वाचक-सभा (विजय तरवडे)

वाचक-सभा (विजय तरवडे)

पुणे मराठी ग्रंथालय हे पुण्यातलं अतिशय जुनं, मोठं आणि अद्ययावत ग्रंथालय आहे. सन १९७८ मध्ये माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा तिच्या वितरणासाठी मार्गदर्शन घ्यायला मी तत्कालीन नगरसेवक गोविंदराव मालशे यांना भेटायला गेलो. गोविंदरावांनी मला पुणे मराठी ग्रंथालयात अच्युत पाटणकर यांच्याकडं पाठवलं. मी ग्रंथालयाचा आजीव सदस्य बनलो. इथलं वातावरण अतिशय घरगुती, साहित्यप्रेमाला पोषक होतं आणि आहे. हवे असलेले संदर्भग्रंथ, जुनी नियतकालिकं सहज उपलब्ध होतात. माझ्या लग्नानंतर झालेल्या स्वागतसमारंभाला ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी आवर्जून आले होते.

माझी पत्नीही आजीव सदस्य बनली. ग्रंथालयाची नवीन इमारत बांधली जात असताना पु. ल. देशपांडे यांनी सढळ हातानं देणगी दिली होती. नवीन इमारत बांधून झाल्यावर ग्रंथालयात झालेल्या सभेला पुलं आले होते. त्या वेळी मी प्रथमच त्यांची ‘जादू’ पाहिली. पुलंनी अतिशय छोटेखानी भाषण केलं. भाषणात एकदाही आपण दिलेल्या देणगीचा उल्लेख नव्हता. ग्रंथालयाचे पदाधिकारी मुकुंद अनगळ बोलायला उठले, तेव्हाची त्यांची मंत्रमुग्ध देहबोली अजून लक्षात आहे. पुलंविषयीच्या प्रेमानं ते किती भारावून गेले होते! नवीन इमारत झाली त्या कालखंडात डॉक्‍टर पुराणिक नावाचे बालरोगतज्ज्ञ ग्रंथालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. पुराणिकांना ‘सत्यकथा’ या मासिकाविषयी खास ममत्व होतं. अनगळ आणि पुराणिक यांना मी एक विनंती केली ः ‘ग्रंथालयात आपण वाचक-सभा हा उपक्रम राबवू...वेगवेगळे लेखक आमंत्रित करू... लेखक येण्यापूर्वी काही दिवस त्यांची पुस्तकं वाचकांना प्राधान्यानं उपलब्ध करून देऊ, म्हणजे वाचक ती पुस्तकं वाचू शकतील आणि ज्यांना त्या लेखकाला भेटायची, संवाद साधायची इच्छा असेल त्यांची ती इच्छा वाचक-सभेत पूर्ण होईल.’ त्यांनी मान्यता दिल्यावर पहिल्या वाचक-सभेला आम्ही ह. मो. मराठे यांना बोलावलं.

वाचक-सभा सुरू झाल्यावर पुराणिकांनी हमोंचं स्वागत केलं आणि ‘आता प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दे,’ असं अनगळांनी मला सांगितलं. मी गडबडलो. उभा राहून फक्त दोनच वाक्‍यं बोलू शकलो. ती म्हणजे, ‘आजचे पाहुणे ह. मो. मराठे हे ‘किर्लोस्कर’ मासिकाचे संपादक आहेत आणि ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे.’ यावर हमो हसले आणि मला म्हणाले ः ‘‘डोंट वरी... मीच माझा परिचय करून देतो.’’ आणि त्यांनी छान भाषण केलं. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

जगद्विख्यात रशियन साहित्यिक डस्टोवस्की यांच्या ‘इडियट’ या कादंबरीवर एका वाचक-सभेत चर्चा झाली. त्या वेळी माझ्या ज्ञानात भलतीच भर पडली. एका प्रकाशक-मित्रानं मला ‘इडियट’चा अनुवाद करण्याविषयी सुचवलं. मात्र, त्या काळात इंटरनेटविषयी मी अनभिज्ञ असल्यानं रशियन नावांचे उच्चार शोधण्यात अडचण आली आणि मी तो अनुवाद करू शकलो नाही.

पुढं ‘इडियट’चे दोन-तीन अनुवाद झाल्याचं समजलं. वाचक-सभेत एका वाचकानं ‘इडियट’चा एक अनुवाद बरोबर आणला होता. अनुवादक कुणी निवृत्त संपादक होते. नोकरीत असताना त्यांचं वरिष्ठांशी आणि काही सहकाऱ्यांशी बिनसलं होतं. त्यांनी अनुवाद करताना मूळ कादंबरीला धक्का लागू न देता पात्रांच्या संबोधनात काही बदल करून आपल्याला शत्रुवत वाटणाऱ्या वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. नोकरीमुळं माझ्या बाहेरगावी बदल्या होऊ लागल्या. ग्रंथालयात नियमित जाणं दुष्कर झालं; पण सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा वाचक-सभेचं पुनरुज्जीवन करण्याची इच्छा झाली. 

काही दिवसांपूर्वी आनंद देशमुख, ज्योती ब्रह्मे-पाध्ये, आर. जे. स्मिता, मीरा सिरसमकर, विश्वास वसेकर, श्रीपाद ब्रह्मे आदींच्या सहकार्यानं एक कार्यक्रम पार पडला. थोडं माणूसबळ जमलं की हा उपक्रम पुन्हा जीव धरेल आणि जोमानं वाढेल, असं वाटतं. ‘इंटरनेटवरच्या आभासी विश्वामुळं आणि फेसबुकमुळं वाचनसंस्कृतीला धक्का बसला,’ असं काही लोक म्हणतात. पूर्वी टीव्ही आले तेव्हाही हाच आरोप केला जाई; पण या दोन्ही आरोपांत तथ्य नाही. फेसबुकवरच मी आणि माझ्या काही मित्रांनी ‘लेखकाबरोबर चहा’ हा उपक्रम एक वर्षभर राबवला. ‘पुण्याच्या रीगल हॉटेलमध्ये दर रविवारी सकाळी वाचकांना लेखक भेटणार आहेत आणि सगळ्यांनी चहाला यावं,’ असं आमंत्रण फेसबुकवर दिलं. रविवारी अनेक वाचक खरोखरच चहाला आणि गप्पा मारायला येत. काही वाचक हे लेखकाकडून पुस्तक विकत मागून घेत. दुसऱ्या दिवशी त्यांचे फोटो फेसबुकवर प्रकाशित केले जात.

वृत्तपत्रांमध्ये लिहिणारे अनेक लेखक-वाचक रविवारी सकाळी त्या हॉटेलमध्ये आता सवयीनं येऊन बसू लागले आहेत. त्याच वेळी तिथून जवळच असलेल्या ‘उत्कर्ष बुक सर्व्हिस’मध्येदेखील सुधाकर जोशी यांच्या सहवासात ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार गप्पाष्टकात रमतात. दुकानाबाहेर पुलावर काही विक्रेत्यांनी दुर्मिळ जुनी पुस्तकं विक्रीसाठी मांडलेली असतात. पुण्यातली रविवारची सकाळ या दोन चौकांमध्ये अशी छान व्यतीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com