावून फार प्राचीन काळापासून साजरा करत आहोत.

पुढे अनेक शतकांनी औद्योगिक क्रांतीनंतर पुरुष वेतनावर काम करू लागले. अनेक कुळाकडं स्वतःची जमीन उरली नाही. म्हणून मग या दिवसाची परंपरा भावांनी बहिणीला पैसे वा भेटवस्तू देऊन कायम राखली. आज तर परिस्थिती इतकी बदललेली आहे, की मिळवत्या बहिणीसुद्धा आपल्या भावाला त्या दिवशी भेटवस्तू देत असतात. अशारितीनं भावा-बहिणीचं नातं समाजासमोर आणण्याचा आपल्या पूर्वजांचा प्रथम प्रयत्न या यमद्वितीयेमुळे (भाऊबीज) साध्य झाला. त्यामुळं सामान्य जनतेत भाऊ-बहीण हे मौल्यवान नातं दृढ झालं, हे खरंच! पण नवनव्या शोधांमुळं आणि त्यानुसार आलेल्या जीवन जगण्याच्या नव्या पद्धतीमुळं मूळ प्राचीन इतिहास, या बदलामध्ये गडप होऊन गेला. आता खरं तर तो दिवस फक्त दीपप्रज्वलनाच्या आणि भावानं काही भेट देण्याच्या रिवाजात टिकून राहिलेला आहे. पूर्वजांनी त्यामागं केलेल्या प्रयत्नांचा हा हृदयस्पर्शी इतिहास मात्र आपण गमावून बसलो आहोत.

थोडक्‍यात, ‘आता झाले मी बिजली, घरे-मंदिरे लखलखली’ इथपर्यंत अग्नीबरोबर माणसाचा प्रवास पूर्ण झाला. तसं म्हटलं, तर ‘ज्योती’चं हे दिव्य स्वरूप आज व्यावहारिक न राहता फक्त पारंपरिक म्हणून टिकून आहे. तरीसुद्धा प्राचीन इतिहासाचा एक क्षीण धागा जणूया ज्योतीनं घट्ट धरून ठेवलेला आहे. निदान त्यामधून ‘हे दिवस आपण का करतो’ हा प्रश्‍न तरी तिनं टिकवून धरला आहे, असं म्हणावंसं वाटतं आणि हा प्रश्‍न आपण नाही विचारला, तरी ‘दिव्या-दिव्यांची ज्योत’ हा इतिहास आपल्याला सांगतच राहणार आहे- असाच शतकानुशतके! त्यासाठी तरी ही दिव्यांची रांग आपण लावत राहिली पाहिजे... अशीच पिढ्यान्‌पिढ्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com