अस्मानी शाळा (श्र्वेतांबरी कनकदंडे)

अस्मानी शाळा (श्र्वेतांबरी कनकदंडे)

तो मार्ग हिरव्या जंगलातून भलीमोठी नागमोडी वळणं घेत दूरवर जायचा. त्या डांबरी रस्त्याचं एक टोक किनवट आणि दुसरं टोक माहूर...या दोन्ही गावांच्या मध्यभागी होतं सारखणी! एक आदिवासी वस्ती असणारं छोटंसं गाव...आपल्या कौलारू जगात स्वच्छंदपणे विसावलेलं, भौतिक जगाशी स्वार्थी हेतू न ठेवता काळ्या धुरापासून दूर आणि दाट धुक्‍यानं अच्छादलेलं ते गाव...त्या डांबरी रस्त्याच्या दुतर्फा खंदक होते हिरव्या गवतानं आच्छादलेले. तिथंच मोठीमोठी डेरेदार झाडं ओळीनं उभी होती. त्यात काटेरी बोरांची आणि बाभळीची झाडं, पळसाची रोपं हिरवीगर्द झालेली. झाडांच्या आणि खंदकांच्या मागं हिरवी शेतं आणि खंदकातून शेतांमध्ये जाण्यासाठी लहान लहान पाऊलवाटा होत्या... 

चालणाऱ्याच्या पावलांखाली गवत आणि पानं चिखलात दबली जाऊन त्या आपोआपच तयार व्हायच्या. तिथल्या निसर्गात लोक रममाण होऊन जायचे. निसर्गाच्या स्वाधीन आपलं सगळं जगणं करायचे. हा निसर्गही इथं निसर्गलेणं उधळण्यात जराही कसर ठेवायचा नाही. या पाऊलवाटांवरून चालताना ‘आपला मार्ग आपणच तयार करावा’ असं प्रत्येक पावलाला शिकवणारा हा निसर्गच स्वतः वाटाड्या व्हायचा. त्या पाऊलवाटाही निमुळत्या होत जायच्या, नागमोडी वळणं घेत दूरवर पाहिल्यास गच्च झाडांच्या सळसळण्यात या वाटाही हिरव्या-काळ्या नागासारख्याच जणू सळसळायच्या. त्या वाटांच्या शेवटाला झाडांच्या दाटीत लपून बसलेला डोंगराच्या पायथ्याशी खळखळ आवाज करत संथ वाहणारा, प्रचंड झाडा-झुडपांच्या गर्द सावलीत विसावणारा, हिरव्या लुसलुशीत गवतानं, रानफुलांनी व्यापलेला, शीतल थंड हवा पिणारा स्वप्नवत्‌ ओढा भेटायचा... स्वच्छ पाण्याचा झरा...अद्भुत नितळ पाणी...! 

तळहातावर सहजी न मावणारा मोठा रातकिडा इथं पाहायला मिळायचा. रातकिड्यांच्या संगीतलहरींना रात्रीचा अंधार भेदण्याचा जणू निसर्गमान्य अधिकारच असावा! अंधाराचं साम्राज्य रानभर पसरायचं. मग फक्‍त ऐकू यायची त्या गडद अंधारात रातकिड्यांच्या आवाजाची गडद गडद होत जाणारी धून...! त्या गडद अंधारात हे किडेही लुप्त होऊन त्या आवाजाचाच एक भाग बनून जायचे.

गाजरगवत, पिवळ्या, नाजूक रानफुलांची लहान लहान रोपटी, बाभळी, सागवान, पळस या प्रदेशात मैलोन्‌मैल पसरलेले होते. जमिनीचा तळ न दिसावा एवढं गाजरगवत... त्यामुळं घनदाट जंगलाचं स्वरूप या भागाला याच रानझाडांमुळं आलेलं होतं. मात्र, जंगलातल्या या झाडांनी ‘सत्तास्थापने’चा अभिमान स्वतःत कधीच दिसू दिला नव्हता आणि स्वतःचा ताठपणाही सोडलेला नव्हता. मात्र, बेभान होऊन कोसळणाऱ्या पावसासमोर वाकण्यातही त्यांनी कधी कमीपणा मानला नव्हता. जंगलाच्या समृद्ध खानदानाची निसर्गाला तोलून धरणारी शांत मायमाउली आणि सगळ्या आसमंताचा आधार होऊन हिंमत देणारी ती पितृछायाच! पानगळीच्या काळात पानं गळून पडायची...पुन्हा त्या मोप पसरणाऱ्या फांद्यांना नवी पालवी फुटायची. या सगळ्या चक्रात आपली मुळं जमिनीत घट्ट रोवून, निसर्गाच्या शक्‍तीशी एकरूप होऊन जायची. ही छोटी-मोठी झाडं आणि काटेरी झुडपंसुद्धा ...! त्यांची अमर्याद, अविरोध सत्ता या परिसरात खुद्द निसर्गानंच निर्माण केलेली होती. त्यांचा कधीही तोल गेला नव्हता आणि कधीच ते उन्मळून पडल्याचंही मी पाहिलं नव्हतं. कारण, ते मानवी वस्तीमधलं जंगल नव्हतं, तर जंगलात नम्रतेनं विसावणारी ती मानवी वस्ती होती.

इथंच होती शासकीय आश्रमशाळा. या शाळेतली छोटी-मोठी मुलं त्या जंगलातल्या दूरच्या अतिरम्य ओढ्याजवळ आंघोळीला जायची. शाळा सुरू होण्यापूर्वी जी न्याहारी मिळायची, त्या वेळी ती मुलं थरथरतच न्याहारीसाठी यायची. संध्याकाळचं जेवण झालं की शाळेच्या मोठ्या पटांगणात रोजची प्रार्थना व्हायची... सगळ्या मैत्रीणी पुन्हा भेटायच्या. सर्वजण मग सुरात गायचे ः ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...’ आम्ही खऱ्या अर्थानं त्या क्षणी हा धर्म जपायचो. 

‘ऐ मालिक तेरे बंदे हम, कैसे हो हमारे करम’ सर्व जण गुणगुणायचे...आणि वाटून जायचं, ही गाणी अशीच सुरू राहावीत...शाळेतली रात्रीची प्रार्थना आणि दिवसाचा निसर्ग यांनी अशी खूप मोठी शिदोरी हाताशी दिली होती. 

इथला पावसाळा काही औरच असायचा. तो धुवाँधार कोसळायचा पूर्ण आसमंतात...धुक्‍याइतकाच घनदाट व्हायचा, धरतीचा प्रत्येक कण ओलावा धरायचा... सगळं रान निथळून जायचं. वाऱ्यानं झाडं बेभानपणे डोलायची, रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहायचे, घोंघावणारं वारं त्यांची संगत-सोबत करायचं. त्यामुळं पावसाचे तुषार मोत्यांसारखे रस्ताभर अस्ताव्यस्त विखरायचे. निसर्गाची सगळी पुण्याई एकवटून यायची आणि मग डोलणारी शेतं, आजूबाजूचे डोंगर श्रीमंत होऊन जायचे. पावसाचा पडदा आभाळाला झाकळून टाकायचा...तो जमिनीवर आदळायचा आणि धरतीचा स्वर्ग व्हायचा! रानगवताचा तो सुगंध आणि असा निर्भयपणे कोसळणारा पाऊस इतरत्र मी पाहिला नव्हता. तिथली वादळं... दाट धुकं... आभाळभर इंद्रधनुष्य...सगळंच अद्भुत होतं. त्या इंद्रधनुष्यानं खरोखरच आभाळ भरून जायचं. लुसलशीत हिरव्या गवतावरचे लाल मखमली किडे तर या काळात सर्वदूर दिसायचे. त्यांचा रंग नुसता पाहत राहावा!

सारखणीच्या शाळेजवळची क्वार्टर म्हणजे भव्य अशी वास्तू होती. समोर दहा-बारा पायऱ्या, गॅलरी आणि हॉल होता. त्यामागं एक डोंगर सतत या क्वार्टरची पाठराखण करायचा. त्या डोंगराच्या मागं निर्जन, मोकळ्या अशा भागात प्रचंड शिळा अस्ताव्यस्त पसरलेल्या...आणि तिथंच एक ओढाही होता. अस्मानात जशी नक्षत्रं चमकत असतात, तशा त्या जागेत गारगोट्या विखुरलेल्या असायच्या. जमिनीवर आणि दगडांच्या सांध्यातही. प्रत्येक गारगोटी नवं कुतूहल देऊन जायची. त्यांचे असंख्य रंग व प्रत्येक रंग खूप वेगळा असायचा. लहान-मोठ्या झाडांनी भरलेली आणि काहीशी मोकळी अशी मैदानसदृश एक जागा तिथं होती. त्या झाडांच्या खाली लाल-काळ्या असंख्य बिया विखुरलेल्या असायच्या. तास-दोन तास माती उकरून त्या शोधण्यात भारीच मौज वाटायची. ती बी म्हणजे ‘गुंज’ होती. जिनं पूर्वी सोनं मोजायचे...म्हणूनच की काय प्रत्येक गुंजेसोबत मला सोनं मिळाल्याचा आनंद होत असे. रोज मूठभर गुंजा आणि आभाळभर आनंद सोबत घेऊन मी माझ्या घरी यायची. तिथले रस्ते आणि रस्त्यांच्या कहाण्यासुद्धा शहरातल्या रस्त्यांपेक्षा आणि त्यांच्या समस्यांपेक्षा खूप वेगळ्या होत्या. शेवटी, कहाणी आणि समस्या यात खूप वेगळेपण असतंच की! उन्हाळ्यात याच रस्त्यांवर दूरवर पाणी साचलेलं दिसायचं, पाण्याचे डोह दिसायचे...पण जवळ जाताच ते डोह नष्ट व्हायचे...कारण ते मृगजळ असायचं...! हे मृगजळ किती सहजपणे भास निर्माण करायचं...क्षणात नष्ट व्हायचं...समोर रस्त्यावर पुन्हा नवीन मृगजळ दिसायचं...पुन्हा आशा वाटायची. हा खेळ रस्ताभर चालायचा. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा मृगजळासारखा असतो आणि तो जगून घ्यायचा असतो हे किती छोट्या क्षणातून या मृगजळानं सांगितलं होतं.

याच दिवसांत अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्री आसमंतात डोंगरांच्या दिशेनं दूरवर पाहिल्यास गडदपणे अंधारलेले डोंगर भयाण वाटायचे. रात्री जंगलात वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजानं ते भयाणपण अंधाराहूनही दाट होत जायचं आणि लांब कुठं तरी एक केशरी रेष दिसायची. डोंगराच्या या गडद अंधाराला आव्हान देणारी ही रेष म्हणजे जंगलातली अग्निज्वाला...म्हणजेच ‘वणवा’ असायचा. डोळ्यांना अतिशृंगारिक दिसणारा वणवा ही माणसासाठी जरी कुतूहलाची बाब असली, तरी या वणव्यात अनेक प्राणी, पक्षी, झाडं संपून जायची. कित्येक घरटी उद्‌ध्वस्त व्हायची. वादळांमुळं झाडांच्या होणाऱ्या घर्षणानं एखादी ठिणगी पेट घ्यायची, संहार व्हायचा, एकाला एक लागून झाडा-झुडपांची श्रृंखलाच पेटायची आणि त्याची केशरी झालर तयार व्हायची. जंगलाचा हा अधिकृत कायदाच होता, अलिखित होता म्हणून निसर्गाच्या आधीन होता. जंगलं मात्र हा कायदा बेमालूमपणे पेलायची. पावसाचं सुख घेऊन तृप्त झालेली झाडं आगीचं दुःख पेलण्यासाठीही समर्थ असायची. मग अमावास्येच्या गडद अंधारात केशरी, पिवळ्या दागिन्यांनी हा मुलुख उजळून निघायचा.

सारखणीचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून जायचा. अगदी बाजूच्या रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रकचा आवाज हा घराच्या मागं वळण घेत जाणाऱ्या रस्त्यात जो घाट लागायचा, त्या घाटात अधिक मोठा ऐकू यायचा. तो आवाज घाट चिरत जायचा. थंडीत शाळेत जात असताना रस्त्यावरून भरधाव जाणारं वाहन - ट्रक, बस, जीप इत्यादी - आपल्यापासून दोन हात पुढं गेलं की जमिनीवर घट्ट एका जागी स्थिर उभं राहावं लागायचं. कारण, त्या वाहनाच्या मागं काहीच क्षणांनंतर येणारा, प्रचंड धक्का देणारा वारा उडवून घेऊन जाईल काय अशा प्रकारे हलवून जायचा. त्यामुळं प्रत्येक वाहनानंतर असं घट्ट पाय रोवून उभं ठाकून त्या प्रचंड वाऱ्याची वाट पाहणं हा माझ्यासाठी एक आवडता विरंगुळा असायचा. शाळेत जाण्यासाठी घरातून लवकर निघून खंदकात पडलेली लाल बोरं वेचणं, झाडांवरची अर्धकच्ची बोरं तोडणं हा कार्यक्रम असायचा. शाळेच्या मधल्या सुट्टीची वाट न बघता तासाचे सर किंवा ताई बाहेर गेल्या की दुसरे शिक्षक वर्गावर येण्यापूर्वी बऱ्यापैकी बोरं खाऊन व्हायची. तिथं शिक्षकांना सर आणि शिक्षिकेला ताई म्हटलं जायचं. 

आमची डबापार्टी खूप अनोखी असायची. चटई, डबे, पाणी घेऊन घराच्या मागच्या डोंगराच्या रस्त्यानं थोड्याच अंतरावर, रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या झाडीत प्रवेश केला, की गच्च भरलेल्या हिरव्या जंगलात चटई अंथरायची...रानवाऱ्याचा मोकळा श्‍वास घ्यायचा... तिथल्या वरपर्यंत उंच उंच गेलेल्या सागवानाच्या पानांची सतत सळसळ व्हायची. पळसाची पानं तोडून त्यांच्या पत्रावळी केल्या जायच्या. त्यावर मनसोक्‍त अशी डबापार्टी व्हायची. जेवणानंतर गप्पा... धिंगाणा, मस्ती, गाण्यांच्या भेंड्या, डोंगरावरून वेगानं खाली धावणं म्हणजे तर केवळ हवेत उडणंच! 

सारखणीचा माझ्यासाठी अतिशय कुतूहलाचा विषय होता व तो म्हणजे ‘फिरती टॉकीज.’ 

एकदा घरासमोरच्या मोठ्या मैदानात अशी फिरती टॉकीज काही दिवसांसाठी आली होती. एक मोठा तंबू आणि त्यात मोठ्या पडद्यावर काही चित्रपट दाखवले जायचे. तिथं जाताना आपापली चटई घेऊन जायची, आरामशीर बसून चित्रपट पाहायचा. त्या वेळी दूरदर्शवर दर शनिवारी आणि रविवारी चित्रपट दाखवले जायचे. त्यात काही दिवस रोज चित्रपट पाहणं ही माझ्यासाठी खासच मेजवानी होती. इथलं विश्व छोटं होतं; पण समाधान आभाळभर असायचं. इथल्या गर्भश्रीमंत निसर्गानं माझ्या बालविश्वात निरागसतेसोबतच मानसिक श्रीमंतीचीही बीजं पेरली होती...त्या लाल किड्यांनी जगण्यात आयुष्यभराचे रंग भरले होते...पावसाळ्यातल्या रातकिड्यांनी संगीत ऐकण्याचा कान दिला होता...दगडाच्या सांध्यात सापडणाऱ्या गारगोट्यांनी कुतूहल-जिज्ञासा दिली होती...शारीरिक शिक्षणांचे तास बुडवून निसर्गाच्या काही तासांच्या शिकवणीनं रम्य आठवणींचं भांडार दिलं होतं...डोंगरावरून खाली धावत येताना शरीरभर पसरणारा रोमांच दिला होता... आश्रमशाळेतल्या मुलींसोबत खिचडी खाण्यासाठी रांगेत उभं राहताना मनातला ‘गर्व’ दूर ठेवायला शिकवलं होतं... असं खूप काही शिकवून गेली होती ती सारखणीची ‘अस्मानी शाळा...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com