तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा... (मंजिरी असनारे-केळकर)

manjiri asnare kelkar
manjiri asnare kelkar

संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच दाखवतात.

आमच्या घरातच संगीत होतं. माझे वडील प्रा. आनंद असनारे हे मूळचे विदर्भातल्या अमरावतीचे. माझे आजोबा व्यवसायानं वकील असले तरी उत्तम तबलावादक होते. माझ्या वडिलांनी आजोबांकडंच तबल्याचं शिक्षण घेतलं. त्यांना चौदाव्या वर्षी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.
अशा घरात माझा जन्म झाला. वडील खूप रियाजी होते. मी लहान असताना त्यांच्या मांडीवर बसून कित्येक तास त्यांचा रियाज ऐकत आले. पुढं शाळेत असताना त्यांना मी हार्मोनिअमवर लेहरासंगत करायची. त्यामुळे लयीचे संस्कार माझ्यावर नकळत झाले.

संगीतशिक्षणाच्या सुरवातीला साधारणतः 10 वर्षांची असल्यापासून मी सांगली इथं चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडं सात-आठ वर्षं प्राथमिक धडे घेतले. स्वरज्ञान, तालज्ञान आणि पुढं ख्यालगायनापर्यंत बुवांनी पाया घट्ट करून घेतला. माझ्या वडिलांचं माझ्या रियाजावर खूप लक्ष असे. वय लहान असल्यानं मला कधी कधी खूप कंटाळा येत असे; परंतु सरावाच्या बाबतीत ते फार कडक शिस्तीचे होते. प्रयत्नपूर्वक केलेली एखादी गोष्ट आपल्याला साधली की खूपच आनंद व्हायचा आणि मग पुढं जाण्यासाठी अजून प्रेरणा मिळायची. रियाजाची गोडी मला वडिलांमुळं लागली. त्या काळात शास्त्रीय संगीताच्या अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घेत असे. 20 मिनिटांत सादरीकरण कसं करायचं याविषयीचा आराखडा कसा करायचा, आपल्याकडं असलेल्या उत्तम गोष्टींचा योग्य उपयोग करून सादरीकरण कसं करायचं अशा सगळ्या गोष्टींची वडिलांनी मला सवय लावली. "सादरीकरण स्वच्छ, सहज असलं पाहिजे, त्यासाठी आधी काम करावं; पण रंगमंचावर नुसतं आपल्या तयारीचं प्रदर्शन होऊ नये,' असं ते सांगत. बरीच बक्षिसं तेव्हा मला मिळाली. या स्पर्धांमुळं लहान वयातच रंगमंचावर गाण्याच्या सादरीकरणाची संधी मिळाली आणि अनुभव मिळाला. गाणं आवडायला लागलं. माझं गाणं चांगलं झालं किंवा घरी घोटून केलेली एखादी गोष्ट रंगमंचावर गाताना चांगली गाता आली की वडिलांना कोण आनंद व्हायचा! माझ्याबरोबर कित्येक तास सरावासाठी ठेका धरून ते बसत, कधीही कंटाळा केला नाही. माझ्या कार्यक्रमांनाही ते नेहमी संगत करत. माझी आईसुद्धा नेहमीच पाठीशी उभी राहिली. ""तू पुढं चालत राहा. आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत,'' हा विश्वास मला माझ्या आई-वडिलांनी दिला. आज वडील हयात नाहीत; पण त्यांच्यात असलेली प्रचंड सकारात्मक ऊर्जा आजही रंगमंचावर नेहमीच जाणवते. या टप्प्यावर मला पुढच्या संगीतशिक्षणासाठी कुठं पाठवता येईल, याचा खूप विचार सुरू होता. जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक मधुसूदन कानेटकर (आम्ही त्यांना आप्पा म्हणत असू) हे त्या वेळी आकाशवाणीतून निवृत्त होऊन सांगलीत राहत होते. त्यांनी मला शिकवावं यासाठी वडील खूप प्रयत्न करत होते; परंतु आप्पा फार कुणाला शिकवत नसत. आमचे वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू होते; पण आप्पा काही दाद देत नव्हते. अनेक महिने टाळल्यावर शेवटी एकदा "मंजिरीला घेऊन या. बघू...' असं त्यांनी वडिलांना सांगितलं. मग थोडं गाणं ऐकून ते म्हणाले ः ""मी तीन महिने तुला शिकवून पाहीन. मी सांगेन तसा रियाज केलास तरच आणि मी सांगतो आहे ते तुला जमतंय असा मला वाटलं तरच पुढं शिकवीन अन्यथा आपण तिथंच थांबू.''

माझं शिक्षण आप्पांकडं सुरू झालं आणि पुढची 20 वर्षं त्यांच्या निधनापर्यंत अखंडितपणे सुरू राहिलं. आप्पा म्हणजे ज्ञानाचं भांडार. संगीतविषय आणि त्याच्याशी जोडलेल्या सगळ्या लोकांवर त्यांचं मनापासून प्रेम. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक कलाकारांचा सहवास त्यांना मिळाला होता. सगळीकडून जे जे चांगलं असेल ते ते त्यांनी आत्मसात केलं होतं. निकोप, मधुर आवाज आणि कमालीची सौंदर्यदृष्टी यामुळं त्यांचं गाणं खूप रसाळ होतं. परिणामी, आप्पांकडं शिकणं हा रोज एक सोहळाच असायचा. सकाळी 10 ते 1 आणि पुन्हा दुपारी 3 ते 7 अशी माझी तालीम होत होती. सकाळी सुरवातीला स्वरलगाव, आवाजसाधना होई. "पहाटेची स्वरसाधना झालीच पाहिजे,' यावर त्यांचा कटाक्ष असे. रोजच्या तालमीच्या वेळी राग, बंदिशी, ठराविक शिस्तीनं रागविस्तार, ख्यालगायनातले वेगवेगळे भाग, उदाहरणार्थ ः बोल-आलाप, बोलतान, तान असं माझ्याकडून ते करून घेत असत. प्रत्येक ठिकाणी घराण्याची मूलभूत तत्त्वं काय असतात, शिस्त काय असते याचा प्रत्यय येत होता. आप्पांकडं शिकवण्याची हातोटी होती. ते कधीही रागवायचे नाहीत. काहीही चुकत असेल तरी ते सुधारायचं कसं हे सांगताना ते अशी एखादी क्‍लृप्ती सांगायचे की ती गोष्ट साधणं सोपं होई. अर्थात, तरीही या सर्व गोष्टी आत्मसात करणं, एकूणच आप्पांकडं शिकणं फार सहज, सोपं होतं असा मात्र मुळीच नाही...ते फार कडक शिस्तीचे होते. सांगितलेली गोष्ट ती म्हणजे तीच आणि तशी म्हणजे तशीच आली पाहिजे, यासाठी ते खूप आग्रही असत. उदाहरणच द्यायचं झालं तर जयपूर घराण्याच्या आखीव-रेखीव, वैशिष्ट्यपूर्ण बंदिशीचं घेता येईल. नुसता मुखडा कसा बांधावा यासाठी ते नुसत्या मुखड्याचा अभ्यास तासन्‌तास करून घेत. अनेकदा एखादी बंदिश सांगून "तू सुरू ठेव, मी आलोच' असं म्हणून निघून जात ते दोनेक तासांनी येत. तोपर्यंत मी ती गोष्ट करत राहत असे. एकदा एक विशिष्ट गोष्ट मला जमत नव्हती, तरीही ते पुनःपुन्हा शांतपणे सांगत होते. शेवटी न राहवून मी रडायला लागले तेव्हा ते म्हणाले ः ""तुला कळलं ना, की तुला येत नाहिये? आता तुझ्या शिक्षणाला खरी सुरवात झाली!'' आप्पा पुढं पुण्याला स्थायिक झाले तेव्हा मी पुण्याला जात असे. लग्नानंतर मी नाशिकला आले तेव्हा ते आमच्या घरी महिना महिना राहायचे. बालगंधर्व, मास्तर कृष्णराव यांची पदं, बेगम अख्तर यांच्या ठुमऱ्या, दादरा, गझला ते अतिशय रंगून गायचे; त्यामुळं घराण्याच्या तालमीबरोबरच आप्पांच्या सहवासात इतर अनेक संगीतप्रकारांचे संस्कार माझ्यावर झाले. "तू काहीही गायलीस तरी ते श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे,' असं ते सांगत. जयपूर घराण्याचे अवघड वाटणारे राग किती सुंदर आहेत हे त्यांनी उलगडून सांगितलं. आप्पा आणि वीणाआजी (त्यांच्या पत्नी) या दोघांनीही माझ्यावर खूप माया केली. आजच्या काळात खऱ्या अर्थानं गुरुगृही राहून माझं व्यक्तिमत्त्व खूप समृद्ध झालं असं मला वाटतं.

सन 2006 मध्ये आप्पा निवर्तले. त्यानंतर माझा अभ्यास सुरूच होता; पण आहे ते गाणं वाढलं पाहिजे, याची जाणीव सतत मनात होती. ज्येष्ठ गायिका पद्माताई तळवलकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ धृपदगायक झिया फरीदुद्दीन डागरसाहेब यांचं मार्गदर्शन काही काळ मला लाभलं. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं गाणं, त्यातला वेगळेपणा याबद्दल मला लहानपणापासूनच ओढ होती. त्यांचा परिचय होता. ताईंकडं शिकावं ही इच्छा तर होतीच; पण थोडा संकोच आणि भीतीही होती. संकोच बाजूला ठेवून एके दिवशी मी त्यांना फोन केला आणि त्यांनी तत्काळ होकार दिला. पुढची अडीच-तीन वर्षं ताईंकडं शिकण्याची संधी मिळाली. प्रत्येक शनिवार-रविवार नाशिकहून मुंबईला मी जात असे. त्यांच्या गाण्याच्या खोलीमध्ये खरोखरच स्वरब्रह्माचा साक्षात्कार व्हायचा. त्या समोर गात असताना रागाचं साक्षात्‌ दर्शन होई...रोज नव्या रूपात तो समोर येई. त्या नेहमी सांगायच्या ः ""मंजिरी, स्वरांना समजून घे, त्यांच्याशी बोलत जा, त्यांच्यावर खूप प्रेम कर. स्वर खूप कनवाळू आहेत गं बाळा. तू जितकं त्यांना देशील त्याच्या किती तरी जास्त ते तुला देतील.'' त्यांच्या आवडत्या झोपाळ्यावर बसून संगीतविषय, सौंदर्यशास्त्र, गुरुपरंपरा, अभ्यास कसा करावा, तानपुरा, आवाजसाधना अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्या बोलायच्या. ताईंच्या सान्निध्यात संगीताकडं पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. प्रत्येक रागाचं; किंबहुना प्रत्येक स्वराचं भावविश्व असतं, त्याचा खोलवर, सर्व बाजूंनी विचार करण्याची दिशा त्यांनी दिली. ताईंचा सहवास हा एक विद्यार्थी म्हणून, गायिका म्हणून आणि व्यक्ती म्हणून मला खूपच समृद्ध करणारा अनुभव होता. आप्पांकडं शिकायला जाण्याआधी माझे गाण्याचे कार्यक्रम होतच होते. त्यांनी शिकवायला सुरवात करताना घातलेल्या अटीनुसार मी तीन वर्षं कुठंही कार्यक्रम केला नाही. पुढं त्यांनी स्वतःच परवानगी दिली आणि माझा पहिला कार्यक्रम पुण्यात झाला. त्याला पुण्यातले रसिक, अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक यांच्याबरोबरीनंच स्वतः पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई उपस्थित होत्या. गाण्यानंतर पुलं आप्पांना म्हणाले ः ""आज कित्येक वर्षांनी पुन्हा मला केसरबाई केरकरांच्या गाण्याची आठवण झाली. तुम्ही हा एवढा मोठा ठेवा पुढच्या पिढीला दिला आहे.'' खरंतर मी केसरबाईंना कधी प्रत्यक्ष ऐकलं नसूनही माझ्या गाण्यात ती परंपरा आप्पांमुळं दिसते.

पुढं भारतातल्या सर्वच प्रमुख संगीतमहोत्सवांमध्ये मी गायिले, गाते आहे. सन 1994 मध्ये मी सवाई गंधर्व संगीतमहोत्सवात गायिले. स्वतः भीमसेनजी श्रोत्यांमध्ये समोर बसले होते, तसंच भोपाळ इथं झालेल्या "जयपूर घराणा संमेलना'त किशोरीताई श्रोत्यांमध्ये होत्या. गाण्यानंतर या दोघांनीही मला भरभरून आशीर्वाद दिले. परदेशातल्या जागतिक संगीत महोत्सवांमध्येही गाण्याची संधी मला मिळाली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथं होणाऱ्या WOMAD या फेस्टिव्हलमध्ये जगभरातून आलेल्या कलाकारांच्या बरोबरीनं भारतीय शास्त्रीय संगीत मी सादर केलं. BBC PROMS ध्ये - मध्ये लंडन इथल्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याचा अनुभव खूप वेगळा आणि छान होता. याशिवाय फ्रान्समध्ये 800 लोकांच्या साथीनं आपलं संगीत गाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल जगभरात सगळ्यांनाच खूप आकर्षण आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात आदर आहे. आपल्या भारतीय संगीतातून लोकांना आत्मिक शांती मिळते हे जाणवतं. भिन्न संस्कृतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हृदयापर्यंत आपल्या संगीताच्या माध्यमातून आपण पोचू शकतो, त्यांच्याशी जोडले जातो हा अनुभव शब्दांत वर्णन करता येत नाही. या संगीताच्या प्रवासात विविध राष्ट्रीय पुरस्कारांसाठी माझी निवड झाली. संगीत नाटक अकादमीनं सन 2006 मध्ये सुरू केलेल्या "उस्ताद बिस्मिल्ला खॉं संगीत पुरस्कारा'च्या पहिल्या वर्षीच्या पुरस्काराची मी मानकरी होते. पुढं दिल्ली इथल्या "संस्कृती प्रतिष्ठान'तर्फे दिला जाणारा संस्कृती पुरस्कार, सुप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांच्या नावाचा रझा पुरस्कार मला मिळाला. मध्य प्रदेश सरकारतर्फे सन 2013 मध्ये "पंडित कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कारा'साठी माझी निवड केली गेली. किशोरी आमोणकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे ज्येष्ठ शिष्य अरुण द्रविड यांनी सुरू केलेल्या "गानसरस्वती पुरस्कारा'ची मी पहिली मानकरी ठरले. मी असं म्हणेन की कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे आपण वाटचाल करत असतो तेव्हा मिळालेले पुरस्कार म्हणजे लोकांच्या प्रेमाची, विश्वासाची पावती असते आणि महत्त्वाचं म्हणजे, ती खूप मोठी जबाबदारी असते. आपले पाय जमिनीवर ठेवूनच पुढं अजून जोमानं काम करत राहण्यासाठी हे पुरस्कार प्रेरणा देतात.

संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच दाखवतात. या सगळ्या वाटचालीत माझे सर्व कुटुंबीय कायमच माझ्याबरोबर आहेत. माझ्या आई-वडिलांच्या प्रेरणादायी संस्कारांच्या पायावर मी भक्कमपणे उभी आहे. माझे पती, कन्या, सासू-सासरे यांची समजूतदार आणि प्रेमळ साथ मला नवनवीन स्वप्नं पाहण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी बळ देते. संगीतामुळं मला जिवाभावाची खूप माणसं मिळाली. ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असतात. माझ्या गाण्यावर मनापासून प्रेम करणारे असंख्य श्रोते मला मिळाले. असंच प्रेम मिळत राहो...
भारतीय संगीताचा मला मिळालेला उज्ज्वल वारसा पुढं नेण्यासाठी स्वररूपी ईश्वर मला शक्ती देवो एवढीच प्रार्थना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com