जाऊ 'पुस्तकांच्या गावा'...

जाऊ 'पुस्तकांच्या गावा'...

पश्‍चिम महाराष्ट्रातील थंड हवेची पर्यटनस्थळे म्हणून महाबळेश्‍वर- पाचगणी शहरे प्रसिद्ध आहेत. या शहरांच्या मध्यात वसलेले भिलार गाव उत्कृष्ट दर्जाच्या रसाळ लालचुटूक स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता हे गाव आणखी एका गोष्टीमुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. ही ओळख केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर जपली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम याठिकाणी राबविला जात आहे... 

वाईपासून पुढे वळणा-वळणाचा पसरणी घाट चढून गेले, की पाचगणी शहर आपले स्वागत करते. पाचगणीपासून साधारण 7-8 किलोमीटर अंतरावर डोंगर-उतारामध्ये भिलार गाव वसले आहे. 

भिलार गावाची लोकसंख्या साधारण पाच हजारांपर्यंत आहे. गावाच्या सुरवातीलाच लाल मातीपासून तयार झालेले अर्धे कच्चे, अर्धे डांबराचे रस्ते आपले गावात स्वागत करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडांच्या अधून-मधून पक्‍क्‍या विटांनी बांधलेली आकर्षक दुमजली घरे डोकावत असतात. प्रत्येक घरासमोर असलेली चारचाकी आणि दुचाकी गाडी आपल्याला गावाच्या आर्थिक सुबत्तेविषयी सांगून जाते. घराच्या आजूबाजूला असलेली लाल मातीची शेते आणि त्यातील स्ट्रॉबेरीची पिके आपसूक लक्ष वेधून घेतात. निलगिरी, फणस इत्यादी प्रकारची उंच उंच झाडे, तांबड्या मातीत, घराच्या आजूबाजूने उन्हाळकामातील वाळवणासारखा वाळलेल्या पानांचा सडा पडलेला दिसतो. घराबाहेरच्या पडवीमध्ये स्ट्रॉबेरी निवडून, पुणे- मुंबईतील बाजारात पाठवण्यासाठी बॉक्‍सेसमध्ये भरण्याचे काम महिला करताना दिसतात. हे या गावातील नेहमीचेच चित्र आहे. 

निकष कोणते? 
अशा या गावात 'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम महाराष्ट्र शासन राबवण्यास उत्सुक आहे, हे कळताच गावकरी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एकमताने तयार झाले. ग्रामसभेमध्ये ठराव होऊन बहुमताने ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली साडेतीन एकर जमीन या उपक्रमासाठी शासनाच्या नावे करण्यात आली. याबरोबर गावात सुरवातीपासून असणाऱ्या घरांमधील सर्वसाधारण 29-30 घरांची 'पुस्तकांचे घर' म्हणून निवड करण्यात आली. या घरांची निवड करताना उपलब्ध असणारी जागा, ज्या गावकऱ्यांच्या घरात पुस्तके ठेवणार आहोत त्यांची मानसिकता, आवड आणि या पुस्तकांच्या गावाला भेट देणाऱ्या साहित्यप्रेमींची सोय या सगळ्याचा विचार करून या घरांची निवड करण्यात आली. निवडलेल्या प्रत्येक घराला रंग देण्यात आला. गावात एकूण तीन शाळा आहेत. त्यातील दोन इंग्रजी माध्यमाच्या, तर एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. या तीनपैकी दोन शाळांमध्ये या उपक्रमातील बालवाङ्‌मय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांकडूनही या उपक्रमाची जोरात तयारी सुरू आहे. 

गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामदैवत मंदिराचा परिसरदेखील अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि शांत आहे. रंगरंगोटी केलेले मंदिर, मंदिराच्या समोरील सभामंडप आणि स्वागत कमानीजवळ बसवलेले सिंहांचे आकर्षक पुतळे लक्ष वेधून घेतात. मंदिर परिसरात व मंदिराच्या बाजूने असणाऱ्या झाडांच्या भोवती छोटे छोटे पार तयार केले आहेत. याबरोबरच सिमेंटची तयार बाकडी, कट्टे; तर काही बाजूला स्टेडियममधील बैठक व्यवस्थेसारखी इथली व्यवस्था आहे. झाडांवर असलेल्या विविध पक्ष्यांचे आवाज हाच काय तो गोंगाट तिथे आहे. मंदिराच्या शेजारी असणाऱ्या एका हॉलमध्ये या उपक्रमातील पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाचनवेड्यांना आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या ठिकाणी, हवा तेवढा वेळ वाचनाचा आनंद घेता येणार आहे. या सगळ्यातून सहजपणे वाचन कट्टे, कविकट्टे तयार होतील. 'पुस्तकांचे गाव' या उपक्रमासाठी गावाचे नाव घोषित करण्यात आले, तेव्हापासून गावकरी वेगवेगळ्या स्तरावर आपापला कामाचा व्याप सांभाळून या उपक्रमाच्या तयारीला लागले आहेत. 

भिलार गाव नोंदणीकृत पाच हजार लोकसंख्येचे गाव असले, तरी निवासी शिक्षणामुळे आणि प्रसिद्ध पर्यटन व्यवसायामुळे हे गाव नेहमीच गजबजलेले असते. प्रतापगड, महाबळेश्‍वर, पाचगणी या ठिकाणी फिरायला येणारे पर्यटक भिलारमध्ये राहण्याला प्राधान्य देतात. यामुळे स्ट्रॉबेरीची शेती, या मुख्य व्यवसायाबरोबरच लॉजिंगचा व्यवसायही विकसित होत आहे. साहजिकच आता या उपक्रमाचा गावाला दुहेरी फायदा होणार आहे. पर्यटकांच्या माध्यमातूनही वाचन चळवळ विकसित होण्यास मदत होणार आहे. 

या उपक्रमासाठी निवडलेल्या घरांमधील एक घर दत्तात्रेय भिलारे यांचे आहे. या उपक्रमाविषयी ते म्हणतात, ''घरात आमचे स्वत:चे छोटेसे ग्रंथालय आहे. या उपक्रमासाठी आमच्या घराची निवड केली, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या उपक्रमामुळे आमच्या गावाला एक वेगळा नावलौकिक मिळण्यास मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता होईल, मुलांना वाचनाची गोडी लागेल. पंचक्रोशीतील गावांसह महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींनादेखील या उपक्रमाचा नक्की फायदा होईल.'' 

भिलार गावाची या उपक्रमासाठी निवड केली याविषयी बोलताना सरपंच वंदना भिलारे म्हणतात, ''देशात होत असलेला हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमासाठी आमच्या गावाची प्राधान्याने निवड केली हा आमच्या गावाचा गौरवच आहे. शासनाने दाखवलेला विश्‍वास आम्ही सार्थ करू. आता उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी आमची आहे. शासनाला या उपक्रमासाठी सर्व सहकार्य गावकऱ्यांकडून केले जाणार आहे.'' 

या उपक्रमाच्या निमित्ताने गावाचा कायापालट करण्यात येणार आहे. भिंतीचित्रे, शिल्पचित्रे यांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. गावातील निवडल्या गेलेल्या 30 घरांपैकी कोणत्या घरात कोणते साहित्य आहे याची माहिती बॅनरच्या माध्यमातून दिली जाणार आहे. शिवाय, सुरवातीचे एक - दोन महिने या उपक्रमाला भेट देणाऱ्या साहित्यप्रेमी लोकांच्या चहा- अल्पोपाहाराची व्यवस्था गावकऱ्यांकडून केली जाणार आहे. शैक्षणिक सहली, कौटुंबिक सहलींच्या माध्यमातून भेट देणाऱ्या लोकांचे याठिकाणी स्वागत केले जाणार आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले. 
या उपक्रमामुळे भिलारकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन अधिक चांगला होणार आहे. रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मोठी मदत होणार आहे. 

इंग्लंडमधील 'हे ऑन वे' या पुस्तकांच्या गावावरून ही संकल्पना सुचली असली, तरी 'पुस्तकांचे गाव' या संकल्पनेचे आपण या प्रकल्पद्वारे मराठीकरण/महाराष्ट्रीकरण केलेले आहे. पुस्तकांचे गाव हा उपक्रम महाराष्ट्रात राबवण्यासाठी आम्हाला प्रसिद्ध पर्यटनस्थळाशेजारचे ठिकाण हवे होते. येथे हा उपक्रम राबविल्यामुळे पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येणारे पर्यटक या पुस्तकांच्या गावाला भेट देतील, हा उद्देश आहे. विविध घरे, लॉजेस, मंदिरे, शाळा याठिकाणी विविध प्रकारची पुस्तके ठेवली जाणार आहेत. या निमित्ताने घराचे आणि पर्यायाने गावाचे रुपांतर एका सुसज्ज ग्रंथालयात होत आहे. अनौपचारिक गप्पा, कविकट्टे, चर्चासत्रे येथे होतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील विविध प्रकाशन संस्थांकडून पुस्तके मागवण्यात आली आहेत. येथे सध्या फक्त मराठी पुस्तके ठेवली जाणार आहेत. पुढील काळात 15 ते 20 टक्के अन्य भाषिक (इंग्रजी, हिंदी) पुस्तके ठेवली जातील. हा उपक्रम 'वाचनसंस्कृती' विकासासाठी आहे. ता 1 मे 2017 रोजी सर्वांना भिलारला येण्याचे 'आग्रही निमंत्रण' आहे. तसेच आगामी काळातही पुस्तक वाचण्यासाठी वारंवार येण्याचे आवाहन! 

'आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने' हे या उपक्रमाचे बोधवाक्‍य आहे. ठाण्यातील स्वत्त्व गटाचे चित्रकार/कलाकार ता. 14, 15, 16 एप्रिल रोजी भिलार येथील घरांवर चित्रकाम करणार आहेत. कोणतेही व्यावसायिक मूल्य न घेता हे कलाकार रंगसजावट करणार आहेत. 
- विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेतील या गावात प्राथमिक स्तरावरची सर्व तयारी झालेली आहे. मात्र आता उत्सुकता आहे ती गावात पुस्तके कधी येणार याची! पुस्तकांच्या गावामध्ये वीस वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील पुस्तके ठेवली जाणार आहेत. महाराष्ट्र दिन आणि कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com