आत्मभान - आत्मस्वीकार

डॉ. सुप्रिया जगताप फाळके
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मी कुणापेक्षा लहान नाही व कुणापेक्षाही महान नाही, माझी काही गुणवैशिष्ट्ये इतरांपेक्षा कमी किंवा सरस असू शकतील याच शक्तिस्थानांचा व कमतरतेचा डोळसपणे केलेला स्वीकार; शक्तिस्थानांना अधिक सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न; तसेच कमतरतांना शक्तिस्थानात बदलण्याचा निर्धार हीच आत्मभानाची व आत्मस्वीकाराची प्रथम पायरी आहे.

हृतिक रोशनचा प्रसिद्ध चित्रपट 'लक्ष्य'; त्यातील 'आखिर कैसा हूँ मैं' गाणे पूर्ण चित्रपटाचा गाभा सांगून जाते. आपल्यातील बहुतांश लोकांची अशीच अवस्था असते; गोंधळलेली! आपल्याला काय हवे आहे, काय वाटते आहे याबाबत संदिग्धता असते. नेमका सूरच सापडलेला नसतो. मग भरकटत राहतो आपण.

स्वतःचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झालेले नसतो. बहुतेक वेळा इतरांचे आपल्याबद्दलचे मतच आपले वास्तव बनून जाते. ही इतर मंडळी आपल्या जवळच्या वर्तुळातील असतात. आपल्या आयुष्यातील त्यांचा रोल हा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो आणि म्हणूणच त्यांनी सहज जाता जाता केलेली टिप्पणीसुद्धा आपल्या भावविश्वावर प्रभाव टाकून जाते. आपले व्यक्तिमत्त्व घडत असताना त्यांचा हा प्रभाव अधिक गडद होत जातो. तो इतका नकळत होतो की त्यांच्या काही सवयी, विचार करण्याची, वागण्याची पद्धत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनून जाते. कधी कधी हे अधिक प्रमाणात होऊन आपले स्वतःचे मत, विचार, भावना, अस्तित्व वेगळे आहे याची जाणीव बहुतांशवेळा झालेली नसते. ही जाणीव होणे गरजेचे ठरते कारण ज्या भावनांचे, विचारांचे प्रवाह आपण वाहून नेतो त्यामध्ये आपणास त्रासदायक ठरणारे विचार, भावनादेखील असतात. प्रसंगानुरूप त्यांची बोचरी जाणीव आपणास होतदेखील असते. परंतु त्यांची विशेष नोंद घेऊन योग्य असे बदल करण्याची कृती आपण करत नाही. इतरांनी लावलेल्या लेबलांमध्ये व आपण अंगिकारलेल्या प्रवाहामध्येच आपण जगत राहतो.

काही व्यक्ती भिडस्थ स्वभावामुळे स्वतःचे मत, विचार व्यक्त करू शकत नाहीत. घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची तयारी नसते. त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचे मानसिक धैर्य नसते. अशा व्यक्ती या भीतीमुळे पळवाटा शोधत राहतात. स्वतःच्या मतावर, विचारांवर लक्ष केंद्रित करत नाहीत. काही व्यक्ती इतरांना खूश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवून बसतात. त्यांचा आनंद, आत्मविश्वास हा इतरांनी केलेल्या स्तुतीमध्येच अडकून राहतो. आणि ते इतरांच्या इच्छेनुसार जगू लागतात. दुसऱ्यांच्या आपल्याबद्दलच्या मतावर स्वतःची किंमत ठरवू लागतात.

काही व्यक्ती स्वतःचे विचार, मते याबाबत टोकाच्या आग्रही असतात. प्रसंगी या वर्तनाचा स्वतःस व इतरांना त्रास होतो याची जाणीव होऊनदेखील बदल्याची इच्छा नसते. समोरच्या व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले जाते. यामागे कमीपणा न घेण्याची वृत्ती, इतरांवर सत्ता गाजवण्याची इच्छा, स्वतःचे अनाठायी महत्त्व वाढवून घेण्याची वृत्ती अशी अनेक कारणे असू शकतात. स्वहित जपण्यासाठी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली जाते.
वरील सर्व प्रकारच्या भूमिका स्वतः त्या व्यक्तीसाठी तणाव निर्माण करणाऱ्या असतात. बाह्यघटकांचा आपल्या व्यक्तित्वावर परिणाम होत असला तरी आपण स्वतःचे अर्थ त्यांना देतच असतो.

यासाठी प्रथम आत्मभान येणे गरजेचे आहे. प्रथम माझ्या भावना, विचार, मते यांचा बिनशर्त स्वीकार करणे गरजेचे आहे. मला काय हवे आहे आणि काय नको, याची जाणीव होणे आवश्‍यक आहे. आपण स्वतःचा स्वीकार करण्याचे नाकरले तर इतरांनी आपला स्वीकार करण्याची अपेक्षा कशी काय ठेवू शकतो? आपल्यात हवा तसा बदल करणे हे पूर्णपणे आपल्या हातात असते. 'व्यक्तिमत्त्व' ही प्रवाही प्रक्रिया आहे. तिला विशिष्ट गुणधर्मांचे लेबल लावणे म्हणजे व्यक्तिमत्त्वातले काही घटक आपण स्वतःच्या इच्छानुसार बदलू शकतो या शक्‍यतेला नकार दिल्यासारखे होते. 'आत्मभान व आत्मस्वीकार' ही प्रवाही प्रक्रिया आहे. प्रसंगानुरूप सतत बदलत राहणारी. स्वतःच्या क्षमता, कमतरता यांचे योग्य भान असणारे, समोरच्या परिस्थितीवर योग्य पर्याय शोधणारे, सुख-दुःख दोन्ही भावनांना 'आपले' म्हणून स्वीकारणारे, कधी स्वतःकडे अंतर्मुख होऊन बघणारे आणि त्यांची सांगड इतरांबरोबरच्या व्यवहाराशी घालणारे व्यक्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मला माझ्याबद्दल काय वाटते हा मानसिक आरोग्यातील एक मूलभूत दृष्टिकोन आहे.

मी कुणापेक्षा लहान नाही व कुणापेक्षाही महान नाही, माझी काही गुणवैशिष्ट्ये इतरांपेक्षा कमी किंवा सरस असू शकतील याच शक्तिस्थानांचा व कमतरतेचा डोळसपणे केलेला स्वीकार; शक्तिस्थानांना अधिक सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न; तसेच कमतरतांना शक्तिस्थानात बदलण्याचा निर्धार हीच आत्मभानाची व आत्मस्वीकाराची प्रथम पायरी आहे.

Web Title: marathi news dr supriya jagtap phalke writes on self acceptance

टॅग्स