ऋण (सुरेखा पेंडसे)

ऋण (सुरेखा पेंडसे)

काहीतरी दैवी संकेतच असावा हा...जे क्षण आपल्यातून निसटून जातात ते कधीच आपले नसतात; पण जे क्षण आपले असतात ते कधीच निसटून जात नाहीत, याची आज पुन्हा एकदा मला खात्री पटली आहे...विचारात बुडालेला राजेश स्वतःशीच म्हणत होता.

नगर-मुंबई या एसटी बसची कंडक्‍टरनं डबल बेल वाजवली अन्‌ बस सुरू झाली. बसमध्ये पहिल्याच सीटवर साधारणतः चाळिशीचा रुबाबदार तरुण बसला होता. कंडक्‍टर त्याच्याशी जरा अदबीनंच बोलत होता. सगळ्यांची तिकिटं काढून झाल्यावर कंडक्‍टर आपल्या जागेवर बसला. दहा-पंधरा मिनिटं गेली असतील तेवढ्यात ड्रायव्हरनं करकचून ब्रेक लावला. गाडी थांबवण्यासाठी एक मुलगा रस्त्याच्या मध्यभागी उभा होता.

‘‘ए पोरा, मरायचंय का? मग दुसरी जागा बघ कुठंतरी... माझ्या गाडीखाली नको!’’

‘‘नाही हो! मला मुंबईला जायचंय! जरा थांबवा ना गाडी,’’ त्या मुलाची दया येऊन की काय कुणास ठाऊक; पण इथं अधेमधे कुठं स्टॉप नसतानाही ड्रायव्हरनं बस थांबवली. मुलगा पटकन बसमध्ये चढला. गाडीत बसायला जागा नव्हती. पहिल्या सीटवर बसलेल्या त्या तरुणाच्या शेजारी फक्त जागा होती.

‘‘साहेब, जरा बसू का मी तुमच्या शेजारी?’’ मुलगा त्या तरुणाला म्हणाला.

‘‘अरे, जरा का! व्यवस्थित बस,’’ तो मुलगा हसला. कंडक्‍टरनं तिकिटाचे पैसे मागितले, त्यावर तो मुलगा म्हणाला ः ‘‘मास्तर, आज माझ्याकडं पैसे नाहीत; पण तुम्ही नेहमी येता ना या बसनं मुंबईला? मग मी थोड्याच दिवसांत आठवणीनं पैसे देईन तुम्हाला. मी मुंबईत काम-धंद्यासाठीच चाललो आहे. मुंबईत कुणी पोटासाठी गेलं तर ती कुणाला दूर करत नाही, म्हणतात. ती सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवते.’’ 

मुलाचं हे बोलणं ऐकून कंडक्‍टरनं त्याच्याकडं जरा चमत्कारिक नजरेनंच पाहिलं. 

तेवढ्यात ‘‘थांब, थांब, मी देतो तुझे पैसे,’’ असं म्हणत त्या तरुणानं कंडक्‍टरला मुलाच्या तिकिटाचे पैसे दिले.

‘‘बाळ, तुझं नाव काय?’’

‘‘माझं नाव मोहन; पण मला सगळेजण मोन्या म्हणतात... तुम्ही कोण?’’ 

‘‘मी राजेश इनामदार’’

प्रवासात झालेल्या गप्पांमधून राजेशला मोहनबद्दलची माहिती समजली. मोहनला बाबा नव्हते. त्याची आई धुण्या-भांड्याची कामं करून त्याला वाढवत होती. तो चार इयत्ता शिकलाही होता; पण नंतर त्याला शाळा सोडावी लागली. मोहनला मुंबईचं आकर्षण होतं म्हणून आज आईला न सांगताच तो मुंबईला काम-धंद्यासाठी निघाला होता. आईचे कष्ट त्याला कमी करायचे होते. तिला सुखी ठेवायचं होतं. काम-धंदा करून मुंबईहून तिला पैसे पाठवायचे होते.

मोहनमध्ये असलेला आत्मविश्वास व धाडस पाहून राजेश त्याला म्हणाला ः ‘‘हे बघ, तुला शिकायचं आहे ना?’’ 

‘‘नाही, मला पैसे मिळवायचे आहेत.’’

‘‘पण शिकल्याशिवाय तुला नोकरी कोण देणार अन्‌ तुला पैसे कसे मिळणार?’’

‘‘मी मोलमजुरी करीन, स्टेशनवर हमाली करीन आणि आईला पैसे पाठवीन...’’

‘‘मोहन, तू आईला न सांगता मुंबईला निघाला आहेस हे चांगलं नाही केलंस. तू माझ्याकडं चल. माझ्या घरी राहा. मी तुला माझ्या मुलांबरोबर शाळेत पाठवीन. आमची छोटीशी बाग आहे. तुला झाडांना पाणी घालायला आवडेल ना? तुझ्या आईलाही आपण पैसे पाठवू या. शिक्षण, काम आणि आईला पैसे पाठवणं असं सगळंच तुझ्या मनासारखं होईल. तसं तुझ्या आईलाही कळवू आपण...’’

‘‘पण काका, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास का ठेवता?’’ 

‘‘अरे, माझी ओळख नसताना तू मला हे सगळं सांगितलंस ना...म्हणून! एवढ्या लहान वयात तू हे  शहाणपण कुणाकडून शिकलास? 

‘‘आईकडून. म्हणून तर मला तिला सुखात ठेवायचंय.’’

गाडी एका स्टॅंडवर थांबली. दोघांचं बोलणंही थांबलं. 

‘‘मोहन, जा... वडा-पाव खाऊन ये,’’ राजेशनं त्याला पैसे दिले

काही वेळानं मोहन वडा-पाव खाऊन आला.

* * *

गाडी पुन्हा सुरू झाली आणि राजेशची तंद्री लागली...३० वर्षांपूर्वी मीही असाच काम शोधण्यासाठी घराबाहेर पडलो होतो. त्या वेळी मला इनामदारसाहेबांनी आधार दिला नसता तर...काय झालं असतं माझं? एवढ्या मोठ्या मुंबईत मी कुठं गेलो असतो? काय केलं असतं? 

राजेश गतकाळात गेला... 

अगदी छोट्या घरात आई-बाबा आणि मी राहत होतो. बाबा हमाली करायचे. आई अगदी अशक्त आणि नेहमी आजारी असायची. तिच्या औषध-पाण्याचा खर्चही होताच. एखाद्या दिवशी बाबांना काम मिळालं नाही तर आमची उपासमार व्हायची. आमच्या गावातला एक मुलगा मुंबईला एका कारखान्यात कामाला होता. तो गावाला आला असताना एकदा मी त्याला गाठलं आणि माझ्या कामाबाबत विचारलं. 

‘तू मुंबईला ये. मी तुला काम मिळवून देतो,’ असं त्यानं सांगितलं. माझ्या बाबांनाही त्यानं विश्वासात घेऊन सांगितलं. आई-बाबा कसेबसे तयार झाले. आम्ही दोघं मुंबईला आलो. ‘मुंबई सेंट्रल’हून लोकलनं आम्ही अंधेरीला जाणार होतो. अंधेरी स्टेशन आल्यावर तो पटकन खाली उतरला. 

मला चपळाई दाखवून उतरायला जमलंच नाही. शेवटच्या स्टेशनवर उतरून मी त्याची वाट पाहत बसलो. सारख्या लोकल येत होत्या. माणसं उतरत होती-चढत होती; पण तो आलाच नाही. त्यानं मला शोधलंही असेल...पण आमची चुकामूक झाली ती झालीच. मी तर पार गांगरून-घाबरूनच गेलो होतो. भूकही लागली होती आणि घाबरल्यामुळं रडायलाही येत होतं. इतक्‍यात, मध्यम वयाचे एक काका माझ्याजवळ येऊन मला म्हणाले ः ‘बाळ, तुला कुठं जायचंय? एकटाच आहेस का?’ ते प्रेमळ शब्द ऐकल्यावर मला जास्तच भरून आलं. मी त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. 

‘हे बघ, तू आजची रात्र आमच्याकडं येतोस का? उद्या ठरवू तुझं काय करायचं ते’ ते म्हणाले. ंबईसारखं पूर्णपणे अनोळख शहर...हळूहळू पडणारा अंधार आणि लागलेली जोराची भूक यामुळं मी लगेचच तयार झालो. त्यांच्याबरोबर घरी आलो. घरात काकू होत्या. स्टेशनजवळच त्यांचं छोटंसं घर होतं आणि शेजारीच त्यांचा छोटासा कारखानाही होता.

‘काका, मी तुमच्याकडंच घरगडी म्हणून राहू का?’ 

‘नको रे बाळा, तुझं हे शिकायचं वय आहे. मी तुला तुझ्या घरी पोचवतो.’

‘नको, नको...मी इथं राहून शिकेन. तुमच्या कारखान्यात काम करेन,’ त्यांनी माझं ऐकलं. 

- माझ्या आई-बाबांनाही कळवलं. मी त्यांच्याकडं राहून शाळेत जाऊ लागलो. संध्याकाळच्या वेळी मी कारखान्यातही जात असे; पण त्यांनी मला कधीच काम करू दिलं नाही.

मी आता त्यांच्या घरातलाच एक झालो होतो. माझं शिक्षण सुरूच होतं. मी ग्रॅज्युएट झालो. कारखान्यात जाऊ लागलो. काका-काकूंना मूल-बाळ नव्हते. त्यांनी मलाच आपला मुलगा मानलं होतं व त्यासंबंधीची सगळी कायदेशीर पूर्तताही केली होती...त्यामुळं मी ‘राजेश इनामदार’ या नव्या नावानं ओळखला जाऊ लागलो! मी अधूनमधून नव्हे, तर वरचे वर आई-बाबांना भेटायला जात होतो. औषध-पाणी वेळेवर झाल्यामुळं आईची तब्येत आता सुधारली होती. दरम्यान, माझंही लग्न झालं. दोन मुलं झाली. काकांचं वय झाल्यामुळं ते आता फारसे कारखान्यात येत नसत. आई-बाबांचंही वय झालं होतं. गावाकडून शहरात यायला ती दोघंही तयार नव्हती. त्यांना कुठंही फिरता येत नव्हतं. त्यांच्यासाठीच मी चार दिवसांपूर्वी गावाला गेलो होतो. दोघांचीही सगळी व्यवस्था करून, त्यांना फिरायला गाडी, ड्रायव्हर अशी सोय करून आता मुंबईला चाललो होतो...गाडी गावाकडंच ठेवल्यामुळं एसटी बसनंच मुंबईला निघालो होतो. किती विलक्षण योगायोग म्हणायचा हा...याच बसमध्ये माझी आणि मोहनची भेट व्हावी! काहीतरी दैवी संकेतच असावा हा...जे क्षण आपल्यातून निसटून जातात ते कधीच आपले नसतात; पण जे क्षण आपले असतात ते कधीच निसटून जात नाहीत, याची आज इतक्‍या वर्षांनंतर मला पुन्हा एकदा खात्री पटली आहे...

* * *

‘मुंबई सेंट्रल’ला गाडी थांबली आणि राजेश गतकाळातून वर्तमानकाळात आला. -मोहनला आपल्याच घरी न्यायचं, आपल्या मुलांबरोबर त्यालाही शिकवायचं...असं राजेशनं मनाशी पक्कं ठरवलं. आपण ज्या समाजात राहतो, त्याचं काही देणं लागतो...ते ऋण फेडायची संधी आज आपल्याला मिळाली आहे, ती अजिबात सोडायची नाही... कुणी सांगावं, या मोहनच्या रूपानं देवानंच आपल्याला ही संधी दिली असावी. राजेशनं मोहनकडं हसून पाहिलं आणि त्याचा हात धरून तो गाडीतून उतरू लागला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com