'अहिंसा परमो धर्म'च्या नावाने.....

अभिषेक मिठारी
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कोणत्याही मुनींनी कोणत्याही पक्षाचा असा धर्माच्या आधाराने प्रचार करणे चुकीचे आहे, भारतीय राज्यघटनेच्याविरुद्ध आहे, हे सोशल मीडियावर उसळणारे समजून घेणार आहेत का? आपली विकारग्रस्तता प्रदर्शित करून इतरांनाही विकारग्रस्त करायचे हे मुनींचे आचरण सम्यक आचरण आहे का? भगवान महावीरांचा अखंड जप करायचा आणि महावीरांच्या विचाराच्या नेमका विरुद्ध व्यवहार करायचा हे योग्य आहे का? 
जैन तत्वज्ञानाचे अभ्यासक व भगवान महावीर सम्यक प्रबोधनी, कोल्हापूर या संस्थेचे प्रमुख अभिषेक मिठारी यांनी विचारलेले हे प्रश्न...

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान जैन मुनी नयपद्मसागरांनी भाजपचा धार्मिक अंगाने केलेला प्रचार आणि शिवसेनेने संजय राऊतांकरवी जैन मुनींवर मारलेले  शाब्दिक बाण यांपैकी जास्त विखारी कोण याचा शोध घेण्यापेक्षा त्याच्या मुळाशी जाणं जास्त महत्वाचं आहे. 

व्यक्तीने काय खावे, शाकाहारी असावे की मांसाहारी, मांसाहारामधे कोणत्या प्राण्याचे मांस खावे, कोणत्या प्राण्याचे खाऊ नये हे ठरवण्याचा ठेका धर्म आणि संस्कृतीच्या आड दडलेल्या  राजकीय श्वापदांकडून अनेक वर्षे चालवीला जात आहे. गेल्या तीन वर्षांत या ठेकेदारांनी आपला उन्माद सत्तेच्या पाठबळाने अधिकच गडद केला आहे.

दोनेक वर्षांपूर्वी जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाच्या कालावधीत मीरा भाईंदर येथे कत्तलखाने बंद ठेवण्याच्या संदर्भात वाद उत्पन्न झाला होता. हिंदू मतपेढीसाठी अल्पसंख्यांक आणि मागास समाजास, त्याला परवडणारे मांस खाऊ न देणारी शिवसेना मराठी भाषिक मतपेढीसाठी मीरा भाईंदर, मुंबई, ठाणे परिसरात रस्तोरस्ती मांसाहाराचे समर्थन करीत होती. जैन धर्मिय मांसाहार निषिद्ध मानतात. पण, म्हणून काही जैनेतरांवर शाकाहाराची सक्ती केली जाऊ शकत नाही. मग, पर्युषण पर्वाच्या कालावधीत कत्तलखाने बंद ठेऊन, जे जैनेतर मांसाहार करतात त्यांची गैरसोय कशासाठी? जशी जैन धर्मियांची कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी चुकीची आहे तशीच शिवसेनेची भूमिका बौद्धिक दिवाळखोरीची आहे. शिवसेना एकीकडे जैन धर्मियांविरोधात मांसाहाराचे समर्थन करते तर दुसरीकडे मुस्लिम आणि दलित समाजास मांसाहारावर निर्बंध आणते.

हे प्रकरण म्हणजे धार्मिक आणि राजकीय पातळीवरच्या मोठ्या विरोधाभासाचे उदाहरण आहे. संयम, शांतता, सर्व प्रकारची अहिंसा (शारीरिक, शाब्दिक इत्यादी) यांना कमालीचे महत्व देणाऱया जैन धर्मातील मुनीचा हिंसेला चिथावणी देणारा आणि धार्मिक भावनेला आवाहन करून भाजपचा केलेला प्रचार एकीकडे तर, दुसरीकडे आजतागायत धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर राजकारण करणारी शिवसेना मोठ्याप्रमाणावर हिंदूकरण झालेल्या जैन मुनींनी धर्माच्या नावावर हिंदूत्ववादी पक्षासाठी मते मागीतली म्हणून त्यांना धर्मांध म्हणत गळे काढत आहे. अर्थात, सेनेसाठी विरोधाभास नवीन नाही. किंबहुना विरोधाभासाचेच दुसरे नाव शिवसेना आहे.  शिवराळ भाषा आणि खळ्ळ् खट्याक् स्वभाव धर्म असलेल्या सेनेचे, प्रवक्ते संजय राऊत आपल्या स्वभाव धर्माला किमान प्रामाणिक तरी आहेत. पण, जैन मुनी नयपद्मसागर व गुजरातेतून विखार सोडणाऱ्या सूरसागरांबद्दल काय म्हणावे?

गुजरातमधून फेसबुकद्वारे विखार सोडत सेनेला संपवायची भाषा करणारे जैन मुनी आचार्य सूरसागर म्हणतात, ''अहिंसा परमो धर्म हे खरं असलं तरी, धर्मासाठी केली जाणारी हिंसा क्षम्य असते.'' त्यांची हिंसेला उत्तेजन देणारी चिथावणीखोर भाषा व धर्माधारीत प्रचाराचा अभिनिवेश जैन तत्वज्ञानाला धरून आहे काय? याला संयम, शील, प्रज्ञा, करुणा म्हणता येईल? याविषयीचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यामधे वादग्रस्त नयपद्मसागर सरळ सरळ लोकसभेला शिवसेनेला आणि आता भाजपला मतदान करण्यास सांगत आहेत. 

कोणत्याही मुनींनी कोणत्याही पक्षाचा असा धर्माच्या आधाराने प्रचार करणे चुकीचे आहे, भारतीय राज्यघटनेच्याविरुद्ध आहे, हे सोशल मीडियावर उसळणारे समजून घेणार आहेत का? आपली विकारग्रस्तता प्रदर्शित करून इतरांनाही विकारग्रस्त करायचे हे मुनींचे आचरण सम्यक आचरण आहे का? भगवान महावीरांचा अखंड जप करायचा आणि महावीरांच्या विचाराच्या नेमका विरुद्ध व्यवहार करायचा हे योग्य आहे का? अपरिग्रहाबद्दल तर न बोललेलेच बरे! जैन मुनींचे हे वर्तन भगवान महावीरांच्या अनेकान्तवादाला धरुन आहे का, हे नको का बघायला की मुनी आहेत म्हणून ते सदैव योग्यच असतील असे मानायचे? मुनींच्या विचाराची - वर्तनाची चिकित्सा नको का करायला? 

या नयपद्मसागर आणि सूरसागर मुनींच्या विखाराचा प्रतिकार करायला जैन धर्मातील एकही विचारवंत पुढे आला नाही. उलट अहिंसक जैन समाजातून हिंसक प्रतिक्रियाच उमटत गेल्या. यावरुन, देशभर पसरलेल्या सांस्कृतिक दहशतवादाला आणि उन्मादाला विवेकी, अवैदिक, सम्यक म्हणवले जाणारे जैन तत्वज्ञान बळी पडल्याचे सिद्ध झाले. आणि अवैदिक - अब्राह्मणी-श्रमण विचारधारा वैदीक ब्राह्मणी धर्माच्या वळचणीला बसल्याचे चित्र पुढे आले. स्वतंत्र मान्यता असलेल्या सर्वात प्राचीन जैन धर्माचे गुजरातच्या कृपेने वेगाने हिंदूकरण होत असल्याचे अधोरेखित झाले. 

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने 'खासगी जीवनाचा' मुलभूत अधिकार सर्व भारतीयांना बहाल केला आहे. त्याअनुशंगाने व्यक्ती ने काय खावे, कोणता पेहराव करावा, कोणाशी विवाह करावा यांवरील धर्म आणि संस्कृतीच्या ठेकेदारांचे नियंत्रण नष्ट होईल अशी आशा बाळगुन सम्यक आचार विचारांतून अधिकाधिक व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करुया!!